पंतप्रधान कार्यालय
ईस्टर्न डेडीकेटेड फ्रेट कॉरीडॉरच्या न्यू भाऊपुर – न्यू खुर्जा टप्याच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन
Posted On:
29 DEC 2020 11:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 डिसेंबर 2020
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल,मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ,केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल, संसदेतले माझे सहकारी, उत्तर प्रदेश सरकार मधले मंत्रीगण, कार्यक्रमाशी संबंधित सर्व मान्यवर, बंधू-भगिनीनो,
आजचा दिवस, भारतीय रेल्वेच्या गौरवास्पद इतिहासाला 21 व्या शतकाची नवी ओळख देणारा आहे, भारत आणि भारतीय रेल्वेचे सामर्थ्य वृद्धिगत करणारा आहे. स्वातंत्र्यानंतर सर्वात मोठा आणि आधुनिक रेल्वे पायाभूत प्रकल्प साकार झालेला आपण पाहत आहोत.
मित्रहो, जेव्हा खुर्जा- भाऊ माल वाहतूक मार्गिकेवर पहिली मालगाडी धावली तेव्हा त्यामध्ये नवभारताचा, आत्मनिर्भर भारताचा हुंकार आणि गर्जना स्पष्ट ऐकायला मिळाली. प्रयागराज मधले कार्यान्वयन नियंत्रण केंद्रही नव भारताच्या सामर्थ्याचे प्रतिक आहे.जगातल्या अत्युत्तम आणि आधुनिक नियंत्रण केंद्रापैकी एक हे केंद्र आहे. यामध्ये व्यवस्थापन आणि डेटा यांच्याशी संबंधित जे तंत्रज्ञान आहे ते भारतात निर्माण करण्यात आले आहे, भारतीयांनी ते तयार केले आहे हे ऐकून कोणालाही अभिमानच वाटेल.
बंधू आणि भगिनीनो,
पायाभूत संरचना कोणत्याही राष्ट्राच्या सामर्थ्याचा सर्वात मोठा स्त्रोत असतो.पायाभूत सुविधामधेही कनेक्टीविटी म्हणजे राष्ट्राच्या जीवनवाहिन्या असतात. या वाहिन्या जितक्या उत्तम तितकेच राष्ट्र संपन्न. आज भारत, जगातली मोठी आर्थिक शक्ती बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे अशा वेळी उत्तम कनेक्टीव्हिटीला देशाचे प्राधान्य आहे. हाच विचार घेऊन गेल्या सहा वर्षात भारतात आधुनिक कनेक्टीविटी बाबतच्या प्रत्येक पैलूवर लक्ष केंद्रित करत काम करण्यात येत आहे. महामार्ग असोत, रेल्वे असो, हवाई मार्ग असो, जलमार्ग असो किंवा आय-वे असो आर्थिक गतीसाठी आवश्यक असलेल्या या पाच चाकांना ताकद दिली जात आहे, गती दिली जात आहे. ईस्टर्न डेडीकेटेड फ्रेट कॉरीडॉरच्या एका मोठ्या भागाचे लोकार्पण म्हणजे या दिशेने मोठे पाऊल आहे.
मित्रहो,
डेडीकेटेड फ्रेट कॉरीडॉर, बोली भाषेत सांगायचे झाले तर मालगाड्यांसाठी तयार करण्यात आलेली विशेष मार्गिका आहे, विशेष व्यवस्था आहे. याची आवश्यकता देशाला का भासली? आपली शेते असोत किंवा उद्योग किंवा बाजार हे सर्व घटक माल वाहतुकीवर अवलंबून असतात. कोठे उगवलेले पिक देशाच्या वेग-वेगळ्या भागात पोहोचवायचे असते. निर्यातीसाठी बंदरांपर्यंत पोहोचवावे लागते.या सर्वामध्ये सर्वात मोठे माध्यम नेहमीच रेल्वे राहिले आहे. जस-जशी लोकसंख्या वाढली, अर्थव्यवस्था विस्तारली त्या बरोबर माल वाहतुकीच्या या जाळ्यावरचा दबाव वाढू लागला. समस्या अशी होती की आपल्या इथे प्रवासी रेल्वे आणि मालवाहू रेल्वे या दोन्ही गाड्या त्याच रेल्वे मार्गावरून धावत असत. मालगाडीचा वेग कमी असतो. मालगाड्याना रस्ता देण्यासाठी प्रवासी गाड्या स्थानकावर थांबवल्या जातात.यामुळे प्रवासी गाड्याही वेळेवर पोहोचू शकत नाहीत आणि मालगाड्यानाही उशीर होतो. मालगाडीची गती जेव्हा कमी होईल, जागोजागी ती थांबत जाईल तेव्हा वाहतूक खर्च जास्त येईल हे नक्कीच. याचा थेट संबंध आपली शेती,खनिज उत्पादन आणि औद्योगिक उत्पादनांच्या किमतीवर पडतो. ही उत्पादने महाग असल्यामुळे देश-विदेशातल्या बाजारपेठेतल्या स्पर्धेत ती टिकाव धरू शकत नाहीत.
बंधू आणि भगिनीनो,
ही परिस्थिती बदलण्यासाठी मालवाहतूक मार्गिकेची योजना तयर करण्यात आली. सुरवातीला 2 समर्पित मालवाहतूक मार्गिका तयार करण्याची योजना आहे. पूर्व समर्पित मालवाहतूक मार्गिका पंजाबचे औद्योगिक शहर लुधियानाला, पश्चिम बंगालच्या दानकुनीशी जोडत आहे. शेकडो किलोमीटर लांबीच्या या मार्गावर कोळसा खाणी, औष्णिक विद्युतकेंद्रे, औद्योगिक शहरे आहेत. यासाठी उपमार्गही निर्माण करण्यात येत आहेत.पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिका, महाराष्ट्राच्या जेएनपीटीला उत्तर प्रदेशच्या दादरीशी जोडते. सुमारे 1500 किलोमीटरच्या या मार्गिकेमध्ये गुजरातच्या मुंद्रा, कांडला, पिपावाव, दहेज आणि हजीराच्या मोठ्या बंदरांसाठी उपमार्ग असतील.या दोन्ही मालवाहतूक मार्गीकांच्या जवळच्या भागात दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरीडॉर आणि अमृतसर-कोलकाता औद्योगिक कॉरीडॉरही विकसित करण्यात येत आहेत. अशाच प्रकारे उत्तर आणि दक्षिण तसेच पूर्व आणि पश्चिम यांना जोडणाऱ्या अशा विशेष रेल्वे कॉरिडॉरशी संबंधित आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहेत.
बंधू आणि भगिनीनो,
मालगाड्यांसाठी तयार करण्यात आलेल्या या विशेष सुविधामुळे भारतात प्रवासी गाड्या उशिराने धावण्याची समस्या कमी होईल.दुसरे म्हणजे मालगाड्यांचा वेगही तिप्पट होईल आणि मालगाड्या दुप्पट सामानाची वाहतूक करू शकतील. कारण या मार्गावर गाड्या डबल डेकर म्हणजे डब्यावर डबा अशा चालवता येऊ शकतील. मालगाड्या जेव्हा वेळेवर पोहोचतील तेव्हा आपले लॉजिस्टिक नेटवर्क स्वस्त होईल.सामान पोहोचवण्याचा खर्च कमी झाल्याने सामान स्वस्त होईल, त्याचा आपल्या निर्यातीला फायदा होईल. इतकेच नव्हे तर देशाच्या उद्योग क्षेत्रासाठी उत्तम वातावरण निर्माण होईल.व्यवसाय सुलभता वाढेल, गुंतवणुकीसाठी भारत अधिक आकर्षक ठरेल.देशात रोजगाराच्या, स्वयंरोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील.
मित्रहो,
या मालवाहतूक मार्गिका भारताचे मोठे माध्यम ठरतील. उद्योग असो, व्यापार असो, शेतकरी असो किंवा ग्राहक, सर्वाना याचा लाभ मिळणार आहे. लुधियाना आणि वाराणसीचा कपडा निर्माता असो,किंवा फिरोजपुर मधला शेतकरी,अलीगढ़ मधला कुलूप निर्माता असो किंवा राजस्थान मधला संगमरमराचा व्यापारी, मलिहाबादचा आंबा उत्पादक असो किंवा कानपुर आणि आग्रा इथला चामडा उद्योग, भदोही इथला गालीचा उद्योग असो किंवा फरीदाबाद मधला कार उद्योग प्रत्येकासाठी संधीच संधी आणल्या आहेत. विशेषकरून औद्योगिक क्षेत्रात मागे पडलेल्या पूर्व भारताला ही मालवाहतूक मार्गिका नवी उर्जा प्राप्त करून देणार आहे. याचा सुमारे 60 टक्के भाग उत्तर प्रदेशात आहे,म्हणून उत्तर प्रदेशातल्या प्रत्येक छोट्या-मोठ्या उद्योगाला याचा लाभ होईल. देश आणि विदेशाच्या उद्योगांमध्ये मागच्या वर्षात उत्तर प्रदेशाबाबत आकर्षण वाढले आहे ते वाढीला लागेल.
बंधू आणि भगिनींनो,
या समर्पित मालवाहतूक मार्गिकेचा लाभ किसान रेल्वेलाही होणार आहे.कालच देशातली 100 वी किसान रेल्वे धावली, किसान रेल्वे मुळे कृषी माल देशभरातल्या मोठ्या बाजारपेठेत सुरक्षित आणि कमी किमतीत पोहोचवणे शक्य झाले आहे. आता नव्या मालवाहतूक कॉरीडॉरमुळे किसान रेल्वे अधिक गतीने आपल्या गंतव्य स्थानी पोहोचू शकेल. उत्तर प्रदेशातही किसान रेल्वेने अनेक स्थानके जोडली गेली आहेत आणि यामध्ये सातत्याने वाढ करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशातल्या स्थानकांजवळ साठवणूक आणि शीत गोदामांची क्षमता वाढवण्यात येत आहे.उत्तर प्रदेशातली 45 माल गोदामे आधुनिक सुविधांनी युक्त करण्यात आली आहेत. याशिवाय राज्यात मालासाठी 8 नव्या शेड निर्माण करण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेशात वाराणसी आणि गाज़ीपुर मध्ये दोन मोठी नाशवंत माल केंद्रे शेतकऱ्यांना सेवा देत आहेत.यामध्ये अतिशय कमी दरात शेतकरी फळे-भाजीपाला यासारख्या नाशवंत मालाची साठवणूक करू शकतात.
मित्रहो, अशा प्रकारच्या पायाभूत सुविधांनी देशाचा इतका फायदा होत आहे तर यासाठी इतका उशीर का असा प्रश्न उपस्थित होतो.हा प्रकल्प म्हणजे 2014 च्या आधी जे सरकार होते त्याच्या कार्य पद्धतीचे जिवंत उदाहरण आहे. 2006 मध्ये या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर केवळ कागदपत्रे आणि फायलींमध्ये हा प्रकल्प अडकून पडला. राज्यांशी ज्या गांभीर्याने चर्चा अपेक्षित होती, ज्या तातडीने संवाद व्हायला हवा होता तो झालाच नाही. परिणामी हे काम अडकले, रेंगाळले आणि भरकटले. या प्रकल्पातला 2014 पर्यंत एक किलोमीटरचा रेल्वे मार्गही तयार झाला नाही. जो निधी मंजूर झाला होता तो योग्य पद्धतीने खर्च करण्यात आला नाही.
मित्रहो,
2014 मध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर हा प्रकल्प फायलींच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आला. अधिकाऱ्यांना नव्या जोमाने पुढे जाण्यासाठी सांगण्यात आले, तेव्हा बजेट 11 पट म्हणजे 45 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढले होते. प्रगती बैठकात मी स्वतः यावर देखरेख ठेवली, संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधला, पुनरावलोकन केले. केंद्र सरकारने राज्य सरकारांशी संपर्क वाढवला.त्यांना प्रोत्साहित केले. नवे तंत्रज्ञान आणले. याचाच परिणाम म्हणजे येत्या काही महिन्यात सुमारे 1100 किलोमीटरचे काम पूर्ण होईल. विचार करा, 8 वर्षात एक किलोमीटरही नाही आणि 6-7 वर्षात 1100 किलोमीटर.
बंधू-भगिनीनो,
पायाभूत सुविधांबद्दल राजकीय उदासीनतेचे नुकसान केवळ मालवाहतूक मार्गीकेलाच झाले असे नव्हे तर रेल्वेशी संबंधित संपूर्ण रेल्वे यंत्रणा याचा परिणाम झेलत आहे. यापूर्वी रेल्वे फेऱ्यांची संख्या वाढवण्यावर भर देत असत, म्हणजे त्याचा फायदा निवडणुकीत व्हावा मात्र ज्या रुळांवरून रेल्वे चालणार आहे त्यावर काही गुंतवणूक करण्यात येत नसे. रेल्वे नेटवर्कच्या आधुनिकीकरणाबाबत गांभीर्यच नव्हते. आपल्या गाड्यांचा वेग अतिशय कमी होता.
मित्रहो,
2014 मध्ये सत्तेवर आल्यानंतर आम्ही कार्यशैली बदलली, विचार पद्धती बदलली. स्वतंत्र रेल्वे बजेट ही व्यवस्था नष्ट करत, घोषणा करा आणि विसरून जा ही आधी होती ती राजनीती बदलली. आम्ही रेल्वे मार्गांसाठी गुंतवणूक केली. वेगवान गाड्यांसाठी रेल्वे मार्गाना सज्ज केले. रेल्वे जाळ्याचा विस्तार आणि विद्युतीकरण केले. आज वंदे भारत एक्सप्रेस सारख्या अर्ध वेगवान गाड्याही धावत आहेत आणि भारतीय रेल्वे आधीपेक्षा खूपच सुरक्षितही झाली आहे.
मित्रहो,
मागच्या वर्षांमध्ये रेल्वेमध्ये प्रत्येक स्तरावर सुधारणा करण्यात आल्या आहेत. स्वच्छता असो, जेवणाखाण्याची उत्तम व्यवस्था असो किंवा दुसऱ्या सुविधा असोत, आज आपल्याला फरक स्पष्ट दिसेल.याच प्रमाणे रेल्वेशी संबंधित निर्मितीमध्ये भारताने आत्मनिर्भरतेची झेप घेतली आहे. आधुनिक रेल्वेची निर्मिती भारत आपल्यासाठीही करत आहे आणि निर्यातही करत आहे.उत्तर प्रदेशाकडे पहिले तर वाराणसी मधले लोकोमोटिव वर्क्स, भारतातले इलेक्ट्रिक इंजिन निर्मितीचे मोठे केंद्र तयार होत आहे.
रायबरेली च्या मॉडर्न कोच कारखान्यातही आम्ही गेल्या सहा वर्षात बदल घडवत इथे आतापर्यंत 5 हजारपेक्षा जास्त नवे रेल्वे डबे निर्माण करण्यात आले आहेत. इथे निर्माण करण्यात आलेले रेल्वे डबे आता विदेशातही निर्यात करण्यात येत आहेत.
बंधू-भगिनीनो,
देशाच्या पायाभूत सुविधा राजकारणापासून दूर ठेवल्या पाहिजेत, देशाच्या पायाभूत सुविधा एखाद्या राजकीय पक्षाची विचारधारेचा नव्हे तर देशाच्या विकासाचा मार्ग असतो.हे 5 वर्षाच्या राजकारणाचे नव्हे तर भावी पिढ्यांना लाभ देणारे मिशन आहे. राजकीय पक्षांना स्पर्धा करायचीच असेल तर पायाभूत सुविधांच्या दर्जाबाबत स्पर्धा करा, वेग आणि व्याप्ती याबाबत स्पर्धा करा.मी इथे आणखी एका मानसिकतेचा उल्लेख करू इच्छितो, जी आपल्याला अनेक आंदोलनादरम्यान दिसते. ही मानसिकता देशाच्या पायाभूत सुविधांचे नुकसान पोहोचवण्याची आहे. आपल्याला लक्षात घेतले पाहिजे की या पायाभूत सुविधा, ही संपत्ती कोण नेत्याची, कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्या सरकारची नाही. ही देशाची संपत्ती आहे. प्रत्येक गरीब , प्रत्येक करदाता, मध्यम वर्ग, समाजाच्या प्रत्येक वर्गाच्या निढळाच्या घामाने ही निर्माण झाली आहे. याचे होणारे नुकसान म्हणजे देशाचा गरीब, देशाच्या सामान्य जनतेचे नुकसान आहे. म्हणूनच लोकशाहीमधला आपला अधिकार बजावताना आपल्याला आपल्या राष्ट्रीय उत्तरदायित्वाचे विस्मरण होता कामा नये.
मित्रहो,
ज्या रेल्वेला अनेकदा लक्ष्य केले जाते ती रेल्वे, कोणत्या सेवा-भावाने कठीण परिस्थतीत देशाच्या कामी येते हे आपण कोरोना काळात पाहिले आहे. कठीण परिस्थितीत अडकलेल्या मजुरांना आपल्या गावी पोहोचवणे असो, औषधे आणि रेशन देशाच्या काना-कोपऱ्यात पोहोचवणे असो, फिरते कोरोना रुग्णालय यासारखी सुविधा असो, रेल्वेचे संपूर्ण जाळे, सर्व कर्मचाऱ्यांचा सेवाभाव देशाच्या सदैव स्मरणात राहील. इतकेच नव्हे तर बाहेरगावाहून परतलेल्या मजुरांसाठी 1 लाखाहून अधिक रोजगारांची निर्मितीही केली आहे.
सेवा, सद्भावना आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी एकनिष्ठ प्रयत्नांचे हे मिशन अखंड सुरु राहील याचा मला विश्वास आहे.
उत्तर प्रदेशासह देशातल्या सर्व राज्यांना माल वाहतूक मार्गिकेच्या नव्या सुविधांसाठी पुन्हा एकदा खूप-खूप शुभेच्छा देतो. रेल्वेच्या सर्व मित्रांना शुभेच्छा देतानाच या माल वाहतूक मार्गिकेचे काम वेगाने पुढे नेण्यासाठी आग्रह करतो. 2014 नंतर आम्ही जी गती आणली तिचा वेग येत्या काळात अधिक वाढवायचा आहे. रेल्वेचे माझे सर्व मित्र, देशाच्या आशा-अपेक्षा नक्कीच पूर्ण करतील. या विश्वासासह आपणा सर्वाना खूप-खूप शुभेच्छा.
खूप- खूप धन्यवाद!
* * *
M.Chopade/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1684593)
Visitor Counter : 160
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam