• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
रेल्वे मंत्रालय

देशभरात 1 जून 2020 पासून 200 विशेष गाड्या धावणार


1 जूनपासून सुरू होणार्‍या 200 गाड्यांमधून पहिल्याच दिवशी 1.45 लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतील

01 ते 30 जून 2020 पर्यंतच्या आगाऊ आरक्षण कालावधीसाठी सुमारे 26 लाख प्रवाशांनी केले आरक्षण

या सेवा श्रमिक विशेष गाड्यांव्यतिरिक्त आणि 12 मेपासून चालविल्या जाणाऱ्या 30 विशेष वातानुकूलित गाड्यांव्यतिरिक्त असतील

प्रवाशांनी स्थानकावर नियोजित वेळेआधी 90 मिनिटे पोहोचायचे आहे; पुष्टी केलेल्या / आरएसी तिकिट असलेल्या प्रवाशांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश करण्याची आणि गाडीत चढण्याची परवानगी

गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गाडीत चढण्यापूर्वी स्क्रिनिंग करणे बंधनकारक आहे आणि फक्त रोगाची लक्षणे नसलेल्या प्रवाशांनाच गाडीत प्रवेश करण्याची परवानगी

Posted On: 31 MAY 2020 9:26PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 मे 2020

 

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि गृह मंत्रालय यांच्याशी सल्लामसलत करून रेल्वे मंत्रालयाने 01 जून 2020 पासून भारतीय रेल्वेची रेल्वे सेवा अंशतः सुरु करण्याची घोषणा केली आहे. 1 जूनपासून सुरू होणार्‍या 200 गाड्यांमधून पहिल्याच दिवशी 1.45 लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतील. 1 जून 2020 पासून खाली जोडलेल्या परिपत्रकानुसार भारतीय रेल्वे उद्या (म्हणजे 1 जून 2020) 200 प्रवासी गाड्या सुरु करणार आहे. (लिंक खाली दिली आहे.)

प्रवासी रेल्वेसेवा श्रेणीबद्ध पद्धतीने पुन्हा सुरु करण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल म्हणून भारतीय रेल्वे उद्या 200 गाड्या सुरु करेल ज्या 01 मे पासून सुरु केलेल्या श्रमिक विशेष गाड्यांव्यतिरिक्त आणि 12 मेपासून चालविल्या जाणाऱ्या 30 विशेष वातानुकूलित गाड्यांव्यतिरिक्त असतील.

या गाड्या नियमित गाड्यांच्या धर्तीवर आहेत. वातानुकूलित आणि बिगर वातानुकूलित अशा दोन्ही वर्गातील पूर्णपणे आरक्षित गाड्या आहेत. सामान्य डब्यात बसण्यासाठीही आरक्षित जागा असेल. गाडीमध्ये कोणताही डबा अनारक्षित राहणार नाही.

सर्वसाधारण डब्यातील आरक्षणानुसार तिकीट दर आकारला जाईल आणि आरक्षित असलेल्या सामान्य वर्गातील डब्यांसाठी (जनरल सिटिंग) आरक्षित ठेवण्यात आलेले असेल तर आरक्षित गाड्यांसाठी द्वितीय श्रेणीच्या आसनाचे (2 एसी) भाडे आकारले जाईल व सर्व प्रवाशांना आसनव्यवस्था दिली जाईल.

आज सकाळी 9.00 वाजता एकूण प्रवासी आरक्षण 25,82,671 होते. या गाड्यांच्या तिकिटांचे आरक्षण आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून किंवा मोबाइल अॅपद्वारे ऑनलाईन केले जात आहे. भारतीय रेल्वेने  22 मे 2020 पासून आरक्षण खिडकी, कॉमन सर्व्हिस सेंटर आणि तिकीट एजंट्स यांच्यामार्फत आरक्षण तिकिट बुकिंगला परवानगी दिली आहे.

पूर्वी सांगितल्याप्रमाणे, भारतीय रेल्वेने 12.05.2020 पासून सुरु केलेल्या 30 विशेष राजधानी प्रकारच्या गाड्या आणि 01.06.2020 पासून सुरु होणाऱ्या  200 विशेष मेल एक्स्प्रेस गाड्यांसाठीच्या (एकूण 230 गाड्या) सूचना सुधारित केल्या आहेत. या सर्व 230 विशेष गाड्यांसाठीचा आगाऊ आरक्षण कालावधी 30 दिवसांवरून वाढवून 120 दिवस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वरील बदलांची अंमलबजावणी 31 मे 2020 रोजी सकाळी 08:00 वाजता झालेल्या रेल्वे आरक्षणापासून झाली आहे. इतर अटी उदा. सध्याचे आरक्षण, रस्त्याच्या कडेला असलेल्या स्थानकांवर तात्काळ आरक्षण वाटप इत्यादी नियमित वेळापत्रकानुसार धावणाऱ्या गाड्यांप्रमाणेच असेल. 30 जून 2020 आणि त्यानंतरच्या तारखेसाठी तात्काळ आरक्षण 29 जून 2020 पासून करता येईल. या सूचना रहदारी वाणिज्य संचालनालयाच्या प्रमुख व्यावसायिक परिपत्रकांखाली भारतीय रेल्वेच्या www.indianrailways.gov.in या संकेतस्थळावर देखील पाहिल्या जाऊ शकतात.

गाड्यांमध्ये चढणाऱ्या प्रवाशांची यादी आणि अनुमती पत्रक:

  1. विद्यमान नियमांनुसार आरएसी आणि प्रतीक्षा यादी तयार केली जाईल.
  2. कोणतीही विना आरक्षित (यूटीएस) तिकिटे दिली जाणार नाहीत आणि कोणत्याही प्रवाशाला गाडीत चढल्यावर प्रवासादरम्यान तिकिट दिले जाणार नाही. 
  3. पूर्ण पुष्टी झालेल्या आणि आरएसीच्या प्रवाशांसह अंशतः प्रतीक्षा यादीतील तिकिट धारकांना  (जर एकल पीएनआरमध्ये पुष्टी झाली असेल तर आणि प्रतीक्षा यादीतील प्रवासी दोन्हीही) परवानगी दिली आहे.
  4. प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना परवानगी नसेल.
  5. 30 जून 2020 आणि त्यानंतरच्या तारखेसाठी तात्काळ तिकिट आरक्षण 29 जून 2020 पासून करता येईल.
  6. गाडी सुटण्याच्या नियोजित वेळेआधी कमीतकमी 4 तास पहिला प्रवासी तक्ता तयार केला जाईल व दुसरा तक्ता गाडी सुटण्यापूर्वी किमान 2 तास अगोदर (सध्याच्या 30 मिनिटांऐवजी) तयार केला जाईल.
  7. गाडीत चढण्यापूर्वी सर्व प्रवाशांचे स्क्रिनिंग होईल आणि फक्त रोगाची लक्षणे नसलेल्या प्रवाशांनाच गाडीत प्रवेश करण्याची परवानगी दिली जाईल.
  8. या विशेष सेवांनी प्रवास करणारे प्रवासी खालील खबरदारीचे पालन करतीलः
    1. गाडीत चढताना आणि प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांनी चेहऱ्यावर मास्क घातला पाहिजे.
    2. स्थानकावर थर्मल स्क्रिनिंग सुलभ करण्यासाठी प्रवासी कमीतकमी 90 मिनिटे आधी स्थानकावर पोहोचेल. रोगाची लक्षणे न आढळणाऱ्या प्रवाशांनाच केवळ प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल.
    3. प्रवाशांनी सुरक्षित अंतर नियमांचे पालन केले पाहिजे.
    4. त्यांच्या गंतव्यस्थानावर आगमन झाल्यानंतर प्रवाशांना तेथील राज्य / केंद्रशासित प्रदेशांनी सूचित केलेल्या आरोग्यविषयक नियमावलीचे पालन करावे लागेल.

तिकीट रद्द करणे आणि परतावा नियमः रेल्वे प्रवासी (तिकीट रद्द करणे आणि भाडे परत देणे) नियम 2015 लागू असेल. याव्यतिरिक्त, खूप ताप किंवा कोविड-19 च्या लक्षणांमुळे प्रवाशाला प्रवास करण्यास मनाई केल्यास भाड्याचा परतावा लागू असेल.

तपासणी दरम्यान एखाद्या प्रवाशाला खूप ताप आणि कोविड -19 इत्यादी लक्षणे आढळल्यास तिकीटाची पुष्टी केलेली असूनसुद्धा त्याला प्रवास करण्यास परवानगी दिली जाणार नाही. अशा परिस्थितीत प्रवाशांना संपूर्ण परतावा खालीलप्रमाणे दिला जाईल: -

  1. प्रवासी नाव आरक्षणावर (पीएनआरवर) एकल प्रवासी असल्यास.
  2. तिकिटावर जर एखादा प्रवासी प्रवास करण्यास अयोग्य आढळला असेल आणि त्याच पीएनआरवरील इतर सर्व प्रवाशांना त्यावेळी प्रवास करण्याची इच्छा नसेल तर सर्व प्रवाशांना संपूर्ण परतावा देण्यात येईल.   
  3. तिकिटावर जर एखादा प्रवासी प्रवास करण्यास अयोग्य वाटला असेल आणि पीएनआरवरील इतर प्रवाशांना त्या प्रवासाची इच्छा असेल तर प्रवासाची परवानगी नसलेल्या प्रवाशाला संपूर्ण परतावा देण्यात येईल.

वरील सर्व प्रकरणांसाठी, प्रचलित प्रथेनुसार टीटीई प्रमाणपत्र प्रवाशाला प्रवेशद्वारात/ तपासणी ठिकाणी/ स्क्रीनिंगच्या ठिकाणी दिले जाईल ज्यात “एक किंवा त्यापेक्षा जास्त प्रवाश्यांमध्ये कोविड 19 च्या लक्षणांमुळे प्रवास करत नसलेल्या प्रवाशांची संख्या” असा उल्लेख केलेला असेल.

टीटीई प्रमाणपत्र मिळाल्यानंतर प्रवास न केलेल्या प्रवाशांच्या परताव्यासाठी प्रवासाच्या तारखेपासून 10 दिवसांच्या आत ऑनलाईन टीडीआर दाखल करावा लागेल.

भोजन व्यवस्था:- भाड्यात कोणतेही भोजन शुल्क समाविष्ट केले जाणार नाही. जेवण मागविण्याची आगाऊ आरक्षण तरतूद, ई-भोजन सेवा हे उपलब्ध नसेल. तथापि, ज्या गाड्यांमध्ये भोजनाची व्यवस्था असलेला डबा जोडलेला आहे त्या मर्यादित गाड्यांमध्येच पैसे आकारून आयआरसीटीसी मर्यादित खाण्याच्या वस्तू आणि सीलबंद पाण्याच्या बाटल्या उपलब्ध करून देईल. या संदर्भातील माहिती तिकिट आरक्षणाच्या वेळी प्रवाशांना उपलब्ध करुन देण्यात येईल. प्रवाशांना त्यांचे स्वतःचे खाद्यपदार्थ आणि प्यायचे पाणी नेण्यास प्रोत्साहन देण्यात येईल. रेल्वे स्थानकांवरील सर्व स्थिर खाद्यपदार्थांचे स्टॉल व व्हेंडिंग युनिट्स (बहुउद्देशीय स्टॉल्स, पुस्तकांचे स्टॉल्स, औषधांचे स्टॉल्स इत्यादी) खुले राहतील. फूड प्लाझा आणि विश्रामगृहात शिजवलेले पदार्थ बसून खाता  येणार नाहीत फक्त पार्सल घेता येईल.

अंथरूण- पांघरूण

गाडीमध्ये अंथरूण- पांघरूण, पडदे दिले जाणार नाहीत. प्रवाशांना प्रवासासाठी स्वतःचे पांघरूण  घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या उद्देशाने वातानुकूलित डब्यातील तापमान योग्य प्रकारे नियमित केले जाईल.

प्रवाशांना समोरासमोर यावे लागू नये म्हणून रेल्वे स्थानकांवर शक्य तितक्या वेगवेगळ्या प्रवेश आणि गंतव्य द्वाराची सोय करण्याच्या सूचना विभागीय रेल्वेला देण्यात आल्या आहेत. रेल्वे स्थानकांवर आणि रेल्वेत पाळावयाचे सुरक्षित शारीरिक अंतराचे नियम विभागीय रेल्वेला कळविले जातील आणि सुरक्षा, आणि स्वच्छता नियमांचे पालन केले जाईल.

सर्व प्रवाशांनी आरोग्य सेतू अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करुन वापरणे आवश्यक आहे. प्रवाशांना कमी वजनाच्या सामानासह प्रवास करण्याचा सल्ला दिला आहे.

 

जोडपत्राची लिंक:


* * *

S.Thakur/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com



(Release ID: 1628219) Visitor Counter : 267


Link mygov.in