रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

देशातील पहिल्या बहु-आयामी लॉजिस्टिक पार्कचा आसाममध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कोनशिला समारंभ


693.97 कोटी रुपयांच्या या पार्कमुळे हवाई, रस्ते, रेल्वे आणि जलमार्ग अशी सरळ संपर्क यंत्रणा एकत्र उपलब्ध होणार

या प्रकल्पामुळे राज्यातील 20 लाख युवकांना थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळतील- नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आशा

Posted On: 20 OCT 2020 5:43PM by PIB Mumbai

 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज आसाम येथे देशातल्या पहिल्या बहु-आयामी लॉजिस्टिक पार्कचा जोगीगाहोपा येथे कोनशीला समारंभ करण्यात आला. 693.97 कोटी रुपयांच्या या पार्कमुळे हवाई, रस्ते, रेल्वे आणि जलमार्गासाठीची थेट संपर्कव्यवस्था उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारच्या भारतमाला या महत्वाकांक्षी दळणवळण प्रकल्प योजनेअंतर्गत हा पार्क विकसित केला जाणार आहे. या कार्यक्रमाला, आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह, डॉ. जनरल व्ही के सिंग आणि रामेश्वर तेली यांच्यासह , आसामचे मंत्री आणि खासदर उपस्थित होते.

देशात असे 35 बहुआयामी लॉजिस्टिक पार्क्स बांधण्याचा सरकारचा विचार असल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितले. या सर्व प्रकल्पांचा आराखडा तयार करण्याचे काम सुरु आहे. या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी स्पेशल पर्पज व्हेकल तयार केले जातील आणि त्यावर व्यवसायिकदृष्ट्या तज्ञ  तसेच  मुख्य कार्यकारी अधिकारी नेमले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. हा पहिला प्रकल्प, आसामच्या जोगिगहोपा येथे NHIDCL मार्फत विकसित केला जाणार आहे. ब्रह्मपुत्रा नदीवर 317 एकर जमिनीवर हा प्रकल्प विकसित होईल. प्रकल्पाचा पहिला टप्पा 2023 मध्ये विकसित होईल.यासाठी 280 कोटी रुपयांची कामे आधीच वितरीत करण्यात आली असून पुढच्या महिन्यापासून प्रकल्पाचे काम पूर्ण होईल, अशी माहिती त्यांनी दिली.या प्रकल्पामुळे आसाममधील  20 लाख युवकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगार मिळतील, अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली.

या अंतर्गत, जोगिगहोपा आणि गुवाहाटी या दरम्यानचे 154 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी चौपदरीरस्ता बांधला जाईल, त्याशिवाय जोगिगहोपाला विविध ठिकाणांशी जोडण्यासाठी छोटे रेल्वेमार्ग आणि रस्ते बांधले जातील, असे त्यांनी सांगितले.

अशाच बहुआयामी लॉजिस्टिक पार्कची उभारणी देशात अन्य ठिकाणी करण्यात येत असून, महाराष्ट्रात जेनपीटीच्या साह्याने, नागपूरजवळ वर्धा ड्राय पोर्ट येथे  346 एकर भागात MMLP बांधण्यासाठीचा बृहद आराखडा तयार आहे, असे गडकरी म्हणाले. त्याशिवाय, बंगलोर, पंजाब, सुरत, मुंबई, इंदोर, पटना, हैदराबाद, विजयवाडा आणि कोईम्बतूर येथे असे MMLP बांधण्यासाठीचे अहवाल तयार केले जात आहेत, असेही ते म्हणाले. त्याशिवाय, चेन्नई विमानतळ, पुणे आणि लुधियाना येथेही MMLP विकसित करण्यासाठी अभ्यास सुरु आहे, असे त्यांनी सांगितले.

आसाम मध्ये 80,000 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्गाची कामे सुरु केली जाणार आहेत, अशी माहिती गडकरी यांनी दिली. या वर्षात त्यापैकी 3,545 कोटी रुपयांची 575 किमी रस्त्यांची कामे या वर्षात केली जातील, त्यानंतर टप्प्याटप्याने पुढची कामे केली जातील असे ते म्हणाले. आसाममधील खासदार आणि आमदारांनी रस्त्यांच्या बांधकामासाठी आणलेल्या प्रस्तावांना मंजुरी दिली जाईल, असेही गडकरी म्हणाले.

ईशान्य भारत विकास विभागाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की नितीन गडकरी यांच्या महत्प्रयासांमुळेच आज या प्रदेशात रस्त्यांचे इतके मोठे जाळे विकसित झाले आहे.त्यांच्यामुळे अंतर्गत जलमार्ग आपल्या लक्षात आले असून, सध्या 10 पेक्षा अधिक जलमार्ग विकसित करण्याचे काम सुरु आहे, या जलमार्गांमुळे लॉजिस्टिक खर्चात, एक चतुर्थांशपर्यंत  बचत होणार आहे. गडकरी यांनी विशेष रस्ते विकास योजनेअंतर्गत खराब स्थितीतील रस्त्यांच्या सुधारणेचाही प्रश्न सोडवला आहे, असे डॉ सिंह म्हणाले. व्यापार, उद्योग आणि वाहतुकीसाठी किफायतशीर दळणवळणाचा मार्ग, अत्यंत चांगला उपाय असून त्यामुळे, सीमापार व्यापाराला चालना मिळेल, अशी आशा सिंह यांनी व्यक्त केली.

****

B.Gokhale/R.Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1666139) Visitor Counter : 266