PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र


तीन जिल्ह्यात गेल्या 28 दिवसात एकही नवा रुग्ण नाही, गोव्यामध्ये कोविड-19 चे सर्व रुग्ण बरे झाले आहेत आणि सध्या एकही सक्रिय रुग्ण नाही: आरोग्य मंत्रालय

Posted On: 20 APR 2020 7:40PM by PIB Mumbai

 

              

दिल्ली-मुंबई,  20 एप्रिल 2020

जी-20 राष्ट्रांच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सौदी अरेबिया येथे झाली. या बैठकीत डॉ हर्षवर्धन यांनी सर्व राष्ट्रांच्या एकत्रित आणि परस्पर सामंजस्य व सहकार्य यातूनच कोविड-19 चा लढा दिला जाऊ शकेल, या मुद्यावर प्रामुख्याने भर दिला.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवर पत्रकार परिषद 

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव श्री लव अगरवाल, गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्या श्रीमती पुण्य सलिला श्रीवास्तव आणि ICMR चे प्रवक्ते श्री रमन गंगाखेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत खालील माहिती दिली.

  • लॉकडाऊन काळातही खरीप हंगामासाठीच्या पेरणी- मशागतीची कामे गतीने सुरु आहेत, गेल्या वर्षीच्या तुलनेत 36% अधिक कामे झाल्याची नोंद आहे, विशेषतः धानाच्या पेरणीक्षेत्रात वाढ झाली आहे.
  • लॉकडाऊन मधून कृषीकामांना वगळण्यात आले आहे, मात्र  शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे
  • शेतकऱ्यांना कृषिउत्पादन कायम घेता यावे, यासाठी PM किसान योजनेअंतर्गत निधी देण्यात आला आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत राज्यांना डाळी देण्यात आल्या आहेत. पीएम फसल बिमा योजनेअंतर्गत विम्याच्या दाव्यांची रक्कम देण्यात आली आहे.
  • कोविड-19  आपत्तीच्या काळात अन्नधान्य आणि नाशवंत मालाची वाहतूक सुलभतेने करता यावी यासाठी ऑल इंडिया अॅग्री ट्रान्सपोर्ट कॉल सेंटर आणि किसान रथ Mobile App सुरू करण्यात आले आहेत.
  • फेस मास्क आणि हँड सॅनिटायझर्सना अत्यावश्यक वस्तू कायद्याच्या कक्षेत आणण्यात आले आहे. मदतकार्यासाठी स्वयंसेवी संस्थाना एफसीआयकडून थेट अन्नधान्य खरेदीची परवानगी देण्यात आली आहे.
  • भारतीय अन्न महामंडळाने लॉकडाऊनच्या काळात  सरासरीच्या दुप्पट अन्नधान्याचे वाटप केले आहे.
  • कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारने मनरेगा रोजंदारीमध्ये वाढ केली आहे. सरासरी 20 रुपयांची वाढ आहे. प्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत प्रधान मंत्री जनधन योजनेच्या खातेधारकांच्या खात्यात थेट रक्कम जमा केली जाते
  • ज्या भागात लॉकडाऊनचे उल्लंघन होत आहे, त्या ठिकाणी राज्यांच्या मदतीने योग्य उपाययोजना केल्या जात आहेत. गृहमंत्रालयाने काल राज्यांना यासंदर्भात पत्र लिहिले असून आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत देण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांचे राज्यांनी काटेकोरपणे पालन करायचे आहे.- गृह मंत्रालय
  • राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगण्यात आले आहे की या मार्गदर्शक तत्वांमध्ये सांगितलेल्या उपाययोजनांपेक्षा जास्त कठोर निर्बंधांचा ते अवलंब करू शकतात, मात्र त्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 अंतर्गत असलेल्या मार्गदर्शक तत्वांना शिथिल  करू नये
  • गृहमंत्रालयाने केरळ सरकारला पत्र पाठवले असून राज्याने परवानगी दिलेल्या काही बाबी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन असल्याचे म्हंटले आहे. केरळने लॉकडाऊन नियमांचे कठोर पालन करावे असेही गृहमंत्रालयाने सांगितले आहे
  • कोविड-19 स्थितीचे मूल्यमापन करण्यासाठी आणि कोविड-19 च्या फैलावाला प्रभावी पद्धतीने प्रतिबंध करण्याच्या राज्यांच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने 6 आंतर- मंत्रालयीन पथके स्थापन केली आहेत.
  • आतापर्यंत 2,546 जण उपचारानंतर बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण 14.75% इतके आहे. देशात सध्या कोविड चे एकूण रुग्ण 17,265 इतके आहेत. गेल्या 24 तासांत 1553 नवे रुग्ण आले तर 36 जणांचा मृत्यू झाला- आरोग्य मंत्रालय
  • केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी काल कोविड-19 व्यवस्थापनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी राजीव गांधी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला भेट दिली. लॉकडाऊन 2.0 च्या काळात शिस्तीचे पालन केल्यास कोविड-19 च्या संघर्षामध्ये विजयाच्या रुपाने त्याचे फायदे मिळतील, असे त्यांनी सांगितले
  • जी-20 देशांच्या आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीत डॉ हर्षवर्धन यांनी सांगितले की कोविडसाठीची लस आणि औषध विकसित करण्याच्या संशोधनात इतर सदस्य देशांसोबत काम करण्यास भारत उत्सुक आहे.
  • सरकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
  • लॉकडाऊनच्या आधी भारतात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा दर 3.4 दिवस इतका होंता, आता त्यात सुधारणा होऊन तो 7.5 इतका झाला आहे. 19 एप्रिलच्या आकडेवारीनुसार, 18 राज्यांत हा दर सरासरी राष्ट्रीय दरापेक्षा चांगला आहे.
  • ओदिशा आणि केरळमध्ये कोविड-19 रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी 30 दिवसांपेक्षा जास्त झाला आहे. गोव्यामध्ये कोविड-19 चे सर्व रुग्ण बरे झाले आहेत आणि सध्या गोव्यात एकही सक्रिय रुग्ण नाही
  • गेल्या 28 दिवसांत कोविड19 चा एकही रुग्ण न आलेल्या माहे आणि कुर्ग या जिल्ह्यांच्या यादीत आता उत्तराखंड च्या पौरी गढवाल जिल्ह्याचाही समावेश झाला आहे. गेल्या 14 दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण न आलेल्या जिल्ह्यांच्या यादीत आज आणखी सहा जिल्ह्यांची वाढ झाली आहे.
  • आजपासून काही राज्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी सोशल डिस्टन्सिंगच्या निकषांचे तुम्ही पालन करावे, अशी आमची तुम्हाला विनंती आहे.  जेणेकरून कोविड-19 च्या रुग्णांच्या संख्येत आणखी घट होईल आणि ग्रीन झोनमध्ये शून्य रुग्ण स्थिती कायम राहील
  • रॅपिड अँटी बॉडी चाचणी ही वैयक्तिक निदानासाठी नाही, कारण, शरीरात असलेल्या अँटीबॉडीज विषाणूविरुद्ध किती प्रभावशाली ठरतील, याची आपल्याला कल्पना नाही. ही चाचणी केवळ निरीक्षणासाठी केली जाते. संसर्गजन्य आजाराबाबतच्या सर्वेक्षणात सातत्याने चुका झाल्या तरी,संसर्गाची व्याप्ती/दिशा तपासण्यावर त्याचा परिणाम होणार नाही.- ICMR
  • RT-PCR टेस्टिंग किट्सचा वापर करताना ते नेहमी 20°C तापमानाखाली ठेवणे गरजेचे आहे, जर तापमान जास्त असेल तर चाचण्यांचे योग्य निष्कर्ष मिळणार नाहीत. तंत्रज्ञांनी नमुने सामान्य तापमानाच्या स्थितीत ठेवले असल्याच्या शक्यतेमुळे पश्चिम बंगालमधून तक्रारी आल्या असू शकतील
  • मुंबईतल्या पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याच्या वृत्तावर आरोग्य मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली की ही अत्यंत दुर्दैवी बातमी असून सर्वांनी आपले काम करतांना आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी, मास्कचा वापर करावा , सॅनिटायझर वापरावा आणि सामाजिक अंतराचे नियम पाळावेत. नमुना चाचणीच्या निकषानुसार ज्या कोणाचीही चाचणी करण्याची गरज असेल, त्याची चाचणी केली जाईल.

 वरील पत्रकार परिषदेचे @PIBMumbai ने केलेले लाइव ट्वीट पाहण्यासाठी इथे क्लिक करा

  इतर अपडेट्स :

 

महाराष्ट्र अपडेट्स

 

महाराष्ट्रातील रुग्ण संख्येने 4000 अप्पा ओलांडला असून रुग्णसंख्या 4203 झाली आहे राज्यामध्ये आजपर्यंत 223 मृत्यू झाले आहेत तर 507 लोक बरे झाले आहेत.  राज्यामध्ये पॉझिटिव आढळलेल्या रुग्णांपैकी दोनतृतीयांश लोकांमध्ये चाचणी वेळी संसर्गाचे कुठलेही लक्षण दिसले नव्हते.

 

DJM/RT/MC/SP/PK

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1616493) Visitor Counter : 520