दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

खाद्यान्न त्वरित पोहोचवण्याची गरज असलेल्या भागावर लक्ष केंद्रीत करण्याचे रविशंकर प्रसाद यांचे निर्देश


भारतीय टपाल खात्याच्यावतीने दुर्गम भागामध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

Posted On: 18 APR 2020 5:02PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 एप्रिल 2020

कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या संकटस्थितीमध्ये भारतीय टपाल खात्याच्या संपूर्ण देशभरातल्या  विशाल जाळयाच्या माध्यमातून लोकांना मदत पोहोचवण्याचे काम केले जात आहे. दळणवळण, विधी आणि न्याय तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि आय.टी. मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज प्रत्येक राज्यातल्या मुख्य पोस्ट मास्टर जनरल आणि मुख्य महा व्यवस्थापक यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. देशातल्या गरजू जनतेला तातडीने मदत करण्यासाठी टपाल खात्याचे विशाल जाळे सज्ज ठेवण्याच्या आणि सक्रिय होण्याच्या सूचना रविशंकर प्रसाद यांनी दिल्या. सध्याच्या परिस्थितीमध्ये भारतीय टपाल खात्याचे कर्मचारी वर्गाने देशातल्या दुर्गम, अतिदुर्गम स्थानी असलेल्या कोट्यवधी लोकांपर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहोचवून ख-या अर्थाने कोरोनाचे योद्धे बनले पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

खाद्यान्न आणि कोरडे अन्नधान्याचे वितरण

 

समाजातल्या वंचित, गरीब, गरजू लोकांपर्यंत खाद्यान्न वस्तूंची तातडीने मदत पोहोचवण्यावर विशेष लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता असल्याचे रविशंकर प्रसाद यांनी यावेळी सांगितले. टपाल विभागाच्या कर्मचारी वर्गाने झोपडपट्ट्यांमध्ये, स्थलांतरित कामगार, रोजंदारीवरचे कामगार अशा गरजू लोकांना अन्न, कोरडा शिधा आणि चेह-यावर बांधण्यासाठी सुरक्षा मास्क वितरित करण्यासाठी आपली बचत देवू केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सुमारे एक लाख अन्नाची पाकिटे, कोरडा शिधा यांचे वितरण एकट्या उत्तर प्रदेशात करण्यात आले आहे. तर नोएडा, गाझियाबाद, लखनौ, प्रयागराज आणि फैजाबाद इथले स्थलांतरित कामगार, गरजू लोक आणि बांधकाम मजूर यांना 50 हजारांहून जास्त अन्न तसेच कोरड्या अन्नधान्यांचे पॅक देण्यात आले आहेत. याबरोबरच बिहारमध्ये जवळपास अन्नाची 16000 पाकिटे वितरित करण्यात आली. तसेच 11,500 पाकिटे हात धुण्यासाठी साबण, मास्क, सॅनिटायझस आणि ग्लोव्हज् यांचे ऐच्छिक वितरण करण्यात आले. लॉकडाउनमध्ये तेलंगणा भागामध्ये टपाल गाडीतून भोजनाची 18,000 पाकिटे पाठवण्यात आली.  तर हैद्राबादमध्ये टपाल कर्मचारी वर्गाने एकत्रित येवून 1750 कुटुंबांना अन्न आणि शिधा दिला. त्याचप्रमाणे नागपूरमध्ये टपाल विभागाच्या कर्मचारी बांधवांनी जवळपास 1500 स्थलांतरित कामगारांना कोरडा शिधा दिला. पंजाबमधल्या टपाल कर्मचा-यांनी ‘फूड ऑन व्हिल्स’ सुरू केली आहे. या गाडीच्या माध्यमातून चंडिगडच्या विविध भागात अडकलेले बांधकाम कामगार, फेरीवालेरिक्षा चालक, पीजीआयमध्ये आलेल्या रुग्णांचे नातेवाईक, स्थलांतरित कामगार यांना भोजन पुरवण्यात येत आहे.

अन्न आणि पुरवठा विभागाच्या मदतीने चंदिगडमधले टपाल खात्याचे अधिकारी टपाल वाहनातून वेगवेगळ्या भागात दिवसातून दोनवेळा अन्नाची पाकिटे वितरित करीत आहेत. ‘फूड ऑन व्हिल्स’च्या माध्यमातून सुमारे दोन ते साडेतीन हजार गरजू लोकांना दिवसातून दोनवेळा अन्न पुरवले जात आहे. विशेष म्हणजे हे काम करताना संबंधित सर्व कर्मचारी सामाजिक अंतर राखण्याच्या नियमांचे पालन करत आहेत. लाल टपाल वाहन आता या बेघर, वंचित लोकांसाठी एक आशेचा किरण बनली आहे. सर्वजण मोठ्या उत्सुकतेने या टपाल गाडीच्या आगमनाची वाट पहात असतात. मुंबईमध्ये टपाल कर्मचारी केवळ स्थलांतरित मजुरांना आणि गरजवंतांना अन्न देत नाहीत तर धारावीसारख्या संक्रमित भागात मास्क आणि सॅनिटायझर्सचाही पुरवठा करीत आहेत.

औषधे सुलभतेने उपलब्ध करून देणे

लॉकडाउनच्या काळात वारंवार आणि दैनंदिन आवश्यक असणारी औषधांची उपलब्धता सगळीकडे आहे. मात्र कर्करोग, मूत्रपिंडाचे आजार यासारख्या विशेष औषधांची उपलब्धता नसते. ग्रामीण भागात अशा रुग्णांना शहरात राहणा-या नातेवाइकांच्यामार्फत किंवा मुलांकडून औषधे मागवावी लागतात. यासंबंधी काही उपाय योजना करण्यात यावी, अशी मागणी अनेकजणांनी व्टिटर आणि इतर समाज माध्यमांच्याव्दारे मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेवून टपाल विभागाच्या स्पीडपोस्ट सेवेच्या माध्यमातून जीवनावश्यक औषधांचा पुरवठा करण्यास प्रारंभ केला आहे. यामुळे गरजेच्या गोष्टी पोहोचवण्यासाठी अगदी दुर्गम ठिकाणीही टपाल खाते सेवा देवू शकते, याची काही ठळक उदाहरणे इथं मुद्दाम देण्यात येत आहेत. सुनील जोशी यांचे पिता एम.पी. जोशी हे भारतीय लष्करामध्ये कार्यरत आहेत. सध्या त्यांचे पोस्टिंग उत्तराखंडमधल्या गौचर या अतिदुर्गम भागात आहे. सुशील जोशी यांनी आपल्या वडिलांसाठी जीवनावश्यक औषधे स्पीडपोस्टच्या माध्यमातून पाठवली. तर मायलॅब कोविड चाचणी संचाची मागणी दि. 13 एप्रिल, 2020 रोजी रात्री 11 वाजता   नोंदवली होती. पुण्यातून हा संच गुजरातमधल्या अंकलेश्वर इथं दुस-या दिवशी सकाळी म्हणजे 14 एप्रिल, रोजी पोहोचवण्यात आला. त्याचप्रमाणे लखनौ इथल्या उत्तर प्रदेश वैद्यकीय पुरवठा महामंडळाने चेन्नईच्या कंपनीकडे 40 डीफायब्रिलेटर्सची मागणी नोंदवली होती. ही वैद्यकीय उपकरणे चेन्नईवरून अवघ्या 36 तासात पोहोचवण्यात आली. तर पुद्दूचेरीवरून ओडिशा आणि गुजरातच्या विविध भागात व्हँटिलेटर्स पोहोचवण्यात आली. याशिवाय कोलकाता ते रांची, सिलिगुडी या भागात रस्ते वाहतुकीव्दारे अनेक टन वैद्यकीय साहित्य पोहोचवण्या आले.

दारी येवून आर्थिक सेवा

टपाल विभागाच्यावतीने अगदी जनतेच्या दारात येवून बँकांचे खाते उघडणे, खात्यातले पैसे काढून ते पोहोचते करणे या सेवा देण्यात येत आहेत. यासाठी गरीब लोक आधारशी संलग्न पेमेंट सिस्टिमचा वापर करीत आहेत. याची मदत थेट लाभ हस्तांतरणामुळे लोकांच्या खात्यामध्ये जमा झालेले पैसे काढण्यासाठी होत आहे. यामुळे लोकांना वेगवेगळ्या निवृत्ती वेतन योजनेचे, मनरेगा अंतर्गत जमा झालेले पैसे काढणे शक्य होत आहे. त्याचबरोबर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत ज्यांना मदत देवू केली आहे, त्यांना बँकेत न जाताही टपाल कर्मचारी रोख रक्कम घरपोच देत आहेत. दि. 13 एप्रिल,2020 रोजी टपाल खात्याने लोकांपर्यंत पैसे पोहोचवण्याचा विक्रम केला. यादिवशी 1.09 लाख व्यवहार झाले, त्यामधून सुमारे 22.82 कोटी रुपये लोकांपर्यंत पोहोचले.

टपाल खात्याने सध्याच्या संकटस्थितीमध्ये केलेल्या उत्तम कामगिरीची आणखी काही उदाहरणे आहेत. शिलाँग इथल्या जवाहरलाल नेहरू क्रीडांगणावर खाते उघडण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये परिसरातल्या गावातले आणि डोंगराळ प्रदेशातले स्थलांतरित कामगार सहभागी झाले होते. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने या सर्वांची खाती उघडण्यात आली. हे काम सामाजिक अंतराचे नियम पाळून आणि सर्वांनी सुरक्षित मास्क लावून पार पाडले. आता इथल्या स्थलांतरित कामगारांना केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळू शकणार आहे. टपाल विभागाच्यावतीने जम्मू, काश्मिर, लेह, गुजरात, तेलंगणा, कर्नाटक, झारखंड, बिहार आणि मध्य प्रदेश या राज्यातल्या आदिवासी भागातल्या विधवा, दिव्यांग आणि वयोवृद्ध लोकांना त्यांचे निवृत्तीवेतन त्यांच्या दारापाशी जावून पोहोचवण्यात येत आहे.

 

  

B.Gokhale/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1615847) Visitor Counter : 204