पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पश्चिम आशियातील अलीकडच्या घडामोडींसंदर्भात आंतर-मंत्रालयीन पत्रकार परिषद


डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड आधारित वितरणाचे प्रमाण सुमारे 96% पर्यंत वाढले असून, त्यामुळे गैरप्रकार आणि गळती रोखण्यात मोठी मदत

निसोस केरोस या मार्शल आयलंड्सच्या ध्वजाखालील कच्च्या तेलाच्या जहाजाने, भारतासाठी सुमारे 2,70,000 मेट्रिक टन कच्च्या तेलसाठा घेऊन होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षितपणे केली पार, हे जहाज 3 जून 2026 रोजी विशाखापट्टणम इथे पोहोचण्याची अपेक्षा

Posted On: 29 MAY 2026 7:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 मे 2026

पश्चिम अशियातील बदलत असलेल्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे अधिकारी  देशातील जनतेला नियमितपणे ताजी माहिती देत आहेत.

एलपीजी संबंधित अंमलबजावणीची कारवाई:

या अंतर्गत गेल्या चार दिवसांत देशभरात 6,500 हून अधिक छापे टाकण्यात आले. या कारवाईदरम्यान 380 हून अधिकसिलेंडर्स जप्त करण्यात आले. तसेच, 5 गुन्हे नोंदविण्यात आले असून 2 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.

पेट्रोल आणि डिझेल संदर्भातील अंमलबजावणी कारवाई:

या अंतर्गत गेल्या दोन दिवसांत देशभरात सुमारे 900 धाडी टाकण्यात आल्या. या कारवाईदरम्यान 417 लिटर पेट्रोल आणि 75,715 लिटर डिझेल जप्त करण्यात आले. तसेच, 12 गुन्हे नोंदविण्यात आले असून 15 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.

एलपीजी ची सद्यस्थिती:

घरगुती एलपीजी पुरवठा स्थिती :

एलपीजी वितरकांकडे गॅसचा तुटवडा झाल्याची कोणतीही घटना नोंदविण्यात आलेली नाही.

व्यावसायिक पातळीवरील ऑनलाइन एलपीजी सिलेंडर्स  बुकिंगचे प्रमाण काल सुमारे 99% पर्यंत वाढले.

डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (DAC) आधारित वितरणाचे प्रमाण सुमारे 96% पर्यंत वाढले असून, यामुळे वितरणातील गैरवापर आणि गळती रोखण्यास मदत झाली आहे. हा कोड, ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठविला जातो.

गेल्या चार दिवसांत सुमारे 1.78 कोटी सिलेंडर्स बुकिंगच्या तुलनेत जवळपास 1.80 कोटी एलपीजी सिलेंडर्स वितरित करण्यात आले आहेत.

नैसर्गिक वायू पुरवठा आणि पीएनजी विस्तार उपक्रम

·केंद्र सरकारच्या 25 मे 2026 रोजीच्या राजपत्रित अधिसूचनेनुसार, ज्या एलपीजी ग्राहकांकडे पाइप्ड नॅचरल गॅस जोडणी देखील आहे, त्यांच्यासाठी पुढील पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत :

ग्राहक पीएनजी जोडणी मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत एलपीजी जोडणी बंद करण्यासाठी अर्ज करू शकतात; किंवा

भविष्यात ज्या भागात पीएनजी सुविधा उपलब्ध नाही, त्या ठिकाणी एलपीजी जोडणी पुन्हा सुरू करण्यासाठी ग्राहक ट्रान्सफर व्हाउचर मिळवू शकतात.

मार्च 2026 पासून सुमारे 8.3 लाख पीएनजी जोडण्यांना गॅसपुरवठा सुरू करण्यात आला असून, अतिरिक्त 2.91 लाख जोडण्यांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात आली आहे. अशा प्रकारे एकूण पीएनजी जोडण्यांची संख्या 11.21 लाखांपर्यंत पोहोचली आहे. तसेच, सुमारे 8.53 लाख ग्राहकांनी नवीन पीएनजी जोडण्यांसाठी नोंदणी केली आहे.

28 मे 2026 पर्यंत सुमारे 60,400 पीएनजी ग्राहकांनी MYPNGD.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून त्यांच्या एलपीजी जोडण्या स्वेच्छेने बंद केल्या आहेत.

किरकोळ इंधनाची उपलब्धता आणि किमतींबाबतचे उपाय

काही भागांतील किरकोळ विक्री केंद्रांवर (पेट्रोल पंपांवर) अपवादात्मकरीत्या जास्त विक्री आणि मोठी गर्दी दिसून आली आहे. मात्र, देशातील सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली.

150 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत 30% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.

खाजगी तेल विपणन कंपन्यांच्या विक्रीत (-38%) आणि सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांच्या घाऊक विक्रीत (-29%) घट झाली आहे. हा सगळा भाग आता सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांच्या किरकोळ विक्री केंद्रांकडे वळला आहे.

जीवनावश्यक वस्तू कायदा आणि त्याअंतर्गत जारी केलेल्या नियंत्रण आदेशांच्या संबंधित तरतुदींनुसार, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना विशेष पथके स्थापन करून, किरकोळ ग्राहकांसाठी असलेला पुरवठा मोठ्या प्रमाणात खरेदी करणारे आणि साठेबाज यांच्याकडून होणारे गैरप्रकार, काळाबाजार, अनधिकृत साठा आणि पेट्रोलियम उत्पादनांचा गैरवापर यांवर पर्यावरण संवर्धन कायद्याच्या संबंधित तरतुदी आणि त्याअंतर्गत जारी केलेल्या नियंत्रण आदेशांनुसार कारवाई करण्याची विनंती करण्यात आली आहे.

सागरी सुरक्षा आणि जहाज वाहतूक ऑपरेशन्स

जहाजाबाबत अद्ययावत माहिती: 'निसोस केरोस' हे मार्शल आयलंडचा ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज (क्रूड ऑइल टँकर), एचपीसीएलच्या करारांतर्गत भारतासाठी अंदाजे 2,70,000 मेट्रिक टन कच्च्या तेलाचा माल घेऊन येत आहे. या जहाजावर 25 परदेशी क्रू सदस्य असून एकही भारतीय खलाशी नाही. या जहाजाने 25/26 मे 2026 रोजी हॉरमुझची सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार केली असून ते 3 जून 2026 रोजी विशाखापट्टणम येथे पोहोचण्याची शक्यता आहे.

या क्षेत्रातील सर्व भारतीय खलाशी सुरक्षित आहेत आणि गेल्या 96 तासांत भारतीय ध्वज असलेली जहाजे किंवा भारतीय क्रू असलेली परदेशी जहाजे यांच्याशी संबंधित कोणत्याही घटनेची नोंद झालेली नाही.

डीजी शिपिंग नियंत्रण कक्षाने कार्यान्वित झाल्यापासून 10,841 फोन कॉल आणि 24,098 पेक्षा जास्त ईमेल हाताळले आहेत. गेल्या 96 तासांत खलाशी, त्यांचे कुटुंबीय आणि सागरी क्षेत्रातील संबंधितांकडून एकूण 509 फोन कॉल आणि 1,332 ईमेल प्राप्त झाले आहेत.

मंत्रालयाने, नौवहन महासंचालनालयाच्या माध्यमातून आतापर्यंत 3,422 पेक्षा जास्त भारतीय खलाश्यांच्या सुरक्षित मायदेशी परतण्यासाठी मदत केली आहे, ज्यामध्ये गेल्या 96 तासांत आखाती देशांतील विविध ठिकाणांहून परत आणलेल्या 47 खलाश्यांचा समावेश आहे.

संपूर्ण भारतातील बंदरांचे कामकाज सुरळीत सुरू असून कुठेही गर्दी किंवा कोंडी झाल्याची नोंद नाही.

या क्षेत्रातील भारतीय नागरिकांची सुरक्षा

परराष्ट्र मंत्रालय आखाती आणि पश्चिम आशिया क्षेत्रातील घडामोडींवर सतत लक्ष ठेवून आहे, तसेच या क्षेत्रातील भारतीय समुदायाची सुरक्षा, संरक्षण आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. 

स्थानिक सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांची माहिती, विमान आणि प्रवासाची स्थिती, कॉन्सुलर सेवा आणि समुदायासाठी हाती घेण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी उपाययोजनांचा समावेश असलेल्या ट्रॅव्हल ॲडव्हायझरी (प्रवास मार्गदर्शिका) जारी केल्या जात आहेत.

भारतीय दूतावास तेथील रहिवासी भारतीय समुदायाशी सक्रियपणे संपर्कात आहेत.

सरकार या क्षेत्रातील भारतीय खलाशांच्या कल्याणाला उच्च प्राधान्य देत आहे. भारतीय दूतावास त्यांना स्थानिक अधिकारी आणि संस्थांशी समन्वय साधणे, कॉन्सुलर मदत देणे आणि भारतात परतण्याच्या संदर्भात  मदत करणे यासह सर्व सहकार्य करत आहेत.

या क्षेत्रातील एकूण विमान प्रवासाच्या परिस्थितीत सुधारणा होत असून, या भागातून भारतातील विविध ठिकाणांसाठी अतिरिक्त विमाने चालवली जात आहेत.

संयुक्त अरब अमिरातीची हवाई हद्द खुली आहे. भारतीय आणि संयुक्त अरब अमिरातीच्या विमान कंपन्या भारतातील विविध शहरांसाठी विमाने चालवत आहेत.

सौदी अरेबिया आणि ओमानमधील विविध विमानतळांवरून भारतातील विविध ठिकाणांसाठी विमानांची उड्डाणे सुरू आहेत.

कतारची हवाई हद्द अंशतः खुली आहे. एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, इंडिगो आणि कतार एअरवेज कतारमधून भारतातील विविध शहरांसाठी विमाने चालवत आहेत.

कुवेतची हवाई हद्द खुली आहे. जझिरा एअरवेज आणि कुवेत एअरवेज कुवेत ते भारत दरम्यान विमाने चालवत आहेत. भारतीय विमान कंपन्या देखील लवकरच कुवेत ते भारत दरम्यान आपले कामकाज पुन्हा सुरू करतील अशी अपेक्षा आहे.

बहरीनची हवाई हद्द खुली आहे. एअर इंडिया एक्सप्रेस, इंडिगो आणि गल्फ एअर बहरीनमधून भारतातील विविध शहरांसाठी विमाने चालवत आहेत.

इराक हवाई हद्द क्षेत्रातून  इतर ठिकाणांसाठी मर्यादित विमानांची उड्डाणे सुरू आहेत, ज्यांचा वापर पुढे भारताच्या प्रवासासाठी केला जाऊ शकतो.

इराणची हवाई हद्द अंशतः खुली आहे. मंत्रालयाने भारतीय नागरिकांना इराणचा प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे आणि जे आधीच तिथे आहेत त्यांना भारतीय दूतावासाच्या मदतीने देश सोडण्याचे आवाहन केले आहे. आतापर्यंत, तेहरानमधील भारतीय दूतावासाने जमीन सीमा मार्गांद्वारे 2,557 भारतीय नागरिकांना इराणबाहेर सुरक्षितपणे काढण्यास मदत केली आहे.

इस्रायलची हवाई हद्द खुली असून या क्षेत्रातील इतर ठिकाणांसाठी मर्यादित विमान सेवा सुरु झाली आहे, ज्यांचा वापर पुढे भारताच्या प्रवासासाठी केला जाऊ शकतो.

 

सुषमा काणे/निलीमा चितळे/राधिका अघोर/नंदिनी मथुरे/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2266883) अभ्यागत कक्ष : 8