PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 18 JUL 2020 7:38PM by PIB Mumbai

 

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

दिल्ली-मुंबई, 18 जुलै 2020

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती :

देशात कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी, केंद्राच्या मार्गदर्शनाखाली सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी वेळेत, संरक्षक आणि वर्गीकृत धोरणे राबवल्यामुळे, देशात कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या आटोक्यात राहिली आहे. सध्या देशात उपचार सुरु असलेल्या सक्रीय कोविड रुग्णांची संख्या 3,58,692 इतकी आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 6,53,750 पर्यंत पोहोचली आहे. बरे झालेले रुग्ण आणि सक्रीय रुग्णांच्या संख्येमधील तफावत सातत्याने वाढते आहे. आज ही तफावत 2,95,058 इतकी आहे. सर्व, 3,58,692  सक्रीय रूग्णांना योग्य वैद्यकीय मदत दिली जात आहे. यांच्यापैकी काही गृह अलगीकरणात तर काही गंभीर रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत.

केंद्र आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी केलेल्या समन्वयीत प्रयत्नांतून, कोविड आजाराचे व्यवस्थापन शक्य झाले आहे. केंद्र सरकार सर्व राज्यांना  सातत्याने मदत करत असून, ज्या ठिकाणी कोविडचे अधिक रुग्ण आहेत, अशा ठिकाणी केंद्राने तज्ञांची पथकेही पाठवली आहेत. बिहारमधील कोविड -19 च्या व्यवस्थापनाचे मूल्यांकन करण्यासाठी आणि आवश्यक ती मदत देण्यासाठी केंद्र सरकार बिहारला पथक पाठवत आहे. या पथकात, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल, NCDC चे संचालक डॉ एस के सिंग आणि एम्सचे सहयोगी प्राध्यापक डॉ नीरज निश्चल यांचा समावेश आहे,हे पथक उद्या बिहारला पोहोचेल.

प्रतिबंधात्मक धोरणाचा मुख्य भर, घरोघरी जाऊन सर्वेक्षण, विशिष्ट परिघात नियंत्रण कामे, रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा वेळेत शोध, प्रतिबंधक आणि बफर क्षेत्रांमध्ये सर्वेक्षण, गंभीर रुग्णांचे प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापन यावर राहिला आहे. रुग्णालय पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी सातत्याने सुरु असलेल्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून, रुग्ण बरे होण्याचा दर वाढला आहे.

गेल्या 24 तासांत, कोविडचे 17,994 रुग्ण बरे झाले. सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 63% इतका आहे.

ICMR च्या चाचणीविषयकच्या ताज्या धोरणानुसार, सर्व वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टरांना चाचणीची शिफारस करण्याची परवानगी देण्यात आली आहे. RT-PCR आणि रॅपिड अँटीजेन पॉईंट ऑफ केअर टेस्ट,यांच्यासह  TruNat आणि CBNAAT या चाचण्यांमुळे कोविड नमुन्यांच्या चाचण्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत 3,61,024 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. आतापर्यंत देशात कोविडसाठी एकूण 1,34,33,742 चाचण्या करण्यात आल्या असून, ज्यामुळे देशात प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे चाचण्यांची संख्या 9734.6.पर्यंत वाढली आहे.

 

इतर अपडेट्स:

 

महाराष्ट्र अपडेट्स :

महाराष्ट्रात एका दिवसात सर्वाधिक 8,308 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात एकूण रुग्णसंख्या 2,92,589 इतकी झाली आहे. राज्यात एका दिवसात रुग्णसंख्या 8 हजाराचा टप्पा ओलांडण्याची ही तिसरी वेळ आहे. राज्यात शुक्रवारी आणखी 258 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे या आजारामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 11,452 इतकी झाली आहे. कोविडमुळे महाराष्ट्रातील दूध पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. राज्यातील रोजच्या 1.19 कोटी लिटर दूध उत्पादनापैकी 47 लाख लिटर दूध विकले न गेल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत. राज्य सरकारने दूध उत्पादकांना आर्थिक साहाय्य करावे अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे.

 

* * * 

ST/DR

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1639670) Visitor Counter : 216