उपराष्ट्रपती कार्यालय
युवकांनी विकास प्रक्रियेत सहभागी होऊन आपली ऊर्जा भारताच्या पुनरुत्थानासाठी वापरावी- उपराष्ट्रपती
Posted On:
16 NOV 2020 8:50PM by PIB Mumbai
उपराष्ट्रपती वेंकैय्या नायडू यांनी युवकांना विकास प्रक्रियेत सहभागी होऊन आपली ऊर्जा रचनात्मक, राष्ट्र-निर्माण कार्य आणि नवीन भारताच्या निर्मितीसाठी वापरावी, असे आवाहन केले.
हैदराबाद विद्यापीठात नवीन सुविधा केंद्राचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी युवकांना नकारात्मकता बाजूला सारुन, सकारात्मक दृष्टीकोन अंगीकारुन भ्रष्टाचार, भूक, शोषण आणि भेदभावमुक्त नवीन भारताची उभारणी करावी, असा सल्ला दिला.
देश सध्या एका महत्त्वाच्या टप्प्यातून जात असून विविध आव्हानांचा सामना करत आहे याकडे लक्ष वेधत नायडू यांनी युवकांना सर्व आघाड्यांवर अग्रेसर राहून भारताला मजबूत बनवण्याचे आवाहन केले.
युवकांनी निरक्षरता दूर करणे, आजारांचा मुकाबला करणे, कृषी क्षेत्रातील आव्हाने, सर्व प्रकारचा भेदभाव संपवणे आणि महिलांवरील अत्याचार आणि भ्रष्टाचार दूर करणे यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले.
मूल्यांचा ऱ्हास होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करताना त्यांनी युवकांना देशाची जुनी मुल्ये आणि संस्कृतीचे अनुसरण करण्यास सांगितले.
युवकांनी कोरोना संक्रमणामुळे निर्माण झालेल्या समस्या ते हवामानबदल संकटावर कल्पक तोडगा काढावा, असे त्यांनी सांगितले.
सर्वांगीण शिक्षण हा लोकांच्या जीवनाचा विकास आणि परिवर्तन याची गुरुकिल्ली आहे असे सांगत त्यांनी 21 व्या शतकातील आव्हानांची पूर्तता करण्यासाठी भारतीय शिक्षण आणि संस्कृतीशी जोडलेली शिक्षण व्यवस्था पुन्हा सुरू करण्याची गरज व्यक्त केली.
प्राचीन काळात भारत जगातील महत्त्वाचे शिक्षण केंद्र होते, तक्षशिला आणि नालंदा यासारख्या नामांकित संस्थांमध्ये परदेशी विद्यार्थी शिक्षणासाठी येत होते, यावर त्यांनी प्रकाश टाकला. त्यांनी हैदराबाद विद्यापीठाचे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक उत्कृष्टता साध्य करण्यावर लक्ष केंद्रीत करण्याचे आवाहन केले. लोकांमध्ये विविधांगी विचारसरणी असते, मात्र मुख्य विचारसरणी “शैक्षणिक उत्कृष्टता” असली पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.
खासगी क्षेत्रासह उच्च शिक्षण संस्था उत्कृष्टता केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी सर्व भागधारकांकडून एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन करीत नायडू यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या समकक्ष दर्जेदार शिक्षण देण्याची गरज व्यक्त केली.
जागतिक श्रेणीतील अव्वल 200 संस्थांमध्ये मोजक्याच भारतीय उच्च शिक्षण संस्था असल्याबद्दल चिंता व्यक्त करताना त्यांनी देशातील बहु-विद्याशाखीय विद्यापीठांना पुढाकार घेऊन सर्वोत्तम होण्यासाठी प्रयत्नरत राहण्यास सांगितले.
अव्वल श्रेणी प्राप्त करण्यासाठी, उच्च शिक्षण संस्थांनी कल्पक संशोधन संस्कृतीचा विकास, संशोधन विभागाची स्थापना करावी आणि उत्तम संशोधकांना प्रोत्साहन द्यावे, अशी इच्छा उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली.
भारत ज्ञान आणि नवोन्मेषाचे केंद्रस्थान (हब) होऊ शकते असे सांगत, त्यांनी हैदराबाद विद्यापीठासारख्या संस्थांनी कल्पकता, शोध आणि उद्यमशीलतेला चालना देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे सांगितले.
विद्यापीठांनी अत्याधुनिक संशोधनाचे केंद्र व्हावे असे सांगत त्यांनी उद्योगांसमवेत जवळचे संबंध प्रस्थापित करण्याचा सल्ला दिला. त्यांनी नवीन शैक्षणिक धोरणात देशातील संशोधनाकडे लक्ष देण्यासाठी नॅशनल रिसर्च फाऊंडेशन प्रस्तावित असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
देशात स्वातंत्र्यानंतरच्या 73 वर्षानंतरही 100 टक्के साक्षरता साध्य करण्यात आली नाही याकडे लक्ष वेधून नायडू यांनी सर्व संबंधित घटकांनी एकत्रित प्रयत्न करुन पूर्ण साक्षर समाजाचे ध्येय साध्य करण्याची गरज व्यक्त केली.
नवीन शैक्षणिक धोरणात केवळ गुणवत्तापूर्ण शिक्षणावर लक्ष केंद्रीत केले नसून, चारित्र्य विकास, वैज्ञानिक वृत्तीला चालना देणे, कल्पकतेला चालना देणे, सेवावृत्ती आणि 21 व्या शतकाच्या आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता निर्माण करण्यावर भर दिला आहे असे सांगत उपराष्ट्रपती नायडू यांनी आनंद व्यक्त केला आणि ते म्हणाले की एनईपी सर्वसमावेशी आणि समग्र आहे.
महामारीविरोधातील लढ्याचा संदर्भ देताना उपराष्ट्रपती म्हणाले, इतर राष्ट्रांच्या तुलनेत भारत चांगल्या स्थानी आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दूरदृष्टीतून देशाला मार्गदर्शन केले आहे. त्यांनी डॉक्टर, शेतकरी, सुरक्षा जवान, स्वच्छता कर्मचारी यांच्या निःस्वार्थी सेवेचे कौतुक केले आणि केंद्र सरकार आणि सर्व राज्यांची महामारीविरोधातील लढ्यासाठी प्रशंसा केली.
सरकारने जारी केलेल्या योग्य अंतर पाळण्याच्या आणि मास्क वापरण्याच्या सूचनांचे पालन करण्याचे त्यांनी जनतेला आवाहन केले. ते म्हणाले, लोकांनी प्रतिकारशक्तीत सुधारणा करून भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार राहिले पाहिजे. त्यांनी जनतेला विशेषतः युवकांना आवाहन केले की नियमित योगासने करावी, सकस आहार घ्यावा आणि जंक फूड टाळावे.
तेलंगणाचे गृहमंत्री मोहम्मद महमुद अली, विद्यापीठाचे कुलपती जस्टीस एल नरसिंह रेड्डी, कुलगुरु डॉ बी. नागार्जुन, विद्यार्थी कल्याण आणि इतर विभागांचे अधिष्ठाता, प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यापीठ कर्मचारी आणि इतर मान्यवरांची याप्रसंगी उपस्थिती होती.
***
Jaydevi PS.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1673294)
Visitor Counter : 341