• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
कृषी मंत्रालय

शेतातून सेवा देत आहेत कोरोना विषाणूचे खरे योद्धे


लॉकडाऊन काळातही रब्बी पिकांची कापणी आणि उन्हाळी पिकांची पेरणी कमीतकमी किंवा कोणत्याही व्यत्ययाविना सुरु

रब्बी पिकांपैकी देशात 310 लाख हेक्टर क्षेत्रावर 67% गव्हाची पेरणी

17 एप्रिल पर्यंत झालेली उन्हाळी पिकाची पेरणी गतवर्षीच्या याच कालावधीपेक्षा 14 % जास्त

केंद्र आणि राज्य सरकारने वेळेवर लक्ष घातल्यामुळे कठीण काळातही शेतकरी आणि कृषी क्षेत्रातील मजुरांच्या मेहनतीला आधार

Posted On: 19 APR 2020 6:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 एप्रिल 2020

 

सध्याच्या काळातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, कृषी क्षेत्र हा आशेचा किरण असून अन्नसुरक्षेचे आश्वासन देखील ती प्रदान करीत आहे. असंख्य अडचणींचा सामना करीत संपूर्ण भारतभर कितीतरी  शेतकरी आणि शेतमजूर शेतीकामात घाम गाळत आहेत, कष्ट करीत आहेत. त्यांच्या मूक प्रयत्नांना जोड मिळाली ती केंद्र आणि राज्य सरकारच्या वेळेवर केलेल्या हस्तक्षेपाची. त्यामुळेच रब्बी पिकांची कापणी आणि उन्हाळी पिकांची पेरणी कमीतकमी किंवा कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरु आहे.

गृह मंत्रालयाने कोविड -19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये कृषी क्षेत्राचे काम सुरळीत सुरु राहण्याची हमी दिली होती. सरकारच्या वेळेवर केलेल्या हस्तक्षेपामुळे आणि  सवलतींमुळे आशावादी परिणाम दिसून येत आहेत. शेतकर्‍यांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि शेतीशी संबंधित उपक्रम राबवताना सामाजिक अंतर ठेवण्यासाठी कार्यप्रणालीचे मानक (स्टँडर्ड ऑपरेशन्स प्रोसीजर -एसओपी) कळविण्यात आले आहेत. कृतीशील उपाययोजनांमुळे रब्बी पिकांची काढणी आणि उन्हाळी पिकांची पेरणीची कामे दोन्ही योजनाबद्ध पद्धतीने सुरु आहेत.

देशातील रब्बी पिकाच्या 310 लाख हेक्टर क्षेत्रामध्ये पेरणी झालेल्या गव्हापैकी 63-67% गव्हाची कापणी यापूर्वीच झाली आहे. राज्यानुसार कापणीची टक्केवारीही वाढली आहे आणि मध्य प्रदेशात- 90-95%, राजस्थानमध्ये -80-85%, उत्तर प्रदेशात -60-65%, हरियाणामध्ये -30-35% आणि पंजाबमध्ये 10-15% पर्यंत कापणी झाली आहे. हरियाणा, पंजाब, उत्तरप्रदेशात पीक काढण्याचे काम शिगेला पोहचले असून एप्रिल 2020 च्या अखेरीस ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. पंजाबने 18000 संयुक्त कापणी यंत्रे तैनात केली आहेत तर हरियाणाने कापणी आणि मळणीसाठी 5000 यंत्रे तैनात केली आहेत.

161 लाख हेक्टरमध्ये पेरणी झालेल्या डाळीं/ कडधान्यापैकी हरभरा, मसूर, उडीद, मूग आणि मटारची कापणी पूर्ण झाली आहे. एकूण 54.29 लाख हेक्टर क्षेत्रामध्ये पेरणी केलेल्या ऊसापैकी  महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि पंजाबमध्ये कापणी पूर्ण झाली आहे. तामिळनाडू, बिहार, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यांत 92-98% कापणी पूर्ण झाली आहे. उत्तर प्रदेशात, 75-80% कापणी पूर्ण झाली आहे आणि मे 2020 च्या मध्यापर्यंत हे काम सुरू राहील.

28 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेल्या रब्बी हंगामातील तांदुळापैकी आंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक, केरळ, ओडिशा, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या राज्यांत कापणी प्राथमिक टप्प्यात आहे कारण कणसात दाणे भरण्याची प्रक्रिया अजून सुरु आहे आणि त्यामुळे काढणीचा काळ वेगवेगळा असू शकतो.

तेलबिया पीकांपैकी 69 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेल्या मोहरीपैकी राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, हरियाणा, पश्चिम बंगाल, झारखंड, गुजरात, छत्तीसगड, बिहार, पंजाब, आसाम, अरुणाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात कापणी झाली आहे. 4.7 लाख हेक्टर क्षेत्रामध्ये पेरणी केलेल्या भुईमूगापैकी  85-90 % कापणी पूर्ण झाली आहे.

विशेषत: अन्नधान्याची अतिरिक्त देशांतर्गत गरज भागविण्यासाठी आणि पशुधनासाठी उन्हाळी पिके घेणे ही एक जुनी पद्धत आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने डाळी, भरडधान्य, पोषक तृणधान्य आणि तेलबिया अशा उन्हाळी पिकांच्या वैज्ञानिक लागवडीसाठी नव्याने पुढाकार घेतला आहे. या व्यतिरिक्त, शेतकरी पाणी उपलब्धतेच्या आधारे पूर्व भारत आणि मध्य भारतातील काही राज्यांत उन्हाळ्यातील धान पिकांची लागवड करतात.

17 एप्रिल 2020 रोजीपर्यंतच्या याच कालावधीत मागील वर्षीच्या तुलनेत देशात उन्हाळी पेरणी क्षेत्र 14% वाढले आहे. गतवर्षीच्या तुलनेत हंगामात पाऊस 14% जास्त झाला आहे. उन्हाळी पिकांच्या पेरणीस तो अनुकूल आहे. आतापर्यंत, उन्हाळी पिकांचे क्षेत्रफळ एक वर्षापूर्वीच्या याच कालावधीच्या तुलनेत 38.64 लाख हेक्‍टरवरून 52.78 लाख हेक्‍टर झाले आहे. कडधान्ये/डाळी, भरडधान्य, पोषक तृणधान्ये आणि तेलबिया पिकांचे क्षेत्रफळ मागील वर्षांच्या तुलनेत 14.79 लाख हेक्टरवरून 20.05 लाख हेक्टर झाले आहे.

धान्य पेरणी यंत्राने उन्हाळी मूग पिकाची पेरणी

पश्चिम बंगाल तेलंगणा, ओडिशा, आसाम, गुजरात, कर्नाटक, छत्तीसगड, तामिळनाडू, बिहार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि केरळ या राज्यात सुमारे 33 लाख हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी तांदुळाची पेरणी झाली आहे.

तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात, छत्तीसगड, बिहार, पंजाब, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, झारखंड आणि तेलंगणा राज्यात सुमारे 5 लाख हेक्टरवर डाळीची पेरणी झाली आहे.

पश्चिम बंगाल, कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, पंजाब आणि बिहार या राज्यांत सुमारे 7.4 लाख हेक्टर क्षेत्रात तेलबियांची पेरणी झाली आहे. पश्चिम बंगालमध्येही जूट पेरणीस सुरवात झाली असून पावसाचा फायदा त्यांना झाला आहे.

उन्हाळ्यातील पीक केवळ अतिरिक्त उत्पन्न देत नाही तर शेतकऱ्यांसाठी रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामादरम्यान रोजगाराच्या बर्‍याच संधी निर्माण करते. उन्हाळी पिकाची लागवड करुन विशेषत: डाळीं/कडधान्याच्या पिकाद्वारे मातीचे आरोग्य सुधारले आहे. यांत्रिक पेरणीमुळे उन्हाळ्यातील पिकांना मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शनाने कापणीचे कार्य वेळेवर पूर्ण होत आहेच शिवाय शेतकऱ्यांच्या  परिश्रमांनी उन्हाळी पिकांचे क्षेत्र वाढण्याची निश्चिती झाली आहे.

 

 

B.Gokhale/V.Joshi/D.Rane
 



(Release ID: 1616111) Visitor Counter : 375


Link mygov.in