पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

“वंदे मातरम्” या राष्ट्रीय गीताच्या 150 व्या वर्षपूर्तीनिमित्त वर्षभर केल्या जाणाऱ्या उत्सवाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन


वंदे मातरम् या गीताचे सार म्हणजे भारत, भारतमाता, भारतीयत्वाची अनादि कल्पना: पंतप्रधान

वसाहतवादी काळात वंदे मातरम् हा, भारत स्वतंत्र होईल, भारतमातेच्या बाहूंनी बंधनांच्या साखळ्या तुटतील, आणि तिची लेकरे स्वतःच त्यांच्या भाग्याची शिल्पकार होतील, या निर्धाराचा उद्घोष झाला: पंतप्रधान

वंदे मातरम् भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा आवाज बनले, एक असा मंत्र ज्याचा प्रत्येक क्रांतिकारकाच्या ओठांनी जप केला, एक असा आवाज ज्यातून प्रत्येक भारतीयाच्या भावना व्यक्त झाल्या: पंतप्रधान

स्वातंत्र्याच्या हुतात्म्यांचे राष्ट्रगीत असण्यासोबतच वंदे मातरम् हे गीत कालातीत प्रेरणादायक म्हणूनही काम करते, हे गीत आपले स्वातंत्र्य आपण कसे मिळवले याची आपल्याला आठवण करून देण्यासोबतच आपण या स्वातंत्र्याचे संरक्षण कसे केले पाहिजे याचे देखील स्मरण करून देते: पंतप्रधान

जेव्हा राष्ट्रध्वज तिरंगा फडकतो, तेव्हा आपल्या हृदयांतून आपोपापच हे शब्द उमटतात – भारतमातेचा विजय असो! वंदे मातरम्!: पंतप्रधान

Posted On: 07 NOV 2025 12:17PM by PIB Mumbai


नवी दिल्ली 07 नोव्हेंबर 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे  वंदे मातरम्या राष्ट्रीय गीताच्या 150 व्या वर्षपूर्तीनिमित्त वर्षभर केल्या जाणाऱ्या उत्सवाचे उद्घाटन केले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधान मोदी म्हणाले की, वंदे मातरम् हे केवळ शब्द नव्हेत हा एक मंत्र आहे, एक उर्जा, एक स्वप्न आणि एक पवित्र निश्चय आहे. वंदे मातरम् हे भारतमातेप्रति भक्ती आणि आध्यात्मिक समर्पण यांचे मूर्त रूप आहे हे त्यांनी अधोरेखित केले. पंतप्रधान म्हणाले की हा एक शब्द आपल्याला आपल्या इतिहासाशी जोडतो, आपला वर्तमानकाळ आत्मविश्वासाने भरून टाकतो आणि आपल्या भविष्यकाळाला असा धीर देण्यासाठी प्रेरित करतो की, कोणताही निश्चय पूर्ण होणार नाही असा नसतो आणि कोणतेही ध्येय आपल्या आवाक्याबाहेर नसते.

वंदे मातरम् गीताचे समूहगान हा खरोखरीच अभिव्यक्तीच्या मर्यादेपलीकडील एक उदात्त अनुभव होता असे वर्णन करत, पंतप्रधान मोदी यांनी सागितले की इतक्या संख्येने गाणाऱ्या आवाजांतून एक अद्वितीय लय, एकच स्वर, एक सामायिक रोमांचकारी भावना आणि एक अखंडित प्रवाह उदयाला आला. आपल्या मनाला ऊर्जेने भारून टाकणाऱ्या निनादाबद्दल आणि सुसंवादाच्या लहरींबद्दल त्यांनी भाष्य केले. मोदी म्हणाले की, 07 नोव्हेंबर हा एक ऐतिहासिक दिवस असून या दिवशी देश वंदे मातरम् या गीताची 150 वी वर्षपूर्ती साजरी करत आहे. हा पवित्र प्रसंग आपल्या नागरिकांना नवी प्रेरणा देईल आणि नव्या ऊर्जेने भारून टाकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इतिहासाच्या पानांमध्ये या दिवसाची नोंद करण्यासाठी वंदे मातरम् गीताला समर्पित विशेष स्मरणार्थ नाणे तसेच टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. भारतमातेला प्राणार्पण केलेले सर्व शूरवीर आणि तेजस्वी व्यक्तिमत्त्वांना आदरांजली वाहत पंतप्रधान मोदी यांनी या प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्वांचे अभिनंदन केले आणि वंदे मातरम् या गीताच्या 150 व्या वर्षपूर्तीनिमित्त प्रत्येक नागरिकाला शुभेच्छा दिल्या.

प्रत्येक गाण्याची आणि प्रत्येक कवितेची एक मध्यवर्ती भावना असते आणि एक मुख्य संदेश असतो याकडे सर्वांचे लक्ष वेधत पंतप्रधानांनी सर्वांना प्रश्न विचारला- वंदे मातरम् या गीताचे सार काय आहे? तर भारत, भारतमाता, भारतीयत्वाची अनादि कल्पना हेच वंदे मातरम् या गीताचे सार आहे याला त्यांनी दुजोरा दिला. याचे तपशीलवार स्पष्टीकरण देत ते म्हणाले की, मानवी संस्कृतीच्या उदयापासून ही संकल्पना आकार घेऊ लागली, प्रत्येक युग हा एक अध्याय म्हणून वाचावा लागला, विविध देशांची निर्मिती झाली, वेगवेगळ्या शक्तींचा उदय होताना दिसला, नव्या संस्कृती उदयाला आल्या, शून्यत्वाकडून महानतेकडे झालेला त्यांचा प्रवास आणि शेवटी पुन्हा शून्यात त्यांचा विलय झालेला बघायला मिळाला. ते पुढे म्हणाले की भारताने इतिहासाची निर्मिती आणि विघटन होताना पाहिले, जगाचा बदलत जाणारा भूगोल पाहिला. या अमर्याद मानवी प्रवासातून भारत शिकत गेला, नवे निष्कर्ष काढले, आणि त्यांच्या आधारावर आपल्या संस्कृतीची मूल्ये आणि आदर्शे यांना आकार दिला आणि त्यातून एक वेगळी सांस्कृतिक ओळख निर्माण केली. भारताने सामर्थ्य आणि नीतिमत्ता यांच्यातील समतोल समजून घेतला आणि म्हणूनच भूतकाळाच्या जखमांना मागे टाकून एक शुद्ध सोन्यासारखा, अमर देश म्हणून उदयाला आला.

स्वतंत्र अस्तित्वाच्या विशुध्द भावनेत रुजलेली भारताची संकल्पना आणि तात्विक शक्ती ही जागतिक सत्तांचा उदय आणि पतन यांपासून पूर्णतः वेगळी आहे हे अधोरेखित करुन, मोदी म्हणाले की जेव्हा ही जाणीव लिखित आणि लयबद्ध रुपात व्यक्त झाली तेव्हा त्यातून वंदे मातरम् सारख्या कलाकृतीची निर्मिती झाली. म्हणूनच, वसाहतवादी काळात वंदे मातरम् हा भारत स्वतंत्र होईल, भारतमातेच्या बाहूंनी बंधनांच्या साखळ्या तुटतील, आणि तिची लेकरे स्वतःच त्यांच्या भाग्याची शिल्पकार होतील, या निर्धाराचा उद्घोष झाला,” मोदी ,म्हणाले.

बंकिमचंद्र यांची आनंदमठ ही केवळ एक कादंबरी नव्हे- तर ते स्वतंत्र भारताचे स्वप्न आहे, हे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचे शब्द आठवत, बंकिम बाबूंच्या रचनेतील प्रत्येक ओळ, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक भावना यात गहन अर्थ दडला आहे हे लक्षात घेत पंतप्रधानांनी आनंदमठ मधील वंदे मातरम् गीताच्या व्यापक महत्त्वावर अधिक भर दिला.  ते म्हणाले की जरी हे गाणे वसाहतवादी काळात रचलेले असले तरीही त्यातील शब्द कधीही त्या गुलामगिरीच्या शतकांच्या छायेत मर्यादित राहिलेले नव्हते. हे शब्द अधीनतेच्या आठवणीपासून मुक्त होते आणि म्हणूनच वंदे मातरम् हे गीत प्रत्येक युगात आणि प्रत्येक वयासाठी समर्पक ठरते.या गीताची सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्यशामलाम मातरमही पहिली ओळ उच्चारत पंतप्रधान मोदी म्हणाले की, हे शब्द म्हणजे निसर्गाचे दिव्य वरदान लाभलेल्या आपल्या मातृभूमीला केलेले अभिवादन आहे.

हजारो वर्षांपासून भारताची हीच ओळख राहिली आहे हे अधोरेखित करत मोदी म्हणाले की आपल्या देशातील नद्या, डोंगर, जंगले आणि सुपीक जमीन यांच्यात नेहमीच विपुल उत्पादनाची क्षमता राहिली आहे. अनेक शतके, जगाने भारताच्या समृद्धीच्या कहाण्या ऐकल्या. अगदी काही शतकांपूर्वी जागतिक जीडीपीमध्ये भारताचा वाटा जवळजवळ एक चतुर्थांश होता.जेव्हा बंकिम बाबूंनी वंदे मातरम् ची रचना केली तेव्हा भारत त्या सुवर्ण युगापासून कितीतरी लांब गेला होता. परदेशी आक्रमणे, लुटालूट आणि शोषणकारी वसाहतवादी धोरणे यांनी देशाला दारिद्र्य आणि उपासमारी भोगायला लावली. तरीही, कितीही मोठी संकटे  येवोत, भारत पुन्हा एकदा सुवर्णयुग आणू शकेल या विश्वासावर बंकिम बाबूंनी समृध्द भारताचे स्वप्न साकारले. आणि म्हणूनच त्यांनी सर्वांना साद घातली वंदे मातरम्.

पंतप्रधान म्हणाले की, हीन आणि मागासलेला देश असे भारताचे चित्र रंगवत ब्रिटिशांनी त्यांच्या सत्तेचे समर्थन केले. वंदे मातरम् गीताच्या पहिल्याच ओळीने हा चुकीचा प्रचार समर्थपणे हाणून पाडला हे त्यांनी ठामपणे सांगितले. म्हणूनच, वंदे मातरम् हे केवळ एक गीत नव्हे तर या गाण्याने स्वतंत्र भारत कसा असेल याचे लाखो भारतीयांच्या मनातील चित्र मांडले: सुजलाम सुफलाम भारताचे स्वप्न.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा दिवस आपल्याला वंदे मातरम् या गीताचा असामान्य प्रवास आणि प्रभाव जाणून घेण्याची संधी देतो.जेव्हा बंकिम बाबूंनी 1875 मध्ये बंगदर्शनमध्ये वंदे मातरम् प्रसिध्द केले तेव्हा अनेकांना ते केवळ एक गाणे वाटले. मात्र लवकरच, वंदे मातरम् हा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा आवाज झाला- एक असा मंत्र ज्याचा प्रत्येक क्रांतिकारकाच्या ओठांनी जप केला, एक असा आवाज ज्यातून प्रत्येक भारतीयाच्या भावना व्यक्त झाल्या. जेथे कोणत्या ना कोणत्या रुपात वंदे मातरम् चे अस्तित्व नाही  असा एकही अध्याय आपल्या स्वातंत्र्य चळवळीत नाही. वर्ष 1896 मध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी कलकत्ता अधिवेशनात वंदे मातरम् चे गायन केले. वर्ष 1905 मध्ये जेव्हा बंगालची फाळणी झाली- ब्रिटिशांनी देशाचे तुकडे करण्यासाठी केलेला हा धोकादायक प्रयोग होता- तेव्हा त्या रचनांच्या विरोधात वंदे मातरम् एखाद्या कातळाप्रमाणे अविचल राहिले. बंगालच्या फाळणीच्या विरोधात सुरु झालेल्या निदर्शनांच्या काळात, सगळे रस्ते एकाच आवाजाने दुमदुमले- वंदे मातरम्.

बारिसाल परिषदेच्या वेळी जेव्हा निदर्शकांवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या तेव्हा त्यांच्या ओठांवर हेच शब्द होते वंदे मातरम्.. त्या घटनेचे स्मरण करत पंतप्रधान मोदी म्हणाले की परदेशातून सक्रीय असलेले वीर सावरकरांसारखे स्वातंत्र्यसैनिक एकमेकांना वंदे मातरम् म्हणत अभिवादन करत असत. अनेक क्रांतिकारकांनी फाशीच्या स्तंभावर उभे असताना वंदे मातरम् चा जयघोष केला. पंतप्रधान म्हणाले की, वेगवेगळे प्रदेश आणि भाषा असलेल्या या विस्तीर्ण देशाच्या इतिहासातील अशा असंख्य घटना, असंख्य तारखा यांनी अशा चळवळी बघितल्या  जेथे प्रत्येक आवाजात एक घोषणा, एक निर्धार, एक गीत प्रतिध्वनित झाले वंदे मातरम्. वंदे मातरम् आपल्यासमोर अविभाज्य भारताचे चित्र उभे करते हे गांधीजींचे वर्ष 1927 मध्ये काढलेले उद्गार उद्धृत करत पंतप्रधान म्हणाले श्री अरविंदो यांनी वंदे मातरम् हे केवळ गीत नसून हा एक मंत्र आहे असे वर्णन केले आहे एक असा मंत्र जो आंतरिक शक्ती जागृत करतो. भिकाजी कामा यांनी तयार केलेल्या ध्वजाच्या केंद्रस्थानी वंदे मातरम् हे शब्द रेखाटलेले होते हे देखील पंतप्रधानांनी नमूद केले.

भारताचा राष्ट्रध्वज  सुरुवातीच्या काळापासून पासून ते आजच्या तिरंग्यापर्यंत काळानुसार विकसित झाला आहे. हे अधोरेखित करताना, एक गोष्ट अपरिवर्तित राहिली आहे की जेव्हा जेव्हा ध्वज फडकवला जातो तेव्हा प्रत्येक भारतीयाच्या हृदयातून सहजतेने निघणारे शब्द म्हणजे भारत माता की जय! आणि वंदे मातरम! हेच होय.  वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताची 150 वर्षे साजरी करत असताना, हे आयोजन म्हणजे देशाच्या महान वीरांना श्रद्धांजली आहे. वंदे मातरम् म्हणत फाशीची शिक्षा स्वीकारणाऱ्या, वंदे मातरम् म्हणत चाबकाचे फटके सहन करणाऱ्या, वंदे मातरमचा मंत्र म्हणत बर्फाच्या लाद्यांवर शिक्षा भोगून दृढ राहिलेल्या असंख्य हुतात्म्यांना ही श्रद्धांजली आहे यावर त्यांनी भर दिला.

आज सर्व 140 कोटी भारतीय वंदे मातरम्म्हणत राष्ट्रासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या इतिहासाच्या पानांमध्ये कधीही नोंदली गेली नाहीत अशा प्रत्येक ज्ञात, अज्ञात व्यक्तीला श्रद्धांजली अर्पण करत आहे , असे ते म्हणाले.

ही भूमी आपली आई आहे, हे राष्ट्र आपली आई आहे आणि आपण तिची मुले आहोत, असे प्रतिपादन करणारे वैदिक श्लोक उद्धृत करून   मोदी म्हणाले की वैदिक काळापासून भारतातील लोकांनी या मातृत्वाच्या रूपात राष्ट्राची पूजा केली आहे. याच वैदिक विचाराने वंदे मातरमच्या माध्यमातून स्वातंत्र्यलढ्यात नवीन चेतना निर्माण केली यावर त्यांनी भर दिला.

जे लोक राष्ट्राला केवळ एक भू-राजकीय अस्तित्व म्हणून पाहतात, त्यांना राष्ट्राला आई मानण्याची कल्पना आश्चर्यकारक वाटू शकते. परंतु भारत वेगळा आहे. भारतात, आई ही जन्म देणारी, पालनपोषण करणारी असते आणि जेव्हा तिची मुले संकटात असतात तेव्हा ती वाईटाचा नाश करणारी देखील असते असे पंतप्रधानांनी म्हटले.

त्यांनी वंदे मातरम् मधील ओळी सांगितल्या. यात त्यांनी, माता भारतीमध्ये अफाट शक्ती आहे, ती आपल्याला संकटातून मार्ग दाखवते आणि शत्रूंना पराभूत करते असे अधोरेखित केले. राष्ट्राला माता आणि आईला शक्तीचे दैवी स्वरूप या कल्पनेमुळे स्वातंत्र्य चळवळीला चालना मिळाली ज्यामध्ये पुरुष आणि महिला दोघांनाही समान रीतीने सामावून घेण्याचा संकल्प करण्यात आला असे पंतप्रधानांनी सांगितले. या दृष्टिकोनामुळे भारत पुन्हा एकदा अशा राष्ट्राचे स्वप्न पाहू शकला जिथे महिला शक्ती राष्ट्र उभारणीच्या आघाडीवर असेल असे ते पुढे म्हणाले.

स्वातंत्र्याच्या हुतात्म्यांचे गान असले तरी, वंदे मातरम आपल्याला त्याच स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची प्रेरणा देखील देते असे सांगून,   मोदी यांनी बंकिम बाबूंच्या मूळ रचनेतील ओळी उद्धृत केल्या. या  ओळी अधोरेखित करतात की माँ भारती ही ज्ञान देणारी सरस्वती; समृद्धी देणारी लक्ष्मी; आणि शस्त्रे आणि शक्तीची धारक दुर्गा यांचा अवतार आहे. ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आघाडीवर उभे राहणारे राष्ट्र; शिक्षण आणि नवोपक्रमाच्या शक्तीने समृद्ध होणारे राष्ट्र; आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत स्वावलंबी असलेले राष्ट्र निर्माण करण्याच्या  ध्येयाचा  पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.

अलिकडच्या काळात जगाने भारताचा खऱ्या स्वरूपात उदय पाहिला याची नोंद घेतविज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताची अभूतपूर्व प्रगती आणि जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून भारताचा उदय यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला.  जेव्हा शत्रूंनी दहशतवादाच्या माध्यमातून भारताच्या सुरक्षिततेवर आणि सन्मानावर हल्ला करण्याचे धाडस केले, तेव्हा जगाने पाहिले की नवा भारत मानवतेच्या सेवेतील कमला आणि विमलाच्या भावनेला मूर्त रूप देत आहे, तर दहशतवादाचा नाश करण्यासाठी दुर्गा - दहा शस्त्रे धारण करणारी कसे बनायचे हे देखील त्याला माहिती, आहे असे ते म्हणाले.

वंदे मातरमशी संबंधित आणखी एका महत्त्वाच्या पैलूला संबोधित करताना, त्याचे महत्त्व सांगताना मोदी यांनी नमूद केले की स्वातंत्र्यलढ्यादरम्यान वंदे मातरमच्या भावनेने संपूर्ण देशाला प्रकाशित केले होते. तथापि, त्यांनी खेद व्यक्त केला की 1937 मध्ये, वंदे मातरमचे महत्त्वाचे श्लोक - त्याचा आत्मा -   खंडित झाला. या विभाजनाने देशाच्या फाळणीचे बीज पेरले. पंतप्रधानांनी या महान राष्ट्रीय मंत्रावर असा अन्याय का केला गेला असा प्रश्न उपस्थित केला आणि आजच्या पिढीने हा इतिहास समजून घेतला पाहिजे यावर भर दिला. त्यांनी इशारा दिला की आजही तीच फूट पाडणारी मानसिकता देशासमोर आव्हान निर्माण करत आहे असे त्यांनी सांगितले.

हे शतक आपण भारताचे शतक बनवले पाहिजे यावर भर देऊन, पंतप्रधानांनी सांगितले की हे साध्य करण्याची ताकद भारत आणि त्याच्या लोकांमध्ये आहे. हा संकल्प साध्य करण्यासाठी त्यांनी आत्मविश्वासाच्या गरजेवर भर दिला. मोदींनी इशारा दिला की या प्रवासात, आपल्याला दिशाभूल करणारे आणि नकारात्मक मानसिकतेचे लोक भेटतील जे शंका आणि संकोच पेरण्याचा प्रयत्न करतील. अशा क्षणी, त्यांनी राष्ट्राला आनंदमठातील तो प्रसंग आठवण्याचे आवाहन केले, जिथे भवानंद वंदे मातरमगातात आणि दुसरे पात्र प्रश्न विचारते की एकटा माणूस काय साध्य करू शकतो. वंदे मातरमची प्रेरणा मग उद्भवते - कोट्यवधी मुले आणि कोट्यवधी हात असलेली आई कधीही शक्तीहीन कशी असू शकतेपंतप्रधानांनी सांगितले की आज, भारतमातेकडे 140 कोटी मुले आणि 280 कोटी हात आहेत, त्यापैकी 60 टक्क्यांहून अधिक तरुण आहेत.   भारताकडे जगातील सर्वात मोठा लोकसंख्याशास्त्रीय फायदा आहे, जो आपल्या राष्ट्राची आणि माँ भारतीची ताकद आहे असे ते म्हणाले. एक प्रश्न मांडत मोदींनी विचारले की आज आपल्यासाठी खरोखर काय अशक्य आहे? वंदे मातरमचे मूळ स्वप्न पूर्ण करण्यापासून आपल्याला काय रोखू शकते?

आज आत्मनिर्भर भारताचे स्वप्न यशस्वी होत असताना, मेक इन इंडियाच्या संकल्पाने देश पुढे जात असताना आणि 2047  पर्यंत विकसित भारताच्या ध्येयाकडे आपण स्थिरपणे वाटचाल करत असताना, मोदी म्हणाले की या अभूतपूर्व युगातील प्रत्येक नवीन कामगिरी उत्स्फूर्तपणे 'वंदे मातरम्' हा जयघोष करते! त्यांनी अधोरेखित केले की जेव्हा भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश बनतो, जेव्हा नवीन भारताचा प्रतिध्वनी अंतराळाच्या सर्वात दूरच्या कोपऱ्यात पोहोचतो, तेव्हा प्रत्येक नागरिक अभिमानाने 'वंदे मातरम्' घोषित करतो! पंतप्रधान पुढे म्हणाले की जेव्हा आपण आपल्या मुलींना अंतराळ तंत्रज्ञानापासून क्रीडा क्षेत्रात शिखरावर पोहोचताना पाहतो, जेव्हा आपण त्यांना लढाऊ विमाने उडवताना पाहतो, तेव्हा प्रत्येक अभिमानी भारतीयाच्या तोंडून 'वंदे मातरम्' हा नारा निघतो.

आज वन रँक वन पेन्शनच्या अंमलबजावणीला 11 वर्षे पूर्ण होत आहेत हे लक्षात घेऊन मोदी म्हणाले की जेव्हा आपली सशस्त्र दले शत्रूचे मनसुबे उधळून लावतात, जेव्हा दहशतवाद, नक्षलवाद आणि माओवादी बंडखोरी निर्णायकपणे पराभूत होतात, तेव्हा आपली सुरक्षा दले जय घोष  करतात - वंदे मातरम्!

माँ भारतीबद्दलची ही श्रद्धा आपल्याला विकसित भारताच्या ध्येयाकडे नेईल यावर भर देऊन, पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला की वंदे मातरमचा मंत्र या अमृतकाळ  प्रवासात माँ भारतीच्या असंख्य मुलांना सशक्तपणे प्रेरणा देत राहील. शेवटी, त्यांनी पुन्हा एकदा वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

पार्श्वभूमी

पंतप्रधानांनी या प्रसंगी एक स्मारक टपाल तिकिट आणि नाणे देखील प्रकाशित केले. हा कार्यक्रम 7 नोव्हेंबर 2025 ते 7 नोव्हेंबर 2026 पर्यंत वर्षभर चालणाऱ्या देशव्यापी स्मरणोत्सवाची औपचारिक सुरुवात आहे, जो भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आणि राष्ट्रीय अभिमान आणि एकता जागृत करणाऱ्या या कालातीत रचनेच्या 150 वर्षांचा उत्सव साजरा करतो.

या उत्सवात सार्वजनिक ठिकाणी "वंदे मातरम्" च्या संपूर्ण आवृत्तीचे सामूहिक गायन झाले. यात मुख्य कार्यक्रमासह समाजातील सर्व घटकांमधील नागरिकांचा सहभाग होता.

2025  मध्ये वर्ष वंदे मातरम् ला 150  वर्षे पूर्ण होत आहेत. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेले आपले राष्ट्रीय गीत "वंदे मातरम्" हे 1875  मध्ये 7 नोव्हेंबर रोजी अक्षय नवमीच्या शुभ मुहूर्तावर लिहिले होते. वंदे मातरम् हे त्यांच्या आनंदमठ या कादंबरीचा भाग म्हणून बंगदर्शन या साहित्यिक जर्नलमध्ये प्रथम प्रकाशित झाले. मातृभूमीला शक्ती, समृद्धी आणि दिव्यतेचे मूर्त स्वरूप म्हणून आवाहन करणारे हे गीत भारताच्या एकता आणि स्वाभिमानाच्या जागृत भावनेला काव्यात्मक अभिव्यक्ती देते. लवकरच ते राष्ट्राप्रति भक्तीचे एक स्थायी प्रतीक बनले.

***

शैलेश पाटील/संजना चिटणीस/हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2187351) Visitor Counter : 35