पंतप्रधान कार्यालय

पॅन आयआयटी जागतिक शिखर परिषदेत पंतप्रधानांनी केलेले बीजभाषण

Posted On: 04 DEC 2020 11:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4  डिसेंबर 2020

 

पॅन आयआयटीचे अध्यक्ष श्री.सुंदरम श्रीनिवासन,

विद्वान माजी विद्यार्थी गण,

मित्रांनो,

तुमच्यासोबत आज या कार्यक्रमात सहभागी होताना मला आनंद होत आहे. देशातील चेन्नई, मुंबई, गुवाहाटी आणि नुकतेच दिल्ली येथील आयआयटींच्या पदवीदान समारंभात सहभागी होण्याची संधी मला मिळाली. आयआयटीच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधल्यानंतर मी नेहमीच खूप प्रभावित होत असतो. या विद्यार्थ्यांशी झालेल्या चर्चेनंतर परत येताना मला खूप उत्साह वाटतो आणि देशाच्या तसेच आपल्या जगाच्या भविष्याबाबत मी निश्चिंत होऊन जातो.

मित्रांनो,

तुम्ही मानवतेची सेवा करणारी या देशाची मुले आणि मुली आहात. नाविन्यपूर्ण शोध लावण्यासाठीची तुमची निश्चयी वृत्ती जगाला मोठी स्वप्ने दाखविणारी आहे आणि ही वृत्ती तुमच्या अत्युच्च क्षमतांपैकी एक आहे. कदाचित ही तुमच्या तंत्रज्ञान आणि व्यवस्थापकीय कौशल्यानंतरच्या स्थानावर आहे. आयआयटीत शिकलेल्या विद्यार्थीवृंदाचे संपूर्ण जगातील आर्थिक मुल्यांसाठीचे एकूण संकलित योगदान नेमके किती हे कुणीतरी एकदा मोजून पाहायला हवे. मला खात्री आहे की ते एखाद्या मोठ्या देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनाशी तुलना करण्याइतके मोठे नक्कीच असेल.

मित्रांनो,

एक काळ असा होता की जेव्हा अशा परिषदांमध्ये फक्त पाच ते सहा आयआयटींचे माजी विद्यार्थी सहभागी व्हायचे मात्र आता ही संख्या सुमारे 24 पर्यंत पोहचली आहे. सहभागी विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांची संख्यादेखील वाढलेली आहे. तसेच आयआयटीला एक ब्रँड म्हणून अधिकाधिक सशक्त करण्याकडे आम्ही लक्ष दिले आहे. भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही भारतीय पूर्णपणे कटीबद्ध आहोत. तुम्हांला लक्षात आले असेल की सध्याच्या काळात भारतात हॅकेथॉन संस्कृती विकसित होत आहे. मला सुद्धा यापैकी काही हॅकेथॉन्समध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. या हॅकेथॉनच्या माध्यमातून युवा वर्ग राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समस्यांवर उत्तम उपाय शोधून काढताना मला दिसत आहे.

देशातील युवकांना त्यांचे कौशल्य दाखविण्यासाठी आंतरराष्ट्रीय मंच उपलब्ध व्हावा आणि त्यांना वैश्विक पातळीवरील उत्तम प्रक्रिया शिकता याव्या यासाठी केंद्र सरकार, आग्नेय आशिया आणि युरोपातील अनेक देशांशी समन्वय साधून काम करीत आहे. गांधी जयंतीला म्हणजे 2 ऑक्टोबर रोजी सुरु झालेल्या वैभव शिखर परिषदेचे यजमानपद भारताने भूषविले.

सुमारे एक महिना सुरु असलेल्या या परिषदेसाठी  विज्ञान आणि नवीन संशोधन क्षेत्रातील उत्तमोत्तम दर्जाची विद्वत्ता एकत्र आली. या परिषदेत सुमारे 23 हजार विद्वान सहभागी झाले होते. या परिषदेत तज्ञ गटांची 230 चर्चासत्रे झाली आणि जवळजवळ 730 तास चर्चा करण्यात आली. ही परिषद अनेक दृष्टीनी उत्पादक ठरली आणि त्यातून भविष्यात विज्ञान आणि नवीन संशोधन क्षेत्रातील सहकार्याच्या अनेक शक्यतांसाठी अपेक्षित वातावरण निर्माण झाले.

मित्रांनो,

भारतामध्ये अनेक कार्यपद्धतीत आता अत्यंत मोठ्या प्रमाणात बदल झालेले दिसत आहेत. ज्या गोष्टी घडणे अशक्य असे वाटत होते त्या आता अत्यंत वेगाने घडून येत आहेत. तुमच्या परिचयाच्या क्षेत्रातील उदाहरण मी घेतो. यापूर्वी, जेव्हा आयआयटी संस्थांमध्ये शिक्षण घेऊन विद्यार्थी अवकाश संशोधन क्षेत्रातील अभियंत्याची पदवी प्राप्त करायचे तेव्हा त्यांना नोकऱ्या देण्यासाठी देशात सशक्त औद्योगिक वातावरण नव्हते. मात्र आज अवकाश संशोधन क्षेत्रात घडून आलेल्या ऐतिहासिक सुधारणांमुळे, भारताच्या या क्षेत्रातील विद्वत्तेला योग्य मान मिळू लागला आहे.

म्हणूनच, रोज देशात अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक नवीन स्टार्टअप्स सुरु होत आहेत. माझी खात्री आहे की इथे आज उपस्थित असलेल्यांपैकी अनेक जण अशा क्षेत्रांमध्ये धाडसीपणे नवीन कार्य उभारतील जिथे अजूनपर्यंत काही काम करण्याचा कुणी विचार देखील केला नसेल. देशातील अनेक क्षेत्रांमध्ये अत्यंत अचूक आणि नाविन्यपूर्ण कार्य होत आहे. भारत सरकार सुधारणा, प्रत्यक्ष कार्य आणि परिवर्तन या तत्वांशी पूर्णपणे वचनबद्ध आहे.

देशात आम्ही सुधारणा केल्या नाहीत असे आता कोणतेही क्षेत्र शिल्लक राहिलेले नाही. कृषी, अणुउर्जा, संरक्षण, शिक्षण, आरोग्य सेवा, पायाभूत सुविधा, अर्थ, बँकिंग, कर रचना.. ही यादी वाढतच जाईल. आम्ही 44 केंद्रीय कामगार कायद्यांचे  फक्त 4 कायद्यांमध्ये एकत्रीकरण करत कामगार क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणल्या. भारतातील कॉर्पोरेट कराचे दर जगातील सर्व देशांमधील दरापेक्षा सर्वात कमी आहेत.

काही आठवड्यांपूर्वी भारतीय मंत्रिमंडळाने क्रांतिकारी निर्णय घेत 10 महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये उत्पादनावर आधारित प्रोत्साहन अनुदान योजना मंजूर केली. उत्पादन आणि निर्यात वाढविण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला. यामध्ये बॅटरी, इलेक्ट्रॉनिक्स, औषध निर्मिती, वाहन उद्योग, दूरसंचार क्षेत्र, सौरऊर्जा या आणि इतर क्षेत्रांचा समावेश आहे. यातील प्रत्येक क्षेत्र तंत्रज्ञानाशी संबंधित आहे. या क्षेत्रांमधील संधींचा वापर व्हायला हवा.

कोविड- 19 महामारीच्या आपत्कालीन परिस्थितीत देखील भारतात विक्रमी  गुंतवणूक झाली आणि त्यापैकी बहुतांश गुंतवणूक तंत्रज्ञान क्षेत्रात करण्यात आली. यातून जग भारताकडे विश्वसनीय आणि उत्तम सहयोगी म्हणून बघत आहे हे स्वच्छपणे दिसून येते.

मित्रांनो,

पॅन आयआयटी चळवळीच्या एकत्रित शक्तीमुळे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न प्रत्यक्षात येण्यास चालना मिळू शकेल. स्वतंत्र भारताच्या इतिहासात महत्त्वपूर्ण निर्णायक प्रसंगी जगभरात विखुरलेल्या भारतीय समुदायाने पुनरुत्थान करू पाहणाऱ्या भारतावर विश्वास ठेवला. ते नव्या भारताचे अग्रदूतच ठरले आणि जगाला भारताचा दृष्टीकोन खर्‍या अर्थाने समजून सांगण्यामध्ये त्यांचा आवाज महत्वपूर्ण होता.

मित्रांनो,

दोन वर्षांनतर, 2022 या वर्षी भारताला स्वातंत्र्य मिळवून  75 वर्ष पूर्ण होत आहेत. अशावेळी, पॅन आयआयटी चळवळीत सहभागी झालेल्यांना मी विनंती करतो की त्यांनी गिव्हिंग बॅक टू इंडिया साठी एक उच्च आदर्श निर्माण करावा. तुमच्या गुरुकुलासाठी तुम्ही करत असेलेले प्रयत्न सुविख्यात आणि प्रेरणादायी आहेत. मला माहित आहे की तुमच्यापैकी अनेक जण तुमच्या कनिष्ठ गुरुबंधू, भगिनींना शिक्षण किंवा उद्योग क्षेत्रात कारकिर्दीसाठी योग्य मार्ग निवडण्याकरिता मार्गदर्शन करीत आहेत. त्यांच्यापैकी अनेक जण आज स्वतःच्या नाविन्यपूर्ण व्यवसायाची सुरुवात करू इच्छित आहेत. हा हुशार आणि आत्मविश्वासाने भरलेला युवा वर्ग स्वतःच्या मेहनतीच्या आणि अभिनव कल्पनांच्या बळावर लक्षात राहण्याजोगे काम करण्याचा प्रयत्न करत आहे.

आता मी तुम्हांला, त्यांच्या या प्रयत्नांमध्ये मार्गदर्शन करण्याचे आवाहन करीत आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव लक्षणीय पद्धतीने साजरा करण्यासाठी तुम्ही तुमच्या नवकल्पना आणि सूचना माझ्याकडे पाठवाव्यात अशी विनंती करतो. तुम्ही तुमच्या कल्पना माय गव्ह वर पाठवू शकता किंवा नरेंद्र मोदी एपद्वारे थेट मला कळवू शकता.

मित्रांनो,

आपण आज करत असलेल्या कार्यातून आपल्या जहाचे उद्याचे भविष्य घडणार आहे. कोविड पश्चात काळात जगाची रचना प्रत्येक क्षेत्रात रि-लर्निंग (नव्याने शिकणे), रि-थिंकिंग (नव्याने विचार करणे), रि-इनोवेटिंग (नव्याने प्रयोग करणे), रि-इन्व्हेंटिंग (नव्याने शोध लावणे) यांच्यावर आधारित असेल. त्याचबरोबर सर्व क्षेत्रांमध्ये सुरु झालेल्या आर्थिक सुधारणांच्या मालिकेमुळे आपल्या संपूर्ण जगालाच पुनर्प्रोत्साहन मिळणार आहे. यामुळे आपले सुलभ जीवन जगणे सुनिश्चित होईल आणि गरीब तसेच दुर्बल घटकांवर याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल.

महामारीच्या काळात औद्योगिक जगत आणि शिक्षण क्षेत्र यांच्या सहयोगाने अनेक नाविन्यपूर्ण कल्पनांचे शोध लागलेले आपण पाहिले आहेत. जगाला आज निर्माण झालेल्या नवीन नॉर्मल परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी उपयुक्त मार्गांची गरज आहे आणि यावर संवाद सुरु करण्यासाठी तुमच्यापेक्षा जास्त योग्य व्यक्ती कोण असणार? आज, आयआयटीतून शिक्षण घेतलेले विद्यार्थी मोठ्या संख्येने जागतिक स्तरावर अनेक क्षेत्रात नेतृत्वपद सांभाळीत आहेत. उद्योग, शिक्षण, कला, प्रशासन अशा अनेक क्षेत्रांमध्ये तुमचे सशक्त नेटवर्क आहे. मानवी व्यवहारांच्या आणि उत्तमतेच्या अक्षरशः प्रत्येक वर्तुळात तुमचे कार्य आहे. अगदी रोज शक्य होत नसले तरी दर आठवड्याला मी स्वतः तुमच्यासारख्या एका किंवा जास्त प्रतिभावान व्यक्तींशी प्रत्यक्ष संवाद साधत असतो. तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन, वाद-विवाद, चर्चा आणि सक्रीय सहभाग याद्वारे नव्या युगातील उदयोन्मुख तंत्रज्ञान रचनेचे नवे मार्ग शोधावेत असे आवाहन मी करीत आहे. ह्या जबाबदारीचे ओझे जास्त असले तरी ते पेलण्यासाठी तुमचे खांदे समर्थ आहेत हे मी जाणतो.

याबरोबरच, मी या वर्षीच्या द फ्युचर ईज नाऊ अर्थात सद्यस्थिती हेच भविष्य आहे ह्या अत्यंत समर्पक संकल्पना असलेल्या परिषदेसाठी तुम्हांला सदिच्छा देतो. खरोखरीच, हेच भविष्य आहे.

शुभेच्छा  

आणि धन्यवाद.

S.Tupe/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1678646) Visitor Counter : 285