पंतप्रधान कार्यालय

राष्ट्रीय स्वच्छता केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण

Posted On: 08 AUG 2020 11:01PM by PIB Mumbai

 

आजचा दिवस अत्यंत महत्वाचा, ऐतिहासिक दिवस आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आजची तारीख म्हणजेच  आठ ऑगस्टचे विशेष महत्त्व आहे. आजच्याच दिवशी, 1942 साली, महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली, एक व्यापक जनचळवळ सुरु झाली होती. इंग्रजानो भारत सोडा (भारत छोड़ो)चा नारा देण्यात आला होता. या ऐतिहासिक दिवशी,राजघाटजवळ स्वच्छता केंद्राचे लोकार्पण होणे, हीच विशेष प्रासंगिक बाब आहे. हे केंद्र म्हणजे बापूंच्या स्वच्छाग्रहाप्रती 130 कोटी भारतीयांनी वाहिलेली आदरांजली आणि कार्यांजली आहे. 

 

मित्रांनो,

पूज्य बापू, स्वच्छतेत स्वराज्याचे प्रतिबिंब बघत असत. स्वराज्याच्या स्वप्नपूर्तीचा एक मार्ग म्हणून ते स्वच्छतेला मानत असत. मला अत्यंत समाधान आहे की स्वच्छतेच्या प्रती महात्मा गांधींच्या आग्रहाला समर्पित असे हे आधुनिक स्मारक आता राजघाटासोबत जोडले गेले आहे.

 

मित्रांनो

हे राष्ट्रीय स्वच्छता केंद्र, महात्मा गांधींच्या स्वच्छाग्रह आणि त्यासाठी समर्पित अशा कोट्यवधी भारतीयांच्या विराट संकल्पाचे मूर्त रूप म्हणून इथे उभे आहे. थोड्यावेळापूर्वी जेव्हा मी या केंद्राच्या आत गेलो होतो, तेव्हा तिथे कोट्यवधी भारतीयांच्या प्रयत्नांचे संकलन बघून, भारावून जात मी मनातल्या मनात त्यांना वंदन केले. सहा वर्षांपूर्वी, लाल किल्यावरुन सुरु झालेल्या या संकल्पाच्या क्षणोक्षणीच्या स्मृती माझ्या दृष्टीपटलावर येत आहेत.

देशाच्या कानाकोपऱ्यात ज्या प्रकारे कोट्यवधी सहकाऱ्यांनी प्रत्येक सीमा, सगळी बंधने बाजूला ठेवत, एकत्र येऊन एका स्वरात  या स्वच्छ भारत अभियानाचा स्वीकार केला, त्या एकोप्याला या केंद्रात साठवून, जतन करण्यात आले आहे. या केंद्रातही सत्याग्रहाच्या प्रेरणेतून, स्वच्छाग्रहाची आपली यात्रा , आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दर्शवण्यात आली आहे. आणि मी हे देखील पहिले की स्वच्छता रोबोट तर इथे आलेल्या मुलांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. ते त्या रोबोशी अगदी मित्राप्रमाणे गप्पा मारत होते. स्वच्छतेच्या मूल्यांशी हीच जवळीक, देश आणि जगातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जाणवेल आणि ती व्यक्ती भारताचे एक नवे चित्र, एक नवी प्रेरणा इथून घेऊन जाईल.

 

मित्रांनो,

आजच्या विश्वात, गांधीजीसारखी मोठी प्रेरणा दुसरी असू शकत नाही. गांधीजींचे जीवन आणि त्यांचे विचार आत्मसात करण्यासाठी आज संपूर्ण जग पुढे आले आहे. गेल्यावर्षी जेव्हा महात्मा गांधींची 150 वी जयंती जगभरात अत्यंत भव्य स्वरूपात साजरी करण्यात आली, ती सर्व दृश्ये अभूतपूर्व होती. गांधीजींचे आवडते भजन, ‘वैष्णव जन तो तेणे कहियेअनेक देशातील गीतकार आणि संगीतकारांनी गायले होते. भारतीय भाषेतील हे भजन अत्यंत सुरेख सुरेल पद्धतीने गाऊन या लोकांनी एक नवा विक्रमच प्रस्थापित केला होता. संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात झालेल्या विशेष जयंती समारंभापासून ते जगातील मोठमोठ्या देशांमध्ये गांधीजींच्या विचारांचे स्मरण केले गेले, त्यांच्या आदर्शांचे स्मरण केले गेले. तेव्हा असे वाटत होते, की गांधीजीनी संपूर्ण जगाला एका सूत्रात, एका बंधनात बांधले होते.

 

मित्रांनो,

गांधीजींची स्वीकारार्हता आणि लोकप्रियता, देश, काल आणि परिस्थितीच्या पलीकडे आहे. याचे सर्वात मोठे कारण आहे, सामान्य माध्यमातून अभूतपूर्व परिवर्तन आणण्याची त्यांची क्षमता ! जगात कोणी कधी विचार केला असेल, का, एका मोठ्या शक्तिशाली सत्तेपासून मुक्ती मिळवण्याच्या मार्गातील एक मार्ग स्वच्छताहा ही असू शकतो?

गांधीजीनी केवळ असा विचारच केला नाही, तर स्वच्छतेच्या या भावनेला स्वातंत्र्याच्या भावनेशी देखील जोडले. त्याला जनचळवळीत रुपांतरित केले. 

 

मित्रांनो,

गांधीजी म्हणत असत—“केवळ धाडसी आणि स्वच्छ जनताच स्वराज्य मिळवू शकते

स्वच्छता आणि स्वराज्यातील परस्परसंबंधांविषयी महात्मा गांधी यासाठी आश्वस्त होते कारण त्यांना खात्री होती, की अस्वच्छता सर्वात जास्त नुकसान कोणाचे करत असेल तर ते गरिबाचे करते. अस्वच्छता, कचरा गरीबापासून त्याची शक्तीच काढून घेतो, त्याची शारीरिक आणि मानसिक ताकद देखील! गांधीजींना माहित होते की भारताला जोपर्यंत अशा घाणीत ठेवले जाईल, तोपर्यंत भारतीय जनामानसात आत्मविश्वास निर्माण होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत जनतेच्या मनात आत्मविश्वास निर्माण होत नाही, तोपर्यंत ती स्वातंत्र्याच्या लढयासाठी कशी उभी राहू शकेल

आणि म्हणूनच, दक्षिण आफ्रिकेपासून ते चंपारणपर्यंत आणि साबरमती आश्रमापर्यंत, त्यांनी स्वच्छतेलाच आपल्या आंदोलनाचे एक माध्यम बनवले होते.

 

मित्रांनो,

मला अत्यंत आनंद आहे की, गांधीजींच्या प्रेरणेतून, गेल्या वर्षी देशाच्या कानाकोपऱ्यात लक्षावधी स्वच्छाग्रहींनी स्वच्छ भारत अभियान हेच आपल्या आयुष्याचे धेय्य बनवले आहे. आणि हेच कारण आहे की 60 महिन्यांत सुमारे, 60 कोटी भारतीय नागरिकांना शौचालयाची सुविधा मिळाली आहे, त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

या शौचालयांमुळेच देशातील भगिनींना सन्मान, सुरक्षा आणि सुविधा मिळाली आहे. त्याचमुळे देशातील लाखो मुलींना न थांबता शिक्षण घेण्याचा विश्वास मिळाला आहे. याचमुळे लाखो गरीब मुलांना आजारांपासून वाचवण्याचे उपाय सापडले आहेत. याचमुळे देशातील कोट्यवधी दलित, वंचित, पीडित, शोषित, आदिवासींना समानतेचा विश्वास मिळाला.

 

मित्रांनो,

स्वच्छ भारत अभियानामुळे, प्रत्येक देशबांधवाचा आत्मविश्वास आणि आत्मबळ वाढवले आहे. मात्र, त्याचा सर्वाधिक लाभ देशातील गरीबाच्या आयुष्यावर होतांना दिसतोय. स्वच्छ भारत अभियानाने आपली सामाजिक चेतना, एक समाज म्हणून आपले आचार-विचार यात कायमस्वरूपी बदल झाले आहेत. पुन्हा पुन्हा हात धुणे,सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट, या सगळ्या सवयी आपण सहजपणे, अत्यंत वेगाने सर्वसामान्य भारतीय जनतेपर्यंत पोहोचवू शकलो आहोत. प्रत्येक ठिकाणी कचरा बघूनही, त्याकडे दुर्लक्ष करणे, ही भावना आता देशातून बाहेर निघते आहे. आता घरातून किंवा रस्त्यावर घाण, कचरा टाकणाऱ्या व्यक्तींना इतर लोक निश्चितपणे टोकतात, थांबवतात. आणि हे काम सर्वात चांगल्या पद्धतीने कोण करतय?

तर आपली मुले, आपले युवक!! 

 

मित्रांनो,

देशातील प्रत्येक मुलाच्या वैयक्तिक आणि सामाजिक स्वच्छतेबाबत जी चेतना निर्माण झाली आहे, त्याचा खूप मोठा लाभ कोरोनाविरुद्धच्या लढाईत देखील आम्हाला मिळतो आहे. आता आपण जरा कल्पना करा, जर कोरोनासारखा हा साथीचा आजार 2014 पूर्वी आला असता, तर काय परिस्थिती झाली असती? शौचालयांची कमतरता असतांना आपण संक्रमणाची गती आपण नियंत्रित करु शकलो असतो का? जेव्हा देशातील 60 टक्के लोकसंख्या उघड्यावर शौचाला जाण्यास बाध्य होती, त्यावेळी टाळेबंदीसारख्या उपाययोजना यशस्वी झाल्या असत्या का? स्वच्छाग्रहाने कोरोना विरुद्धच्या लढाईत एक मोठा आधार आपल्याला दिला आहे, एक माध्यम दिले आहे.

 

मित्रांनो,

स्वच्छता मोहीम हा एक प्रवास आहे, जो यापुढेही सातत्याने सुरु राहणार आहे. उघड्यावर शौचाच्या पद्धतीतून मुक्तता मिळवल्यानंतर आपली जबाबदारी आता आणखी वाढली आहे. देशाला हागणदारी मुक्त बनवल्यानंतर आता ही उपलब्धी पुढे कायम ठेवण्याच्या मोहिमेवर लक्ष केंद्रीत करण्यात आली आहे. आता आम्हाला शहर असो किंवा गाव, कचऱ्याचे व्यवस्थापन आणि त्याची विल्हेवाट  अधिक प्रभावी करायची आहे. आता आपल्याला कचऱ्यातून सोने तयार करण्याच्या कामाला गती दिली आहे. या संकल्पासाठी आज भारत छोडोचळवळीपेक्षा अधिक चांगला दिवस कोणता असू शकतो?

 

मित्रांनो,

देशाला दुर्बळ बनवणाऱ्या वाईट सवयींचा त्याग भारताने करावा, यापेक्षा अधिक चांगले काय होईल

हाच विचार घेऊन, गेल्या सहा वर्षांपासून देशात एक व्यापक भारत छोडो अभियान’  सुरु झाले आहे.

गरीबी- भारत छोड़ो !

उघड्यावर शौचाला जाण्याची अगतिकता - भारत छोड़ो !

पाण्यासाठी पायपीट करण्याची असहायता- भारत छोड़ो !

एकदाच वापरले जाणारे प्लास्टिक - भारत छोड़ो।

भेदभावाची प्रवृत्ती, भारत छोड़ो !

भ्रष्टाचाराची कुप्रथा, भारत छोड़ो !

दहशतवाद आणि हिंसा - भारत छोड़ो !

 

मित्रांनो,

भारत छोडोचा हा संकल्प स्वराज्यापासून सुराज्याच्याभावनेशी अनुरूप आहे. याच शृंखलेत आज आपल्या सर्वांना अस्वच्छता भारत छोडो” (‘गंदगी भारत छोड़ो’) च्या  संकल्पाची पुनरावृत्ती करायची आहे.

 

चला तर मग,

आजपासून, 15 ऑगस्टपर्यंत म्हणजे स्वातंत्र्यदिनापर्यंत देशात, एक आठवड्याची मोहीम चालवू या. स्वराज्याच्या सन्मानार्थ हा आठवडा आपण गंदगी भारत छोड़ो सप्ताहम्हणून साजरा करणार आहोत. प्रत्येक जिल्ह्याच्या जबाबदार अधिकाऱ्यांना माझा असा आग्रह आहे की त्यांनी या आठवड्यात आपापल्या जिल्ह्यातल्या सर्व गावात सामुदायिक शौचालये बांधण्याची, त्यांची दुरुस्ती करण्याची मोहीम चालवावी. जिथे दुसऱ्या राज्यातून स्थलांतारीत कामगार जात आहेत, त्या गावांमध्ये प्राधान्याने हे काम करायला हवे. त्याचप्रमाणे, कचऱ्यातून खत तयार करण्याचे काम असो, गोबरगैस असो, जलपुनर्प्रक्रिया असो, एकदाच वापरले जाणाऱ्या प्लास्टिकपासून मुक्ती असो, यासाठी आम्हा सर्वाना एकत्र पुढे जायचे आहे.

 

मित्रांनो,

जसे गंगा नदीच्या स्वच्छता मोहिमेबाबत आपल्याला सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे, तशीच देशातील इतर नद्यांमधली घाण देखील आपल्याला बाहरे काढून त्या नद्या स्वच्छ करायच्या आहेत. इथे जवळच यमुना नदी आहे. यमुनेलाही अस्वच्छ नाल्याच्या विळख्यातून सोडवण्याचे अभियान आपल्याला जलद गतीने राबवायचे आहे . यासाठी, यमुनेच्या आजूबाजूला वसलेल्या प्रत्येक गावातील आणि शहरातील नागरिकांची मदत आणि सहकार्य आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे.

आणखी एक महत्वाचे म्हणजे, हे सगळे करतांना, “दो गज़ की दूरी, मास्क है ज़रूरीहा नियम विसरता कामा नये. कोरोना विषाणू आपले तोंड आणि नाकाच्या मार्गानेच संक्रमित होतो आणि तिथेच तो विकसितही होतो. त्यामुळे, हे संक्रमण रोखण्यासाठी मास्कचा वापर, शारीरिक अंतर आणि सार्वजनिक जागांवर न थुंकणे, अशा नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.

स्वतःला सुरक्षित ठेवत, हे व्यापक अभियान आपण यशस्वी करणार आहोत, या  विश्वासासह पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वच्छता केंद्रासाठी सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन !!

खूप खूप धन्यवाद !!

*****

B.Gokhale/R.Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1644544) Visitor Counter : 423