पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औषध निर्मिती क्षेत्रातल्या प्रमुखांशी साधला संवाद

Posted On: 19 APR 2021 8:08PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औषध निर्मिती क्षेत्रातल्या प्रमुखांशी दूर दृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. कोरोना महामारीविरोधातल्या लढ्यात औषध निर्मिती क्षेत्राच्या महत्वाच्या भूमिकेची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.

सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीतही औषधनिर्मिती क्षेत्र ज्या झपाट्याने काम करत आहे त्याचे पंतप्रधानांनी कौतुक केले.      औषधनिर्मिती क्षेत्राच्या प्रयत्नांमुळे आज भारत ‘जगाचे औषधालय’ म्हणून ओळखला जात असल्याचे ते म्हणाले. महामारीच्या काळात 150 पेक्षा जास्त देशांना आवश्यक औषधांचा पुरवठा आपण केला. इतकी आव्हाने असूनही भारतीय औषधनिर्मिती क्षेत्राने गेल्या वर्षात  निर्यातीत 18 टक्के वाढ दर्शवली असे सांगून यातून या क्षेत्राची क्षमता दिसून येत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आणि वाढत्या रुग्ण संख्येचा उल्लेख करत, अनेक आवश्यक औषधांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी या उद्योगाने केलेल्या प्रयत्नांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. रेमडेसिवीर सारख्या इंजेक्शनच्या किमती कमी केल्याबद्दलही त्यांनी प्रशंसा केली. औषधे आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणे यांचा पुरवठा सुरळीत राखण्यासाठी अखंड पुरवठा साखळी  सुनिश्चित करण्याचे आवाहन त्यांनी औषध निर्मिती क्षेत्राला केले. लॉजीस्टिक आणि वाहतूक सुविधांना सरकार सर्वतोपरी सहाय्य करेल असे आश्वासन त्यांनी दिले.  

कोविडसह  भविष्यात येऊ शकणाऱ्या सर्वच धोक्याबाबत  अधिकाधिक संशोधन करण्याचे आवाहन त्यांनी या उद्योगाला केले. यामुळे विषाणूविरोधातल्या आपल्या लढ्याला मदत मिळेल.

औषध निर्मिती क्षेत्राच्या सहकार्याची अपेक्षा करतानाच नवी औषधे आणि नियामक प्रक्रियेत सरकार सुधारणा हाती घेत असल्याचे त्यांनी सांगितले.  

सरकारकडून तत्परतेने मिळत असलेली मदत आणि सहाय्य याबद्दल या क्षेत्रातल्या प्रमुखांनी सरकारची प्रशंसा केली. गेल्या एक वर्षात उत्पादन आणि लॉजीस्टिक सुरळीत राखत औषध उपलब्धता सुनिश्चित ठेवण्यासाठीचे प्रयत्न त्यांनी अधोरेखित केले. उत्पादन,वाहतूक, लॉजीस्टिक आणि सहाय्यक सेवासाठी औषध निर्मिती हब मध्ये कार्यान्वयन सर्वोच्च पातळीवर ठेवण्यात आले आहे. कोविड उपचार नियमावलीशी संबंधित काही औषधांच्या मागणीत अभूतपूर्व वाढ झाली असूनही त्याची पूर्तता करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी देण्यात आली.

केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन, केन्द्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री अश्विनी कुमार चौबे, केंद्रीय रसायन आणि खत  मंत्री डी व्ही सदानंद गौड़ा, रसायन आणि खत  राज्य मंत्री मनसुख मांडवीय , पंतप्रधानांचे प्रधान सचिव, डॉ. व्ही . के. पॉल, सदस्य (एच) नीती आयोग, कॅबिनेट सचिव, केंद्रीय आरोग्य सचिव, केंद्रीय औषधनिर्माण सचिव, आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव, यांच्या सह केंद्र सरकारच्या  मंत्रालय आणि विभागांचे इतर अधिकारी बैठकीत सहभागी झाले होते.

 

***

Jaydevi PS/NC/CY

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1712821) Visitor Counter : 175