पंतप्रधान कार्यालय

आयसीसीच्या 95 व्या वार्षिक सत्राच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन

Posted On: 11 JUN 2020 11:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 जून 2020

 

नमस्कार!! आपण सर्व खुशाल असाल, अशी मला आशा वाटते. 95 वर्षे सातत्याने देशाची सेवा करणे, ही कोणत्याही संस्थेसाठी फारच मोठी बाब असते. आयसीसीने पूर्व भारत आणि ईशान्य भारतातील विकासाच्या कामी जे योगदान दिले आहे, विशेषतः तेथील उत्पादन विकासात जे योगदान दिले आहे, ते ऐतिहासिक आहे. आयसीसीसाठी योगदान देणाऱ्या आपणा सर्वांचे, अगदी प्रत्येकाचे मी अभिनंदन करतो.

मित्रहो, 1925 साली स्थापना झाल्यानंतर आयसीसीने स्वातंत्र्य युद्ध पाहिले, भीषण असा दुष्काळ आणि अन्नाचे दुर्भिक्ष अनुभवले आणि देशाच्या विकासातही आयसीसीचा मोठा वाटा राहिला आहे.

आता यावेळी ही वार्षिक सर्वसाधारण सभा अशा काळात होत आहे, जेव्हा आपला देश अनेक आव्हानांचा मुकाबला करत आहे. कोरोना विषाणू  प्रादुर्भावाच्या संकटाशी संपूर्ण जग लढा देत आहे, भारत सुद्धा लढत आहे. मात्र इतर अनेक प्रकारची संकटे सुद्धा सातत्याने समोर येत आहेत.

एकीकडे पुराचे आव्हान तर दुसरीकडे टोळधाड, कुठे गारपीट होत आहे तर कुठे तेलक्षेत्रात आगी लागत आहेत आणि काही ठिकाणी लहान-मोठे भूकंप येत आहेत. हे सर्व कमी होते म्हणून की काय पूर्व आणि पश्चिम क्षेत्रात एकापाठोपाठ एक अशी दोन चक्रीवादळे आव्हान होऊन समोर उभी ठाकली.

अशा अनेक आघाड्यांवर आपण सगळेच एकत्र येऊन लढा देत आहोत. अनेकदा काळ आपली परीक्षा घेतो, पारख करतो. अनेकदा अनेक संकटे, अनेक परीक्षा अगदी एकाच वेळी समोर येतात.

मात्र आमचा अनुभव असा आहे की अशा प्रकारच्या कसोटीच्या काळात आमचे कर्तृत्व उज्वल भविष्याची हमी घेऊन समोर येते. कोणत्याही संकटाचा मुकाबला आपण कसा करतो, कठीण परिस्थितीशी किती सक्षमपणे लढा देतो, त्यावर येणाऱ्या संधी सुद्धा अवलंबून असतात.

मित्रहो आपल्याकडे एक म्हण आहे, “मन के हारे हार, मन के जीते जीत”, अर्थात आपली संकल्पशक्ती, आपली इच्छाशक्ती आपला पुढचा मार्ग ठरवत असते. जे सुरुवातीलाच पराभव मान्य करतात, त्यांच्यासमोर फार कमी नव्या संधी येतात, मात्र जे विजयासाठी सातत्याने प्रयत्न करत राहतात, परस्परांची साथ देत पुढे चालत राहतात, त्यांच्यासमोर सातत्याने नव्या संधी येत राहतात.

मित्रहो, आपली ही एकजूट, एकत्र येऊन मोठ्यात मोठ्या संकटाचा मुकाबला करण्याची आपली संकल्पशक्ती, आपली इच्छाशक्ती ही आपली फार मोठी क्षमता आहे. एक राष्ट्र म्हणून ही आपली फार मोठी ताकद आहे.

संकटाचा उतारा म्हणजे त्यासमोर ठामपणे उभे राहणे. प्रत्येक संकटाने नेहमी भारताच्या इच्छाशक्तीला अधिक मजबूत केले आहे, एक राष्ट्र म्हणून देशवासीयांना नवी ऊर्जा दिली आहे, सर्व संकल्पाच्या पूर्ततेसाठी शक्ती दिली आहे. हीच भावना आज मला आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर दिसते आहे, कोट्यवधी देशवासीयांच्या प्रयत्नांमध्ये दिसते आहे. कोरोनाच्या संकटाने संपूर्ण जगाला आपल्या ताब्यात घेतले आहे, सगळे जग त्याच्याशी लढा देत आहे. कोरोना योद्ध्यांच्या साथीने आपला देश सुद्धा या संकटाचा मुकाबला करत आहे.

मात्र या परिस्थितीत सुद्धा प्रत्येक देशवासी आता एकाच संकल्पाने भारून गेला आहे, या संकटाचे संधीत रुपांतर करायचे आहे. आमच्या देशाला परिवर्तनाच्या सर्वात मोठ्या वळणावरून पुढे घेऊन जायचे आहे.

हे मोठे वळण म्हणजे काय, तर आत्मनिर्भर भारत. आत्मनिर्भरतेची ही भावना, प्रत्येक भारतीयाने एका आकांक्षेप्रमाणे मनात जोपासली आहे.

मात्र तरीही, असे झाले असते तर, असा एक फार मोठा किंतु प्रत्येक भारतीयाच्या मनात राहून गेला आहे, विचारांमध्ये राहिला आहे.  वैद्यकीय उपकरणांच्या क्षेत्रात आपण आत्मनिर्भर झालो असतो तर...  संरक्षण विषयक उत्पादनाच्या क्षेत्रात आपण आत्मनिर्भर झालो असतो तर...   कोळसा आणि खाण क्षेत्रात आपण आत्मनिर्भर असतो तर...

खाद्यतेल, खते या क्षेत्रांत आपण आत्मनिर्भर असतो तर... इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादन क्षेत्रात आपण आत्मनिर्भर असतो तर... सोलार पॅनल, बॅटरी आणि चीप उत्पादन क्षेत्रात आपण आत्मनिर्भर असतो तर.. हवाई वाहतूक क्षेत्रात आपण आत्मनिर्भर असतो तर.. असे अनेक जर आणि तर नेहमीच प्रत्येक भारतीयाला अस्वस्थ करत असतात..

मित्रहो, या जर-तर च्या प्रश्नांमधून बाहेर पडत भारताला आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने गेल्या पाच सहा वर्षांमध्ये देशाची धोरणे आखली जात आहे आणि त्यासाठी पूरक पद्धती अंगीकारल्या जात आहेत.  आता कोरोनाच्या संकटाने आपल्याला अधिक वेगाने पुढे जाण्यास शिकविले आहे. याच धड्यातून उदयाला आले आहे, आत्मनिर्भर भारत अभियान.

मित्रहो, आपण बघतो की आपल्या कुटुंबातील अपत्य, मग तो मुलगा असो वा मुलगी, अपत्य अठरा-वीस वर्षांचे झाल्यानंतर आपण त्यांना सांगतो की तुम्ही आता तुमच्या पायांवर उभे राहायला शिका, म्हणजेच एका आत्मनिर्भर व्हा. अशा तऱ्हेने आत्मनिर्भर होण्याचा पहिला वस्तुपाठ आपल्या कुटुंबापासूनच सुरू होतो. भारताला सुद्धा आता आपल्या पायावर उभे राहायचे आहे.

मित्रहो, आत्मनिर्भर भारत अभियानाचा सोपा अर्थ असा आहे की भारताने इतर देशांवर अवलंबून राहणे कमी केले पाहिजे. अशी प्रत्येक वस्तू, जी आयात करणे भारताला भाग पडते आहे, ती भारतातच कशी तयार होईल, भारतच त्या उत्पादनांची निर्यात कशा प्रकारे करू शकेल, या दिशेने आपल्याला वेगाने काम करायचे आहे.

त्याचबरोबर भारताचे लघुउद्योजक ज्या वस्तू तयार करतात, आपले स्वयंसहायता गट आणि त्यांच्याशी संबंधित अनेक गरीब नागरिक ज्या वस्तू तयार करतात, कित्येक दशके ज्या वस्तू आपल्या देशात तयार होत आल्या आहेत, प्रत्येक गल्लीत विकल्या गेल्या आहेत, त्या खरेदी करायचे सोडून परदेशातून तेच सामान मागविण्याच्या आपल्या वृत्तीलाही नियंत्रित करायचे आहे.

अशा लहान व्यापार करणाऱ्या लोकांकडून आपण केवळ वस्तू खरेदी करत नाही, त्यांना केवळ पैसे देत नाही तर यांच्याकडून खरेदी करून आपण त्यांच्या श्रमाचा मान राखतो, आदर करतो. आपण त्यांच्याकडून वस्तू खरेदी केल्यामुळे त्यांना किती चांगले वाटत असेल, किती अभिमान वाटत असेल याचा अंदाजही आपल्याला येणार नाही.

त्याचमुळे आपल्या लोकलसाठी व्होकल होण्याची वेळ आली आहे, अर्थात देशांतर्गत उत्पादनेच वापरण्याची वेळ आली आहे. प्रत्येक गाव, प्रत्येक वस्ती, प्रत्येक जिल्हा, प्रत्येक प्रदेश आणि संपूर्ण देशाला आत्मनिर्भर करण्याची वेळ आली आहे.

मित्रहो, स्वामी विवेकानंद यांनी एकदा एका पत्रात लिहिले होते की, सद्यस्थितीत भारतीयांना आपण स्वतः तयार केलेले उत्पादन वापरण्यास उद्युक्त करणे आणि परदेशांमध्ये भारतीय बनावटीच्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देणे, ही सर्वात सोपी पद्धत आहे.  स्वामी विवेकानंद यांनी दाखविलेला हा मार्ग, कोरोना विषाणू प्रादुर्भावानंतरच्या काळात भारतासाठी प्रेरणा आहे. आता देशाने निश्चय केला आहे आणि त्या दृष्टीने आगेकूचही करत आहे.

आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत ज्या मोठ्या सुधारणांची घोषणा करण्यात आली, त्यांच्यावर तातडीने अंमलबजावणी सुरू झाली आहे.

एम एस एम ई च्या व्याख्येची व्याप्ती वाढवायची असो वा एम एस एम ईं च्या सहाय्यासाठी हजारो कोटी रुपयांच्या विशेष निधीची व्यवस्था असो, या बाबी आज सत्यात उतरत आहेत. आयबीसी शी संबंधित निर्णय, लहान चुकांना गुन्ह्यांच्या व्याप्ती बाहेर ठेवण्याचा निर्णय, गुंतवणुकीचा मागोवा घेण्यासाठी प्रकल्प विकास पथकाची स्थापना करणे अशा अनेक बाबी तातडीने करण्यात आल्या आहेत.

सध्या सर्वच क्षेत्रांसाठी, विशेषतः कोळसा आणि खाण क्षेत्राला अधिक स्पर्धात्मक करण्यासाठी ज्या सुधारणांची घोषणा करण्यात आली आहे, त्यांचा लाभ घेण्यासाठी उद्योग क्षेत्राने पुढाकार घेतला पाहिजे, युवा सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे.

मित्रहो, शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या संदर्भात अलीकडे जे निर्णय  घेण्यात आले आहेत, त्यामुळे कृषी आधारित अर्थव्यवस्थेला कित्येक वर्षांच्या गुलामीतून मुक्तता मिळाली आहे. आता भारतातील शेतकऱ्यांना आपली उत्पादने देशात कोठेही विकण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे.

एपीएमसी अधिनियम तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियमामध्ये ज्या सुधारणा करण्यात आल्या आहेत, तसेच शेतकरी आणि  उद्योग यांच्यातील भागीदारीचा जो मार्ग खुला झाला आहे, त्यामुळे शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कायापालट  निश्चितपणे होणार आहे. या निर्णयांमुळे शेतकऱ्याला एक उत्पादक म्हणून, आणि त्याने घेतलेल्या पिकाला एक उत्पादन म्हणून ओळख मिळाली आहे.

मित्रहो, शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पैसे थेट हस्तांतरित करणे असो, कमाल हमी भावासंदर्भातील निर्णय असो किंवा शेतकऱ्यांच्या निवृत्ती वेतनासाठीची योजना असो, या सर्व प्रयत्नांच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना अधिक सक्षम करत आहोत. आता शेतकऱ्यांना एका मोठा बाजारपेठ स्रोत म्हणून विकसित होण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी सहाय्य केले जात आहे.

मित्रहो, स्थानिक उत्पादनांसाठी ज्या समूह आधारित दृष्टिकोनाला भारतात प्रोत्साहन दिले जात आहे, त्यानुसार सर्वांसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये ज्या वस्तूंचे उत्पादन होते, त्यांच्या परिसरातच संबंधित समूहांचा विकास केला जाणार आहे. उदाहरणार्थ - पश्चिम बंगालमधील ताग उत्पादक शेतकऱ्यांसाठी नजीकच्या परिसरात ताग आधारित उद्योगांना अधिक सक्षम केले जाणार आहे.

वन उत्पादनांची संपदा जोपासणाऱ्या आदिवासींना त्यांच्या क्षेत्रात आधुनिक प्रक्रिया एकके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्याचबरोबर बांबू आणि जैविक उत्पादनांसाठी सुद्धा समूह विकसित केले जाणार आहेत. सिक्कीम प्रमाणेच संपूर्ण ईशान्य क्षेत्र जैविक शेतीचे फार मोठे केंद्र होऊ शकते, जैविक राजधानी म्हणून विकसित होऊ शकते.

आयसीसी संबंधित आपण सर्व व्यापाऱ्यांनी मनावर घेतले तर ईशान्य क्षेत्राला जैविक शेतीचे फार मोठे केंद्र घडवू शकता, त्याला जागतिक ओळख मिळवून देऊ शकता आणि जागतिक बाजारपेठेवर राज्यही करू शकता.

मित्रहो, आपण सगळेच ईशान्य  आणि पूर्व भारतात कित्येक दशकांपासून काम करत आहात. सरकारने या भागाच्या विकासासाठी जी पावले उचलली आहेत, त्यांचा फार मोठा लाभ पूर्व आणि ईशान्य भारतातील नागरिकांना होणार आहे.

कोलकाता सुद्धा पुन्हा एकदा फार मोठे नेतृत्व म्हणून समोर येऊ शकतो, असे मला वाटते. आपल्या प्राचीन गौरवापासून प्रेरणा घेऊन भविष्यात कोलकाता संपूर्ण क्षेत्राच्या विकासाचे नेतृत्व करू शकतो.

श्रमजीवी पूर्वेकडचे, संपत्तीही पूर्वेकडची, स्रोतही पूर्वेकडचे. अशा परिस्थितीत या क्षेत्राचा किती वेगाने विकास होऊ शकतो, हे आपल्यापेक्षा जास्त चांगले कुणाला ठाऊक असेल??

मित्रहो, पाच वर्षांनंतर अर्थात 2025 साली आपली संस्था शंभर वर्षे पूर्ण करेल. तसेच 2022 साली देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीला 75 वर्षे पूर्ण होणार आहेत. आपल्या संस्थेसाठी, आपल्या प्रत्येक सदस्यासाठी एक मोठा संकल्प करण्याची ही योग्य वेळ आहे. मी आपल्याला आग्रह करतो की आत्मनिर्भर भारत अभियानाला वेग देण्यासाठी आयसीसीने सुद्धा आपल्या परीने पन्नास ते शंभर नवे संकल्प हाती घ्यावेत.

हे संकल्प संस्थेचे असावेत, संस्थेशी संबंधित प्रत्येक उद्योग आणि व्यापारी एककाचे सुद्धा असावेत आणि प्रत्येक व्यक्तीचे सुद्धा असावेत. आपले संकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने आपण सगळेच जितकी प्रगती करू, त्याच प्रमाणात पूर्व तसेच ईशान्य भारतात, आत्मनिर्भर भारताचे हे अभियान सुद्धा प्रगती करत राहील.

मित्रहो, उत्पादन क्षेत्रात बंगालच्या ऐतिहासिक श्रेष्ठतेला पुन्हा एकदा पुनरुज्जीवन करावे लागेल. "बंगाल आज जो विचार करतो, तो विचार उद्याच्या भारताच्या मनात असतो",  असे आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. यापासून प्रेरणा घेऊन आपल्याला आगेकूच करायची आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला आदेश आणि नियंत्रणाच्या जोखडातून बाहेर काढत सक्रियतेच्या दिशेने नेण्याची हीच वेळ आहे. संकुचित विचार करण्याची ही वेळ नाही तर पुढे येऊन मोठे निर्णय घेण्याची, मोठी गुंतवणूक करण्याची ही वेळ आहे.

जागतिक पातळीवर स्पर्धात्मक ठरेल, अशी देशांतर्गत पुरवठा साखळी तयार करण्याची ही वेळ आहे.

त्यासाठी उद्योग विश्वाला आपल्या विद्यमान पुरवठा साखळीतील सर्व भागीदारांना संकटातून बाहेर पडण्यासाठी मदत करायची आहे आणि मूल्य वर्धनासाठीही त्यांना मदतीचा हात द्यायचा आहे.

मित्रहो, आत्मनिर्भर भारत अभियान पुढे नेताना आणि कोरोना कालखंडाशी संघर्ष करताना आज आपण या वार्षिक सर्वसाधारण सभेत 'लोक, ग्रह आणि लाभ' हा विषय उपस्थित केला आहे, तो सुद्धा महत्त्वाचा आहे. काही लोकांना वाटते की या तिन्ही बाबी परस्परविरोधी आहेत. मात्र असे नाही. या तिन्ही बाबी परस्परांशी संबंधित आहेत. या तिन्ही बाबी परस्परांच्या सोबतीने विकसित होऊ शकतात आणि परस्परांच्या सोबतीने अस्तित्वात असू शकतात.

मी तुम्हाला काही उदाहरणे सांगतो. जसे एलईडी बल्ब. पाच सहा वर्षांपूर्वी एका एलईडी बल्बची किंमत साडे तीनशे रुपयांपेक्षा जास्त होती. आज तोच बल्ब पन्नास रुपयांपर्यंत मिळतो. विचार करा, किंमत कमी असल्यामुळे देशभरात घराघरात कोट्यवधी एलईडी बल्ब पोहोचले आहेत, पथदिव्यांमध्येही एलईडी बल्ब वापरले जात आहेत. हे प्रमाण इतके जास्त आहे की त्यामुळे उत्पादन खर्च कमी झाला आहे आणि नफा सुद्धा वाढला आहे. हा नफा कोणाला मिळाला आहे?

जनतेला, सर्वसामान्य नागरिकांना, ज्यांचे विजेचे बिल कमी होऊ लागले आहे. दरवर्षी केवळ एलईडी च्या वापरामुळे देशवासीयांच्या वीज बिलामध्ये सुमारे 19 हजार कोटी रुपयांची कपात झाली आहे. या कपातीचा लाभ गरिबांना झाला आहे, देशातील मध्यम वर्गाला झाला आहे.

याचा लाभ आपल्या ग्राहकाला सुद्धा झाला आहे. सरकारी संस्थांनी जितके एलईडी बल्ब कमी किंमतीत विकले, केवळ त्यामुळे दरवर्षी किमान चार कोटी टन कार्बन डाय ऑक्‍साईडचे उत्सर्जन कमी झाले आहे.

अर्थात लाभ दोघांनाही मिळाला आहे, यातून दोघांनाही फायदाच झाला आहे. जर आपण सरकारच्या इतर योजना आणि निर्णय पाहिले तर गेल्या पाच ते सहा वर्षांमध्ये 'लोक, ग्रह आणि लाभ' ही संकल्पना चांगलीच यशस्वी ठरली आहे.

सध्या आपण पाहतो आहोत की सरकार देशांतर्गत जल मार्गांवर अधिकाधिक भर देत आहे. हल्दिया पासून बनारस पर्यंत जलमार्ग सुरू झाला आहे.आता ईशान्य क्षेत्रातही जलमार्ग वाढविले जात आहेत.

हे जलमार्ग लोकांसाठी फायदेशीर आहे कारण त्यामुळे प्रवासाचा खर्च कमी होतो आहे.

हे जलमार्ग आपल्या ग्रहासाठी सुद्धा फायदेशीर आहेत, कारण त्यासाठी कमी इंधन वापरले जाते. त्याचबरोबर आपण लक्षात घेतले पाहिजे की जलमार्ग वाढविल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलची आयात कमी करता येईल तसेच रस्त्यांवर वाहतूक कोंडी सुद्धा टाळता येणार आहे. वस्तू स्वस्त होतील तसेच नजीकच्या मार्गाने त्या लवकर पोहोचतील. खरेदी करणारे आणि विक्रेते, दोघांनाही यातून लाभ मिळणार आहे.

मित्रहो, भारतात आणखी एक  मोहीम सध्या सुरू आहे. एक वेळ वापरल्या येणाऱ्या प्लास्टिक पासून देशाला मुक्त करणे. यात सुद्धा 'लोक, ग्रह आणि लाभ' या तिन्ही बाबी विचारात घेतल्या आहेत.

विशेषतः पश्चिम बंगालसाठी तर हे फारच फायदेशीर आहे. यामुळे आपल्या भागातील ताग उद्योगाला अधिक चालना मिळण्याची शक्यता आहे. आपण याचा लाभ घेतला आहे का? आता पॅकेजिंगसाठी  तागाचा वापर वाढला आहे. म्हणजे आपली खऱ्या अर्थाने भरभराट होते आहे.

आपण या संधीचा निश्चितच फायदा घेतला पाहिजे. ही संधी हातची जाऊ दिली तर त्यामुळे नुकसानच होईल. जरा विचार करा, जेव्हा पश्चिम बंगाल मध्ये तयार झालेली तागाची पिशवी प्रत्येकाच्या हातात दिसेल तेव्हा पश्चिम बंगालच्या लोकांना त्यापासून केवढा मोठा लाभ मिळालेला असेल...

मित्रहो, आज घडीला नागरिक केंद्रित, नागरिकांच्या साथीने आणि ग्रहासाठी अनुकूल विकासाचा दृष्टिकोन, हा देशातील प्रशासनाचा एक अविभाज्य घटक आहे. आमची तंत्रज्ञान विषयक प्रगती सुद्धा 'लोक, ग्रह आणि लाभा'च्या दृष्टिकोनास अनुरूप अशीच आहे.

युपीआय च्या माध्यमातून आमची बँकिंग व्यवस्था स्पर्शरहीत, संपर्करहीत, रोखरहीत आणि 24 तास सक्रिय झाली आहे. भीम BHIM ॲप च्या माध्यमातून सतत विक्रमी व्यवहार होत आहेत. Rupay card आता गरीब, शेतकरी, मध्यमवर्ग आणि देशातील सर्वच वर्गांत लोकप्रिय होत आहे. जर आपण भारताला आत्मनिर्भर करायचे असे म्हणतो तर आपण Rupay card चा वापर अभिमानाने का करू नये?

मित्रहो, आता देशातील बँकिंग सेवेची व्याप्ती अशा लोकांपर्यंत पोहोचली आहे ज्यांना दीर्घकाळ या लाभांपासून वंचित ठेवण्यात आले.  DBT तसेच JAM अर्थात जनधन आधार मोबाईलच्या माध्यमातून कोणत्याही गळती शिवाय कोट्यवधी लाभार्थींपर्यंत थेट मदत पोहोचविणे शक्य झाले आहे.

त्याचप्रमाणे गव्हर्मेंट इ मार्केट प्लेस अर्थात GeM ने लोकांना सरकारच्या सोबत काम करून लाभ प्राप्त करण्याची संधी मिळवून दिली. आपणाला ठाऊक असेल की GeM या मंचावर लहान-लहान स्वयंसहायता गट, एम एस एम ई, थेट भारत सरकारला आपल्या वस्तू आणि सेवा उपलब्ध करून देऊ शकतात. यापूर्वी, काही लाख रुपयांचा व्यवहार करणाऱ्या उद्योजकाला आपली उत्पादने थेट केंद्र सरकारला विकण्याचा विचारही करणे शक्य नव्हते.

म्हणूनच मी आयसीसीला आग्रहाने सांगू इच्छितो की जे आपले सदस्य आहेत, आपल्याशी संबंधित उत्पादक आहेत त्यांना सुद्धा GeM मंचावर येण्यास प्रोत्साहन द्या. आपल्याशी संबंधित प्रत्येक उत्पादक GeM शी संलग्न झाला तर लहान उद्योजक सुद्धा आपली उत्पादने थेट सरकारला विकू शकतील.

मित्रहो, जेव्हा आपण आपल्या ग्रहाबद्दल बोलतो, तेव्हा आपल्या लक्षात येते की आज आईसी अर्थात आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल सोलार अलायंस ही एक फार मोठी जागतिक चळवळ होते आहे. सौर ऊर्जा क्षेत्रात भारताला जो लाभ दिसतो आहे, तो संपूर्ण जगाला व्हावा यासाठी भारत प्रयत्नशील आहे. इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या सर्व सदस्यांना माझी विनंती आहे की नवीकरण उर्जा तसेच सौर उर्जा निर्मितीसाठी भारताने जी उद्दिष्टे निश्चित केली आहेत, त्यात त्यांनी योगदान द्यावे आणि गुंतवणूक करण्यासाठी पुढाकार घ्यावा.

देशातच सोलार पॅनलचे उत्पादन घेण्यासाठी, ऊर्जा संग्रहण क्षमता वाढविण्यासाठी बॅटरीच्या संशोधन-विकास तसेच उत्पादनात गुंतवणूक करावी. जे या कामात गुंतलेले आहेत, अशा संस्थांना एम एस एम ई मदतीचा हात द्यावा. आगामी काळात जगात सोलार रिचार्जेबल बॅटरीसाठी फार मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. भारताचे उद्योग विश्व ,या क्षेत्रात नेतृत्व करू शकेल का? खरे तर या क्षेत्रात भारत एक फार मोठे केंद्र होऊ शकतो.

2022 साली भारत आपल्या स्वातंत्र्य प्राप्तीची 75 वर्षे पूर्ण करेल आणि 2025 साली  आयसीसी शंभर वर्षे पूर्ण करेल.  मी उल्लेख केलेल्या संधी लक्षात घेत या वर्षांमध्ये साध्य करण्यासाठीची उद्दिष्टे निश्चित करता येतील.

मित्रहो, योग्य संधी ओळखण्याची, स्वतःला आजमावून पाहण्याची आणि नवी शिखरे गाठण्यासाठी आगेकूच करण्याची हीच वेळ आहे. जर हे सर्वात मोठे संकट असेल तर त्यापासून आपण सुद्धा सर्वात मोठा धडा घेतला पाहिजे आणि त्यापासून पुरेपूर लाभ सुद्धा करून घेतला पाहिजे.

सरकार यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे, याची ग्वाही मी आपणाला देतो. आपण निस्संकोचपणे पुढे व्हा. नव्या संकल्पनांसह, नव्या विश्वासासह पुढे या. आत्मविश्वासाने परिपूर्ण भारत हा आत्मनिर्भर भारताचा गाभा आहे.

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी  'नूतोन जुगेर भोर' या आपल्या कवितेत म्हटले आहे की "चोलाय चोलाय बाजबे जोयेर मेरी, पाएर बेगेई पोथ केटे जात कोरीश ना आर आर दे" अर्थात पुढे पडणाऱ्या प्रत्येक पावलावर जयघोषाचा नाद होत राहील, वेगाने पुढे जाणारे पावले नवा रस्ता तयार करतील. आता उशीर करू नका.

विचार करा, किती मोठा मंत्र आहे. वेगाने पुढे जाणारी पावले नवा रस्ता तयार करतील. इतकी इतकी मोठी प्रेरणा आपल्यासमोर आहे, तेव्हा थांबण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

जेव्हा आपण आपल्या संस्थेच्या स्थापनेची शंभर वर्षे पूर्ण कराल, जेव्हा देश आपल्या स्वातंत्र्यप्राप्तीची 75 वर्षे पूर्ण करेल, तेव्हा आत्मनिर्भर भारताच्या मार्गावर आपला देश फार पुढे निघून गेला असेल, असा विश्वास मला वाटतो.

पुन्हा एकदा आपणा सर्वांना अनेकानेक शुभेच्छा.

निरोगी असा, सुरक्षित असा.

अनेकानेक आभार.

काळजी घ्या.

 

* * *

B.Gokhale/M.Pange/D.Rane

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1631095) Visitor Counter : 344