पंतप्रधान कार्यालय
नवी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ परिसरामध्ये स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
Posted On:
12 NOV 2020 11:05PM by PIB Mumbai
सर्वात प्रथम सर्व नवयुवकांनी एक जयघोष करावा, असा माझा आग्रह असणार आहे. आपण सर्वांनी माझ्याबरोबर जरूर बोलावे- मी म्हणेन- स्वामी विवेकानंद - आपण सर्वांनी ‘अमर रहे अमर रहे’ असे म्हणावे.
स्वामी विवेकानंद - अमर रहे , अमर रहे !
स्वामी विवेकानंद - अमर रहे , अमर रहे !
देशाचे शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक जी, जेएनयूचे कुलगुरू प्राध्यापक जगदीश कुमार जी, उपकुलगुरू प्राध्यापक आर.पी. सिंह जी, आजच्या या कार्यक्रमाला प्रत्यक्षात साकार करणारे जेएनयूचे माजी विद्यार्थी डॉ. मनोज कुमार जी, मूर्तिकार नरेश कुमावत जी, वेगवेगळ्या ठिकाणांवरून या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असलेले विविध शाखांचे प्राध्यापक सदस्य आणि विशाल संख्येने या कार्यक्रमाबरोबर जोडले गेलेले माझे सर्व युवा सहकारी, मी जेएनयू प्रशासन, सर्व शिक्षक आणि विद्यार्थी वर्गालाही या महत्वपर्ण कार्यक्रमाची संधी साधून खूप शुभेच्छा देतो.
मित्रांनो,
स्वामी विवेकानंद जी म्हणत होते - मूर्तीमध्ये आस्थेचे रहस्य असे आहे की, आपण त्या एका गोष्टीने ‘व्हिजन ऑफ डिव्हिनिटी’ विकसित करू शकतो. माझी इच्छा आहे की, जेएनयूमध्ये बसविण्यात आलेला स्वामीजींचा पुतळा सर्वांना प्रेरणा देत रहावा, स्वामी विवेकानंदांना प्रत्येक व्यक्तीमध्ये धाडस, साहस निर्माण व्हावे, असे वाटत होते. या पुतळ्यामुळे सर्वांमध्ये साहस मिळावे, धाडस मिळावे. हा पुतळा करूणेचा भावही शिकवेल, दया- अनुकंपा शिकवेल. हे विचार स्वामीजींच्या व्यक्तित्वाचा, शिकवणुकीचा मुख्य आधार आहेत.
हा पुतळा आपल्याला राष्ट्राविषयी अगाध समर्पण शिकवेल, राष्ट्रप्रेम शिकवेल, आपल्या देशावर अत्युच्च प्रेम करणे हेच सर्वात महत्वाचे आहे, असा सर्वोच्च संदेश स्वामीजींच्या जीवनातून मिळतो, तोच संदेश हा पुतळा देईल. हा पुतळा देशाला ‘व्हिजन ऑफ वननेस’ यासाठी प्रेरणा देत राहील. स्वामीजींच्या चिंतनाला हाच दृष्टीकोन प्रेरणादायक ठरला होता. हा पुतळा ,विकासाचा दृष्टीकोन ठेवून युवकांच्या नेतत्वाखाली पुढे जाण्यासाठी देशाला प्रेरणा देणार आहे. हा पुतळा आपल्या सर्वांना स्वामीजींच्या सशक्त -समृद्ध भारत या स्वप्नाला साकार करण्याची प्रेरणा देत राहणार आहे.
मित्रांनो,
हा फक्त पुतळा नाही तर वैचारिक उंचीचे प्रतीक आहे. ज्या विचारांच्या बळावर एका संन्यासाने संपूर्ण दुनियेला भारताचा परिचय करून दिला. त्यांच्याकडे वेदांताचे अगाध ज्ञान होते. त्यांच्याकडे एक ‘व्हिजन’ होते. भारत या विश्वाला काय देऊ शकतो, हे त्यांना चांगले ठाऊक होते. त्यांनी भारताच्या विश्वबंधुत्वाचा संदेश संपूर्ण जगामध्ये पोहोचवण्याचे कार्य केले. भारताच्या सांस्कृतिक वैभवाला,विचारांना, परंपरांना दुनियेसमोर आणले. अगदी गौरवपूर्ण पद्धतीने त्यांनी हे सर्व विश्वासमोर मांडले.
आपण विचार करू शकतो, ज्यावेळी चहोबाजूंनी नैराश्याचे वातावरण होते. सर्व आघाड्यांवर हताशपण आले होते, गुलामीच्या जोखडाखाली सगळे लोक दबून-पिचून गेले होते, अशा वेळी स्वामीजींनी अमेरिकेतल्या मिशिगन विद्यापीठामध्ये म्हटले होते, आणि त्यांनी हे गेल्या शताब्दीच्या प्रारंभीच्या काळात म्हटले होते, त्यांनी नेमके काय म्हटले होते? मिशिगन विद्यापीठामध्ये भारताचा एक संन्यासी घोषणाही करतो, भारताचे व्यक्तित्वही दाखवतो.
तो म्हणाले होते की- ‘‘ हे शतक तुमचे आहे. याचाच अर्थ गेल्या शताब्दीच्या प्रारंभी त्यांचे शब्द असे होते की -
‘‘हे शतक तुमचे आहे, मात्र 21वे शतक निश्चितच भारताचे असेल’’. गेल्या शतकामध्ये त्यांनी काढलेले हे उद्गार आहेत. या शतकामध्ये त्यांनी काढलेले उद्गार सत्य करून दाखवणे , ही आता आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
भारतीयांच्या त्याच आत्मविश्वासाचे, त्याच भावनेचे प्रतीक या पुतळ्यामध्ये समाविष्ट आहे. हा पुतळा त्या ज्योतिपुं:जाचे दर्शन आहे. गुलामगिरीच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये भारताला आपल्यातल्या सामर्थ्याचे , आपल्यातल्या शक्तीचे विस्मरण झाले होते. त्या सामर्थ्याचा पुन्हा परिचय देण्याचे, भारताला जागृत करण्याचे काम विवेकानंदांनी केले. भारतामध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचे कार्य त्यावेळी विवेकांनंदांनी केले.
मित्रांनो,
आज देश आत्मनिर्भर भारताचे लक्ष्य निश्चित करून आणि संकल्प घेवून पुढची मार्गक्रमणा करीत आहे. आज आत्मनिर्भर भारताचा विचार 130 कोटींपेक्षा जास्त भारतीयांचे संयुक्त लक्ष्य असून, आता आत्मनिर्भर भारत बनवण्याची आमची महत्वाकांक्षा आहे. ज्यावेळी आम्ही आत्मनिर्भर भारताविषयी बोलतो, त्यावेळी आमचे लक्ष्य फक्त भौतिक अथवा व्यक्तिगत स्वरूपापर्यंतच मर्यादित नाही. वरवरचा अर्थ नाही. आत्मनिर्भरतेचा अर्थ व्यापक आहे, त्याचा विस्तारही अधिक व्यापक आहे. हा विचार सखोल आहे आणि तसेच त्याला तितकीच उंचीही आहे. साधनसामुग्री बरोबरच वैचारिक तसेच संस्कारामध्येही आत्मनिर्भरता आली तरच राष्ट्र आत्मनिर्भर बनू शकणार आहे.
परदेशामध्ये एकदा स्वामीजींना कोणी तरी विचारले होते की, ‘आपण ‘जंटलमन’ दिसावे, अशा प्रकारची वेशभूषा आपण का नाही करीत?’ या प्रश्नावर स्वामीजींनी उत्तर दिले होते, ‘‘या वेशभूषेमध्ये भारताचा आत्मविश्वास, भारताची मूल्ये यांचे सखोलतेने दर्शन होते’’. ‘‘ आपल्या संस्कृतीमध्ये एक टेलर व्यक्तीला ‘जंटलमन’ बनवतो. मात्र आमच्या संस्कृतीमध्ये कोण ‘जंटलमन’ आहे हे त्याचे व्यक्तित्वच निश्चित करते’’ आत्मनिर्भरतचा विचार आणि संस्काराची निर्मिति असे ‘परिसर’ करीत असतात. आपल्यासारखे युवा सहकारी बनवितात असे अतिशय नम्रतेने स्वामींजींनी त्या सद्गृहस्थांना उत्तर दिले होते .
मित्रांनो,
या देशाचा युवकच तर संपूर्ण दुनियेचा ‘ब्रँड इंडिया’चा ‘ब्रँड अम्बेसेडर’ म्हणजे भारताचा ‘सदिच्छादूत’ आहे. आमचे तरूण , भारताच्या संस्कृती आणि परंपरांचे प्रतिनिधित्व करतात. म्हणूनच हजारों वर्षांपासून चालत आलेल्या भारताच्या प्राचीन परंपरा, भारताची वेगळी ओळख असलेल्या गोष्टींविषयी फक्त गर्व करण्याची, आपल्याकडून अपेक्षा आहे असे अजिबात नाही, तर 21 व्या शतकामध्ये भारताची नवीन ओळख तयार करण्याचीही अपेक्षा आहे. भूतकाळामध्ये आम्ही दुनियेला काय दिले याचे स्मरण करणे आणि हे सांगणे यामुळे आपला आत्मविश्वास वाढत असतो. याच आत्मविश्वासाच्या जोरावर आपल्याला भविष्यात काम करायचे आहे. भारत 21व्या शतकातल्या जगासाठी काय देईल, यासाठी नवसंकल्पना तयार करून, त्या प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारीही आपल्यावर आहे.
मित्रांनो,
आमचे तरूण सहकारी या देशाच्या धोरण निश्चिती आणि नियोजनातली महत्वाची साखळी आहेत. त्यांच्या मनामध्ये काही प्रश्न नक्कीच निर्माण झाले असतील. भारताची आत्मनिर्भरता याचा अर्थ आपण, आपल्यामध्येच रममाण होणे, असा आहे का? आपल्यामध्येच मग्न राहणे म्हणजे काय? तर या प्रश्नांची उत्तरे आपल्याला स्वामी विवेकानंद यांच्या विचारांमध्ये मिळतात. स्वामीजींना कोणी तरी एकदा विचारले होते की, संतांना आपल्या देशाशिवाय इतर सर्व देशांना आपले का मानू नये? यावर स्वामीजींनी उत्तर दिले की, जी व्यक्ती आपल्या मातेला स्नेह आणि आधार देऊ शकत नाही, ती व्यक्ती दुस-याच्या मातेची चिंता कशी काय करू शकेल? म्हणूनच आमची आत्मनिर्भरता संपूर्ण मानवतेच्या भल्यासाठी आहे आणि आम्ही हे करून दाखवत आहे. ज्या ज्या वेळी भारताचे सामर्थ्य वाढले आहे, त्या त्यावेळी भारतामुळे संपूर्ण जगाला लाभ झाला आहे. भारताच्या आत्मनिर्भरतेमध्ये ‘आत्मवत् सर्वभूतेषु’ ही भावना आहे. संपूर्ण विश्वाच्या कल्याणाचा विचार यामध्ये आहे.
मित्रांनो,
आज प्रत्येक क्षेत्रामध्ये करण्यात येत असलेल्या अभूतपूर्व सुधारणा आत्मनिर्भरतेच्या भावनेने करण्यात येत आहेत. देशाच्या जनतेने मतपेटीच्या माध्यमातून या सुधारणांना समर्थनही दिले आहे. आपण सर्वजण जेएनयूमध्ये भारताच्या सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेविषयी गांभीर्याने विश्लेषण करीत असता. भारतामध्ये करण्यात आलेल्या सुधारणांविषयी कोण कोण काय-काय बोलतात, याविषयी आपल्याइतके चांगले कोणाला माहिती असणार? भारतामध्ये चांगल्या सुधारणांना- वाईट राजकारण असे मानले जात होते, हे सत्य आहे नाही का? मग चांगल्या सुधारणा- चांगले राजकारण कसे काय झाले?
याविषयी आपण सर्व जेएनयू सहकारी मंडळींनी जरूर संशोधन करावे. परंतु अनुभवाच्या आधारे मी एक पैलू आपल्यासमोर ठेवणार आहे. आज कार्यप्रणालीमध्ये जितक्या सुधारणा करण्यात आल्या आहेत, त्यामागे भारताला प्रत्येक पावलावर अधिक चांगले बनविण्याचा संकल्प आहे. आज होत असलेल्या सुधारणांविषयीची नियत आणि निष्ठा पवित्र आहेत. आज ज्या सुधारणा होत आहेत, त्याआधी एक सुरक्षा कवच तयार केले जात आहे. या कवचामुळे विश्वास आणि भरवसा यांचा सर्वात जास्त आधार मिळत आहे. जेव्हा शेतकरी बांधवांच्या हितासाठी सुधारणा करण्याचा विषय आला. शेतकरी हा दशकांपासून केवळ राजकारणातला चर्चेचा विषय झाला होता. वास्तविक स्तरावर त्याच्या हितासाठी काम करण्यासाठी अतिशय मर्यादित पावले उचलण्यात आली.
गेल्या सहा वर्षांमध्ये आम्ही शेतकरी बांधवांसाठी एक सुरक्षा तंत्र विकसित केले. शेत जमीन सिंचनासाठी चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या. बाजारपेठांच्या आधुनिकीकरणासाठी गुंतवणूक करण्यात आली. यूरिया पुरेसा उपलब्ध करून देण्यासाठी उपाय योजले, मृदा आरोग्य पुस्तिका योजना असेल, उत्कृष्ट बियाणे असेल, शेतीसाठी येणा-या खर्चाच्या दीडपट किमान आधार मुल्य असेल, आॅनलाइन बाजारपेठेची व्यवस्था-ई-नाम असेल, आणि प्रधानमंत्री सन्मान निधीच्या माध्यमातून दिलेली थेट मदत असेल, गेल्या काही वर्षामध्ये किमान आधार मुल्यामध्ये अनेकवेळा वाढ करण्यात आली आणि शेतकरी बांधवांकडून विक्रमी धान्य खरेदीही करण्यात आली. शेतकरी बांधवांना अशा प्रकारे सुरक्षा कवच प्रदान करण्यात आले. ज्यावेळी त्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण झाला, त्यावेळी आम्ही कृषी सुधारणा करण्यासाठी पुढे आलो.
प्रथम शेतक-यांच्या अपेक्षांप्रमाणे काम करण्यावर आम्ही भर दिला आणि आता शेतक-यांच्यार आकांक्षांच्या पूर्तीसाठी काम करण्यात येत आहे. आता शेतकरी बांधवांना पारंपरिक साधनांबरोबरच अनेक पर्याय बाजारामध्ये उपलब्ध झाले आहेत. ज्यावेळी जास्त पर्याय असतात, त्यावेळी खरेदीदारांमध्ये स्पर्धेचे वातावरण निर्माण होते. त्याचा थेट लाभ शेतक-यांना मिळणार आहे. सुधारणांमुळे आता शेतकरी उत्पादक संघ म्हणजेच एफपीओच्या माध्यमातून शेतक-यांना थेट निर्यातक बनविण्याचा रस्ताही मोकळा झाला आहे.
मित्रांनो,
शेतक-यांबरोबरच गरीबांच्या हितासाठी अनेक सुधारणा करण्यासाठी असेच मार्ग स्वीकारण्यात येत आहे. आपल्याकडे प्रदीर्घ काळापासून गरीबांसाठी फक्त घोषणाच दिल्या गेल्या आहेत. परंतु सत्य असे आहे की, देशातल्या गरीबाला कधीच कार्यप्रणालीबरोबर जोडण्याचा प्रयत्नही झाला नाही. सर्वात जास्त दुर्लक्षित घटक म्हणजे समाजातला गरीब वर्ग होता. हा गरीब वर्ग सर्व दृष्टीने ‘अनकनेक्टेड’ होता. आर्थिक दृष्ट्या या गरीब वर्गाला कुठेही समाविष्ट करून घेण्यात आले नव्हते. आता गरीबांना आपले पक्के घरकुल, शौचालय, वीज, स्वयंपाकाचा गॅस, स्वच्छ पेयजल, डिजिटल बँकिंग, स्वस्त मोबाइल संपर्क यंत्रणा, आणि वेगवान इंटरनेट कनेक्शन यासारख्या सुविधा अन्य नागरिकांप्रमाणेच मिळू लागल्या आहेत. अनेक सुविधा गरीबांपर्यंत आता पोहोचल्या आहेत. हे गरीबाच्या अवती-भवती तयार कलेले, विणलेले सुरक्षा कवच आहे. हे कवच त्याच्या आकांक्षांना भरारी घेण्यासाठी आवश्यक आहे.
मित्रांनो,
आणखी एक सुधारणा, थेट आपल्यासाठी आहे. या सुधारणेचा प्रभाव जेएनयूसारख्या देशातल्या अनेक शैक्षणिक परिसरांवर परिणाम करणारा आहे. ही सुधारणा आहे, देशाचे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अगदी ‘गाभ्याची मुल्ये’ आहेत. आत्मविश्वास असलेल्या दृढनिश्चयी आणि सद्चारित्र्यपूर्ण युवकांचा भारत निर्माण करायचा आहे. हेच स्वामीजींचे ‘व्हिजन’ होते. भारतामध्ये असे शिक्षण दिले जावे की, त्यामधून युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल, त्यांना हरप्रकारे आत्मनिर्भर बनविले पाहिजे, असे स्वामीजींना वाटत होते. जीवनाच्या दोन-अडीच दशकानंतर युवा सहकारींमध्ये जी हिम्मत निर्माण होते, तीच हिम्मत शालेय जीवनाच्या प्रारंभीच का बरं त्यांच्यामध्ये निर्माण होऊ नये? कोणत्याही शाखेच्या शिक्षणाला पुस्तकी ज्ञानामध्ये बांधून ठेवणे, गुणपत्रिका, पदवी, पदविका यांच्यामध्ये युवा ऊर्जा का बर सीमित, मर्यादित ठेवून बांधून टाकायची? नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये याचाही विचार करून सर्वात अधिक लक्ष समावेषकते वर केंद्रीत करण्यात आला आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मुळाशी समावेषकता हा विचार आहे. भाषा एक फक्त माध्यम आहे. ज्ञानाची मापकता नाही, ही भावना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आहे. गरीबातल्या गरीबाला, देशातल्या सर्व कन्यांना, त्यांच्या आवश्यकतेनुसार आणि त्यांच्या सुविधेनुसार चांगले शिक्षण घेण्याचा अधिकार मिळावा, हे या धोरणामध्ये सुनिश्चित करण्यात आले आहे.
मित्रांनो,
सुधारणांचा निर्णय करणेही आपल्या दृष्टीने पुरेसे नसते. त्या सुधारणांना आपण ज्या प्रकारे स्वतःच्या जीवनामध्ये आणतो, स्वीकारतो, ही सर्वात महत्वाची गोष्ट असते. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये सार्थक परिवर्तनही वेगाने येईल. मात्र त्यासाठी आपण सर्व सहका-यांनी अगदी प्रामाणिकतेने प्रयत्न करण्याची गरज आहे. विशेषतः आपला शिक्षकवृंद, बुद्धिजीवी वर्ग यांच्यावर या परिवर्तनाची सर्वात जास्त जबाबदारी आहे. तसे पाहिले तर मित्रांनो, जेएनयूच्या या परिसरामध्ये एक सर्वात लोकप्रिय जागा आहे. कोणती जागा आहे ही? साबरमती ढाबा! हीच जागा आहे ना? आणि तिथं किती जणांचे खाते आहे? मी असं ऐकलं आहे की, आपण सर्व मंडळी शिकण्याचा तास- वर्ग झाल्यानंतर त्या ढाब्यावर जाता आणि तिथं चहा पराठे यांच्याबरोबर वादविवादही करता. आपआपल्या कल्पना, मते यांचे आदान-प्रदान करता. तसं पाहिलं तर पोट भरलेलं असेल तर अशी चर्चा करायलाही मजा येते. आजपर्यंत आपल्या कल्पनांची, चर्चांची भूकही साबरमती ढाबा या जागेने भागवली आहे. आता, आपल्यासाठी स्वामीजींच्या या प्रतिमेच्या छत्रछायेमध्ये आणखी एक नवीन स्थान तुम्हाला यासाठी मिळाले आहे.
मित्रांनो,
कोणत्या एका गोष्टीने आपल्या देशाच्या लोकशाही व्यवस्थेला खूप मोठे नुकसान पोहोचवले आहे, तर ती गोष्ट आहे- राष्ट्रहितापेक्षा जास्त प्राधान्य आपल्या विचारधारेला देणे. याचे कारण म्हणजे माझी विचारधार असे सांगते म्हणून देशहिताच्या बाबतीतही मी याच साच्यामध्ये विचार करेन, याच चौकटीमध्ये राहून काम करेन, मित्रांनो, असा मार्ग स्वीकारणे योग्य नाही हे अगदी चुकीचे, अयोग्य आहे. आज जर कोणी आपल्या विचारधारेविषयी गर्व करीत असेल, आणि ते स्वाभाविकही आहे, परंतु तरीही आपली विचारधारा राष्ट्रहिताच्या विषयी, राष्ट्राच्या बरोबरच असली पाहिजे. राष्ट्राच्या विरोधात असणे कधीही योग्य ठरणार नाही.
आपण मागे वळून देशाचा इतिहास पहावा, ज्या ज्यावेळी देशाच्या समोर कोणतीही अवघड समस्या आली आहे, त्या त्यावेळी प्रत्येक विचार, प्रत्येक विचारधारेचे लोक राष्ट्रहितासाठी एकत्रित आले आहेत. स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली, प्रत्येक विचारधारेचे, वैचारिक भूमिकेचे लोक एकत्रित आले होते. त्यांनी देशासाठी एकत्रितपणे संघर्ष केला होता.
बापू यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित होताना कोणाला आपली विचारधारा किंवा वैचारिक भूमिका सोडावी लागली, असे काहीही झाले नाही. त्याकाळात परिस्थितीच अशी होती की, प्रत्येकाने केवळ ‘देशासाठी’ या एका समान कारणासाठी संघर्ष केला. देशाला प्राधान्य दिले. आता आणीबाणीच्या काळाचे जरा स्मरण करावे. आणीबाणीच्या काळातही देशाने अशीच एकजूटता दाखविली होती. आणि मला तर या आंदोलनाचा एक भाग होण्याचे सौभाग्य मिळाले होते. काय घडले हे मी तर सर्व गोष्टी स्वतः पाहिल्या आहेत. अनुभवल्या आहेत. मी त्या काळाचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे. आणीबाणीच्या विरोधामध्ये त्या आंदोलनामध्ये काँग्रेसचे माजी नेता आणि कार्यकर्तेही होते. आरएसएसचे स्वयंसेवक आणि जनसंघाचे लोकही होते. समाजवादी लोकही होते. कम्युनिस्ट होते. जेएनयूशी जोडले गेलेले कितीतरी लोक होते. त्यांनी एकत्रित येऊन आणीबाणीच्या विरोधात संघर्ष केला होता. या एकजूटतेमध्ये, या लढाईमध्येही कोणालाही आपल्या विचारधारेबरोबर तडजोड करावी लागली नव्हती. मात्र सर्वांचा उद्देश्य एकच होता- राष्ट्रहित! आणि हा उद्देश्यच सर्वात मोठा होता. म्हणूनच मित्रांनो, ज्यावेळी राष्ट्राची एकता, अखंडता आणि राष्ट्रहित यांचा प्रश्न असतो, त्यावेळी वैचारिक भूमिकेच्या ओझ्याने दबून जाऊन निर्णय घेतला गेला तर देशाचे नुकसानच होते.
हो, मी एक गोष्ट मानतो की, स्वार्थासाठी, संधी साधून घेण्यासाठी आपल्या वैचारिक भूमिकेशी तडजोड करणे तितकेच अयोग्य आहे. आजच्या या माहितीच्या युगामध्ये, आता अशा प्रकारचा संधीसाधुवाद यशस्वी होऊ शकत नाही. हे घडत असल्याचे आपण पाहतही आहोत. आपल्याला संधीसाधुवादापासून दूर मात्र एका स्वस्थ- सुदृढ संवादाच्या माध्यमातून लोकशाही पद्धत जीवंत ठेवायची आहे.
मित्रांनो,
आपल्याकडे जी वसतिगृहे आहेत, त्यांची नावेही गंगा, साबरमती, गोदावरी, ताप्ती, कावेरी, नर्मदा, झेलम, सतलज यासारख्या नद्यांच्या नावांवरून ठेवली आहेत. या नद्यांप्रमाणेच आपण सर्वजण देशाच्या कानाकोप-यांतून येथे आले आहात. वेगवेगळे विचार घेऊन तुम्ही येथे येता आणि इथे एकत्रित रहाता आहात. आपल्या कल्पनांचे आदानप्रदान करताना, नवनवीन विचारांच्या या प्रवाहाला अविरत , खळाळता ठेवायचे आहे. हा प्रवाह कधीही सुकून, आटून चालणार नाही. आमचा देश म्हणजे महान भूमी आहे. जिथे वेगवेगळ्या बौद्धिक विचारांचे बीज अंकुरित होत ,विकसित होत आले आहे आणि ते फळफळलेही आहे. ही परंपरा अधिक मजबूत करणे, आपल्यासारख्या युवकांच्यादृष्ठीने गरजेचे आहे. या परंपरेमुळेच भारताची लोकशाही दुनियेतली सर्वात सळसळती लोकशाही आहे.
मला असे वाटते की, आपल्या देशाच्या युवकांनी कधीही, कोणत्याही परिस्थितीचा असेच सहजतेने स्वीकार करू नये. कोणीतरी एकजण काहीतरी म्हणतोय, म्हणून ते योग्य आहे, असे मानणे बरोबर नाही. आपण स्वतःही तर्कशुद्ध विचार करावा, वाद-विवाद करावा, निरोगी चर्चा करावी, मनन-चिंतन, विचार मंथन करावे, संवाद साधावा, आणि मगच कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचावे.
स्वामी विवेकानंद जी यांनीही कधीही आहे त्या परिस्थितीचा सहज स्वीकार केला नाही. आणखी एका गोष्टीवर मी विशेष करून बोलू इच्छितो, ती गोष्ट म्हणजे - ह्युमर !- विनोदबुद्धी!! आपआपल्यात केली जाणारी गंमत, मजेच्या गोष्टी. विनोदबुद्धीने केलेल्या गंमतीदार गोष्टी म्हणजे खूप चांगले ‘ल्यूब्रिकेटिंग फोर्स’ ठरते. आपल्या मनामध्ये अशी विनोदबुद्धी सतत जागृत ठेवली पाहिजे. कधी कधी तर मी अनेक नवयुवकांना पाहतो, त्यावेळी कोणत्यातरी प्रचंड ओझ्याखाली दबल्यासारखे झालेले असतात. संपूर्ण विश्वाचे ओझे त्यांच्या डोक्यावर असल्यासारखे ते वावरत असतात. अनेकवेळा आपण महाविद्यालयाच्या परिसरातच तिथल्या राजकारणात गुंतून पडतो आणि मग अशा विनोदबुद्धीला पार अगदी विसरूनच जातो. म्हणूनच आपण आपल्याकडची विनोदबुद्धी शाबूत ठेवली पाहिजे. विनोद करण्याचा, विनोदावर हसण्याचे क्षण, संधी हरवू देऊ नयेत.
युवा मित्रांनो,
विद्यार्थीदशा, हा काळ म्हणजे स्वतःला ओळखण्यासाठी एक खूप उत्तम संधी आहे. स्वतःला ओळखणे जीवनाची सर्वात महत्वाची आवश्यकताही आहे. मला असे वाटते की, या काळाचा तुम्ही भरपूर उपयोग करून घ्यावा. जेएनयू परिसरामध्ये बसविण्यात आलेला हा स्वामीजींचा पुतळा राष्ट्रनिर्माण, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रजागरण यांच्याविषयी प्रत्येक युवकाला प्रेरणा देत राहील. या भावनेबरोबरच आपणा सर्वांना खूप- खूप शुभेच्छा!
आपणा सर्वांना सुयश लाभावे, सर्वजण निरोगी रहावे. आगामी दिवसांत येत असलेले सण मोठ्या उत्साहात साजरे करावेत. आपले नातेवाईक इथे वास्तव्य करीत असतील तर, त्यांनाही आनंद होईल की, आपणही दिवाळीच्या आनंदामध्ये खूप मजेत काम करीत आहात. माझ्यावतीने आपल्या सर्वांना अनेक-अनेक सदिच्छा!
खूप-खूप धन्यवाद!!
-----
Jaydevi PS/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1673286)
Visitor Counter : 323
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam