उपराष्ट्रपती कार्यालय

भारताला वैश्विक ज्ञान महासत्ता बनविण्याचा नवीन शैक्षणिक धोरणाचा उद्देश: उपराष्ट्रपती


भारताने पुन्हा एकदा विश्वगुरू बनण्याच्या आकांक्षा ठेवली पाहिजे- उपराष्ट्रपती

Posted On: 17 NOV 2020 6:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली ,  17 नोव्हेंबर 2020

एनईपी म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनविण्याच्या उद्देशाने तयार केले आहे असे सांगून उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी देशाने पुन्हा एकदा शैक्षणिक क्षेत्रामध्ये विश्वगुरू बनण्याची गरज अधोरेखित केली.

उपराष्ट्रपती म्हणाले, भारतीय प्राचीन शिक्षण प्रणालीतून प्रेरणा घेऊन नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्याचे बहुमुखी व्यक्तिमत्व घडविण्यावर या धोरणात लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. भारतीय शिक्षण सर्वांगीण, बहुशास्त्रीय आणि अधिक व्यावहारिक बनविण्याचा प्रयत्न या धोरणाच्या माध्यमातून करण्यात आल्याचे नायडू यांनी सांगितले.

अगरतळा राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या (एनआयटी, अगरतळा) 13व्या दीक्षांत समारंभामध्ये नायडू यांचे भाषण झाले. यावेळी नायडू म्हणाले, आपल्या संस्कृतीमध्ये निसर्ग आणि मानव यांच्यामध्ये एकोपा ठेवून सहनिवास करण्याची शिकवण दिली आहे. निसर्गाचा आणि निर्जीव गोष्टींचाही आदर करणे आपल्या संस्कृतीमध्ये शिकवले जाते. आमचे शिक्षण व्यावहारिक, निरोगी आणि जीवनाला पुरक ठरणारे ज्ञान देणारे आहेअसेही नायडू पुढे म्हणाले.

उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था आणि विद्यापीठांनी भारताला ज्ञान केंद्र आणि नवसंकल्पनांचे केंद्र बनवावे, असे आवाहन करून उपराष्ट्रपती नायडू म्हणाले सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये विविध क्षेत्रामध्ये अत्याधुनिक संशोधन करून उद्योग आणि तत्सम संस्था यांच्यामध्ये सहकार्य निर्माण करण्याची गरज आहे. आपल्या संस्था या सर्जनशीलता आणि संशोधक यांच्याबाबतीत महत्वाचे केंद्र ठराव्या असा सल्ला उपराष्ट्रपतींनी यावेळी दिला.

आपल्या देशात तरूणांची लोकसंख्या 65 टक्के आहे. या प्रचंड युवाशक्तीला योग्यप्रकारे मार्गदर्शन करून त्यांच्यातील ऊर्जेच्या मदतीने चांगली परिसंस्था निर्माण करून उद्योजकतेला चालना देण्याचे आवाहन नायडू यांनी केले. आपल्या स्थानिक भागातल्या प्रतिभावंत आणि कौशल्यांना ओळखून ‘व्होकल फॉर लोकल’ होणे आणि त्यानुसार काम करण्याची आवश्यकता आहे.  एनआयटी- अगरतळासारख्या संस्थांनी युवकांना नोकरी कशी लागेल, याचा विचार न करता, या तरूणांना रोजगार निर्मिती कशी करता येईल, नोकरदार नाही तर नोक-या देणारे कसे बनवता येईल, असा विचार करण्यासाठी आघाडीवर असले पाहिजे, असेही नायडू यावेळी म्हणाले.

एनआयटी अगरतळाने परिसरातील खेडेगावांना दत्तक घेऊन त्यांना, ‘आदर्श गाव’ बनविण्याचा उद्देशाने काम सुरू केल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. ग्रामीण भागातील जीवनामध्ये असलेली आव्हाने समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी काही काळ खेड्यात वास्तव्य करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. कृषी कार्य ही आपली मूलभूत संस्कृती आहे, शेतीला एक व्यवहार्य आणि किफायशीर बनविण्यासाठी कार्य करण्यास नायडू यांनी सांगितले.

राष्ट्रीय संस्था मानांकन आराखडा (एनआयआरएफ) अंतर्गंत 100 सर्वोकृष्ट अभियांत्रिकी संस्थांमध्ये अगरतळा एनआयटीने स्थान मिळविल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी सर्वांचे कौतुक केले.

S.Thakur/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1673495) Visitor Counter : 239