PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 20 OCT 2020 7:46PM by PIB Mumbai

दिल्ली-मुंबई, 20 ऑक्टोबर 2020

Coat of arms of India PNG images free download 

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

 

Image

ग्रँड चॅलेंजेस ची वार्षिक सभा 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बीजभाषण झाले. यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले, की ज्या समाजात, विज्ञान आणि नवोन्मेषावर गुंतवणूक केली जाते, तोच समाज भविष्याला आकार देऊ शकतो. विज्ञान आणि संशोधनात आधीपासूनच गुंतवणूक केली तर त्याची फळे आपल्याला योग्य वेळी मिळू शकतात, त्यामुळेच त्याबाबत तत्कालिक विचार करण्यापेक्षा दूरदृष्टीने काम करायला हवे, असे पंतप्रधान म्हणाले.

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :

भारताने कोविडविरुद्धच्या लढाईत अनेक महत्वाचे मैलाचे दगड पार केले आहेत.

गेल्या 24 तासांत आढळलेल्या कोविड-19 च्या रुग्णांची संख्या सुमारे तीन महिन्यांनंतर 50000 (46,790) पेक्षा कमी आढळली आहे. याआधी, 28 जुलै रोजी रुग्णांची एका दिवसातली संख्या 47,703 असल्याची नोंद आहे.

दररोज कोविडचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असून मृत्यूदरही सातत्याने घटतो आहे. तसेच सक्रीय रुग्णांचे प्रमाण देखील कमी होत आहे.

भारताने मिळवलेले आणखी एक यश म्हणजे, एकूण संख्येच्या तुलनेत, सक्रीय रुग्णांचे प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा कमी झाले आहे. सध्या देशभरात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 7.5 लाखांपेक्षाही कमी (7,48,538) आहे. आजपर्यंतच्या कोविड रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत सक्रीय रुग्णांचे हे प्रमाण 9.85% इतके आहे.

केंद्र सरकारच्या सर्वसमावेशक धोरणानुसार, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी, एकत्रित आणि निश्चित ध्येय ठेवून केलेल्या प्रभावी अंमलबजावणीचा हा परिणाम आहे.त्याशिवाय देशभरात चाचण्या, त्वरित आणि प्रभावी निरीक्षण आणि ट्रॅकिंग, रूग्णांना त्वरित रुग्णालयात दाखल करणे तसेच प्रमाणित उपचारांच्या प्रोटोकॉलचे कसोशीने पालन करण्यामुळे कोविडविरुध्दच्या लढ्यात हे यश मिळाले आहे. तसेच, या लढ्यात देशभर निस्वार्थ सेवा देणारे कोविड योद्धे, डॉक्टर्स, आघाडीवर काम करणारे सर्व कार्यकर्ते यांच्या निस्वार्थ सेवेचाही हा परिणाम आहे.

सक्रीय रुग्णांच्या संख्येत घट होत असतांना दुसरीकडे मात्र, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. आतापर्यंत 67 लाखांपेक्षा अधिक रुग्ण (67,33,328) या आजारातून बरे झाले आहेत. सक्रीय रुग्ण आणि बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येतील तफावत सातत्याने वाढत असून, आज ही तफावत 59,84,790 इतकी आहे.

गेल्या 24 तासांत 69,720 रुग्ण बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आता देशाचा रुग्ण बरे होण्याचा सरासरी दर 88.63% इतका आहे.

बरे झालेल्या रूग्णांपैकी 78% रुग्ण 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील असल्याचे आढळले आहे.

महाराष्ट्रात एका दिवसात, सर्वाधिक 15,000 पेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत, तर त्या खालोखाल कर्नाटकात एका दिवसात 8,000 पेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत.

नव्याने आढळलेल्या रूग्णांमधील 75% रुग्ण 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ या राज्यांत 5,000 पेक्षा अधिक सक्रीय रुग्ण आढळले आहेत.

गेल्या 24 तासांत देशभरात 587 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी 81% टक्के 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहेत. आज सलग दुसऱ्या दिवशी मृतांचा आकडा 600 पेक्षा कमी आढळला आहे. महाराष्ट्रात एका दिवसात सर्वाधिक म्हणजे 125 मृत्यूंची नोंद झाली.

कोविड रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक असलेला भारत एकमेव देश आहे, तसेच मृत्यूदर सर्वात कमी असलेल्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो. आज हा मृत्यूदर 1.52% इतका आहे. सक्रीय रुग्णांच्या संख्येत सातत्याने होत असलेल्या घटीचा हा परिणाम आहे.

इतर अपडेट्स:

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज आसाम येथे देशातल्या पहिल्या बहु-आयामी लॉजिस्टिक पार्कचा जोगीगाहोपा येथे कोनशीला समारंभ करण्यात आला. 693.97 कोटी रुपयांच्या या पार्कमुळे हवाई, रस्ते, रेल्वे आणि जलमार्गासाठीची थेट संपर्कव्यवस्था उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारच्या भारतमाला या महत्वाकांक्षी दळणवळण प्रकल्प योजनेअंतर्गत हा पार्क विकसित केला जाणार आहे.

नौवहन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार ) मनुसुख मांडवीय यांनी आज नवी दिल्लीत जहाज वाहतूक सेवा (व्हीटीएस) आणि जहाज वाहतूक देखरेख प्रणाली (व्हीटीएमएस) साठी स्वदेशी सॉफ्टवेअर सोल्यूशन विकासाचा ई-शुभारंभ केला. उद्घाटनपर भाषणात मांडवीय यांनी भारतीय बंदरांच्या वाहतूक व्यवस्थापनांसाठी महागड्या परदेशी बनावटीच्या सॉफ्टवेअर सोल्यूशनवर अवलंबून न राहता देशाच्या गरजेनुसार स्वदेशी प्रणाली विकसित करण्यावर भर दिला.

आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या वित्तीय पॅकेजचा एक भाग म्हणून केसीसी म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड योजने अंतर्गत 2.5 कोटी शेतकरी बांधवांना पतपुरवठा करून आर्थिकदृष्ट्या पाठबळ देण्याचा निर्णय घेतला आहे. या ‘स्पेशल सॅच्युरेशन ड्राइव्ह’ अंतर्गत 1.35 लाख कोटी पतमर्यादेसह 1.5 कोटींपेक्षा जास्त शेतकरी बांधवांना केसीसीच्या माध्यमातून पतपुरवठा करण्यासाठी मंजुरी देण्याचा टप्पा गाठला आहे.

लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी खर्गा कोअरच्या सुरक्षा आणि परिचालन सज्जतेचा आढावा घेण्यासाठी 19 ऑक्टोबर 2020 रोजी अंबाला छावणीला भेट दिली. जनरल ऑफिसर कमांडिंग, लेफ्टनंट जनरल एस एस महाल यांनी लष्कर प्रमुखांना थोडक्यात माहिती दिली. त्यानंतर लष्करप्रमुखांनी फॉर्मेशन कमांडर्सशी संवाद साधला. उच्च स्तरीय परिचालन सज्जतेबद्दल त्यांनी फॉर्मेशनची प्रशंसा केली आणि कोविड -19 विरोधातील लढाईत फॉर्मेशन आणि युनिट्सनी हाती घेतलेल्या प्रतिबंधात्मक उपायांचे कौतुक केले.

महाराष्ट्र राज्यातील 450 किलोमीटरच्या राज्य महामार्ग आणि प्रमुख जिल्हा रस्त्यांच्या उन्नतीकरणासाठी आशियाई विकास बँक (एडीबी) आणि केंद्र सरकार यांनी आज 177 दशलक्ष डॉलर्स कर्जाच्या करारावर स्वाक्षरी केली.

 

महाराष्ट्र अपडेट्स :

सर्व खाजगी डॉक्टरांना एका दिवसात किमान दोन ते तीन तास कोविड प्रतिबंधक मिशनमध्ये सहभागी होण्याच्या आणि कोविड सेंटरला भेट देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. खासगी डॉक्टरांनी, ग्रामीण भागातील कोविड सेंटरमध्ये, विशेषत: अलिकडच्या आठवड्यात ज्या भागात मृत्यूचे प्रमाण वाढले आहे, त्या ठिकाणी वेळ द्यावा, असे आव्हान टोपे यांनी केले आहे. राज्यात मृत्यू दर कमी करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनावर त्यांनी भर दिला . सोमवारी महाराष्ट्रात 5984 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 15069 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे सक्रीय रुग्णांची संख्या कमी होऊन 1.73 लाख इतकी झाली आहे.

FACT CHECK

*****

B.Gokhale/S.Tupe/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1666196) Visitor Counter : 190