पंतप्रधान कार्यालय

ग्रँड चॅलेंजेस वार्षिक सभा 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बीजभाषण


विज्ञान आणि नवोन्मेष यात गुंतवणूक करणाऱ्या समाजांकडून भविष्याला आकार दिला जाईल:पंतप्रधान

आपल्या सर्व नागरिकांचे लसीकरण सुनिश्चित करण्यासाठी भारत आधीपासूनच लस वितरण यंत्रणेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यरत:पंतप्रधान

Posted On: 19 OCT 2020 11:36PM by PIB Mumbai

 

ग्रँड चॅलेंजेस ची वार्षिक सभा 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बीजभाषण झाले.

यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले, की ज्या समाजात, विज्ञान आणि नवोन्मेषावर गुंतवणूक केली जाते, तोच समाज भविष्याला आकार देऊ शकतो. विज्ञान आणि संशोधनात आधीपासूनच गुंतवणूक केली तर त्याची फळे आपल्याला योग्य वेळी मिळू शकतात, त्यामुळेच त्याबाबत तत्कालिक विचार करण्यापेक्षा दूरदृष्टीने काम करायला हवे, असे पंतप्रधान म्हणाले. आणि नवोन्मेष,संशोधनाचा हा प्रवास, सहकार्यातून आणि जनतेच्या सहभागातूनच व्हायला हवा, असेही त्यांनी नमूद केले. एकेकट्याने काम केल्यास विज्ञानाची प्रगती कधीही होऊ शकणार नाही, आणि ग्रँड चॅलेंजेस कार्यक्रमाला या तत्वाची नीट जाणीव आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. जगभरातले अनेक देश एकत्र येऊन, प्रतीसूक्ष्मजीव रोधक, माता आणि बालआरोग्य, कृषी, पोषाहार, पाणी, स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य अशा विविध विषयांवर काम करत असलेल्या ग्रँड चॅलेंजेस या व्यासपीठाचे त्यांनी कौतुक केले.

कोरोना या जागतिक साथीच्या आजारामुळे, आपल्याला संघशक्तीचे,एकत्रित काम करण्याचे महत्व पटले आहे. आजारांना कुठल्याही भौगोलिक सीमा नसतात आणि ते धर्म, वंश, लिंग, वर्ण असा कुठलाही भेदभाव करत नाहीत. यात अनेक संसर्गजन्य आणि अ-संसर्गजन्य आजारांचाही समावेश असून, त्यांनी आज जगभरातल्या लोकांचे आयुष्य प्रभावित केले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. भारतातील भक्कम आणि गतिमान असा वैज्ञानिकांचा समूह आणि उत्तम विज्ञान संस्था, या भारताचे वैभव आहेत. विशेषतः गेल्या काही महिन्यात, कोविड-19 विरुद्ध लढा देतांना या संस्थांचे महत्व अधोरेखित झाले आहे.या संस्थांनी, आजार प्रतिबंधनापासून ते क्षमता बांधणीपर्यंत, अक्षरशः चमत्कार करून दाखवले आहेत,असं पंतप्रधानांनी सांगितलं.

भारतात, एवढी अफाट लोकसंख्या असूनही कोविड-19 च्या मृत्यूचे प्रमाण कमी आहे कारण लोकांची शक्ती आणि धोरणांचा जनकेन्द्री दृष्टीकोन. सध्या देशात, दररोज कोविड रुग्णांच्या संख्येत घट होत आहे आणि रुग्ण बरे होण्याचा दर जगात सर्वोत्तम म्हणजे, 88 टक्के आहे, असे त्यांनी सांगितले. हे घडण्यामागची कारणे सांगतांना पंतप्रधान म्हणाले, की भारत अशा निवडक देशांपैकी एक होता, ज्याने, अत्यंत लवचिक स्वरुपाची टाळेबंदी केली, मास्कचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले.संपर्क शोधण्याचे काम प्रभावीपणे केले तसेच रॅपिड अँटीजेन टेस्ट ताबडतोब सुरु केल्या.

कोविडची लस विकसित करण्याच्या प्रयत्नात देखील भारत आघाडीवर आहे. सध्या देशात 30 पेक्षा अधिक स्वदेशी लसींवर संशोधन सुरु असून त्यातील तीन अत्यंत प्रगत अवस्थेत आहेत. देशातील सर्वांना लस देणे सुनिश्चित व्हावे, यासाठी भारत आधीपासूनच काम करत असून, एक सुस्थापित लस-वितरण प्रणाली विकसित करण्याचे काम सुरु आहे, त्यासोबतच, प्रत्येक नागरिकाला डिजिटल आरोग्य क्रमांक देऊन, त्याची नोंद ठेवली जात आहे. अत्यंत कमी खर्चात, उत्तम दर्जाची औषधे आणि लसी निर्माण करण्यासाठी भारत जगभरात ओळखला जातो. जागतिक लसीकरणासाठी लागणाऱ्या 60 टक्के लसी भारतातच विकसित करण्यात आल्या आहेत. भारताचा हा अनुभव आणि संशोधनविषयक गुणवत्ता, याच्या बळावर भारत, जागतिक आरोग्यविषयक प्रयत्नांच्या केंद्रस्थानी राहून, इतर देशांना आरोग्यविषयक क्षमता वाढवण्यासाठी मदत करेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. देशात उत्तम सार्वजनिक आरोग्य, स्वच्छताविषयक सुविधा, शौचालयांची उभारणी यासाठी, गेल्या सहा वर्षात सरकारने केलेले प्रयत्न आणि राबवण्यात आलेले उपक्रम यांची त्यांनी माहिती दिली. या सुविधांचा सर्वाधिक लाभ महिला, गरीब आणि वंचित समाजाला होत आहे, असे त्यांनी सांगितले. त्याशिवाय देशातील आजार कमी करण्यासाठी आणि गावांमधील नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची देखील त्यांनी माहिती दिली. विशेषतः गावागावत पाईपने पाणीपुरवठा करणे, ग्रामीण भागात वैद्यकीय महाविद्यालये सुरु करणे आणि जगातील सर्वात मोठी आरोग्यविमा योजना-आयुष्मान भारत यांचा त्यांनी उल्लेख केला.  

वैयक्तिक सक्षमतेसाठी, एकत्रित प्रयत्न सुरु ठेवावेत, असे आवाहन यावेळी पंतप्रधानांनी केले. ग्रँड चॅलेंजेस ची ही बैठक फलदायी होवो, तसेच यातील विचारमंथनातून काहीतरी सकस आणि ठोस निष्कर्ष बाहेर पडावेत, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

***

U.Ujgare/R.Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1666063) Visitor Counter : 254