इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

आत्मनिर्भर अ‍ॅप नवोन्मेष आव्हानासाठी शासनाने वाढविली अंतिम मुदत

Posted On: 17 JUL 2020 7:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 जुलै 2020

आत्मनिर्भर भारत अ‍ॅप नवोन्मेष आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने शासनाने या आव्हानासाठीच्या प्रवेश प्रक्रियेची अंतिम तारीख 26 जुलै 2020 पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. MyGov च्या नवोन्मेष पोर्टलवर हे आव्हान आयोजित केले असून https://innovate.mygov.in/app-challenge/ .वर लॉग इन करून त्यात सहभागी होता येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 जुलै रोजी सुरू केलेल्या आत्मनिर्भर भारत अ‍ॅप नवोन्मेष आव्हानाला देशभरातील तंत्रज्ञ उद्योजक आणि स्टार्टअप्सकडून अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत 8 विवक्षित श्रेणींमध्ये 2,353 नोंदणी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये 1,496 वैयक्तिक स्तरावर तर संस्था आणि कंपनी स्तरावर सुमारे 857 प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. वैयक्तिक स्तरावर प्राप्त झालेल्या प्रवेशिकांपैकी जवळपास 788 अ‍ॅप नवोन्मेष पूर्णावस्थेत असून उर्वरित 708 वर काम सुरु आहे. संस्थांद्वारे आलेल्या अ‍ॅप्समधील 636 अ‍ॅप्स यापूर्वीच कार्यरत केले असून उर्वरित 221 अ‍ॅप्स विकसित अवस्थेत आहेत. एकूण प्राप्त अ‍ॅप्सच्या श्रेणीनुसार वर्गीकरण करायचे झाल्यास 380 व्यावसायिक, 286 आरोग्य आणि निरोगीपणा अंतर्गत आहेत तर ई लर्निंग अंतर्गत 339, सोशल नेटवर्किंग अंतर्गत 414, गेम्स अंतर्गत 136, कार्यालयातून आणि घरातून काम करण्यासाठी 238, बातम्यांसाठी 75 आणि मनोरंजन क्षेत्रासाठी 96 अ‍ॅप्स चा समावेश आहे. इतर श्रेणी अंतर्गत जवळपास 389 अ‍ॅप्स प्राप्त झाले आहेत. यापैकी सुमारे 100 अ‍ॅप्स 100,000 हून अधिक वेळा डाउनलोड झाले आहेत. दुर्गम आणि लहान शहरांसह देशभरातून या आव्हानात्मक स्पर्धेत लोकांनी सहभाग नोंदविला आहे. आपल्या देशातील विद्यमान प्रतिभेचे हे द्योतक आहे. अ‍ॅप्स नवोन्मेष आव्हान हे भारतीय तंत्रज्ञान विकसक, उद्योजक आणि कंपन्यांना मोठ्या प्रमाणात भारतासाठी अ‍ॅप्स तयार करण्याची योग्य संधी आहे, जी जगात कुठेही अतुलनीय आहे. उत्तम, विक्रीयोग्य आणि सर्वाना सहज हाताळता येईल असे सुलभ आणि सुरक्षित अ‍ॅप्स निवडून त्याचा वापर करायला वापरकर्त्यांना प्रोत्साहित करणे हे खरे तर आव्हान आहे.

M.Chopade/V.Joshi/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1639428) Visitor Counter : 172