युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री श्री अनुराग सिंह ठाकूर यांनी केला देशव्यापी फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 ला प्रारंभ


आरोग्यसंपन्न आणि तंदुरुस्त भारतासाठी युवा मन, शरीर आणि आत्मा हे महत्वाचे पैलू- अनुराग ठाकूर

देशातल्या सुमारे 750 जिल्ह्यात फिट इंडिया फ्रीडम रन चे आयोजन,  प्रत्येक जिल्ह्यातल्या 75 गावात फिट इंडिया फ्रीडम रन– क्रीडा मंत्री

Posted On: 13 AUG 2021 6:07PM by PIB Mumbai


 

ठळक मुद्दे :

  • स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून फिट इंडिया फ्रीडम रनचे आयोजन
  • नव्या भारताला तंदुरुस्त करण्यासाठी श्री अनुरागसिंह ठाकूर यांनी दिली तंदुरुस्त राहण्याची प्रतिज्ञा
  • एक 'फिट इंडिया' एक 'हिट इंडिया' बनवेल: श्री अनुराग ठाकूर
  • युवा व्यवहार  आणि क्रीडा राज्यमंत्री  निसिथ प्रामाणिक यांनीही ऐतिहासिक ठिकाणी सहभागींशी साधला संवाद

भारताच्या स्वातंत्र्याची  75 वर्षे साजरी करणाऱ्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा  एक भाग म्हणून केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री श्री अनुराग सिंह ठाकूर आणि युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री  निसिथ प्रामाणिक यांनी 13 ऑगस्ट रोजी देशव्यापी फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 या कार्यक्रमाचा आरंभ केला. क्रीडा विभागाचे  सचिव श्री रवी मित्तल आणि युवा व्यवहार विभागाच्या सचिव श्रीमती उषा शर्मा यावेळी उपस्थित होत्या.

केंद्रीय मंत्र्यांनी दिल्लीच्या मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियममधून फ्रीडम रन ला  हिरवा झेंडा दाखवला आणि स्टेडियममध्ये फ्रीडम रन मध्ये सहभाग घेतला. पोर्ट ब्लेअरमधील सेल्युलर जेल सारख्या ऐतिहासिक स्थळांसह लाहौल स्पितीमधील काझा पोस्ट; मुंबईचे गेट वे ऑफ इंडिया आणि पंजाबमधील अटारी सीमा यांसारख्या देशभरातील इतर 75 ठिकाणीही हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

श्री अनुराग सिंह ठाकूर यांनी फिट इंडिया फ्रीडम रनमध्ये सहभागी होऊन ,नव्या भारताला तंदुरुस्त  बनवण्यासाठी तंदुरुस्त राहण्याची प्रतिज्ञा दिली.स्वातंत्र्याच्या महोत्सवाचा एक भाग म्हणून फिट इंडिया फ्रीडम रन २.० च्या प्रारंभावेळी क्रीडामंत्र्यांनी सहभागींसह राष्ट्रगीत गायले.

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने आपल्या स्वातंत्र्य सेनानींचा गौरव करत मार्शल नृत्य सादर करून या कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यानंतर मंत्र्यांनी सशस्त्र आणि निमलष्करी दलांच्या सदस्यांशी आणि नेहरू युवा केंद्र संघटनेतील (एन वाय के एस ) स्वयंसेवकांशी आभासी माध्यमाद्वारे  संवाद साधला आणि आणि केवळ देशाचे संरक्षण करण्यासाठीच नव्हे तर तरुणांना त्यांच्या जीवनाचा नियमित भाग म्हणून तंदुरुस्त राहण्यासाठी  प्रोत्साहित केल्याबद्दल त्यांची प्रशंसा केली.

देशभरातील विविध ऐतिहासिक स्थळांवरील  सहभागींशी संवाद साधताना क्रीडा मंत्री म्हणाले की, भारत स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत असताना, स्वातंत्र्याच्या महोत्सवाचा भाग म्हणून फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 मोहीम आयोजित केली  आहे.ते पुढे म्हणाले कीज्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले त्या राष्ट्रीय नायकांशी देखील देशाला  फ्रीडम रन हा कार्यक्रम जोडेल. आगामी 25 वर्षात आपले राष्ट्र कोणता आकार आणि दिशा घेईल हे आपण किती तंदुरुस्त आहोत यावर अवलंबून आहे, असे मंत्री म्हणाले.तरुण मन, शरीर आणि आत्मा हे निरोगी आणि तंदुरुस्त भारताचे प्रमुख पैलू आहेत'' याचा मंत्र्यानी पुनरुच्चार केला. केवळ 'फिट इंडिया'  'हिट इंडिया' बनवेल, असेही मंत्री म्हणाले.श्री अनुराग ठाकूर यांनी प्रत्येक नागरिकाला या चळवळीचा भाग होण्याचे  आवाहन केले. फिट इंडियाला जनचळवळ करण्याचे आवाहन  पंतप्रधानांनी सगळ्यांना केले आहे, जे केवळ लोकांच्या सहभागामुळे शक्य आहे.मी प्रत्येकाला त्यांच्या आवडीचे ठिकाण आणि धावण्याची गती निवडण्याचे आणि या ऐतिहासिक चालवळेचा भाग होण्याचे आवाहन करतो, असे मंत्री म्हणाले.

आसाममधील सीमा सुरक्षा दलाच्या जवानांशी संवाद साधताना मंत्री श्री अनुराग ठाकूर म्हणाले की, भारत स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत असताना 75 ठिकाणचे लोक या चळवळीत सहभागी  होतील आणि ही चळवळ प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचेल. अटारी सीमेवरून सीमा सुरक्षा दलाचे जवान यात सहभागी झाले आणि भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतानाच फिट इंडिया चळवळ प्रत्येक गावात घेऊन जाण्याचे आवाहन या संवादादरम्यान मंत्र्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना केले.

केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान अलाहाबादच्या आझाद पार्कमधून सहभागी झाले. युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री श्री निसिथ  प्रामाणिक यांनी त्यांच्या संवादादरम्यान  फिट इंडिया चळवळीत सहभागी झाल्याबद्दल कर्मचाऱ्यांचे आभार मानले आणि पंतप्रधानांचे नव्या भारताचे , तंदुरुस्त भारताचे  स्वप्न साकार करण्याचे आवाहन केले.

त्यांनतर प्रसारमाध्यमांशी बोलताना श्री अनुराग ठाकूर म्हणाले स्वातंत्र्याचा  अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी आणि देशातील तरुणांना तंदुरुस्तीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी आम्ही आज फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 चा प्रारंभ केला. देशभरातील 75 ऐतिहासिक ठिकाणी ही फ्रीडम रन कार्यक्रम आयोजित केला आहे ,जो पुढे देशाच्या सुमारे 750 जिल्ह्यांतील 75 गावांमध्ये आयोजित केला जाईल  आणि 'फिटनेस की डोज ,आधा घंटा रोजमोहिमेला प्रोत्साहन देईल. यासह, पंतप्रधानांच्या तंदुरुस्तीसाठीच्या चळवळीला देशाच्या प्रत्येक भागापर्यंत नेण्याचे आणि तिला  जन तंदुरुस्त चळवळ बनवण्याचे आमचे ध्येय आहे.फ्रीडम रन ओपचारिकपणे 15 ऑगस्ट रोजी सुरू होईल आणि 2 ऑक्टोबर 2021 पर्यंत चालणार आहे.याच्या माध्यमातृन  देशभरातील 7.50 कोटींहून अधिक तरुण आणि नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे आमचे लक्ष्य आहे.

यावेळी बोलताना श्री निसीथ प्रमाणिक यांनी कार्यक्रमातील सर्व सहभागींचे आभार मानले आणि सांगितले की, की नव्या भारताला तंदुरुस्त भारत बनविणे हे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे आणि हे स्वप्न साकार करण्यासाठी फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 महत्वाची भूमिका बजावेल.

क्रीडा सचिव श्री रवी मित्तल यांनी सांगितले की, 2 ऑक्टोबर 2021 पर्यंत प्रत्येक आठवड्यात 75 जिल्ह्यांमध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यातील 75 गावांमध्ये फिट इंडिया फ्रीडम रन  आयोजित केली जात आहे. लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात ,धावणे आणि खेळ यासारखे तंदुरुस्तीसाठीचे  उपक्रम हाती  घेण्यास प्रोत्साहित करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.

फिट इंडिया फ्रीडम रन २.० च्या प्रमुख उपक्रमांमध्ये प्रतिज्ञा, राष्ट्रगीत सादर करणे, फ्रीडम रन, कार्यक्रमस्थळी सांस्कृतिक कार्यक्रम, युवा स्वयंसेवकांमध्ये सहभागी होण्यासाठी जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्या गावांमध्ये अशाचप्रकारच्या फ्रीडम रनचे आयोजन करणे हे समाविष्ट आहे. लोक फिट इंडिया पोर्टल https://fitindia.gov.in  वर आपल्या  फ्रीडम रन ची नोंदणी करू शकतात आणि अपलोड करू शकतात आणि #Run4India आणि #AzadikaAmritMahotsav या हॅशटॅग सह  त्यांच्या समाजमाध्यमांवर फ्रीडम रन कार्यक्रमाला प्रोत्साहन देऊ शकतात.

विविध स्तरांवर या कार्यक्रमांना उपस्थित राहून लोकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी, प्रोत्साहित आणि प्रेरित करण्यासाठी प्रतिष्ठित लोक लोकप्रतिनिधी, पीआरआय नेते, सामाजिक कार्यकर्ते, क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती, प्रसारमाध्यमे, डॉक्टर, शेतकरी आणि लष्कराच्या जवानांना विनंती केली जात आहे. कोविड -19   शिष्टाचाराचे  पालन करून संपूर्ण देशात प्रत्यक्ष आणि आभासी माध्यमातून  कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.

***

Jaydevi PS/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1745514) Visitor Counter : 367