• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मुंबईत घाटकोपर येथील नौदल विलगीकरण शिबिरातून 44 जण घरी परतले

Posted On: 13 APR 2020 3:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 एप्रिल 2020

 

मुंबईत घाटकोपर, येथील मटेरियल ऑर्गनायझेशन येथे भारतीय नौदलाच्या विलगीकरण सुविधेने इराणमधून आलेल्या 44 प्रवाशांना (24 महिलांसह) विलगीकरण कक्षात ठेवण्याचे काम शांततेत आणि यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. एकूण 44 जणांनी 13 मार्च 20 पासून इथल्या सुविधेत 30 दिवस व्यतीत केले. 28 मार्च रोजी यातील प्रत्येकाची कोविड -19 चाचणी करण्यात आली आणि त्यात या सर्वांंना कोरोनाची बाधा झाली नसल्याचे निष्पन्न झाले.

नौदलाच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या समर्पित पथकाने या प्रवाशांच्या आरोग्यावर देखरेख ठेवण्यासाठी अथक परिश्रम घेतले. विलगीकरण सुविधेतील स्वच्छता,त्यांची सोय आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी संरक्षक कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने त्यांना मदत केली. त्यांच्यासाठी बनवण्यात आलेले जेवण कडक  देखरेखीखाली तयार करण्यात आले होते आणि कोणत्याही विशेष गरजा पूर्ण करण्यासाठी सज्ज होते.

विलगीकरण सुविधेमध्ये ठेवण्यात आलेल्या या प्रवाशांचा वेळ जावा तसेच त्यांच्या सोयीसाठी वाचनालय, टीव्ही रूम, इनडोअर गेम्स, एक छोटी व्यायामशाळा आणि मर्यादित क्रिकेट साहित्य इत्यादींची सोय करण्यात आली होती.

देशव्यापी लॉकडाऊनमध्ये मर्यादित दुकाने उपलब्ध असल्यामुळे अतिरिक्त आव्हाने निर्माण झाली होती, मात्र त्यावर नाविन्यपूर्ण कल्पनेने मात करण्यात आली. तसेच या प्रवाशांना  श्रीनगर आणि लडाख येथील त्यांच्या घरी जाण्याचे कोणतेही साधन नसल्यामुळे त्यांचा मुक्काम वाढवण्यात आला. भारतीय हवाई दलाच्या विमानांचा वापर करून त्यांना विमानातून नेण्याची व्यवस्था करण्यात आली आणि 12 एप्रिल 2020 रोजी C-130  विमानाने या व्यक्तींना श्रीनगरला परत पाठवण्यात आले. परतीच्या प्रवासासाठी प्रत्येक प्रवाशाला डब्यांमधून जेवण, नाष्टा आणि हाताने शिवलेले दोन मास्क एनडब्ल्यूडब्ल्यूए घाटकोपरच्या सौजन्याने देण्यात आले.  

कोविड-19 विरुद्ध लढ्यात राष्ट्रीय प्रयत्नांना मदत करण्यासाठी भारतीय नौदल वचनबद्ध आहे आणि देशातील सर्व नागरिकांना आणि नागरी प्रशासनाला सर्वतोपरी मदत करायला तयार आहे.

 

 

U.Ujgare/S.Kane/D.Rane


(Release ID: 1613922) Visitor Counter : 189


Link mygov.in
National Portal Of India
STQC Certificate