PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र


पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत पाचवी बैठक 11 मे 2020 रोजी दुपारी 3 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे घेणार

देशात कोविड-19 व्यवस्थापनासाठी पुरेशा आरोग्यविषयक पायाभूत सुविधा आणि आरोग्य सुविधा तीन श्रेणींमध्ये उभारण्यात आल्या

Posted On: 10 MAY 2020 7:30PM by PIB Mumbai

 

(Contains Press releases concerning Covid-19, issued in last 24 hours, inputs from PIB Field Offices and Fact checks undertaken by PIB)

दिल्‍ली-मुंबई, 10 मे 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत पाचवी बैठक 11 मे 2020 रोजी दुपारी 3 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दुपारी 3 वाजता राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे पाचवी बैठक घेणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने ट्वीटर वर म्हटले आहे.

संपूर्ण जगभरामध्ये कोविड-19 महामारीचा उद्रेक झाला आहे, या पार्श्‍वभूमीवर भारत सरकारने इतर देशांसाठीही अनेक उपाय योजना केल्या आहेत आणि मदतीचा हात दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे भारतीय नौदलाचे ‘केसरी’ हे जहाज इतर देशांसाठी मदत सामुग्री घेवून आज रवाना झाले. मालदीव, मॉरिशस, सेशेल्स, मॅडागास्कर आणि कॉमोरोस या देशांना मदत पुरवण्यासाठी‘केसरी’ जहाज रवाना झाले. या जहाजातून अन्नसामुग्री, कोविड-19 महामारीवर उपयोगी ठरत असलेल्या एचसीक्यू औषधाच्या गोळ्या आणि विशेष आयुर्वेदिक औषधे तसेच वैद्यकीय सहाय्यकांचे पथक आज पाठवण्यात आले. या देशांशी असलेले दृढ ऋणानुबंध लक्षात घेवून भारताने ‘मिशन सागर’ सुरू केले आणि मदत सामुग्री पाठवली आहे.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती  

देशात कोविड-19 व्यवस्थापनासाठी पुरेशा आरोग्यविषयक पायाभूत सुविधा आणि आरोग्य सुविधा उभारण्यात आल्या आहेत. कोविड-19 प्रकरणांच्या  व्यवस्थापनासाठी समर्पित सार्वजनिक आरोग्य सुविधा खालीलप्रमाणे तीन श्रेणींमध्ये विभागल्या आहेत –

 • श्रेणी I-  समर्पित कोविड हॉस्पिटल (डीसीएच) - समर्पित कोविड रुग्णालये  प्रामुख्याने ज्यांचे वैद्यकीयदृष्ट्या गंभीर असे निदान झाले आहे त्यांना व्यापक सेवा पुरवतात. आयसीयू, व्हेंटिलेटर आणि  ऑक्सिजन मदतीसह बेड या सुविधांनी ही रुग्णालये  सुसज्ज असतात. या रुग्णालयांमध्ये संशयित आणि बाधित रुग्णांसाठी स्वतंत्र विभाग असतात.  समर्पित कोविड आरोग्य केंद्रे आणि कोविड सेवा केंद्रांसाठी समर्पित कोविड रुग्णालये संदर्भ( रेफरल) केंद्र म्हणून काम करतील.
 • श्रेणी II समर्पित कोविड आरोग्य केंद्र  (डीसीएचसी) - समर्पित कोविड आरोग्य केंद्र ही अशी रुग्णालये आहेत जी वैद्यकीयदृष्ट्या सौम्य लक्षणे असलेल्या सर्व रुग्णांची काळजी घेतात. समर्पित कोविड आरोग्य केंद्रात  संशयित आणि बाधित रुग्णांसाठी स्वतंत्र विभाग असतात. या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन सुविधा असलेले सुसज्ज  बेड असतील. प्रत्येक समर्पित कोविड आरोग्य केंद्र एक किंवा अधिक समर्पित कोविड रुग्णालयांशी जोडलेले आहे.
 • श्रेणी III समर्पित कोविड सेवा केंद्र (डीसीसीसी) - कोविड सेवा केंद्र केवळ अशाच रुग्णांची काळजी घेऊ शकतात जे वैद्यकीयदृष्ट्या सौम्य किंवा अति सौम्य  किंवा कोविड संशयित रुग्ण आहेत. राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमार्फत वसतिगृह, हॉटेल, शाळा, स्टेडियम, लॉज इत्यादी सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही ठिकाणी या अस्थायी सुविधा उभारल्या जाऊ शकतात. या सुविधांमध्ये संशयित आणि बाधित रुग्णांसाठी स्वतंत्र विभाग असतील. प्रत्येक समर्पित कोविड सेवा केंद्र रेफरल उद्देशासाठी एक किंवा अधिक समर्पित कोविड आरोग्य केंद्र आणि कमीतकमी एक समर्पित कोविड हॉस्पिटलशी जोडलेले आहे.

10 मे पर्यंत सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये 483 जिल्ह्यांमध्ये 7740 सुविधा आहेत. ज्यात राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकार तसेच केंद्र सरकारची रुग्णालये आणि सुविधा समाविष्ट आहेत. एकूण 6,56,769 अलगीकरण खाटा असून बाधित रुग्णांसाठी 3,05,567 खाटा, संशयित रुग्णांसाठी 3,51,204 खाटा,  99,492 ऑक्सिजनने  सुसज्ज खाटा तर ऑक्सिजन सह 1,696 सुविधा आणि 34,076 आयसीयू बेड आहेत.

सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना सार्वजनिक माहितीसाठी त्यांच्या संकेतस्थळांवर  तीन प्रकारच्या कोविड समर्पित सुविधा अधिसूचित आणि अपलोड करण्याची विनंती केंद्र सरकारकडून  करण्यात आली आहे. 32 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांनी त्यांच्या संकेतस्थळांवर / सार्वजनिक माहिती मंचावर याआधीच माहिती अपलोड केली आहे आणि अन्य ते करण्याच्या प्रक्रियेत आहेत.

नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (एनसीडीसी) येथे कोव्हीड-19 चाचणी क्षमता आणखी वाढवण्याची गरज लक्षात घेऊन अधिकारप्राप्त गट  2च्या शिफारशीनुसार उच्च प्रक्रिया यंत्र  खरेदीला मान्यता देण्यात आली. आता एनसीडीसीमध्ये कोबास 6800 चाचणी मशीन यशस्वीरित्या उभारण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार एनसीडीसी दिल्ली, एनसीआर, लडाख, जम्मू-काश्मीर आणि इतर विविध राज्यांतील नमुन्यांच्या चाचणीसाठी सहाय्य पुरवत आहे. सध्या एनसीडीसीमध्ये दररोज चाचणी क्षमता सुमारे 300-350 इतकी आहे. कोबास 6800 या  24 तासात सुमारे  1200 नमुन्यांची चाचणी घेण्याची क्षमता असलेल्या यंत्रासह एनसीडीसीमध्ये कोविड -19 चाचणी क्षमता लक्षणीयरित्या वाढविण्यात आली आहे.

आतापर्यंत एकूण 19,357 लोक बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 1,511 रुग्ण बरे झाले. रुग्ण बरे होण्याचा दर 30.76% वर गेला आहे.  बाधित रुग्णांची संख्या 62,939 आहे. कालपासून, भारतात कोविड-19 बाधित रुग्णांमध्ये 3,277 ची वाढ नोंदली गेली आहे.

इतर अपडेट्स :

 • केंद्रीय गृहमंत्रालयाने सीबीएसई- म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या देशभरातील 3,000 शाळा मूल्यमापन केंद्र म्हणून सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. सीबीएसई द्वारे घेतल्या गेलेल्या दहावी आणि बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे वेळेत मूल्यमापन होऊन निकाल लावता यावा, या दृष्टीने ही परावानगी देण्यात आली आहे.
 • कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव आणि आरोग्य सचिवांसोबत बैठक घेऊन कोविड-19 व्यवस्थापनाच्या स्थितीचा आढावा घेतला.  गौबा यांनी, अधिकाधिक श्रमिक विशेष रेल्वेगाड्या चालविण्यासाठी रेल्वेला सहाय्य करण्याची विनंती राज्य सरकारांना केली. वंदे भारत मिशन अंतर्गत, परदेशातील नागरिकांना भारतात परत आणण्यासाठी राज्य सरकारांनी केलेल्या सहकार्याचे त्यांनी कौतुक केले.
 • रसायन आणि खते मंत्रालयांतर्गत नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाने एप्रिल 2020 मध्ये  खत विक्रीत 71% वाढ नोंदवली आहे.  एप्रिलमध्ये कोविड-19 लॉकडाऊनमुळे देशात कडक निर्बंध असूनही कंपनीने मागील वर्षीच्या याच कालावधीतील 2.12 लाख मेट्रिक टनच्या तुलनेत एप्रिल 2020 मध्ये 3.62 लाख मेट्रिक टन खत विक्री नोंदवली.
 • कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात गोव्याचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे प्रादेशिक कार्यालय, दाव्यांचा निपटारा व निवृत्तीवेतन सेवा काळजीपूर्वक आणि किमान कर्मचाऱ्यांसह निवृत्तीवेतनधारकांपर्यंत पोहोचविण्यास वचनबद्ध आहे. आर्थिक संकटाला सामोरे जाणाऱ्या नियोक्त्यांना अग्रगामी लाभ देण्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना (पीएमजीकेवाय) सुरू केली आहे. तथापि, प्रथमदर्शनी असे आढळून आले आहे की गोव्यामध्ये 1702 आस्थापना या लाभासाठी पात्र ठरल्या आहेत, परंतु आत्तापर्यंत फक्त 425 आस्थापनांनी 5748 कर्मचाऱ्यांसाठी एक कोटी रुपयांपर्यंत याचा लाभ घेतला आहे.मार्च आणि एप्रिल 2020 महिन्यांचा लाभ घेण्यासाठी शेवटची तारीख 15.05.2020 आहे. कोणताही दंड आकारला जाणार नाही आणि आस्थापने इलेक्ट्रॉनिक चलन कम रिटर्न (ईसीआर) अपलोड करू शकतात (प्रशासकीय शुल्क आणि कर्मचारी ठेव संलग्न विमा योजना (ईडीएलआय) असे मिळून फक्त 1%आकारण्यात येईल).
 • अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षित 1500 हून अधिक आरोग्य सहाय्यक कोरोना रुग्णांच्या उपचारात मदत करत असल्याचे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितले. या आरोग्य सहाय्यकांमध्ये 50 टक्के मुलींचा समावेश असून देशभरातली विविध रुग्णालये आणि आरोग्य केंद्रात कोरोना रुग्णांच्या उपचारात त्या मदत करत आहेत.या वर्षी 2000 पेक्षा जास्त आरोग्य सहाय्यकांना अल्पसंख्याक मंत्रालयाकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे.
 • कोविड-19 चा प्रभाव जास्त असणाऱ्या आणि वेगाने प्रादुर्भाव होणाऱ्या 10 राज्यात केंद्रीय पथके तैनात करण्याचा निर्णय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने घेतला आहे. कोविड-19 चा संसर्ग रोखण्यासाठीच्या व्यवस्थापनात मदत करण्यासाठी संबंधित राज्यांच्या राज्य आरोग्य विभागांना ही पथके  मदत करतील. या पथकांमध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, सहसचिव स्तरीय नोडल अधिकारी आणि सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ यांचा समावेश आहे.
 • लॉकडाऊनमुळे देशाच्या विविध भागात अडकलेले स्थलांतरित मजूर, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर व्यक्तींना विशेष रेल्वेने मूळ गावी परतता येईल याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर रेल्वेने श्रमिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला. 9 मे 2020 पर्यंत देशाच्या विविध राज्यातून 283 श्रमिक विशेष गाड्या चालवण्यात आल्या, यापैकी 225 गाड्या आपल्या नियोजित स्थानी पोहोचल्या तर 58 गाड्या अद्याप वाटेवर आहेत. शनिवारसाठी 49 श्रमिक विशेष गाड्या नियोजित होत्या.
 • लॉकडाऊन दरम्यान पश्चिम रेल्वेने देशसेवेत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आतापर्यंत ईशान्येकडील प्रदेशासह विविध राज्यांमध्ये 3,258 रॅकद्वारे 6.14 दशलक्ष टन जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यात आली आहे. मालवाहतुकीत खत,मीठ, धान्य, सिमेंट, कोळसा या वस्तूंची वाहतूक केली गेली. या व्यतिरिक्त औषध,वैद्यकीय उपकरणे,गोठविलेले अन्न, दुधाची पावडर आणि दूध यासारख्या जीवनावश्यक वस्तूंसह मिलेनियम पार्सल व्हॅन आणि दूध टाकी वॅगन्सच्या 178 रॅक्सची वाहतूक करण्यात आली.

महाराष्ट्र अपडेट्स

गेल्या चोवीस तासात 48 मृत्यू आणि 1,165 नव्या रुग्णांसहित राज्यातील रुग्णसंख्या 20,228 वर पोचली आहे. एकट्या मुंबईतच 12,864 केसेस तर 489 मृत्यू झाले आहेत.

 

FACT CHECK

 

* * *

RT/MC/SP/DR

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1622749) Visitor Counter : 147