पंतप्रधान कार्यालय

लखनौ विद्यापीठाच्या शतकमहोत्सवी स्थापना समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 25 NOV 2020 9:02PM by PIB Mumbai

नवी दिल्ली ,  25 नोव्हेंबर 2020

नमस्‍कार !

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे  वरिष्‍ठ सहकारी आणि लखनौचे खासदार राजनाथ सिंह , उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री  योगी आदित्‍यनाथ , उप मुख्‍यमंत्री डॉक्टर दिनेश शर्मा , उच्च शिक्षण राज्यमंत्री  नीलिमा कटियार , उत्तर प्रदेश सरकारमधील अन्य सर्व  मंत्रीगण, लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू आलोक कुमार राय , विद्यापीठातील  शिक्षक आणि विद्यार्थीगण , स्त्री आणि पुरुषगण ,

लखनौ विद्यापीठाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शंभर वर्षांचा काळ केवळ एक आकडा नाही. त्याच्याशी अनेक यशस्वी कामगिरीचा जिवंत इतिहास जोडलेला आहे. मला आनंद आहे कि या  100 वर्षांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक टपाल तिकीट, स्मृती नाणे आणि लिफाफा प्रकाशित करण्याची संधी मला मिळाली आहे. 

मित्रानो,

मला सांगण्यात आले आहे कि बाहेर  गेट नंबर-1 जवळ जे पिंपळाचे  झाड आहे, ते विद्यापीठाच्या  100 वर्षाच्या  अविरत प्रवासाचे महत्वपूर्ण साक्षीदार आहे. या झाडाने विद्यापीठ परिसरात  देश आणि जगासाठी अनेक प्रतिभावान आपल्यासमोर घडताना पाहिले आहेत. 100 वर्षांच्या या प्रवासात इथून निघालेल्या व्यक्ती राष्ट्रपति पदावर पोहचल्या आहेत, राज्यपाल बनल्या आहेत. विज्ञान क्षेत्र असो किंवा न्याय क्षेत्र , राजकीय असो किंवा प्रशासकीय, शैक्षणिक असो किंवा साहित्य, सांस्कृतिक असो किंवा क्रीडा,  प्रत्येक क्षेत्रातील गुणवंतांना लखनौ विद्यापीठाने घडवले आहे. विद्यापीठाच्या कला शाखेच्या मधल्या मोकळ्या जागेत खूप मोठा इतिहास एकवटलेला आहे. याच जागेत नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा आवाज घुमत होता आणि त्या वीर वाणीत म्हटले होते, - "भारतीय लोकांना आपले संविधान तयार करू द्या किंवा मग त्याची मोठी किंमत चुकवा. " उद्या जेव्हा आपण भारतीय आपला  संविधान दिन साजरा करू, तेव्हा नेताजी सुभाष बाबू यांचा तो हुंकार नवी ऊर्जा घेऊन येईल.

मित्रानो,

लखनौ विद्यापीठाशी इतकी नावे जोडलेली आहेत, अगणित लोकांची नावे, इच्छा असूनही सर्वांची नावे घेणे शक्य नाही. मी आजच्या पवित्र प्रसंगी, त्या सर्वांना वंदन करतो. शंभर वर्षांच्या प्रवासात  अनेक लोकांनी  अनेक प्रकारे  योगदान दिले आहे. ते सर्व अभिनंदनाला पात्र आहेत.  हां, एवढे नक्की कि मला जेव्हा लखनौ विद्यापीठातून शिकून बाहेर पडलेल्या लोकांशी बोलण्याची संधी मिळाली आणि विद्यापीठाचा विषय निघाला आणि त्यांच्या डोळ्यात चमक नाही असे मी कधी पाहिलेले नाही.  विद्यापीठात व्यतीत केलेले दिवस, त्याबद्दल बोलताना ते खूप उत्साहित होतात असे मी अनेकदा अनुभवलेले आहे. आणि म्हणूनच लखनौ आमच्यावर  फिदा, आम्ही  फिदा-ए-लखनौ याचा अर्थ अधिक चांगल्या प्रकारे समजतो. लखनौ विद्यापीठाची  आत्मीयता , इथली  "रूमानियत" काही वेगळीच आहे. इथल्या विद्यार्थ्यांच्या मनात टागोर लायब्ररी पासून विविध कॅंटीनचे चहा-सामोसे, आणि बन-मक्खनने  अजूनही घर केले आहे. आता बदलत्या काळानुसार खूप काही बदलले आहे. मात्र लखनौ विद्यापीठाचा मूड लखनवीच आहे, आताही तसाच आहे. 

मित्रानो,

हा योगायोगच आहे कि आज देव प्रबोधिनी एकादशी आहे. असे मानले जाते कि चातुर्मासात येण्याजाण्याच्या समस्यांमुळे आयुष्य थांबलेले असते. एवढेच नाही तर देवगण देखील झोपी गेलेले असतात. एक प्रकारे आज देवजागरणाचा दिवस आहे. आपल्याकडे म्हटले जाते- या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी" जेव्हा सर्व प्राण्यांबरोबरच देवता देखील झोपलेल्या असतात, तेव्हा देखील संयमी मानव लोक कल्याणासाठी साधनेत मग्न असतो. आज आपण पाहत आहोत,  कि देशातील नागरिक किती संयमाने ,  कोरोनाच्या या कठीण आव्हानाचा सामना करत आहेत, देशाला पुढे नेत आहेत.

मित्रानो,

देशाला प्रेरित करणाऱ्या,  प्रोत्साहित करणाऱ्या नागरिकांची जडण-घडण अशाच शैक्षणिक संस्थांमध्ये होते. लखनौ विद्यापीठ गेली कित्येक दशके आपले हे काम उत्तम प्रकारे पार पाडत आहे. कोरोनाच्या काळातही इथल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी , शिक्षकांनी अनेक प्रकारचे उपाय समाजाला दिले आहेत. , आताही तेच आहेत.

मित्रानो,

मला सांगण्यात आले आहे कि लखनौ विद्यापीठाचे क्षेत्र-अधिकार वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठाकडून नवीन संशोधन केंद्रांची देखील स्थापना करण्यात आली आहे. मात्र मला यात आणखी काही गोष्टी जोडायच्या आहेत. मला विश्‍वास आहे कि तुम्ही लोक त्या तुमच्या चर्चेत नक्की समाविष्ट कराल. माझी सूचना आहे कि ज्या जिल्ह्यांपर्यंत तुमची  शैक्षणिक व्याप्ती आहे, तिथल्या स्थानिक निर्मिती, स्थानिक उत्पादनांशी निगडित अभ्यासक्रम, त्यासाठी  अनुकूल कौशल्य विकास, त्याचे बारकाईने विश्लेषण , हे आपल्या विद्यापीठात का होऊ नये. तिथे त्या उत्पादनांच्या निर्मितीपासून त्यात मूल्यवर्धनासाठी आधुनिक  उपाय, आधुनिक तंत्रज्ञानावर संशोधन देखील आपले विद्यापीठ करू शकते. त्यांचे ब्रांडिंग, विपणन आणि व्यवस्थापनाशी निगडित धोरण देखील तुमच्या अभ्यासक्रमाचा भाग बनू शकते. विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या दिनचर्येचा भाग बनू शकते. आता उदा. लखनौची  चिकनकरी, अलिगढचे  ताले, मुरादाबादची पितळ्याची भांडी,  भदोहीचा गालिचा यासारखी अनेक उत्पादने आपण जागतिक स्तरावर स्पर्धात्मक कशी बनवता येतील, यासंदर्भात नव्या पद्धतीसह काम, नव्याने अभ्यास , नव्याने संशोधन आपण करू शकत नाही का, नक्की करू शकतो. या अभ्यासामुळे सरकारला देखील आपल्या धोरण आखणीत ,खूप मोठी मदत मिळते आणि तेव्हाच एक जिल्हा, एक उत्पादनाची भावना खऱ्या अर्थाने  साकार होऊ शकेल. याशिवाय, आपली कला, आपली संस्कृती , आध्यात्म शी संबंधित विषयांच्या जागतिक व्याप्तीसाठी देखील आपल्याला निरंतर काम करायचे आहे.  भारताची ही मृदू ताकद आंतरराष्ट्रीय  स्तरावर भारताची प्रतिमा मजबूत करण्यात खूप सहाय्यक आहे. आपण पाहिले आहे, संपूर्ण जगात योगाची ताकद काय आहे, कुणी योग म्हणत असेल, कुणी योगा म्हणत असेल, मात्र संपूर्ण जगाला योगाला एक प्रकारे आपल्या आयुष्याचा भाग बनवण्यासाठी प्रेरित केले आहे.

विद्यापीठ हे केवळ उच्च शिक्षणाचे केंद्र नसते. ते मोठी उद्दिष्टे, मोठे संकल्प साधण्याची ताकद मिळवण्याचे देखील एक खूप मोठे सामर्थ्याचे भांडार असते., एक खूप मोठी ऊर्जा भूमि असते,  प्रेरणा भूमि असते.  आपले चारित्र्य निर्माण करण्याचे, आपल्या आतील सुप्त ताकद जागवणारे  प्रेरणास्थान देखील आहे.  विद्यापीठातील शिक्षक, वर्षनुवर्षे  आपल्या विद्यार्थ्यांचा बौद्धिक, शैक्षणिक आणि शारीरिक विकास करत असतात, विद्यार्थ्यांचे सामर्थ्य वाढवतात. विद्यार्थ्यांनी आपले सामर्थ्य ओळखावे यात देखील तुम्हा शिक्षकांची मोठी भूमिका असते.

मात्र मित्रानो, दीर्घकाळापासून आपल्याकडे ही समस्या आहे कि आपण आपल्या सामर्थ्याचा पूर्ण वापरच करत  नाही. हीच समस्या यापूर्वी आपल्या शासन कारभारात, सरकारी रितीरिवाजात देखील होती. जर सामर्थ्याचा योग्य वापर झाला नाही तर काय परिणाम होतो, त्याचे आज मी तुमच्यासमोर उदाहरण देतो.  आणि इथे उत्तर प्रदेशात ते जास्त समर्पक देखील आहे.  लखनऊ जे खूप दूर नाही,  रायबरेली, रायबरेलीचा   रेलकोच कारखाना , अनेक वर्षांपूर्वी तिथे गुंतवणूक झाली, संसाधने लागली, यंत्रे बसवण्यात आली , मोठमोठ्या घोषणा झाल्या. रेल्वे कोच बनवू. मात्र अनेक वर्षे तिथे केवळ डेंटिंग-पेंटिंगचे काम होत होते. कपूरथलाहून डबे बनून यायचे, आणि इथे त्यात थोडी स्वच्छता, रंग-रंगोटी करणे, काही गोष्टी तिथे टाकणे बस एवढेच व्हायचे.

ज्या कारखान्यात रेल्वेचे डबे बनवण्याचे सामर्थ्य होते, तिथे पूर्ण क्षमतेने कधी काम झाले नाही. 2014 नंतर आम्ही विचार बदलले, पद्धती बदलल्या. त्याचा परिणाम असा झाला कि काही महिन्यातच इथून पहिला डबा बनून तयार झाला आणि आज दरवर्षी शेकडो डबे इथून तयार होऊन जात आहेत. सामर्थ्याचा योग्य वापर कसा होतो, तो तुमच्या शेजारीच आहे आणि जग आज ही गोष्ट पाहत आहे आणि उत्तर प्रदेशला तर याचा अभिमान वाटत असेल,  कि आता काही वर्षानंतर जगातील सर्वात मोठी , तुम्हाला अभिमान वाटेल मित्रानो, जगातील सर्वात मोठा रेल्वे डब्यांचा कारखाना  रायबरेली इथे उभारला जात आहे.

मित्रानो,

सामर्थ्याच्या वापराबरोबरच स्वच्छ मन आणि  इच्छा शक्ति असणे देखील तेवढेच आवश्यक आहे.  इच्छाशक्ति नसेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात योग्य परिणाम मिळू शकत नाहीत.  इच्छाशक्तिमुळे कसा बदल घडतो याची देशासमोर अनेक उदाहरणे आहेत, मी आज इथे तुमच्यासमोर एकाच क्षेत्राचा उल्लेख करू इच्छितो, तो म्हणजे युरिया. एके काळी देशात युरिया उत्पादनाचे अनेक कारखाने होते. मात्र तरीही मोठ्या प्रमाणावर युरिया भारत बाहेरून मागवत होता, आयात करत होता. याचे एक मोठे कारण हे होते कि  जे देशातील खत कारखाने होते, ते आपल्या पूर्ण क्षमतेने काम करत नव्हते.  सरकार स्थापन झाल्यावर जेव्हा मी याबाबत अधिकाऱ्यांशी बोललो, तेव्हा मी हैराण झालो.

आम्ही एकापाठोपाठ एक धोरणात्मक निर्णय घेतले. याचाच परिणाम आहे कि आज देशात युरिया कारखाने पूर्ण क्षमतेने काम  करत आहेत. याशिवाय आणखी एक समस्या होती.  यूरियाचा काळा बाजार. शेतकऱ्यांच्या नावे निघत होते आणि पोहचत दुसऱ्या ठिकाणी होते, चोरी व्हायची. त्याचे खूप मोठे नुकसान आपल्या देशातील शेतकऱ्यांना सोसावे लागत होते. युरियाच्या काळ्या बाजारावर विपणनाचा उपचार आम्ही केला. कसा केला,  यूरियाचे शंभर टक्के निम आच्छादन करून. ही निम आच्छदनाची संकल्पना देखील मोदी आल्यानंतर आली आहे असे नाही . हे सगळे माहीत होते, सर्वाना ठाऊक होते. आणि पूर्वी देखील थोडयाशा प्रमाणात निम कोटिंग व्हायचे. मात्र काही प्रमाणात केल्यामुळे चोरी काही थांबत नाही , मात्र शंभर टक्के निम कोटिंग साठी जी इच्छाशक्ति हवी होती, ती आज नव्हती. आज शंभर टक्के नीम कोटिंग होत आहे, आणि शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात युरिया मिळत आहे.

नवीन तंत्रज्ञान आणून, जुने आणि बंद झालेले खत कारखाने आता पुन्हा सुरु देखील केले जात आहेत. गोरखपुर असेल, सिंदरी असेल,  बरौनी असेल, हे सर्व खत कारखाने काही वर्षातच पुन्हा सुरु होतील. यासाठी खूप मोठी  गॅसपाइपलाइन पूर्व भारतात टाकली जात आहे. सांगायची बाब ही आहे कि विचारात सकारात्मकता आणि दृष्टिकोनात शक्यता आपण कायम  जिवंत ठेवायची आहे,  तुम्ही बघा, आयुष्यात तुम्ही  कठीण आव्हानांचा सामना अशा तऱ्हेने करू शकू.  

मित्रानो,

तुमच्या आयुष्यात नेहमीच असे लोक देखील येतील जे तुम्हाला प्रोत्साहित नाही तर निराश करत राहतील. हे नाही होऊ शकत, अरे तू हे करू शकत नाही, हे तुझे काम नाही, हे कसे होईल, अरे यात तर खूप अडचणी आहेत , हे तर शक्यच नाही , अशा प्रकारची वाक्ये कायम तुम्हाला ऐकायला मिळत असतील. दिवसभरात दहा लोक असे भेटत असतील जे निराशा, निराशा, निराशेच्या गोष्टीच करत असतात आणि अशा गोष्टी ऐकून तुमचे कान देखील थकले असतील. मात्र तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून पुढे वाटचाल सुरु ठेवा. जर तुम्हाला वाटत असेल कि तुम्ही जे करत आहात, ते बरोबर आहे, देशाच्या हिताचे आहे, ते न्यायोचित पद्धतीने केले जाऊ शकते , तर ते साध्य करण्यासाठी तुमच्या प्रयत्नांमध्ये कधी कुठलीही कमतरता ठेवू नका. मला आज तुम्हाला आणखी एक उदाहरण द्यायचे आहे.

मित्रानो,

खादी बद्दल, आपल्याकडे खादीबाबत जे वातावरण आहे, मात्र माझे जरा उलटे होते , मी थोडा उत्साहित राहिलो आहे, जेव्हा मी गुजरात सरकारमध्ये नव्हतो, तेव्हा मी एक  सामाजिक काम करत होतो, कधी राजकीय कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. खादीबाबत आपल्याला अभिमान आहे, आवडते,  खादी प्रति वचनबद्धता,  खादी प्रति आवड,  खादी प्रति लगाव, खादीची  लोकप्रियता , संपूर्ण जगभरात पसरावी असे कायम माझ्या मनात असायचे. जेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री बनलो, तेव्हा मी देखील खादीचा  खूप  प्रचार प्रसार करणे सुरु केले.  2 ऑक्टोबरला मी स्वतः बाजारात जायचो, खादीच्या दुकानात जाऊन स्वतः काही ना काही खरेदी करायचो. माझे विचार खूप सकारात्मक होते, हेतू देखील निर्मळ होता. मात्र दुसरीकडे काही लोक निराश करणारे देखील भेटत होते. मी जेव्हा खादीला प्रोत्साहन देण्याबाबत विचार करत होतो, जेव्हा काही लोकांनी याबाबत चर्चा केली तेव्हा ते म्हणाले कि खादी इतकी कंटाळवाणी आहे आणि इतकी मागासलेली आहे. शेवटी आजच्या तरुणात तुम्ही तिला कसे प्रोत्साहित करू शकाल? तुम्ही विचार करा, मला कशा प्रकारच्या सूचना मिळायच्या. अशाच निराशावादी दृष्टिकोनामुळे आपल्याकडे खादीच्या पुनरुज्जीवनाबाबत सर्व शक्यता मनातच मावळायच्या, समाप्त झाल्या होत्या. मी त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले आणि सकारात्मक विचाराने पुढे गेलो. 2002  मध्ये, मी  पोरबंदर इथे ,  महात्‍मा गांधीजींच्या जयंती दिनी , गांधीजीच्या जन्‍मगावीच  खादीच्या कपड्यांचा  एक फैशन शो ठेवला आणि एका विद्यापीठाच्या युवा विद्यार्थ्यांकडे याची जबाबदारी सोपवली.  फैशन शो तर होतच असतात, मात्र खादी आणि तरुण दोघांनी मिळून त्या दिवशी जी गर्दी जमवली, त्याने सर्व पूर्वग्रह नष्ट झाले, युवकांनी करून दाखवले होते, आणि त्यानंतर त्या कार्यक्रमाची चर्चा देखील बरीच झाली होती आणि त्यावेळी मी  एक नारा देखील दिला होता कि स्वातंत्र्यापूर्वी राष्ट्रासाठी खादी , स्वातंत्र्यानंतर फॅशनसाठी खादी , लोक हैराण होते कि खादी कशी काय फॅशनेबल असू शकते, खादी कपड्यांचा फॅशन शो कसा होऊ शकतो ? आणि कुणी असा विचार देखील कसा करू शकतो कि खादी आणि फैशन यांना एकत्र आणायचे.

मित्रानो,

यात मला खूप अडचणी आल्या नाहीत.  बस, सकारात्मक विचारांनी, माझ्या  इच्छाशक्तिने माझे काम केले. आज जेव्हा ऐकतो कि खादी दुकानात एका दिवसात एक कोटी रुपयांची विक्री होत आहे , तेव्हा मी ते जुने दिवस आठवतो. तुम्ही ऐकून हैराण व्हाल, आणि हा आकडा तुम्ही लक्षात ठेवा,  2014 पूर्वी  20 वर्षात जितकी खादीची विक्री झाली नव्हती त्यापेक्षा अधिक खादीची विक्री गेल्या  6 वर्षात झाली आहे. कुठे 20 वर्षांचा व्यवसाय आणि कुठे 6 वर्षांचा व्यवसाय.

मित्रानो,

लखनौ विद्यापीठ संकुलातील कविवर्य  प्रदीप यांनी म्हटले आहे, तुमच्याच विद्यापीठातून, याच मैदानाच्या लेखणीतून निघालेले शब्द आहेत हे,  प्रदीप म्हणाले होते, - कधी-कधी स्वतःशी गप्पा मारा, स्वतःशी बोला. स्वतःच्या नजरेत तुम्ही काय आहात? हे मनाच्या तराजूवर तोला . या ओळी विद्यार्थी म्हणून,  शिक्षक म्हणून किंवा लोकप्रतिनिधि म्हणून आपणा सर्वांसाठी एक प्रकारे मार्गदर्शक तत्वे आहेत. आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात स्वतःशी संवाद , स्वतःशी बोलण्याची,  आत्मचिंतन करण्याची सवय मोडत चालली आहे. इतकी  डिजिटल गैजेट्स आहेत, इतके विविध मंच आहेत , ते तुमचा वेळ चोरतात, हिरावून घेतात, मात्र तुम्हाला या सर्वांमध्ये स्वतःसाठी वेळ काढावाच लागेल.

मित्रानो,

मी पूर्वी  एक काम करत होतो, गेली  20 वर्षे नाही करू शकलो कारण तुम्ही सर्वानी मला असे काम दिले आहे , मी त्या कामातच गुंतलो आहे. मात्र जेव्हा मी  शासन व्‍यवस्थेत नव्हतो, तेव्हा माझा एक कार्यक्रम असायचा दरवर्षी, मी स्वतःला भेटायला जातो, त्या कार्यक्रमाचे माझे नाव होते मी स्वतःला भेटायला जातो आणि मी पाच दिवस, सात दिवस अशा ठिकाणी  निघून जायचो, जिथे कुणीही मनुष्य नसेल. पाण्याची थोडी सुविधा असली खूप झाले. माझ्या आयुष्यातील ते क्षण खूप बहुमूल्य असायचे, मी तुम्हाला जंगलांमध्ये जाण्यासाठी सांगत नाही, थोडा तरी वेळ स्वतःसाठी काढा. तुम्ही स्वतःला किती वेळ देत आहात हे खूप  महत्वपूर्ण आहे. तुम्ही स्वतःला जाणून घ्या, स्वतःला ओळखा, याच दिशेने विचार करणे गरजेचे आहे. तुम्ही बघाल, याचा थेट  प्रभाव तुमच्या सामर्थ्यावर पडेल, तुमच्या इच्छाशक्तीवर पडेल.

मित्रानो,

विद्यार्थीदशा हा खूप अनमोल काळ असतो, जो लोटल्यानंतर पुन्हा परत येणे कठीण असते. म्हणूनच आपले आयुष्य मजेत जगा, प्रोत्साहन देखील द्या. या काळात तुमचे झालेले मित्र आयुष्यभर तुमच्या बरोबर असतील.  पद-प्रतिष्ठा, नोकरी-उद्योग , महाविद्यालय, हे एवढे मित्र, तुमच्या शैक्षणिक  जीवनातले मित्र,  मग ते शाळेतले असतील किंवा महाविद्यालयातील, त्यांचे तुमच्या आयुष्यात एक वेगळेच स्थान असते. खूप मैत्री करा आणि मैत्री खूप पार पाडा .

मित्रानो,

जे नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू केले आहे, त्याचे उद्दिष्ट देखील हेच आहे कि देशाचा प्रत्येक युवक स्वतःला ओळखू शकेल, आपल्या मनात डोकावून पाहू शकेल. बालवाडीपासून  पीएचडी पर्यंत आमूलाग्र बदल याच संकल्पासह केले आहेत. प्रयत्न हा आहे कि पूर्वी  आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास ही एक खूप मोठी गरज असल्याचे मानले जात होते. आत्मविश्वास तेव्हाच येतो जेव्हा स्वतःचे निर्णय घेण्याचे थोडे स्वातंत्र्य त्याला मिळेल , त्याला लवचिकता मिळेल. बंधनात जखडलेले शरीर आणि चौकटीत अडकलेला मेंदू कधीही सृजनशील असूच शकत नाही. लक्षात ठेवा, समाजात असे लोक खूप भेटतील जे परिवर्तनचा  विरोध करतात.

ते विरोध यासाठी करतात कारण  जुनी चौकट मोडण्याची भीती त्यांना असते..त्यांना वाटते कि परिवर्तन केवळ बाधा आणते, व्यत्यय आणते. ते नव्या निर्मितीच्या शक्यतेबाबत विचार करत नाहीत. तुम्हा युवा मित्रांना अशा प्रत्येक भीतीपासून स्वतःला बाहेर काढायचे आहे. म्हणूनच लखनौ विद्यापीठाचे तुम्ही सर्व शिक्षक, विद्यार्थी या सर्वांना माझी विनंती आहे कि या नवीन शैक्षणिक धोरणाबाबत खूप चर्चा करा, मंथन करा, वाद घाला, संवाद साधा. याच्या वेगवान अंमलबजावणीवर संपूर्ण सामर्थ्यानिशी काम करा. देश जेव्हा स्वातंत्र्याची  75 वर्ष पूर्ण करेल, तोपर्यंत नवीन शैक्षणिक धोरण व्यापक स्वरूपात आपल्या शिक्षण व्यवस्थेचा भाग बनायला हवे. चला,  "वय राष्ट्रे जागृयाम पुरोहिता:" हा  नारा  साकार करण्याच्या कामाला लागूया. चला, आपण भारतमातेच्या वैभवासाठी, आपला प्रत्येक संकल्प आपल्या कर्माद्वारे सिद्धीला नेऊया.

मित्रानो,

1947 पासून  2047 स्वातंत्र्याची 100 वर्ष होतील, मी लखनौ विद्यापीठाला विनंति करेन , याच्या धोरणकर्त्यांना विनंती करेन कि पाच दिवस, सात दिवस वेगवेगळे गट पाडून मंथन करा आणि 2047, जेव्हा स्वातंत्र्याची  100 वर्षे साजरी करू तेव्हा लखनौ विद्यापीठ कुठे असेल, तेव्हा लखनौ विद्यापीठाने आगामी  25 वर्षात देशाला काय दिले असेल, देशाच्या अशा कोणत्या गरजा पूर्ण करण्यासाठी लखनौ विद्यापीठ  नेतृत्‍व करेल. मोठ्या संकल्पांसह, नव्या उमेदीसह जेव्हा तुम्ही  शताब्‍दी साजरी कराल, तेव्हा भूतकाळातील गोष्टी आगामी दिवसांसाठी प्रेरणा बनायला हव्यात, आगामी दिवसांसाठी पथदर्शक बनायला हव्यात आणि जलद गतीने पुढे मार्गक्रमण करण्यासाठी नवी ऊर्जा मिळायला हवी.

हा समारंभ  100 पर्यंतच्या आठवणीपुरता मर्यादित राहू नये, हा समारंभ जेव्हा स्वातंत्र्याची  100 वर्ष पूर्ण होतील, तोपर्यंतच्या  25 वर्षाची रूपरेखा साकार करण्याचा बनावा, आणि लखनौ विद्यापीठाच्या कार्यशैलीत हे असायला हवे कि  2047 मध्ये देशाच्या स्वातंत्र्याची 100 वर्ष पूर्ण होतील, तेव्हा हे विद्यापीठ देशाला हे देईल, आणि कुठलेही विद्यापीठ  25 वर्षांचा कार्यकाळ देशाला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी  समर्पित करते, काय नवीन परिणाम मिळू शकतील, ते आज गेल्या  100वर्षांच्या इतिहासाचा साक्षीदार आहे. लखनौ विद्यापीठाची  100 वर्षे, जे यश मिळवले आहे, ते याचे साक्षीदार आहेत आणि म्हणूनच मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही मनात  2047चा संकल्‍प करत स्वातंत्र्याच्या  100 वर्षापर्यंत व्यक्तीच्या जीवनात मी हे देईन, विद्यापीठ म्हणून आम्ही हे देऊ, देशाला पुढे नेण्यात आमची ही भूमिका असेल, या संकल्पासह तुम्ही पुढे वाटचाल करावी. मी पुन्हा एकदा या शताब्‍दी समारंभानिमित्त अनेक-अनेक शुभेच्छा देतो, आणि तुमच्याबरोबर सहभागी होण्याची मला संधी मिळाली , याबद्दल मी तुमचा खूप-खूप आभारी आहे. 

धन्‍यवाद !!

 

U.Ujgare/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1675981) Visitor Counter : 233