PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र


1,06,719 विलगीकरण खाटा आणि 12,024 ICU खाटा असलेली 602 समर्पित  कोविड हॉस्पिटल्स राज्यांच्या समन्वयाने तयार करण्यात आली आहेत: आरोग्य मंत्रालय

Posted On: 14 APR 2020 7:45PM by PIB Mumbai

 

Delhi-Mumbai, April 14, 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लॉकडाऊनचा कालावधी 3 मे 2020 पर्यंत वाढवण्याची घोषणा केली. आधीचा 21 दिवसांचा लॉकडाऊन आज म्हणजेच 14 एप्रिल 2020 ला संपणार होता. यावेळी कोरोनाशी लढा देण्यासाठी पंतप्रधानांनी जनतेला सात गोष्टींचे  पालन करण्यास सांगितले.  

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधानांचे मनापासून आभार व्यक्त करत म्हंटले की, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड-19 चा प्रसार थांबवण्यासाठी आणि त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढविण्याचा हा निर्णय देशवासियांच्या आयुष्याचे संरक्षण करण्यासाठी घेतला आहे.

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवर पत्रकार परिषद 

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव श्री लव अगरवाल, गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्या श्रीमती पुण्य सलिला श्रीवास्तव आणि ICMR चे प्रवक्ते श्री रमन गंगाखेडकर तसेच वित्त मंत्रालयाचे प्रवक्ते यांनी आज पत्रकार परिषदेत खालील माहिती दिली.

  • केंद्रीय गृहमंत्रालय सर्व जीवनावश्यक वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर देखरेख ठेवून आहे. तसेच, हेल्पलाईन च्या मदतीने सर्व समस्या आणि तक्रारींचे निराकरण केले जात आहे. आतापर्यंत राज्यांच्या मदतीने ह्या हेल्पलाईन च्या माध्यमातून 5000 तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.
  • श्रम मंत्रालयाने कामगारांच्या वेतन संबंधित तक्रारींचे निवारण करण्यासाठी 20 नियंत्रण कक्ष/ तक्रार निवारण कक्ष स्थापन केले आहेत. हेल्पलाईन विषयीची माहिती मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची अंमलबजावणी तातडीने होत असून त्यावर उच्च स्तरावरून देखरेख ठेवली जात आहे. कालपर्यंत 32 कोटी गरीबांना या पॅकेज अंतर्गत थेट रोख रु. 29,352  कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे.- वित्त मंत्रालय
  • प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत 5.29 कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्न किंवा शिधा देण्यात आला आहे. 3,985 मेट्रिक टन डाळी विविध राज्ये/ केंद्रशासित प्रदेशात वाटपासाठी पाठवण्यात आल्या आहेत.- वित्त मंत्रालय
  • आतापर्यंत 97 लाखांपेक्षा अधिक मोफत उज्ज्वला गस सिलेंडर वितरित करण्यात आले आहेत. EPFO च्या 2.1लाख सदस्यांनी ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या खात्यातून ना परतावा आगाऊ स्वरूपात 510 कोटी रुपये रक्कम काढली आहे.पीएम किसान योजनेचा पहिला हप्ता म्हणून 7.47 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 14,946 कोटी रुपये रक्कम जमा करण्यात आली आहे.
  • कालपर्यंत 2,31,902 नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. 21,635 चाचण्या काल करण्यात आल्या. आयसीएमआर अंतर्गत 166 प्रयोगशाळा आणि 70 खाजगी प्रयोगशाळांना मान्यता देण्यात आली आहे. – ICMR
  • आम्हाला RT-PCR कोविड-19 टेस्टिंग किट्सचा मागवण्यात आलेला अतिरिक्त साठा मिळाला आहे ,याची भर पडल्यामुळे चाचण्यांच्या गरजांची बराच काळ पूर्तता होत राहील - ICMR  
  • या व्यतिरिक्त आम्ही 33 लाख RT-PCR टेस्टिंग किट्सची मागणी नोंदवली आहे, तसेच 37 लाख जलद टेस्टिंग किट्सचा साठा देखील लवकरच दाखल होण्याची अपेक्षा आहे- ICMR
  • लाईफलाईन उडान विमान सेवेअंतर्गत, 218 विमांनानी सुमारे 377.5 टन अत्यावश्यक वैद्यकीय मालवाहतूक देशाच्या दुर्गम भागात करण्यात आली आहे. विशेषतः ईशान्य भारत,बेटे असलेले केंद्रशासित प्रदेश इथे माल पाठवण्यावर भर देण्यात आला आहे.
  • भारतीय टपाल खात्याने भारतीय औषध निर्माण संस्था, आरोग्य सेवांचे महासंचालक आणि ऑनलाईन औषध कंपन्यांशी समन्वय साधून रुग्णालये आणि वैयक्तिक ग्राहकांच्या घरांपर्यंत औषधांचा पुरवठा सुरु केला आहे. आंतरराज्यीय आणि राज्यांतर्गत मेल सेवेच्या माध्यमातून हा पुरवठा होत आहे.
  • बँक आणि बँक सखीसाठी व्यवसाय प्रतिनिधी म्हणून स्वयंसहायता गटाच्या महिला अत्यंत महत्वाची कामगिरी बजावत आहेत. महिलांची PMJDY खाती तसेच PM किसान योजनेची खाती असलेल्या लोकांना, तसेच मनरेगा चे वेतन खातेदारांना बँकेत न जाता मिळेल याची व्यवस्था या महिला करत आहेत.
  • पंतप्रधानांच्या प्रमुख वैज्ञानिक सल्लागारांनी मुंबईतल्या धारावीसारख्या दाटीवाटीची वस्ती असलेल्या भागांमध्ये कोविड-19 चा फैलाव रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. सार्वजनिक शौचालये आणि स्नान आणि स्वच्छतागृहांसाठी कमी खर्चात होणाऱ्या स्वच्छता विषयक उपाययोजना त्यात सुचवल्या आहेत. – आरोग्य मंत्रालय
  • आतापर्यंत 1,036 रुग्ण कोरोना आजारातून बरे झाले आहेत, 179 रुग्ण काल या आजरातून बरे झाले. आतापर्यंत 10, 363 लोकांना या आजाराचा संसर्ग झाला आहे, काल 1211 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. आतापर्यंत 339 जणांचा मृत्यू झाला असून काल 31 जणांचा मृत्यू झाला.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला उद्देशून केलेल्या भाषणात सांगितले की  आपल्या जनतेने आतापर्यंत दाखवलेले एकजुटीचे सामर्थ्य ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खऱ्या अर्थाने वाहिलेली आदरांजली आहे.
  • ज्या भागांनी परिस्थितीची हाताळणी अतिशय चांगल्या प्रकारे केली आहे त्या भागांमध्ये 20 एप्रिलपासून निवडक कामकाजाला परवानगी देण्यात येईल. या संदर्भातील सविस्तर मार्गदर्शक तत्वे भारत सरकारकडून उद्या जारी करण्यात येतील.
  • देशात औषधे, अन्नधान्य आणि इतर महत्वाच्या वस्तूंचा पुरेसा साठा राहील, यासाठी केंद्र सरकारतर्फे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली.
  • कोविड19 शी लढा देण्यासाठी सात नियमांचे पालन करावे असे आवाहन पंतप्रधानांनी देशाला केले आहे.
  • 1,06,719 विलगीकरण खाटा आणि 12,024 ICU खाटा असलेली 602 समर्पित  कोविड हॉस्पिटल्स राज्यांच्या समन्वयाने तयार करण्यात आली आहेत. या संख्येत सातत्याने वाढ करण्यात येत आहे.- संयुक्त सचिवांची माहिती
  • नवी दिल्लीत एम्स येथे समर्पित कोविड रुग्णालयाची उभारणी कशी करण्यात आली आहे, याची माहिती, आरोग्य मंत्रालयाने दिली. या रुग्णालयात सुमारे 270 अलगीकरण बेड्स आहेत आणि 150 पेक्षा जास्त अतिदक्षता बेड्स आहेत.
  • जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, काल जगभरात, 76,498 पॉझिटिव्ह रुग्ण आणि 5,702 मृत्यू झाले. आपल्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे, भारतात गेल्या 24 तासांत केवळ 1,211 पॉझिटिव्ह रुग्ण आणि 31 मृत्यूंची नोंद झाली.
  • वृद्धत्व आणि आधीपासून असलेले गंभीर आजार हे जोखीमकारक दोन प्रमुख घटक आहेत, असे आम्हाला आढळले आहे; तरुणांना देखील संसर्ग होत असला तरी त्यांच्यात बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे- भारतातील कोविड-19 प्रकरणांच्या  लोकसंख्या वैशिष्ट्यांच्या संबंधाबाबत प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला आरोग्य मंत्रालयाचे उत्तर दिले.
  • ज्यांना कोरोनाची लक्षणे जाणवत आहेत, त्यांनी केंद्र/राज्य सरकारांच्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा किंवा आशा या प्रत्यक्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना विचारावे; अशावेळी काय करायचं याचे शिक्षण कार्यकर्त्यांना देण्यात आले आहे जेणेकरुन ते लवकर निदान होण्यासाठी व रुग्णालयात योग्य उपचार मिळण्यासाठी लोकांना मदत करु शकतील.
  • आम्ही आमच्या नमुना निकषांच्या आधारावर कोविड19 च्या चाचण्या करत आहोत; निकषविहिन चाचण्या केल्यास चाचण्या किट्सचा संपूर्ण वापर होणार नाही. त्याशिवाय, आपण हळूहळू आपल्या चाचण्यांचे क्षेत्र वाढवत आहोत, ज्यांना SARI किंवा फ्लू सारखे आजार आहेत, त्यांच्याही चाचण्या आम्ही करत आहोत.
  • पूर्वतयारीनिशी कृती करण्याचा आमचा प्रयत्न आहे, कोविड-19 सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून जाहीर होण्याच्या 12-13 दिवस आधीच आम्ही  तपासण्या सुरू केल्या होत्या. आम्ही आधीपासून केलेल्या उपाययोजनांमुळे आम्ही कशा प्रकारे कोविड-19 व्यवस्थापन करू शकलो आहोत ते दिसून येत आहे.

वरील पत्रकार परिषदेचे @PIBMumbai ने केलेले लाइव ट्वीट पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Other updates:

 

 

महाराष्ट्र अपडेट्स

121 नव्या केसेस सहित महाराष्ट्रातील रुग्ण संख्या 2,455 झाली. यात 92 मुंबई, 13 नवी मुंबई, 10 ठाणे, 5 वसई-विरार व एकजण रायगड येथील आहे.  

***

 

DJM/RT/MC/SP/PK


(Release ID: 1614478) Visitor Counter : 426