PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 17 NOV 2020 7:57PM by PIB Mumbai

दिल्ली-मुंबई, 17 नोव्हेंबर 2020

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

एनईपी म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनविण्याच्या उद्देशाने तयार केले आहे असे सांगून उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी देशाने पुन्हा एकदा शैक्षणिक क्षेत्रामध्ये विश्वगुरू बनण्याची गरज अधोरेखित केली. उपराष्ट्रपती म्हणाले, भारतीय प्राचीन शिक्षण प्रणालीतून प्रेरणा घेऊन नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करण्यात आले आहे.

उपराष्ट्रपती वेंकैय्या नायडू यांनी युवकांना विकास प्रक्रियेत सहभागी होऊन आपली ऊर्जा रचनात्मक राष्ट्र-निर्माण कार्य आणि नवीन भारताच्या निर्मितीसाठी वापरावी, असे आवाहन केले. हैदराबाद विद्यापीठात नवीन सुविधा केंद्राचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बंगळुरू टेक समिट, 2020 चे उद्‌घाटन करणार आहेत. बंगळुरू टेक समिट 19 ते  21 नोव्हेंबर, 2020 दरम्यान होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारतासाठी ‘व्होकल फॉर लोकल’ अभियान लोकप्रिय बनवण्याबाबत काल  आध्यात्मिक नेत्यांना केलेल्या आवाहनाला देशभरातील प्रमुख आध्यात्मिक नेत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. पंतप्रधानांच्या आवाहनाला ‘संत समाजाने’ अतिशय उत्साहाने प्रतिसाद दिला. आत्मनिर्भर भारतसाठी स्थानिक उत्पादनांच्या खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ती लोकप्रिय करण्यासाठी सार्वजनिक बांधिलकीसह आध्यात्मिक नेत्यांनी पुढाकार घेतला आहे आणि त्यासाठी त्यांनी पाठिंबा देण्याचा संकल्प केला आहे.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :

गेल्या दोन दिवसांपासून भारतामध्ये दररोज सुमारे 30,000 कोरोना बाधित नवीन रूग्णांची नोंद होत आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे नवीन 29,163 रूग्ण आढळले. गेल्या सलग दहा दिवसापासून देशामध्ये दररोज 50,000पेक्षा कमी कोरोनाचे रूग्ण नोंदवले जात आहेत.

नागरिक आता कोविड होऊ नये म्हणून काळजी घेत असून, योग्य वर्तन करीत असल्याचे दिसून येत आहे. यूरोप आणि अमेरिका या देशांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोविडच्या दैनंदिन रूग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे.

कोविड आजारातून बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 40,791 कोरोनाचे रूग्ण बरे झाले. तर गेल्या 24 तासांमध्ये 29,163 जणांना कोविड झाल्याची नोंद आहे.

सरकारने संपूर्ण देशभर कोविड चाचण्या करण्याचे प्रमाण कायम ठेवले आहे. एका दिवसात देशामध्ये 12,65,907 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामुळे कोरोनाच्या एकूण रूग्णांच्या संख्येमध्ये 7.01टक्के घट झाल्याचे दिसून येत आहे.

देशामध्ये 4,53,401 कोविडचे सक्रिय रूग्ण आहेत. एकूण रूग्णांपैकी हे प्रमाण फक्त 5.11 टक्के आहे.

या आजारातून बरे झालेल्या रूग्णांची संख्या 82,90,370 आहे. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण आता वाढले असून आज ते 93.42 टक्के झाले आहे.

गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाची बाधा झालेल्या रूग्णांपैकी 72.87 टक्के रूग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातले आहेत.

रूग्ण बरे होण्याचे प्रमाण केरळमध्ये सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. केरळमधील 6,567 कोरोना रूग्ण आता पूर्ण बरे झाल्याची नोंद आहे. त्याखालोखाल पश्चिम बंगालमधील 4,376 कोरोनाचे रूग्ण बरे झाले आहेत. तर दिल्लीमधील 3,560 कोरोनाचे रूग्ण बरे झाले आहेत.

देशातल्या 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नव्याने कोरोना झालेल्या रूग्णांचे प्रमाण 75.14 टक्के आहे.

दिल्लीमध्ये कालच्या एका दिवसामध्ये 3,797 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याखालोखाल पश्चिम बंगालमध्ये 3,012 जणांना कोरोना झाला आहे. केरळमध्ये 2,710 जणांना कोरोना झाला.

गेल्या 24 तासांमध्ये दिल्लीमध्ये कोरोना झालेल्या 99 रूग्णांना प्राण गमवावे लागले. हे प्रमाण 22.76 टक्के आहे. तर महाराष्ट्रामध्ये 60 जणांचा आणि त्याखालोखाल पश्चिम बंगालमध्ये 53 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला.

इतर अपडेट्स:

महाराष्ट्र अपडेट्स:

सोमवारी महाराष्ट्रात 2,535 नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली. गेल्या पाच महिन्यातला हा नीचांक आहे. राज्यात नवीन कोविड -19 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सातत्याने घट होत आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 92.49 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 2.64 टक्के आहे. मुंबई शहरात एका दिवसात 409 रुग्णांची नोंद झाली.

GC/ST/PM

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1673522) Visitor Counter : 150