पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान दिनानिमित्त देशवासियांना लिहिले पत्र
देश विकसित भारताचे स्वप्न साकारण्याचा दिशेने आगेकूच करत असताना नागरिकांनी त्यांच्या कर्तव्यांची जाणीव आपल्या मनात कायम ठेवावी, असे पंतप्रधानांचे आवाहन
नागरिकांनी आपला मतदानाचा अधिकार वापरून लोकशाहीला अधिक बळकट करण्याचे पंतप्रधानांनी केले आवाहन
Posted On:
26 NOV 2025 12:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 नोव्हेंबर या संविधान दिनानिमित्त देशवासियांना पत्र लिहिले असून 1949 मध्ये, याच दिवशी संविधान सभेने भारताचे संविधान स्वीकारले होते, याचे स्मरण केले आहे, तसेच राष्ट्राच्या प्रगतीला सातत्याने मार्गदर्शन करणारी संविधानाची चिरस्मरणीय भूमिका अधोरेखित केली आहे. या पवित्र दस्तऐवजाचा सन्मान करण्याच्या हेतूने केंद्र सरकारने सन 2015 मध्ये, 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता, असे त्यांनी म्हटले आहे.
संविधानाने, सामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तींना राष्ट्राच्या सेवेसाठी सर्वोच्च पदावर पोहोचण्यासाठी कसे सक्षम केले, हे सांगून पंतप्रधानांनी संसद आणि संविधानाप्रती असलेल्या पूज्यभावाचे स्वतःचे अनुभव सामायिक केले. सन 2014 मध्ये संसदेच्या पायऱ्यांना नतमस्तक होऊन स्पर्श केल्याचे तसेच 2019 मध्ये, आदराचे प्रतीक म्हणून संविधान आपल्या कपाळाला लावल्याचे स्मरण पंतप्रधानांनी केले. संविधानाने अनेकांना स्वप्न पाहण्याची ताकद आणि त्या स्वप्नांना साकार करण्यासाठी ताकद दिली आहे, यावर त्यांनी भर दिला.
संविधान सभेच्या सर्व सदस्यांना आदरांजली वाहत पंतप्रधानांनी डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्या दूरदृष्टीपूर्ण दृष्टिकोनाने संविधानाला समृद्ध करणाऱ्या अनेक प्रतिष्ठित महिला सदस्यांचे स्मरण केले. संविधानाला 60 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गुजरात मध्ये आयोजित केलेल्या संविधान गौरव यात्रेचा' तसेच संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाली, तेव्हा आयोजित केलेले संसदेचे विशेष अधिवेशन आणि देशव्यापी कार्यक्रम या ऐतिहासिक टप्प्यांचा आणि या कार्यक्रमांना मिळालेल्या विक्रमी सार्वजनिक सहभागाचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.
याच वर्षी सरदार वल्लभभाई पटेल आणि भगवान बिरसा मुंडा या दोन असाधारण व्यक्तिमत्वांचे 150 वे जयंती वर्षे आहे तसेच राष्ट्रीय गीत वंदे मातरम् च्या 150 व्या वर्षपूर्तीचा उत्सव, श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या बलिदान दिनाचा स्मरणोत्सव देखील याच वर्षी असल्याने यावर्षीच्या संविधान दिनाला विशेष महत्त्व असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे, तसेच ही सर्व व्यक्तिमत्त्वे आणि महत्त्वाचे टप्पे आपल्याला आपली कर्तव्ये प्राधान्याने पार पाडण्याचे स्मरण करून देतात, ज्यावर संविधानाने कलम 51अ मधील मूलभूत कर्तव्यांवरील एका समर्पित प्रकरणाद्वारे भर दिला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. उत्तम प्रकारे पार पाडलेले कर्तव्य तद्नुरूप अधिकार निर्माण करते आणि ही कर्तव्ये आपल्याला सामाजिक आणि आर्थिक प्रगती साध्य करण्यासाठी मार्गदर्शन करतात, असा महात्मा गांधी यांचा विश्वास होता, याचे स्मरणदेखील त्यांनी केले आहे.
या शतकाचा प्रारंभ होऊन आधीच 25 वर्षे उलटून गेली आहेत आणि आतापासून अवघ्या दोन दशकांनी, आपण वसाहतवादी राजवटीपासून मुक्त होण्याची 100 वर्षे साजरी करणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. वर्ष 2049 मध्ये, संविधान स्वीकृतीला शंभर वर्षे पूर्ण होतील. आपण आखत असलेली धोरणे, आपण आज घेत असलेले निर्णय आणि आपल्या सामूहिक कृती येणाऱ्या पिढ्यांचे जीवन घडवतील असे सांगून विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण वाटचाल करत असताना, नागरिकांनी आपल्या राष्ट्राप्रती असलेली आपली कर्तव्ये अग्रस्थानी असल्याचे कायम ध्यानीमनी ठेवायला हवे असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.
प्रत्येकाने आपला मतदानाचा अधिकार वापरून लोकशाही बळकट करण्याची जबाबदारी पूर्ण करण्यावर पंतप्रधानांनी भर दिला आहे तसेच 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या, प्रथमच मतदान करणाऱ्या युवांसाठी दर 26 नोव्हेंबर रोजी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विशेष समारंभ आयोजित करण्याचा सल्ला त्यांनी दिला. आपल्या युवांमध्ये जबाबदारीची आणि अभिमानाची भावना जागृत केली, तर ते आयुष्यभर लोकशाहीच्या मूल्यांशी वचनबद्ध राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या महान राष्ट्राचे नागरिक म्हणून आपली कर्तव्ये पार पाडण्याच्या आपल्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार करण्याचे तसेच याद्वारे, विकसित आणि सशक्त भारताच्या उभारणीत सार्थ योगदान देण्याचे आवाहन करून पंतप्रधानांनी आपल्या पत्राचा समारोप केला.
पंतप्रधानांनी एक्सवरील एका वेगळ्या पोस्ट मध्ये लिहिले आहे:
"संविधान दिनानिमित्त, मी देशभरातील माझ्या कुटुंबातील सदस्यांना एक पत्र लिहिले आहे. त्यात, मी आपल्या संविधानाची महानता, जीवनातील मूलभूत कर्तव्यांचे महत्त्व आणि आपण पहिल्यांदाच मतदार होण्याचा आनंद का साजरा करावा यासारख्या विषयांवर माझे विचार मांडले आहेत..."
* * *
सोनाली काकडे/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2194555)
Visitor Counter : 6