पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पश्चिम आशियातील अलीकडच्या घडामोडींबाबत आंतर-मंत्रालयीन पत्रकार परिषद


भारतीय तेल शुद्धीकरण प्रकल्प उच्च क्षमतेने कार्यरत

देशांतर्गत एलपीजी उत्पादनात 28% वाढ

पायाभूत सुविधा, आर्थिक सुविधा, ऊर्जा सुरक्षा देखरेख आणि जहाज सुरक्षा ऑपरेशन्समध्ये सरकारच्या समन्वित उपाययोजना

नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि एलपीजी सिलिंडरची अनावश्यक नोंदणी टाळावी

नागरिकांनी चुकीची माहिती आणि अफवांपासून सावध राहावे असे आवाहन

Posted On: 12 MAR 2026 10:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 मार्च 2026

पश्चिम आशियातील सध्याच्या अस्थिर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर,पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय माध्यमांना भारत सरकारने केलेल्या उपाययोजनांबाबत अद्ययावत माहिती दिली. या आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत इंधन पुरवठ्याची सध्याची परिस्थिती, अखंड ऊर्जा पुरवठा, सागरी सुरक्षा, परदेशातील भारतीय नागरिकांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारची तयारी, याबाबत माहिती देण्यात आली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी घाबरून सिलेंडरची अनावश्यक नोंदणी टाळावी तसेच बनावट कथा आणि अफवांवर विश्वास ठेवू नये.  

ऊर्जा पुरवठा आणि इंधन उपलब्धता:

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने आश्वासन दिले आहे की, अखंड ऊर्जा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, आणि दररोज 50 लाख सिलेंडर वितरित केले जात आहेत.

कच्चे तेल आणि तेल शुद्धीकरण प्रकल्प-

युद्धाचा हा 13 वा दिवस आहे आणि इतिहासात प्रथमच होर्मुझची सामुद्रधुनी व्यावसायिक वाहतुकीसाठी प्रभावीपणे बंद करण्यात आली आहे. 40 हून अधिक देशांमधून कच्चे तेल आणले जात असून, आपले 70% कच्चे तेल आता होर्मुझची सामुद्रधुनी वगळता अन्य मार्गांनी आणले जात आहे. त्याशिवाय, देशाचे तेल शुद्धीकरण प्रकल्प उच्च क्षमतेने कार्यरत असून, अनेक ठिकाणी 100 टक्क्यांपेक्षा जास्त क्षमतेने काम करत आहेत.

नैसर्गिक वायू-

या परिस्थितीचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी, पुरवठ्याला प्राधान्य देण्यासाठी सरकारने अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत 9 मार्च 2026 रोजी नैसर्गिक वायू नियंत्रण आदेश जारी केला.

एलपीजी पुरवठा-

· सध्या युद्धकालीन परिस्थिती आहे, भारत आपल्या वापराच्या सुमारे 60% एलपीजी आयात करतो आणि त्यापैकी सुमारे 90% होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येतो, हा मार्ग सध्या बंद आहे. जागतिक परिस्थिती आव्हानात्मक आहे. मागणी पुरवठा संतुलन राखण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत.

· तेल शुद्धीकरण प्रकल्पांद्वारे एलपीजीचे उत्पादन वाढवण्यात आले- 9 मार्च 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या एलपीजी नियंत्रण आदेशानुसार सर्व तेल शुद्धीकरण प्रकल्पांना एलपीजीचे उत्पादन अधिकाधिक वाढवण्याचे निर्देश देण्यात आले होते. रिफायनरी निर्देशांद्वारे गेल्या 5 दिवसांत एलपीजीचे उत्पादन 28 टक्क्यांनी वाढवण्यात आले असून, पुढील खरेदी सक्रियपणे सुरू आहे.

· आपले देशभरात 25000 हून अधिक वितरक आहेत. साठयाची परिस्थिती बारकाईने नोंदवली जात आहे. साठा संपल्याची कुठेही नोंद नाही. दररोज 50 लाखाहून अधिक सिलेंडर वितरित केले जात आहेत.भीतीमुळे बुकिंगमध्ये अनेक पट वाढ झाली आहे. जागतिक अनिश्चिततेच्या या काळात नागरिकांनी पॅनिक बुकिंग टाळावे, अधिकाऱ्यांना सहकार्य करावे आणि शक्य असेल तेव्हा इंधन वाचवावे, असे आम्ही आवाहन करतो.

· घरगुती नसलेल्या एलपीजीसाठी, रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांसारख्या आवश्यक क्षेत्रांना प्राधान्य दिले जात आहे. रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि इतर व्यावसायिक वापरकर्त्यांना करावयाच्या वाटपाचा आढावा घेण्यासाठी आयओसीएल, एचपीसीएल आणि बीपीसीएलच्या कार्यकारी संचालकांची तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. एका मोठ्या निर्णयाद्वारे राज्य सरकारांशी समन्वय साधून, ओएमसीजकडून ( तेल वितरण कंपन्या ) सरासरी मासिक व्यावसायिक एलपीजी गरजेच्या 20% वाटप आजपासून केले जाईल जेणेकरून कोणतीही साठेबाजी किंवा काळाबाजार होणार नाही.

· ओएमसी व्यावसायिक सिलिंडरच्या वितरणासाठी सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांशी संपर्क साधत आहेत. व्यावसायिक सिलिंडरच्या वितरणासाठी आज दिल्लीच्या मुख्य सचिवांशी चर्चा झाली आहे.

· एलपीजी आणि गॅस चॅनेलवरील दबाव कमी करण्यासाठी पर्यायी इंधन पर्याय सक्रिय केले जात आहेत. किरकोळ दुकाने आणि पीडीएस( सार्वजनिक वितरण सेवा) चॅनेलद्वारे केरोसीन उपलब्ध करून दिले जात आहे तसेच औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी इंधन तेल उपलब्ध करून दिले जात आहे.

·सागरी सुरक्षा आणि जहाज वाहतूक परिचालन

केंद्रीय बंदर, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाने नवीनतम अपडेट्स माध्यमांसोबत सामायिक केली. असे सांगण्यात आले की-

· पर्शियन आखाती प्रदेशात कार्यरत असलेल्या भारतीय ध्वजधारी जहाजांची संख्या 28 वर कायम आहे, त्यापैकी 24 जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या पश्चिमेला आहेत, ज्यावर 677 भारतीय खलाशी आहेत आणि 4 जहाजे सामुद्रधुनीच्या पूर्वेला आहेत ज्यात 101 भारतीय खलाशी आहेत. सर्व भारतीय जहाजे आणि कर्मचाऱ्यांवर त्यांच्या सुरक्षिततेसाठी सक्रियपणे लक्ष ठेवले जात आहे.

·सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि वैद्यकीय मदत देण्यासाठी अधिकारी, जहाज व्यवस्थापक आणि भरती संस्था भारतीय दूतावास आणि स्थानिक अधिकाऱ्यांशी निकट समन्वय साधत आहेत.

·संपूर्ण भारतातील एकूण बंदरांचे कामकाज स्थिर आहे.

·प्रमुख बंदरांना एलपीजी जहाजांसाठी प्राधान्याने बर्थ उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

·मंत्रालय आणि जहाज वाहतूक महासंचालनालय अशा दोन्ही ठिकाणी ( 28 फेब्रुवारी 2026) 24 तासांचा समर्पित नियंत्रण कक्ष कार्यरत आहे.

·परदेशी ध्वज असलेल्या जहाजांवर भारतीय कर्मचाऱ्यांशी संबंधित सागरी घटना घडल्या आहेत. या जहाजांवर 78 भारतीय खलाशी होते. त्यापैकी 70 जण सुखरूप बचावले असून 4 जण जखमी झाले परंतु त्यांची प्रकृती स्थिर आहे. दुर्दैवाने, 3 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 1 खलाशी बेपत्ता आहे.

·भारतीय खलाशांच्या सुरक्षिततेची आणि कल्याणाची खात्री करण्यासाठी तसेच भारताच्या सागरी हितांचे रक्षण करण्यासाठी सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे.

या प्रदेशातील भारतीय नागरिकांची सुरक्षा

परराष्ट्र मंत्रालयाने जीसीसी आणि इराणमधील भारतीयांच्या सुरक्षिततेबद्दल आणि कल्याणाबद्दल अद्ययावत माहिती उपलब्ध केली आहे. असे सांगण्यात आले की-

·आमचे मिशन भारतीय समुदायाच्या सदस्यांशी नियमित संपर्कात आहे आणि त्यांना व्यावसायिक उड्डाण पर्यायांची माहिती देण्याबाबत मदत करत आहे.

·आर्मेनिया आणि अझरबैजान मार्गे व्यावसायिक विमानांनी परत येऊ इच्छिणाऱ्या भारतीय नागरिकांना दूतावास मदत करत आहे. 

.सध्या सुरू असलेल्या या संघर्षात आपण 3 भारतीय नागरिक गमावले आहेत. तसेच एक भारतीय नागरिक बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. 

हे चारही भारतीय नागरिक या भागातून प्रवास करणाऱ्या व्यापारी जहाजांवरील कर्मचारी दलाचे भाग होते.

त्यांचे पार्थिव लवकरात लवकर भारतात परत आणण्यासाठी ​ओमान आणि इराक मधील आपले दूतावास तसेच दुबईतील आपले वाणिज्य दूतावास स्थानिक प्रशासनासोबत काम करत आहेत. 

अशा कारणांमुळेच कोणत्याही भागातून व्यापारी जहाजांवर होणाऱ्या हल्ल्यांचा भारत तीव्र निषेध करतो असेही यावेळी सांगितले गेले. 

सर्वात​ ताज्या घडामोडीत सेफ सी विष्णू या मार्शल आयलंडचा ध्वज असलेल्या जहाजावर जीवितहानी झाली आहे. ही घटना इराकला लागून असलेल्या भागात घडली.

या जहाजावर एकूण 28 कर्मचारी होते, त्यात 16 भारतीय नागरिकांचा समावेश होता. त्यापैकी एकाचा दुर्दैवाने मृत्यू झाला. आम्ही त्यांच्याबद्दल शोकसंवेदना व्यक्त करतो. इतर सर्व 15 भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली असून ते सध्या बसरा इथे आहेत. आपला दूतावास त्यांच्या संपर्कात असून, त्यांना शक्य ती सर्व मदत पुरवली जात आहे.

या संघर्षात आतापर्यंत चोवीसपेक्षा जास्त भारतीय नागरिक जखमी झाले आहेत. त्यापैकी अनेकजण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. काही जण अद्याप रुग्णालयात उपचार घेत आहेत.

माध्यमांद्वारे नागरिकांना केलेले आवाहन :

​माहिती आणि प्रसारण मंत्रालय :

गॅस सिलेंडरची घाबरून नोंदणी करू नये, असे आवाहन माध्यमांद्वारे सर्व नागरिकांना करण्यात आले आहे. पुरवठा विनाव्यत्यय सुरू राहील, याची सुनिश्चिती करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जात आहेत.

जिल्हास्तरीय देखरेख समित्या आणि राज्य सरकारांनी प्रत्यक्षातील एलपीजी सिलेंडरच्या वितरणावर लक्ष ठेवावे आणि आवश्यक ती कार्यवाही करावी यासंदर्भातील त्यांची भूमिका ठळकपणे अधोरेखित केली गेली आहे.

समाजमाध्यम वापरकर्त्यांनी चुकीची माहिती आणि अफवा पसरवू नयेत आणि केवळ विश्वासार्ह तसेच खातरजमा केलेली माहितीच सामायिक करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

विद्यमान​परिस्थिती सातत्याने बदलत असल्याने, दूरचित्रवाणी वाहिन्यांनी एकाच प्रकारची दृश्ये वारंवार प्रसारित करणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जमिनीवरची नेमकी परिस्थिती कोणत्या वेळेची आहे, याबद्दल नागरिकांना योग्य माहिती मिळावी यासाठी वाहिन्यांनी ही दृश्ये प्रसारित करताना त्यावर तारीख आणि वेळ शिक्काकृत (Timestamp) करूनच ती प्रसारित करावी, अशी विनंती त्यांना केली गेली आहे.

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी ​जीवनावश्यक वस्तूंच्या साठेबाजीच्या विरोधात कठोर उपाययोजना कराव्यात तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा विनाव्यत्यय सुरू राहील, याची सुनिश्चिती करावी अशा सूचना  देण्यात आल्या  आहेत.

शैलेश पाटील/निलीमा चितळे/नंदिनी मथुरे/राजश्री आगाशे/तुषार पवार/प्रिती मालंडकर

  

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2239326) अभ्यागत कक्ष : 45