PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 26 APR 2020 7:16PM by PIB Mumbai

दिल्ली-मुंबई, 26 एप्रिल 2020

"या जागतिक महामारीच्या संकटातच आपल्या परिवारातला एक सदस्य या नात्यानं, आणि आपण सर्व माझ्या परिवारातलेच आहात, तेव्हा काही संकेत देणं, काही सूचना करणं, ही माझी जबाबदारी बनते. माझ्या देशवासियांना मी आग्रह करेन की, आपण अतिआत्मविश्वासात कधीही अडकणार नाही. आपल्या  शहरात, आपल्या  गावात, आपल्या  गल्लीत, कार्यालयात, आतापर्यंत कोरोना पोहचलेला नाही, म्हणून आता पोहचणार नाही, असा विचार कधीही मनात आणू नका. असा चुकीचा समज कधीही मनात बाळगू नका. म्हणून, अतिउत्साहात, स्थानिक स्तरावर कोणतीही बेपर्वाई केली जाऊ नये. हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि, मी पुन्हा एकदा म्हणेन, दोन फुट अंतर ठेवा, स्वतःला निरोगी ठेवा" असे आवाहन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात केले. ते पुढे म्हणाले,

"भारताची कोरोनाच्या विरोधातील लढाई ही खऱ्या  अर्थाने लोकांच्या नेतृत्वानेच लढली जात आहे. भारतात कोरोनाच्या विरोधातील लढाई जनता लढत आहे, आपण लढत आहात, जनते बरोबरीने एकत्रितपणे शासन, प्रशासन लढत आहे. विकासासाठी प्रयत्नशील असलेला भारतासारखा विशाल देश, गरिबीशी निर्णायक लढा देत आहे. त्याच्याकडे, कोरोनाशी लढण्यासाठी आणि जिंकण्याचा हाच एक मार्ग आहे. तंत्रज्ञानाच्या आघाडीवर तर देशातला प्रत्येक नाविन्यपूर्ण संशोधक नव्या परिस्थितीनुसार काही न काही निर्माण करत आहे. डॉक्टर असो, स्वच्छता कामगार असो, इतर सेवा बजावणारे लोक असोत- इतकंच नाही, आपल्या पोलिस व्यवस्थेबद्दलही सामान्य लोकांच्या मानसिकतेत मोठं परिवर्तन  घडलं आहे.  आम्ही भारताच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी जे करायचं आहे, त्याचे प्रयत्न तर वाढवले आहेतच, परंतु जगभरातनं येत असलेल्या मानवतेच्या रक्षणाच्या हाकेकडेही पूर्णपणे लक्ष दिलं. आम्ही जगातल्या सर्व गरजूंपर्यंत औषधं पोहचवण्याचा विडा उचलला आणि मानवतेचं हे काम करून दाखवलं."

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती  

कोविड-19 च्या प्रसाराला आळा घालणे, प्रतिबंध आणि व्यवस्थापन यासाठी केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने सातत्याने एकत्रित उपाययोजना करत आहे. या सर्व उपाययोजना आणि व्यवस्थापनांवर सर्वोच्च पातळीवर नियमित देखरेख ठेवली जात आहे.

कोविड-19 च्या तयारीचा आढावा घेण्यासाठी, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी आज अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था-एम्सच्या ट्रौमा सेंटरला भेट दिली. या भेटीदरम्यान, त्यांनी एम्समध्ये कोविड-19 च्या रूग्णांसाठी विविध अत्याधुनिक कक्षांची  पाहणी केली. तसेच  कोविड-19 च्या रूग्णांशीही व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. रुग्णांच्या जवळ रोबोच्या माध्यमातून हा व्हिडीओ कॉल करण्यात आला होता. आरोग्यमंत्र्यांनी रुग्णांच्या प्रकृतीची चौकशी केली. एम्समधले उपचार आणि सुविधांविषयी देखील त्यांनी माहिती घेतली आणि सूचनाही मागवल्या.

सविस्तर आढाव्यानंतर, डॉ हर्षवर्धन यांनी, विविध कक्षातल्या कामांविषयी समाधान व्यक्त केले. कोविड-19 चे रुग्ण आणि संशयितांच्या कल्याणासाठी डिजिटल प्लेटफॉर्म आणि व्हिडीओ/ व्हाईसकॉलच्या मदतीने एम्स चोवीस तास संपूर्ण खबरदारी घेत असल्याबद्दल  त्यांनी सर्वांचे कौतुक केले. कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी जनतेला लॉकडाऊन 2.0 चे पूर्णपणे पालन करण्याचे आवाहन डॉ हर्षवर्धन यांनी केले. भारतात हॉट स्पॉट जिल्हे कमी होत असून आपण आता बिगर-हॉट स्पॉट जिल्ह्यांकडे वाटचाल करत आहोत, असे सांगत, भारतातील परिस्थिती सुधारत आहे, असे त्यांनी सांगितले.

आज कॅबिनेट सचिवांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्व राज्यातले मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांशी चर्चा केली. कोविड-19 च्या देशभरातील तयारीचा त्यांनी यावेळी आढावा घेतला. ज्या राज्यात कोविड-19 चे अधिक रुग्ण आहेत, त्या राज्यात, लॉकडाऊनच्या नियमांचे तसेच कंटेन्मेंट धोरणाचे काटेकोर पालन केले जावे, असे त्यांनी सांगितले. राज्यांनी सर्व वैद्यकीय पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेवर, त्यात अलगीकरण खाटा, आयसीयू बेड्स व्हेंटीलेटर्स इत्यादिंकडे लक्ष द्यावे, असेही ते म्हणाले.

आतापर्यंत देशात 5804 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचा दर सध्या  21.90%. इतका आहे. तसेच, देशभरात सध्या कोविडचे एकूण 26,496 रुग्ण आहेत आणि 824 जणांचा या आजारात मृत्यू झाला आहे.

इतर अपडेट्स :

महाराष्ट्र अपडेट्स

राज्यातील लॉकडाऊनबाबत त्या त्या भागातील परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. उद्या (सोमवारी) पंतप्रधानांसमवेत व्हिडिओ कॉन्फरंसमध्येदेखील यादृष्टीने चर्चा होईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते आज दुपारी लाईव्ह प्रसारणाच्या माध्यमातूनजनतेशी संवाद साधत होते.

केंद्राचे पथक आठवडाभरापासून राज्यात असून त्यांना त्रयस्थपणे निरिक्षण करण्याचे तसेच उणिवा असल्यास त्या सांगण्याचे आवाहनपण केले आहे, त्यांच्या सुचनांचे पालन करण्याच्या सुचनाही आपण प्रशासनाला दिल्या आहेत असे मुख्यमंत्री म्हणाले.

 

 

RT/MC/SP/PK

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1618466) Visitor Counter : 319