• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आंतर-मंत्रालयीन केंद्रीय पथकाकडून ठाणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा


प्रतिबंधित क्षेत्रात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याची केंद्रीय पथकाची सूचना

Posted On: 25 APR 2020 7:59PM by PIB Mumbai

मुंबई, 25 एप्रिल 2020

 

कोविड-19 संबंधी स्थितीचं प्रत्यक्ष मूल्यमापन करण्यासाठी केंद्र सरकारने आंतर मंत्रालयीन केंद्रीय पथकाची स्थापना केली आहे. अतिरिक्त सचिव मनोज जोशी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय पथकाने आज कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाची स्थिती जाणून घेण्यासाठी ठाणे जिल्ह्याचा आढावा घेतला.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच तातडीने सर्वेक्षण आणि वैद्यकीय तपासणी तसेच संस्थात्मक  क्वारंटाईन करण्यावर भर देण्यात यावा अशा सूचना केंद्रीय पथकाचे प्रमुख अतिरिक्त सचिव मनोज जोशी यांनी केल्या. 
जिल्ह्यामध्ये  प्रतिबंधात्मक आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

अतिरिक्त सचिव मनोज जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे मनपाच्या बल्लाळ सभागृहात झालेल्या बैठकीत कोविड-19 ची वाढती संख्या, प्रतिबंधात्मक उपाययोजना व त्याअनुषंगाने भविष्यात करायचे नियोजन याचा आढावा घेण्यात आला.

सर्व विभाग समन्‍वयाने काम करीत आहेत, ही समाधानाची बाब असली तरी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जास्तीत जास्त संशयितांची तपासणी करण्यात यावी. प्रत्येक क्षेत्रातील फिवर क्लिनिकच्या ठिकाणी योग्य ती दक्षता घेण्यात यावी. तसेच संस्थात्मक क्वारंटाईन वाढविण्याबरोबरच अधिक चाचण्या करण्यावर भर देण्यात यावा असे जोशी यावेळी म्हणाले.

विशेषत: झोपडपट्टीच्या अथवा जास्त घरांची गर्दी असलेल्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करावे. सार्वजनिक स्वच्छतागृह आहे तेथे अधिक काळजी घेण्यात यावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. 

 

प्रत्येक मनपाने आपल्या भागातील ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्यावी. तसेच जिल्ह्यातील सर्व ठिकाणी अन्‍न–धान्‍याचे वितरण व्‍यवस्थित करावे आणि नागरिकांमध्‍ये असलेली भीती नाहीशी करून त्यांच्यामध्ये विश्‍वास निर्माण करावा. तसेच कोविड व्यतिरिक्त ईतर रुग्णांना देखील उपचार मिळावेत यासाठी आवश्यक ते नियोजन करावे अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. 

तत्पूर्वी या केंद्रीय पथकाने सकाळी कौशल्य हॉस्पिटल, जिल्हा सामान्य रूग्णालय, होरायझन हॉस्पिटल या कोव्हीड हॉस्पिटल्सना तसेच पारसिक नगर कळवा, अमृतनगर, मुंब्रा या ठिकाणी भेट घेवून परिस्थितीचा आढावा घेतला.  

ठाणे जिल्ह्यात आरोग्य, पोलिस, महसुल  प्रशासन हे संयुक्तपणे काम करीत आहे.सर्व महानगरपालिका तसेच हॉस्पिटलमध्ये पुरेश्या प्रमाणात सर्व सुविधा उपलब्ध आहेत. त्यांना आवश्यकतेनुसार सुविधांची उपलब्धता करुन देण्यात येत असल्याचे कोकण विभागीय आयुक्त श्री शिवाजीराव दौंड यांनी सांगितले. 

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्ह्यात सुरु असलेल्या कम्युनिटी किचनची व अडकून पडलेल्या मजूर व कामगारांची निवास व भोजनाची व्यवस्था प्रशासन व विविध संस्थांच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची माहिती दिली.

दरम्यान, कोविड-19 चा प्रसार आटोक्यात ठेवण्यासाठी राज्यांच्या प्रयत्नांमधे वृद्धी करण्यासाठी आणि परिस्थितीचे मुल्यांकन करण्यासाठी केंद्र सरकारकडून आंतर मंत्रालयीन केंद्रीय पथके स्थापन करण्यात आली आहेत. गुजरातसाठी दोन, तेलंगण, तामिळनाडू आणि महाराष्ट्र (मुंबई-पुणे साठी आधी स्थापन केलेल्या पथकांच्या जबाबदारीच्या क्षेत्राचा विस्तार) या तीन राज्यांसाठी प्रत्येकी एक पथक स्थापन करण्यात आले आहे. ही पथके प्रत्यक्ष स्थळी परिस्थितीची पाहणी करून राज्य प्रशासनाला निवारणाबाबत आवश्यक सूचना करून जनहितार्थ केंद्र सरकारला अहवालही सादर करतील.

 

R.Tidke/S.Tupe/D.Rane

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com


(Release ID: 1618275) Visitor Counter : 137

Read this release in: English

Link mygov.in