PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 13 OCT 2020 7:26PM by PIB Mumbai

दिल्ली-मुंबई, 13 ऑक्टोबर 2020

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांचे ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रकाशन केले. त्यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे ‘लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था’ असे नामकरण केले.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली आज कोविड-19 विषयक मंत्रिगटाची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून बैठक झाली. केंद्रीय मंत्री डॉ एस जयशंकर, हरदीप सिंग पुरी, मनसुख लाल मंडवीय, अश्विनी कुमार चौबे, आणि नीती आयोगाचे सदस्य (आरोग्यक्षेत्र) डॉ विनोद पॉल या बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीच्या सुरवातीला डॉ हर्षवर्धन यांनी कोविड विरोधातील लढ्यात आघाडीवर राहून लढणाऱ्या सर्व कोविड योध्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी या सर्वांच्या सेवाकार्याला  सलाम केला. 

आतापर्यंत देशात कोविडचे 62,27,295 रुग्ण बरे झाले असून आज जगात भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर सर्वाधिक म्हणजे 86.78% इतका आहे.  मृत्यूदरही 1.53% म्हणजे जगात सर्वात कमी इतका आहे. सुरुवातीला भारतात रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी तीन दिवस इतका होता. मात्र सातत्यपूर्ण प्रयत्नांतून हा कालावधी आता 74.9 दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे, असे डॉ हर्षवर्धन यांनी सांगितले. सध्या देशभरात कोविड चाचणीसाठी 1927 प्रयोगशाळा आहेत, ज्यामुळे चाचाण्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. भारताची चाचणी क्षमता आता दररोज 1.5  दशलक्षपर्यंत वाढवण्यात आली आहे.  गेल्या 24 तासात सुमारे 11 लाख चाचण्या करण्यात आल्या, अशी माहिती त्यांनी दिली.

आगामी काळात, येणारे सणवार आणि उत्सव तसेच हिवाळ्यात आपल्या सर्वांना अत्यंत दक्ष राहून कोविड संसर्ग रोखण्यासाठीच्या नियमांचे पालन करावे लागेल, असे आवाहन त्यांनी या बैठकीत केले. अशा काळात आपण निष्काळजीपणा केल्यास, रुग्णसंख्या वाढू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

केंद्र सरकारचे निश्चित धोरण आणि केंद्रासह सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून टप्याटप्याने करण्यात येत असलेल्या उपाययोजना, यामुळे, भारताने जागतिक पातळीवर, प्रति दशलक्ष  लोकसंख्येच्या तुलनेत, कोविडच्या  रुग्णांचे प्रमाण सर्वात कमी राखण्यात आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही  सर्वात कमी राखण्यात यश मिळवले आहे.

जागतिक पातळीवर प्रती दशलक्ष लोकसंख्येमागे रुग्णांची संख्या 4,794, इतकी आहे, तर भारतात ही संख्या 5,199  इतकी आहे. इंग्लंड, रशिया, दक्षिण आफ्रिका , अमेरिका आणि ब्राझील या देशांत  सरासरीपेक्षा अधिक रुग्णसंख्या आढळते आहे.

भारतात प्रती दशलक्ष लोकांमागे रुग्णांची मृत्यूसंख्या 79 आहे, मात्र जगात ही संख्या दक्षलक्ष/138 इतकी आहे.

चाचण्यांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, भारत सर्वाधिक चाचण्या करणाऱ्या देशांपैकी एक ठरला आहे.  गेल्या 24 तासांत देशात 10,73,014 चाचण्या करण्यात आल्या असून, आतापर्यंत एकूण चाचण्यांची संख्या 8.89 कोटी (8,89,45,107) इतकी झाली आहे.

चाचण्यांची संख्या सातत्याने वाढवत नेल्यामुळे, कोविड रुग्ण लवकरात लवकर सापडण्यात मदत झाली आणि त्यांच्यावर वेळेत उपचार झाल्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आणि मृत्यूदर कमी झाला.

भारताची तुलना अमेरिका, इंग्लंड, रशिया, फ्रांस अशा श्रीमंत देशांशी करणे योग्य ठरणार नाही, कारण भारतात त्यांच्यासारखी परिस्थिती नाही. भारताची लोकसंख्या आणि त्या तुलनेत संसाधनांचे प्रमाण, याचा समतोल इतर देशांपेक्षा वेगळा आहे. तसेच, प्रती दशलक्ष लोकसंख्येमागे, डॉक्टर्स आणि परिचारिकांची संख्या, जीडीपीतील आरोग्यासाठीची तरतूद, अशा निकषांवर भारताची इतर उच्च उत्पन्न असलेल्या विकसित देशांसोबत तुलना करणे अन्यायकारक ठरेल. व्यापक परिप्रेक्ष्यात पहिले असता, कोविड व्यवस्थापना संदर्भात भारताची धोरणे आणि गेल्या अनेक महिन्यांत सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात केलेल्या कामांमुळे अत्यंत उत्साहवर्धक परिणाम दिसले आहेत.

भारतात नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे, गेल्या 24 तासांत देशभरात कोविडचे 55,342 नवे रुग्ण आढळले. 

केंद्र सरकारच्या सर्वसमावेशक आणि आक्रमक चाचण्यांचे धोरण, योग्य प्रकारे रुग्णांचा माग घेणे आणि सर्वेक्षण, रूग्णालयात उपचार आणि प्रमाणित उपचार पद्धतींचे पालन या सर्व उपाययोजनांमुळे, दररोज आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे.

गेले पाच आठवडे, दररोज आढळणाऱ्या रुग्णसंख्येत सातत्याने घट झाली आहे. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दररोजच्या रुग्णांची साप्तहिक सरासरी संख्या 92,830 इतकी होती, मात्र आता ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात ही संख्या 70,114 पर्यंत कमी झाली आहे. 

सक्रीय रुग्णांच्या संख्येत देखील सातत्याने घट होत आहे. सध्या देशात सक्रीय रुग्णांची संख्या एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्येच्या तुलनेत 11.69%इतकी म्हणजे 8,38,729 इतकी आहे. आज सलग पाचव्या दिवशी सक्रीय रुग्णांची संख्या 9 लाखांपेक्षा कमी आहे.

एकूण रूग्णांपैकी 76% रुग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटकात रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. दोन्ही राज्यात सध्या दररोज 7000 पेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. कर्नाटक, केरळ, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि छत्तिसगढ या राज्यात, नव्याने रुग्णसंख्या वाढतांना दिसत आहे.

गेल्या 24 तासांत, 77,760 रुग्ण बरे झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 62 लाखांपेक्षा अधिक (62,27,295) झाली आहे. दररोज रुग्ण बरे होण्याच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे, देशात रुग्ण बरे होण्याचा दरातही सुधारणा झाली आहे. सध्या हा दर 86.78% इतका आहे.बरे झालेल्या एकूण रूग्णांपैकी 78% रुग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात आहेत.

महाराष्ट्रात एका दिवसांत, 15,000 रुग्ण बरे झाले तर  कर्नाटकात ही संख्या 12,000 इतकी आहे.

कोविडमुळे मृत्यू झालेल्यांची संख्याही आज सलग दहाव्या दिवशी 1000 पेक्षा कमी आढळली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोविडमुळे 706 जणांचा मृत्यू झाला. यापैकी 79% मृत्यू दहा राज्ये/ केंद्रशासित प्रदेशात झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक (165 मृत्यू ) म्हणजे 23% मृत्यूंची नोंद झाली आहे.

इतर अपडेट्स: 

महाराष्ट्र अपडेट्स

महाराष्ट्रात राज्य आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार कोविड 19 रुग्णांच्या संख्येत घट दिसून येत आहे. राज्यात जास्त बधितांची संख्या आढळणाऱ्या पुणे, नाशिक आणि नागपूर यासारख्या शहरांमध्ये आता बधितांची संख्या कमी झाली आहे. मुंबईत अद्याप परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही, परंतु संख्यांचा आढावा घेतल्यास महानगरात परिस्थितीत किंचित सुधारणा होत असल्याचे दिसून आले आहे. सणासुदीच्या काळात कोविड19 चा प्रसार रोखण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने सोमवारी फेस मास्क न घातलेल्यांवर सामूहिक मोहीम राबविली आणि असे म्हटले आहे की दररोज सुमारे 20,000 नागरिकांना दंड आकारला जाईल. ही मोहीम किमान एक महिना सुरू राहील, असे महानगरपालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांनी सांगितले आणि ते स्वत: दररोज परिस्थितीवर लक्ष ठेवणार आहेत. 

नवीन रुग्ण- 7,089 

बरे झाले रुग्ण- 15,656 

मृत्यू –165 

सक्रिय रुग्ण - 2,12,439 

एकूण पॉसिटीव्ह केसेस- 15,35,315 

एकूण बरे झालेले रुग्ण- 12,81,896 

एकूण मृत्यू –40,514 

आतापर्यंत चाचणी घेतलेले नमुने- 76,97,906

 

B.Gokhale/S.Tupe/P.Malandkar
 
 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1664091) Visitor Counter : 245