पंतप्रधान कार्यालय

इंडियन चेम्बर ऑफ कॉमर्स (ICC)च्या वार्षिक पूर्णसत्र 2020 मध्ये पंतप्रधानांचे भाषण


आपल्याला ‘आत्मनिर्भर भारत’ घडवण्याची गरज

Posted On: 11 JUN 2020 6:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 जून 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स संघटनेच्या 95 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्घाटनप्रसंगी व्हिडीओ कॉन्फान्सिंग च्या माध्यमातून आपले विचार मांडले.

कोविड-19 विरुध्दच्या लढ्याचा आपल्या भाषणात उल्लेख करतांना पंतप्रधान म्हणाले की,या संकटाशी सामना करतांना, संपूर्ण जगासोबत भारतही मोठ्या धैर्याने पावले उचलत आहे. या संकटासोबतच, टोळधाड, गारपीट, तेल-वायू विहिरीत आग, छोटे-मोठे भूकंप आणि दोन वादळे अशा इतर संकटांचाही सामना करावा लागतो आहे. मात्र आज देश संपूर्ण शक्तीनिशी एकत्र येऊन या संकटांचे आव्हान पेलतो आहे.

अशा कसोटीच्या काळांनीच भारताला अधिक दृढनिश्चयी बनवले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. दृढनिश्चय, इच्छाशक्ती आणि एकता हीच आपल्या देशाची ताकद आहे, ज्यामुळे आपला देश कोणत्याही संकटाचा सामना करु शकतो. कोणतेही संकट आपल्यासाठी एक संधी घेऊन येत असते, ह्या संधीचा वापर करुन घेत आपल्याला आत्मनिर्भर भारत घडवायचा आहे असे पंतप्रधान म्हणाले.

आत्मनिर्भर भारत :

आत्मनिर्भर म्हणजेच स्वयंपूर्ण होणे ही भारताची कित्येक वर्षांपासूनची आकांक्षा आहे.

आता आपल्या देशातील प्रत्येक गाव,जिल्हा स्वयंपूर्ण बनवणे ही काळाची गरज आहे.असे पंतप्रधान म्हणाले. भारतीय अर्थव्यवस्थेला ‘कमांड आणि कंट्रोल’ मोड मधून म्हणजे सरकारी आदेश आणि नियंत्रणापासून मुक्त करत, प्लग आणि प्ले’ म्हणजे स्वयंपूर्ण बनवण्याची गरज आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

धाडसी निर्णय घेण्याची आणि धाडसाने गुंतवणूक करण्याची ही वेळ आहे, जेणेकरुन आपण जागतिक स्पर्धात्मक पातळीवरची स्वदेशी पुरवठा साखळी निर्माण करु शकू. आपल्याला आता पारंपारिक दृष्टीकोन ठेवून चालणार नाही, असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी ज्या ज्या क्षेत्रात, भारत आत्मनिर्भर होऊ शकेल, अशी क्षेत्रे यावेळी सांगितली.

आत्मनिर्भर होण्याचे ध्येय देशाचे धोरण आणि कार्यपद्धती दोन्हीतही सर्वोच्च स्थानी आहे, आणि आता कोरोनाच्या संकटाने आपल्याला हे ध्येय लवकरात लवकर साध्य करण्याची शिकवण दिली आहे. याच शिकवणीतून- ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाने जन्म घेतला आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आज आपल्याला ज्या वस्तू किंवा पदार्थांची आयात करावी लागते आहे, त्या सर्व वस्तूंचा भारत निर्यातदार देश होईल, यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करायला हवे आहे, असे पंतप्रधान म्हणाले. छोट्या व्यापाऱ्यांच्या प्रयत्नांचे-कष्टांचे  कौतुक करत, ते म्हणाले की जेव्हा आपण त्यांच्याकडून स्थानिक उत्पादने विकत घेतो, तेव्हा आपण त्यांना केवळ वस्तू आणि सेवेची किंमत देत नसतो, तर त्यांच्या योगदानाचा केलेला तो सन्मान असतो.

पंतप्रधानांनी यावेळी स्वामी विवेकानंद यांचे वचन उद्धृत केले. ‘आज करायची एकमेव साधी-सरळ गोष्ट म्हणजे, भारतीयांना स्वदेशी उत्पादने वापरण्यास प्रवृत्त करा आणि इतर देशात, भारतीय उत्पादनांसाठी बाजारपेठ निर्माण करा स्वामी विवेकानंद यांनी दाखवलेला हा मार्ग आज कोरोनाच्या संकटानंतर भारतीयांना प्रेरक दिशा देणारा मार्ग ठरला आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत जाहीर केलेल्या महत्वाच्या आर्थिक सुधारणांचा पंतप्रधान मोदी यांनी यावेळी उल्लेख केला. ज्यात, एमएसएमई क्षेत्राची परिभाषा अधिक व्यापक करणे, एमएसएमई ला सहाय्य करण्यासाठी विशेष निधीची व्यवस्था करणे,नादारी आणि  दिवाळखोरी संहितेविषयीचा निर्णय, गुंतवणूकीचा पाठपुरावा करण्यासाठी, प्रकल्प विकास विभागांची स्थापना करण्याचा निर्णय इत्यादी सुधारणांचा समावेश होता.

कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यात सुधारणा :

कृषी क्षेत्रात अलीकडेच घेतलेल्या निर्णयांचा देखील त्यांनी उल्लेख केला. गेली अनेक वर्षे बंधनात अडकलेल्या कृषी क्षेत्राला या निर्णयामुळे मुक्त करण्यात आले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आता देशातील सर्व शेतकऱ्यांना आपली पिके, उत्पादने देशात कुठेही विकण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे.

ईशान्य भारत- सेंद्रिय शेतीचे केंद्र :

केंद्र सरकारने स्थानिक उत्पादनांबाबत समूह-आधारित दृष्टीकोन अंगिकारला असून त्यातून सर्वांना संधी मिळू शकेल, असे पंतप्रधान म्हणाले.स्थानिक उत्पादने ज्या जिल्ह्यात किंवा तालुक्यात होतात, त्या भागात हे समूह विकसित केले जातील, त्यासोबतच, बांबू आणि सेंद्रिय पिकांसाठीचे समूह देखील विकसित केले जातील. जसे की सिक्कीम प्रमाणेच, संपूर्ण ईशान्य भारत सेंद्रिय शेतीचे मोठे केंद्र बनू शकतो, सेंद्रिय शेतीला जागतिक स्तरावर ईशान्य भारताची ओळख म्हणून विकसित केले, आणि जागतिक बाजारात या उत्पादनांना एक महत्वाचे स्थान मिळवून दिले, तर सेंद्रिय शेती ही ईशान्य भारतात  मोठी चळवळ बनू शकते.

नागरिक, पृथ्वी आणि लाभ यांच्यातील परस्परसंबंध :

उत्पादन क्षेत्रात, एकेकाळी बंगाल सर्वोच्च स्थानी होते, हे सांगत, ते ऐतिहासिक महत्व पुन्हा निर्माण करण्याची गरज आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आज बंगाल कसा विचार करतो, यापासून उद्या संपूर्ण देश प्रेरणा घेईल, असे मोदी म्हणाले. उद्योगक्षेत्राने यासाठी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले. पीपल, प्लॅनेट आणि प्रॉफिट म्हणजेच नागरिक, पृथ्वी आणि लाभ यांचा एकमेकांशी जवळचा संबध असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या तिन्ही घटकांचे एकमेकांसोबत उत्तम सहजीवन असले, तर तिघांचीही भरभराट होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. हा परस्परसंबंध विस्तृतपणे  सांगण्यासाठी त्यांनी एक उदाहरण दिले. सहा वर्षांपूर्वी सरकारने एलईडी बल्बच्या किमती कमी केल्या. ज्यामुळे, देशातील एकूण वीज बीलात वार्षिक 19 हजार कोटी रुपयांची बचत झाली. आणि हा निर्णय जनता आणि पृथ्वी या दोन्ही घटकांसाठी लाभदायक ठरला. गेल्या पाच सहा वर्षातील सरकारच्या इतर योजना आणि निर्णय देखील नागरिक, पृथ्वी आणि लाभ या संकल्पनेवरच आधारलेले होते, असे त्यांनी संगीतले. जलमार्गाचा वापर करून लोकांना कसा लाभ होतो आणि त्यामुळे खर्च कमी झाला आहे तसेच इंधन कमी जळल्याने पृथ्वी म्हणजेच पर्यावरणालाही त्याचा लाभ झाला आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

जनकेंद्रित, लोकाभिमुख आणि पर्यावरण-पूरक विकास :

पंतप्रधान मोदी यांनी आणखी एक उदाहरण दिले ते म्हणजे, देशाला एकल वापराच्या प्लास्टिकच्या वापरापासून मुक्त करण्याची चळवळ. या चळवळीमुळे पश्चिम बंगालमधील तागनिर्मिती उद्योगाला प्रोत्साहन आणि लाभ मिळेल. या संधीचा उद्योगक्षेत्रानेही लाभ करून घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. जनकेंद्रित, लोकाभिमुख आणि पर्यावरण पूरक विकासाचा दृष्टीकोन आता सरकार आणि प्रशासनाचा अविभाज्य घटक झाला आहे, असे त्यांनी सांगितले.तंत्रज्ञानातील आपली प्रगती देखील जनता, पृथ्वी आणि लाभ या संकल्पनेशी अनुरूप आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. 

रूपे कार्ड आणि युपीआय :

आत देशातील बँकिग व्यवस्था स्पर्शविरहित, संपर्कविरहित, रोकड विरहित झाली असून, युपीआयच्या माध्यमातून ती 24 तास कार्यरत राहू शकते. भीम App आज नवनवे विक्रम बनवत आहे. रूपे कार्ड आज गरीब, शेतकरी, मध्यमवर्ग यांच्यासह देशातील सर्व स्तरातील लोकांचे व्यवहाराचे महत्वाचे साधन झाले आहे. आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी रूपे कार्डचा वापर करण्यावर त्यांनी भर दिला. आता देशातील वंचित घटकांपर्यंत बँकिंग व्यवस्था पोचली आहे. यामुळेच, आता थेट लाभ हस्तांतरण, जेईएम (जनधन-आधार-मोबाईल) यांच्या माध्यमातून काहीही गळती न होता, लाखो लाभार्थ्यांपर्यंत, थेट मदत पोहचते आहे.

तसेच, स्वयंसहायता गट, एमएसएमई यांनाही, जेईएमच्या माध्यमातून वस्तू आणि सेवांचा थेट पुरवठा होत आहे, हे ही पंतप्रधानांनी सांगितले.

उद्योगक्षेत्राने, संशोधन आणि विकास तसेच उत्तम दर्जाच्या बॅट्रीजचे उत्पादन करण्यावर भर द्यावा, ज्यामुळे, देशातील सौर उर्जा पैनेलची सौर उर्जा साठवण क्षमता वाढवता येऊ शकेल,असे पंतप्रधान म्हणाले. एमएसएमई क्षेत्राला देखील उद्योगक्षेत्राने मदतीचा हात द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘नूतोन जुगेर भोर’ या प्रसिध्द कवितेचा आपल्या भाषणात उल्लेख करत, पंतप्रधानांनी उद्योग क्षेत्राला, सध्या असलेल्या आव्हानांच्या काळात उपलब्ध संधी शोधण्याचा आग्रह केला. केवळ धावणारी पावलेच नवा रस्ता निर्माण करु शकतात, असे सांगत, आता उशीर करायला नको, असे पंतप्रधान म्हणाले.

ईशान्य भारत आणि पूर्व भारतात उद्योगांच्या विकासात इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स संघटनेने दिलेल्या योगदानाचाही पंतप्रधानांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.

 

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1630927) Visitor Counter : 419