पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 750 मेगावॅट रीवा सौर प्रकल्प राष्ट्राला समर्पित केला; त्यावेळी केलेले भाषण

Posted On: 10 JUL 2020 12:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 जुलै 2020

 

मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल जी,

मध्य प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री शिवराज सिंह जी,

केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी आर. के. सिंह जी,

थावरचंद गेहलोत जी, नरेंद्रसिंह तोमर जी, धर्मेंद्र प्रधान जी, प्रल्हादसिंह पटेल जी, मध्य प्रदेश मंत्रिमंडळातले सदस्य आणि खासदार तसचे आमदार, रीवासहित संपूर्ण मध्य प्रदेशातल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो! आज रीवाने खरोखरीच एक इतिहास रचला आहे. रीवाचा खरा परिचय म्हणजे माता नर्मदेच्या नावाने आणि पांढऱ्या वाघांमुळे आहे. आता यामध्ये अशियातल्या सर्वांत मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे नावही जोडले गेल आहे. या प्रकल्पाचा आकाशातून घेतलेला व्हिडिओ आपण पाहिला तर असं वाटतं की, शेतांमध्ये हजारो सौर पॅनलचे पीक आले आहे आणि ते हवेवर छान डोलतेय. आणखी असंही वाटतंय की, नितळ- निळाईचे पाणी असलेल्या एखाद्या खोल समुद्रावरून आपण जात आहोत. या कार्यासाठी मी रीवाच्या लोकांचे, मध्य प्रदेशच्या लोकांचे खूप- खूप अभिनंदन करतो. शुभेच्छा देतो.

रीवाचा हा सौर ऊर्जा प्रकल्प या संपूर्ण क्षेत्राला दशकामध्ये ऊर्जेचे खूप मोठे केंद्र बनवण्यासाठी मदत करेल. या सौर प्रकल्पामुळे मध्य प्रदेशातल्या लोकांना, इथल्या उद्योगांना वीज तर मिळणार आहेच, इतकंच नाही तर दिल्लीमध्ये मेट्रो रेल्वेपर्यंत या प्रकल्पाचा लाभ मिळणार आहे. याशिवाय रीवाप्रमाणेच शाजापूर, नीमच आणि छतरपूर येथे मोठे सौर प्रकल्प उभे करण्याचे काम सुरू आहे. ओंकारेश्वर धरणाच्या पाण्यावर तरंगता सौर प्रकल्प बनवण्याची योजना आहे. हे सर्व प्रकल्प ज्यावेळी तयार होतील, कार्यरत होतील त्यावेळी मध्य प्रदेश निश्चितच स्वस्त आणि स्वच्छ, पर्यावरण पूरक वीज  निर्माण करणारे केंद्र बनेल. याचा सर्वात जास्त लाभ मध्य प्रदेशातल्या गरीब, मध्यम वर्गातल्या परिवारांना, शेतकरी बांधवांना आणि आदिवासींना होणार आहे.

मित्रांनो, आपल्या परंपरेमध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सूर्य पूजेला विशेष स्थान आहे. ‘‘पुनातु मां तत्स वितुर्वेण्यम्’’  म्हणजे जो उपासना योग्य सूर्यदेव आहे, त्याने आम्हाला पवित्र बनवावे. पवित्रतेची ही अनुभूती आज इथं रीवामध्ये, प्रत्येक ठिकाणी येते आहे की नाही? सूर्यदेवाच्या या ऊर्जेचा आज संपूर्ण देश अनुभव घेत आहे. आपण आता सौर ऊर्जा क्षेत्रामध्ये दुनियेमध्ये पहिल्या-अव्वल पाच देशांमध्ये पोहोचलो आहोत. एक प्रकारे हा तर सूर्यदेवाचा आशीर्वादच आहे.

मित्रांनो, सौर ऊर्जा ही आजची नाही तर 21 व्या शतकामध्ये ऊर्जेच्या गरजपूर्तीसाठी सर्वात मोठे माध्यम बनणार आहे. कारण सौर ऊर्जा निश्चित आहे, शुद्ध आहे आणि सुरक्षित आहे. निश्चित अशासाठी आहे की, ऊर्जेचे, वीजेचे दुसरे स्त्रोत संपुष्टात येवू शकतात. परंतु सूर्य सदासर्वदा, संपूर्ण विश्वामध्ये निरंतर चमकत राहणार आहे. शुद्ध अशासाठी आहे, कारण पर्यावरणाला प्रदूषित करण्याऐवजी सुरक्षित ठेवण्यासाठी मदत मिळते. आणि सुरक्षित अशासाठी, कारण हे आत्मनिर्भरतेचे एक खूप मोठे प्रतीक आहे. अतिशय चांगली प्रेरणा आहे.आपल्या ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी सुरक्षित साधन आहे. जसजसा भारत विकासाच्या शिखराच्या दिशेने पुढची वाटचाल करीत आहे, आमच्या आशा-आकांक्षांमध्येही वाढ होत आहे. तसतशी आपल्याला ऊर्जेची, वीजेची गरजही वाढत आहे. अशावेळी आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी विजेची आत्मनिर्भरता असणे अतिशय आवश्यक आहे. यामध्ये सौर ऊर्जा एक खूप मोठी भूमिका बजावणार आहे आणि आपले प्रयत्नच भारताच्या या क्षमतेचा विस्तार करणारे ठरणार आहेत.

मित्रांनो, ज्यावेळी आपण आत्मनिर्भरतेविषयी बोलतो, प्रगतीविषयी बोलतो त्यावेळी अर्थशास्त्र हा एक प्रमुख मुद्दा असतो. संपूर्ण दुनियेमध्ये नीति निर्धारण करणारे अनेक वर्षांपासून दुविधेमध्ये आहेत. आर्थिकबाबतीत विचार करायचा की पर्यावरणाचा विचार करायचा, असा त्यांना प्रश्न आहे. याची चर्चा सुरू झाली की, काही जण आर्थिक बाजूचा विचार करावा असे म्हणतात तर काहीजण पर्यावरणाच्या बाजूने जातात. परंतु भारताने हे दाखवून दिले आहे की, दोन्ही घटक एकमेकांच्या विरोधी नाहीत तर एकमेकांचे सहयोगी आहेत. स्वच्छ भारत अभियान असो, प्रत्येक परिवाराला एलपीजी आणि पीएनजीच्या स्वच्छ, निर्मळ इंधानाशी जोडण्याचे अभियान असो, संपूर्ण देशात सीएनजीवर चालणारी वाहन व्यवस्थेसाठी मोठे जाळे निर्माण करण्याचे काम असो, देशामध्ये विजेवर चालवणाऱ्या परिवहन सुविधेसाठी सुरू केलेले प्रयत्न असो, अशा अनेक प्रयत्नांनी देशामध्ये सामान्य माणसाच्या जीवनाला अधिक चांगले, पर्यावरण स्नेही बनवण्यात येत आहे. भारतासाठी ‘अर्थव्यवस्था आणि पर्यावरण’ हे दोन वेगळे पक्ष नाहीत तर एकमेकांना पूरक पक्ष आहेत.

मित्रांनो, आज आपण सर्वांनी पाहिलंच असेल, सरकारचे जितकेही कार्यक्रम होतात, त्यामध्ये पर्यावरण सुरक्षा आणि ईज ऑफ लिव्हिंग यांना प्राधान्य दिले जात आहे. आमच्यासाठी पर्यावरणाची सुरक्षा फक्त प्रकल्पापुरती मर्यादित नाही. तर हा आमचा जीवन जगण्याचा मार्ग आहे. ज्यावेळी आम्ही नवीकरणीय ऊर्जेचे मोठे प्रकल्प प्रारंभ करतो, त्यावेळी आम्ही हेही सुनिश्चित करतो की, स्वच्छ ऊर्जा निर्माण करण्याचा आम्ही केलेला संकल्प जीवनाच्या प्रत्येक पैलूंमधुन  दिसला पाहिजे. याचा लाभ देशातल्या प्रत्येक कानाकोप-यात, समाजातल्या प्रत्येक वर्गाला, प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचला पाहिजे. आपल्याला मी एक उदाहरण देतो.

मित्रांनो, गेल्या सहा वर्षांमध्ये जवळपास 36 कोटी एलईडी बल्ब संपूर्ण देशामध्ये वितरित करण्यात आले आहे. एक कोटींपेक्षा जास्त एलईडी बल्ब देशभरातल्या रस्त्यांवर लावण्यात आले आहेत. ऐकायला तर खूपच सामान्य गोष्ट वाटते. याचे कारण असे आहे की, जर एखादी सामान्य सुविधा आपल्याला मिळाली तर त्याचा होणारा परिणाम, त्या सुविधेमुळे पडलेला प्रभाव, घडून आलेले परिवर्तन यांची आपण कधीच फारशी चर्चा करीत नाही. मात्र एखादी गोष्ट आपल्याकडे नसेल तर मात्र त्यावेळी त्या गोष्टीची चर्चा होते.

मित्रांनो, हा छोटासा दुधी एलईडी बल्ब ज्यावेळी आपल्याकडे नव्हता, त्यावेळी तो असावा, त्याची गरज आहे, असे वाटत होते. परंतु या बल्बची किंमत खूप जास्त होती. अनेकांना परवडत नव्हती. हा बल्ब जास्त किंमत आहे, म्हणून विकला जात नव्हता. विकत कोणी घेत नाही म्हणून तो बनवणारे कोणी नव्हते. आता गेल्या सहा वर्षात किती परिवर्तन आले? एलईडी बल्बची किंमत दहापटीने कमी झाली. अनेक कंपन्यांनी बाजारात हे बल्ब आणले. आणि जे काम 100-200 वॅटचा बल्ब करीत असे, तेच काम, तितकाच प्रकाश देण्याचं काम आता 9-10 वॅटचा एलईडी बल्ब करतो. घरांमध्ये, गल्ली-बोळांमध्ये एलईडी बल्ब लावण्यात आल्यामुळे आता दरवर्षी जवळपास 600 अब्ज युनिट वीजेचा वापर कमी झाला आहे. आणि लोकांना प्रकाशही चांगला मिळत आहे. इतकंच नाही, तर दरवर्षी जवळपास 24 हजार कोटी रूपयांची बचत होत असल्यामुळे तेच पैसे देशांच्या लोकांसाठी वापरले जात आहेत. याचा अर्थ एलईडी बल्बमुळे विजेच्या बिलामध्ये कपात झाली आहे. याचा आणखी एक महत्वपूर्ण पैलू आहे. एलईडी बल्बमुळे जवळपास साडेचार कोटी टन कमी कार्बन डाय-ऑक्साईड पर्यावरणात जाण्यापासून रोखणे शक्य झाले आहे. म्हणजेच प्रदूषण कमी होत आहे.

मित्रांनो, वीज सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे तसेच वीज पुरेशा प्रमाणात मिळाली पाहिजे. त्याचबरोबर आपले वातावरण, आपली हवा, आमचे पाणीही शुद्ध राहिले पाहिजे. असा विचार निश्चित केला असून त्यासाठी आम्ही निरंतर काम करीत आहोत. हाच विचार सौर ऊर्जेविषयी आम्ही धोरण आणि रणनीती आखताना केला आहे, हे स्पष्ट दिसून येईल. आता आपणच विचार करा, वर्ष 2014 मध्ये सौर ऊर्जेची किंमत 7-8 रूपये प्रति युनिट होती. आज हीच किंमत सव्वादोन ते अडीच रूपये प्रति युनिट इतकी कमी झाली आहे. याचा खूप मोठा लाभ उद्योगांना मिळत आहे. रोजगार निर्माण होत आहे. देशवासियांनाही लाभ होत आहे. भारतामध्ये सौर ऊर्जा इतकी स्वस्त कशी काय आहे, याविषयी देशातच नाही तर संपूर्ण दुनियेमध्ये चर्चा होत आहे. ज्याप्रमाणे भारतामध्ये सौर ऊर्जा क्षेत्रामध्ये काम करण्यात येत आहे, ते पाहून अशी चर्चा तर आणखी वाढणार आहे. अशाच मोठ्या, महत्वपूर्ण पावलांमुळे भारताला स्वच्छ उर्जेच सर्वात आकर्षक बाजारपेठ मानली जात आहे. आज ज्यावेळी नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राकडे पाहिले जाते, त्यावेळी या संक्रमणाविषयी संपूर्ण दुनियेमध्ये चर्चा होते. या क्षेत्रात भारताकडे एक ‘मॉडेल’च्या रूपामध्ये पाहिले जाते.

मित्रांनो, दुनियेची, मानवतेची भारताडून खूप आशा आहेत. सर्वांच्या या अपेक्षा पाहूनच आम्ही संपूर्ण विश्वाला जोडण्यासाठी कार्यरत आहे. या विचारसरणीचा परिणाम ‘‘आयसा’’ म्हणजेच इंटरनॅशनल सौलर अलायन्स (आयएसए) आहे. ‘वन वर्ल्ड, वन सन, वन ग्रिड’ यामागे हीच भावना आहे. या सौर ऊर्जेच्या चांगल्या उत्पादनासाठी आणि उपयोग करण्यासाठी संपूर्ण विश्वाला एकत्रित करण्याचा प्रयत्न  आहे. यामुळे आपल्या धरती मातेसमोर आलेले मोठे संकट टळावे आणि छोटे छोटे देश, गरीब देश यांचीही विजेची आवश्यकता पूर्ण व्हावी.

मित्रांनो, एक प्रकारे सौर ऊर्जा आता सर्वसामान्य ग्राहकांना उत्पादकही बनवले आहे. विजेच्या बटनाचे नियंत्रण पूर्ण त्यांच्याच हातामध्ये सोपवले आहे. परंतु सौर ऊर्जेमध्ये तर मग घराचे छत असो किंवा कार्यालय अथवा कारखान्याचे छत असो, कोणत्याही ठिकाणी थोडी जरी जागा असेल, त्यामध्ये सामान्य लोकही आपल्याला आवश्यक असलेली वीज निर्माण करू शकतात. यासाठी सरकार व्यापक प्रात्सोहन देत आहे. मदतही करत आहे. वीजेच्या उत्पादनामध्ये आत्मनिर्भरतेच्या या अभियानामध्ये आमचा अन्नदाताही जोडला जात आहे.

मित्रांनो, आमचे शेतकरी आज इतके सक्षम आहेत, त्यांच्याकडे आता साधनसंपन्नता आहे. आज ते एक नाही तर दोन दोन पद्धतीच्या प्रकल्पांनी देशाला मदत करीत आहेत. एक प्रकल्प म्हणजे ते ज्या पारंपरिक पद्धतीने शेती करतात, त्यामुळे आपल्या सर्वांना अन्न मिळते, भोजन मिळते. आता नवीन, दुस-या पद्धतीचे प्रकल्पही आमचे शेतकरी तयार करीत आहेत. ज्यामुळे घरांपर्यंत वीज पोहोचणार आहे. पहिला प्रकल्प पारंपरिक शेतीचा आहे. आमचा शेतकरी बंधू जमिनीत पेरणी करतो आणि धान्य पिकवतो. परंतु हा जो दुसरा सौर ऊर्जा प्रकल्प आहे, तो अशा जमिनीवर लावण्यात येईल की, ज्यामध्ये पिके येवू शकत नाही. अशा खडकाळ, नापिक जमिनीवर सौर प्रकल्प लावला जाईल. म्हणजे जी भूमी शेतकरी बांधवाच्या दृष्टीने पीक घेण्यासारखी नाही, त्याच जमिनीचा उपयोग सौर ऊर्जा निर्मितीसाठी केला गेला तर शेतकरी वर्गाचे उत्पन्न वाढणार आहे.

कुसुम योजनेच्या माध्यमातून आज शेतकरी बांधवांना अतिरिक्त जमिनीवर असे सौर प्रकल्प लावण्यासाठी मदत करण्यात येत आहे. शेतामध्ये जी सौर ऊर्जा तयार होईल, तिच्यामुळे आमचे शेतकरी आपल्या विजेच्या गरजेची पूर्तता करू शकतील आणि अतिरिक्त वीज ते विकूही शकणार आहेत. मध्य प्रदेशातले शेतकरीही आता अतिरिक्त उत्पन्न देणाऱ्या या साधनाचा स्वीकार करतील आणि भारताला ऊर्जा निर्यातदार बनवण्याच्या या व्यापक अभियानाला नक्कीच यशस्वी करतील, असा मला पूर्ण विश्वास आहे. हा विश्वास यासाठी जास्त आहे कारण, मध्य प्रदेशच्या शेतकरी बांधवांनी संकल्पाला सिद्धीमध्ये बदलून दाखवले आहे. तुम्ही लोकांनी असे काही काम केले आहे की, ते सगळीकडे चर्चेचा विषय बनले आहे. ज्याप्रकारे तुम्ही गहू उत्पादनामध्ये विक्रम बनवला, सगळ्यांना मागे टाकलं, ते काम अतिशय कौतुकास्पद आहे. कोरोनासारख्या या संकटाच्या काळामध्ये शेतकरी बांधवांनी विक्रम मोडणारे उत्पादन केले. मध्य प्रदेशच्या सरकारने विक्रम मोडणारी खरेदी केली. यासाठी तुम्ही प्रशंसेला पात्र आहात. म्हणूनच विजेच्या उत्पादनाच्याबाबतीही मध्य प्रदेशाच्या सामर्थ्‍यावर माझा पूर्ण विश्वास आहे. एके दिवशी अशी बातमी येईल की, कुसुम योजने अंतर्गत मध्य प्रदेशातल्या शेतकरी बांधवांनी विजनिर्मितीचा विक्रम मोडला, नवा विक्रम स्थापन केला- याची मला आशा आहे, खात्री आहे.

बंधू आणि भगिनींनो, सौर ऊर्जेची ताकद आम्ही पूर्ण वापरू शकत नाही. जोपर्यंत आपल्याकडे देशातच उत्कृष्ट दर्जाचे सौर पॅनल, उत्तम बॅटरी, उत्तम दर्जाची स्टोअरेज क्षमता यांचे निर्माण होत नाही. तोपर्यंत सौर ऊर्जेचा पूर्ण क्षमतेने वापर आपण करीत आहोत, असे म्हणता येणार नाही. मात्र आता या दिशेने वेगाने काम सुरू आहे. आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये आता देशाचे लक्ष्य आहे की, सौर पॅनलसहित सर्व उपकरणांसाठी आपण जे आयातीवर अवलंबून आहोत, ते अवलंबित्व संपूर्णपणे समाप्त करण्यात येईल.  आत्ता देशाकडे सौर पीव्ही मोड्यूल निर्मिती करण्याची क्षमता आहे. त्यालाही वेग देण्याचे लक्ष्य आहे. यासाठी घरगुती सौर ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी पावले उचलली जात आहेत. आता ज्याप्रमाणे कुसुम योजनेअंतर्गत लावण्यात येणा-या सौर पंपामध्ये घरांच्या छतांवर लावता येणारे पॅनल भारतामध्येच बनवण्यात आलेल्या सौर फोटो व्होलटॅक सेल्स आणि मोड्युल्स आवश्यक करण्यात आले आहेत. याशिवाय सरकारी विभाग आणि इतर सरकारी संस्था जे कोणी सौर सेल किंवा मोड्यूल यांची खरेदी करतात, त्यांनी ‘मेक इन इंडिया’ उत्पादनेच खरेदी करावीत असा निर्णय घेतला आहे. इतकेच नाही तर ऊर्जा प्रकल्प लावणाऱ्या कंपन्यांनी सौर पीव्ही निर्मिती करावी, यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. या क्षेत्राशी जोडले गेलेल्या उद्योजकांना माझा आज आग्रह असा आहे की, युवा मित्रांनो, स्टार्ट अप्समधून, ‘एमएसएमई’ला सुद्धा आग्रह आहे की, या संधीचा तुम्ही सर्वांनी लाभ उठवावा.

बंधू आणि भगिनींनो, आत्मनिर्भरता योग्य प्रकारे साधायची असेल तर आपल्याला स्वतःमध्ये आत्मविश्वास असला पाहिजे. आत्मविश्वास त्यावेळी येतो, ज्यावेळी संपूर्ण देश, सगळी व्यवस्था, प्रत्येक देशवासी साथ देते. कोरोनामुळे संकटाची स्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीमध्ये भारत हेच काम करीत आहे. सरकार असाच आत्मविश्वास जागृत करण्यासाठी कार्यरत आहे. समाजाच्या ज्या स्तरापर्यंत वास्तविक सरकार पोहोचूही शकत नव्हती, आज त्यांच्यापर्यंत सरकारची सर्व साधन सामुग्रीनिशी पोहोचली आहे असे नाही तर सरकारची सहवेदनाही पोहोचली आहे. आता प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचेच उदाहरण घ्या. लॉकडाउन सुरू झाल्यानंतर लगेच पहिले पावूल उचलले ते देशातल्या 80 कोटींपेक्षा जास्त गरीब साथींपर्यंत मोफत धान्य कसे पोहोचेल, हे पाहिले गेले. त्यांच्या खिशामध्ये थोडे-फार पैसे येतील, याचा विचार सर्वात आधी केला. आणि आता लॉकडाउन उठवण्यात आला आहे, त्यावेळी सरकारने विचार केला की, आता पावसाळा आहे. सण-उत्सवांचे दिवस आहेत. अशावेळी गरीबांना ही मदत मिळाली पाहिजे. म्हणूनच अन्नधान्य मोफत वितरित करण्याची योजना पुढेही सुरू ठेवली. आता गरीब कुटुंबांना नोव्हेंबरपर्यंत मोफत रेशन मिळत राहणार आहे. इतकेच नाही तर, खासगी क्षेत्रातल्या लाखो कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ खात्यामध्येही सरकार पूर्ण अंशदान देत आहे. याचप्रमाणे पीएम-स्वनिधी योजनेच्या माध्यमातुन  ज्यांच्यापर्यंत सर्वात कमी मदत पोहोचली, त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. आता या योजनेतून हातगाडी, ठेला लावणाऱ्या लाखो लोकांना दहा हजार रूपयांपर्यंत स्वस्त कर्ज बँकेकडून मिळायला लागले आहेत. आपल्याला सर्वात अधिक उपयोगी असणारे हे छोटे छोटे व्यवसाय करणारे लोक आता स्वतःचा धंदा वाचवू शकणार आहेत. पुन्हा लगेच सुरू करू शकणार आहेत. असे काही सरकार करू शकते, याचा याआधी कोणीतरी विचार केला होता का? म्हणजेच एकीकडे छोटे, लघु, कुटीर उद्योग आणि दुसरीकडे मोठे उद्योग अशा दोन्ही बाजूंचा विचार केला गेला. तसेच या लहान लहान उपयोगी व्यावसायिकांचीही चिंता दूर करण्यासाठी सरकारने विचार केला.

मित्रांनो, सरकार असो अथवा समाज, संवेदना आणि सतर्कता राखणे हेच अशा अतिशय अवघड प्रसंगाला सामोरे जाताना आमचे सर्वात मोठे प्रेरणास्त्रोत आहे. आज ज्यावेळी आपण (मध्य प्रदेश) - संपूर्ण देशाला पुढे घेवून जाण्यासाठी घराच्या बाहेर पडला आहे. सर्वांनीच बाहेर पडताना आपली आणखी एक जबाबदारी आहे, ती कायम स्मरणात ठेवावी. दोन गज अंतर सर्वांनी एकमेकांमध्ये ठेवायचे आहे. चेहऱ्यावर मास्क बांधायचा आहे आणि आपले हात 20 सेकंद साबण लावून धुवायचे आहेत. या नियमांचे नेहमी पालन करायचे आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे, मध्य प्रदेशच्या या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी खूप- खूप अभिनंदन!

आपण सर्वांनी सतर्क रहावे, सुरक्षित रहावे, आरोग्यदायी रहावे.

खूप- खूप आभार!!

B.Gokhale/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1637937) Visitor Counter : 331