गृह मंत्रालय
आरोग्य सुविधा केंद्रांत, विशेषतः कोविड-19 उपचार केंद्रात आग लागण्याच्या घटना घडू नयेत यासाठी कृती आराखडा तयार करण्याची गरज- केंद्रीय गृहमंत्रालयाची सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सूचना
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी रुग्णालये आणि कोविड समर्पित केंद्रांसह सर्व वैद्यकीय सुविधा केंद्रांना अखंड आणि सुरळीत वीजपुरवठा सुनिश्चित करण्याची गरज –केंद्रीय गृहमंत्रालय
Posted On:
05 MAY 2021 4:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 मे 2021
अलीकडच्या काळात काही राज्यांमधील रुग्णालयांमध्ये तसेच शुश्रुषा केंद्रात शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याच्या घटनांकडे गृहमंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे लक्ष वेधले आहे.
या संदर्भात सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासकांना पाठवलेल्या पत्रात केंद्रीय गृहसचिवांनी म्हटले आहे, की अलीकडच्या काळात ज्या आग लागण्याच्या घटना घडल्या त्या लक्षात घेत विशेषतः उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर, कदाचित उष्ण तापमानामुळे, देखभालीचा अभाव किंवा सुविधा केंद्रांमध्ये अंतर्गत वायरिंगवर पडलेला भार या सगळ्यामुळे शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे आग लागणे त्यात जीवित आणि वित्तहानी होण्याचा धोका निर्माण होतो, त्यामुळे याकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे.
सरकारी आणि खाजगी आरोग्य सुविधा केंद्रे, विशेषत: कोविड समर्पित आरोग्य केंद्रांमध्ये आग लागण्याची एकही घटना घडू नये यादृष्टीने एक कृती आराखडा तयार करण्याची गरज आहे, असेही या पत्रात पुढे म्हटले आहे.
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी याबाबत आरोग्य, उर्जा आणि अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन एक सविस्तर आढावा घ्यावा आणि त्या आधारावर सर्व रुग्णालये तसेच आरोग्य सुविधा केंद्रांसाठी अग्नीसुरक्षाविषयक कृती आराखडा तयार करावा, अशी सूचना, गृहमंत्रालयाने केली आहे.
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी विविध स्तरावरील अधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत की त्यांनी सर्व रुग्णालये आणि आरोग्य केंद्रात जाऊन, अंतर्गत वायरींची स्थिती तसेच सुक्षा उपकरणे कार्यरत आहेत की नाही, याची तपासणी करावी. तसेच यात कुठे त्रुटी आढळल्यास, त्वरित सुधारणा केल्या जाव्यात, अशी विनंतीही या पत्रात करण्यात आली आहे.
रूग्णालये आणि शुश्रुषा केंद्रांमध्ये अग्निसुरक्षा व्यवस्थेबाबत अलीकडेच गृहमंत्रालयाने अग्नीशमन सेवा, नागरी संरक्षण आणि होम गार्ड विभागाच्या महासंचालकांना पाठवलेल्या मार्गदर्शक सूचनांकडेही या पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे.
देशातले बहुसंख्य कोविड रुग्ण सध्या कोविडसाठी समर्पित आरोग्य सुविधा केंद्रातच उपचार घेत आहेत, याचा उल्लेखही या पत्रात करण्यात आला आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजन युक्त बेड, अतिदक्षता बेड आणि व्हेंटीलेटर्स तसेच अतिदक्षता विभागातील उपचारांसाठी गरज असते. हे लक्षात घेऊन, सर्व रुग्णालये आणि आरोग्य सुविधा केंद्रात, अविरत-अखंड वीजपुरवठा राहील हे सुनिश्चित करावे, अशी सूचना या पत्रात करण्यात आली आहे.
त्याशिवाय, प्रत्येक जीव वाचवणे याला सध्या सर्वाधिक प्राधान्य आहे आणि त्यामुळेच, प्रत्येक आरोग्य सुविधा केंद्रात कोविड व्यवस्थापनासाठी आवश्यक त्या सर्व औषधांसह इतर आरोग्य साधनांचा पुरवठा करण्याकडे लक्ष द्यावे. तसेच भविष्यात कुठल्याही अनुचित घटना होऊ नयेत, यासाठी आधीच काळजी घेतली जावी, असेही या पत्रात सांगण्यात आले आहे.
* * *
S.Tupe/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1716218)
Visitor Counter : 305
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam