पंतप्रधान कार्यालय

डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या 'देह वेचावा कारणी ' या आत्मचरित्राचे पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन


प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे नाव ‘लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था’असे नामकरण केले

डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचे प्रयत्न आणि योगदान भावी पिढ्यांना प्रेरणा देईल: पंतप्रधान

Posted On: 13 OCT 2020 4:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज  डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांचे  ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रकाशन केले. त्यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे ‘लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था’ असे नामकरण केले.

यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, महाराष्ट्रातील प्रत्येक भागात विखे पाटील यांच्या जीवनातील कथा सापडतील. ते म्हणाले की, बाळासाहेब विखे पाटील यांनी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवत महाराष्ट्राच्या विकासासाठी आपले आयुष्य वेचले.  ते म्हणाले की, ग्रामस्थ, गरीब, शेतकर्‍यांचे जीवन सुलभ करणे आणि त्यांचे दुःख कमी करणे हे विखे पाटील यांच्या जीवनाच्या केंद्रस्थानी आहे.

पंतप्रधान म्हणाले की, विखे पाटील यांनी नेहमीच समाजाच्या उन्नतीसाठी काम केले आणि समाजात अर्थपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी, गरीब आणि खेड्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राजकारण हे माध्यम बनवण्यावर नेहमी भर दिला. ते म्हणाले की बाळासाहेब विखे पाटील यांच्या या दृष्टिकोनाने त्यांना इतरांपेक्षा वेगळे ठरवले. ते म्हणाले, बाळासाहेब विखे पाटील यांचे आत्मचरित्र आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचे आहे, कारण महाराष्ट्रातील सहकाराच्या यशस्वीतेसाठी , गावांच्या विकासासाठी, गरीबांसाठी , त्यांच्या शिक्षणासाठी  त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्यांचे योगदान पुढील पिढ्यांना प्रेरणा देईल.

डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी गरीबांचे दुःख आणि यातना समजून  घेतल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. म्हणूनच  त्यांनी शेतकऱ्यांना एकत्र आणले, त्यांना सहकारांशी जोडले. अटलजी यांच्या सरकारमधील मंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात  सहकारी संस्थांना प्रोत्साहन दिले असे  पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की, जेव्हा देशात ग्रामीण शिक्षणाबाबत फारशी चर्चा होत नव्हती, तेव्हा डॉ बाळासाहेब विखे पाटील यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेद्वारे खेड्यातील तरुणांना सक्षम बनवण्याचे काम केले. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी खेड्यातील तरुणांचे शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी काम केले.

पंतप्रधान म्हणाले, विखे पाटील यांना  खेड्यातील शेतीमध्ये  शिक्षणाचे महत्त्व माहित आहे. आज शेतकऱ्यांना उद्योजकतेकडे वळवण्यासाठी आणि त्यांना उद्योजक बनवण्यासाठी संधी निर्माण केल्या जात आहेत.

पंतप्रधान म्हणाले, स्वातंत्र्यानंतर जेव्हा देशात खायला पुरेसे अन्न नव्हते, तेव्हा पिकाची उत्पादकता कशी वाढवायची याला सरकारचे प्राधान्य होते. परंतु उत्पादकतेच्या या चिंतेत शेतकऱ्यांच्या  नफ्याकडे लक्ष दिले गेले नाही. ते म्हणाले की, देशातील शेतकऱ्यांचे  उत्पन्न वाढवण्यावर आता भर दिला जात आहे आणि या दृष्टीने निरंतर प्रयत्न केले जात आहेतकिमान हमी भाव वाढवण्याचा निर्णय, युरियावर कडुनिंबाचे आच्छादन  आणि उत्तम  पीक विमा ही काही उदाहरणे आहेत. पंतप्रधान-किसान सन्मान निधी योजनेसारख्या उपक्रमांमुळे आता शेतकऱ्यांना छोट्या खर्चासाठी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले. शिवाय शीतगृहेमेगा फूड पार्क आणि कृषी-प्रक्रिया पायाभूत सुविधा यासारख्या पायाभूत सुविधा वाढवण्याबाबत अभूतपूर्व काम केले गेले आहे.

बाळासाहेब विखे पाटील यांनी शेतीच्या पारंपारिक ज्ञानाचे जतन  करण्यावर भर दिल्याचा उल्लेख करताना  नमूद केले, कि आपण त्या ज्ञानाचे जतन केले पाहिजे आणि शेतीत नवीन व जुन्या पद्धती एकत्र करायला  पाहिजेत. या संदर्भात त्यांनी ऊस पिकाचे उदाहरण दिले, जिथे शेतीच्या नवीन आणि जुन्या दोन्ही पद्धती वापरल्या जातात. ते म्हणाले की, आता उसापासून साखर आणि इथेनॉल काढण्यासाठी उद्योग सुरू केले जात आहेत.

पंतप्रधान म्हणाले की डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी महाराष्ट्रातील खेड्यातील पिण्याच्या आणि  सिंचनाच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी प्रयत्न केले. ते पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री कृषी सिंचय योजनेंतर्गत महाराष्ट्रातील  अनेक वर्षांपासून रखडलेले  26 प्रकल्पांचे काम जलदगतीने सुरू करण्यात आले. यापैकी 9 प्रकल्प यापूर्वीच पूर्ण झाले आहेत. हे प्रकल्प पूर्ण झाल्यावर सुमारे 5 लाख हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा मिळेल, असेही ते म्हणाले.

ते म्हणाले, जुलै 2018 मध्ये महाराष्ट्रातील 90 प्रमुख आणि लघु पाटबंधारे प्रकल्पांवर काम सुरू झाले. पुढील  2-3 वर्षांत हे प्रकल्प पूर्ण झाल्यावर सुमारे  4 लाख हेक्टर जमीन सिंचनाच्या सुविधांशी जोडली जाईल. ते म्हणाले की भूजल पातळी अत्यंत कमी असलेल्या महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांमध्ये अटल भूजल योजना राबवली जात आहे.

जलजीवन अभियानांतर्गत महाराष्ट्रातील खेड्यांमधील प्रत्येक कुटूंबाला पिण्याचे पाणी देण्याचे कामही जलद गतीने सुरू असल्याचे पंतप्रधान म्हणाले. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातील 19 लाख पेक्षा अधिक कुटुंबांना पाईपद्वारे  पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यापैकी 13 लाखांहून अधिक गरीब कुटुंबांना कोरोना साथीच्या आजारात ही सुविधा मिळाली.

ते म्हणाले की मुद्रा योजनेमुळे गावात स्वयंरोजगाराच्या संधींमध्ये वाढ झाली आहे. देशातील बचत गटातील 7 कोटींपेक्षा जास्त महिलांना 3 लाख कोटी रुपयांहून अधिक कर्ज देण्यात आले आहे. ते पुढे म्हणाले की, बँकांकडून कर्ज सहज मिळावे यासाठी शेतकरी, मच्छिमारांना किसान क्रेडिट कार्डची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पूर्वी किसान क्रेडिट कार्डापासून वंचित असलेल्या सुमारे अडीच कोटी लहान शेतकरी कुटुंबाना आता ही सुविधा आहे.

 

पंतप्रधान म्हणाले, खेड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये, आत्मविश्वास वाढवण्यामुळे, आत्मनिर्भरतेचा  संकल्प अधिक बळकट होईल. बाळासाहेब विखे पाटील यांनाही खेड्यांमध्ये स्वावलंबनाची ही भावना रुजवायची होती.

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1664017) Visitor Counter : 307