पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमध्ये नवा रायपूर येथे केले छत्तीसगड विधानसभेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन


आज छत्तीसगड आपल्या आकांक्षांच्या नव्या शिखरावर उभा आहे, या अभिमानास्पद क्षणी मी त्या द्रष्ट्या आणि कनवाळू नेत्याला म्हणजेच ज्यांच्या दूरदृष्टीमुळे या राज्याची निर्मिती झाली, त्या आदरणीय भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी जी यांना अभिवादन करतोः पंतप्रधान

आज संपूर्ण देश वारसा आणि विकास या दोहोंचा अंगिकार करण्यासाठी पुढे येत आहेः पंतप्रधान

भारत ही लोकशाहीची जननी आहेः पंतप्रधान

भारत आता नक्षलवाद आणि माओवादी दहशतवादाचे उच्चाटन करण्याच्या दिशेने आगेकूच करत आहेः पंतप्रधान

विधानसभा हे केवळ एक कायदेनिर्मिती करण्याचे स्थान नाही तर छत्तीसगडचे विधिलिखित साकार करण्याचे एक सचेतन केंद्र आहे - पंतप्रधान

Posted On: 01 NOV 2025 2:59PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज छत्तीसगडमध्ये नवा रायपूर येथे छत्तीसगड विधानसभेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी आजचा दिवस छत्तीसगडच्या विकासाच्या वाटचालीची सोनेरी सुरुवात आहे, असे नमूद केले. आपल्या स्वतःसाठी हा दिवस अतिशय आनंदाचा आणि महत्त्वाचा आहे, असे त्यांनी सांगितले. अनेक दशकांपासून जोपासना केलेल्या या भूमीसोबत आपले अतिशय दृढ भावनिक नाते असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत असल्याच्या काळाची आठवण करून देत मोदी म्हणाले की छत्तीसगडमध्ये त्यांनी बराच काळ व्यतित केला आणि तिथून बरेच काही शिकायला मिळाले. छत्तीसगडबाबतचा दृष्टीकोन, त्याच्या निर्मितीचा संकल्प आणि या संकल्पाची पूर्तता यांची आठवण करून देत, छत्तीसगडच्या परिवर्तनाच्या प्रत्येक क्षणाचे आपण साक्षीदार राहिलो असल्याचे सांगितले. हे राज्य आपल्या 25 वर्षांच्या वाटचालीतील एका महत्त्वाच्या टप्प्यात प्रवेश करत असताना, या प्रसंगाचा एक भाग बनण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. रौप्य महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने या राज्याच्या जनतेसाठी विधानसभेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करण्याचा बहुमान प्राप्त झाल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. त्यांनी छत्तीसगडच्या जनतेला आणि राज्य सरकारला या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे अभिनंदन केले.

2025 हे वर्ष भारतीय प्रजासत्ताकाचे अमृत वर्ष आहे कारण भारताने आपल्या नागरिकांसाठी राज्यघटना समर्पित केली, त्या घटनेला या वर्षी 75 वर्षे पूर्ण झाली,” असे मोदी म्हणाले. या ऐतिहासिक प्रसंगी या भागातील रवीशंकर शुक्ला, बॅरिस्टर ठाकूर छेदीलाल, घनश्याम सिंह गुप्ता, किशोर मोहन त्रिपाठी, रामप्रसाद पोटाई आणि रघुराज सिंह या संविधान सभेच्या मान्यवर सदस्यांना त्यांनी अभिवादन केले, जे लोक हा भाग अतिशय मागास असूनही दिल्लीपर्यंत पोहोचले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यघटना तयार करण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. आजचा दिवस हा छत्तीसगडच्या इतिहासातील सुवर्ण अध्याय असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. विधानसभेच्या अतिशय भव्य आणि आधुनिक इमारतीचे उद्घाटन होत असताना त्यांनी यावर भर दिला की हा समारंभ केवळ या इमारतीसाठी नाही तर तो जनतेच्या आकांक्षा, संघर्ष आणि अभिमानाच्या 25 वर्षांचा गौरवसोहळा आहे. आज छत्तीसगड आपल्या आकांक्षांच्या एका नव्या शिखरावर उभा आहे, या अभिमानास्पद क्षणी मी त्या द्रष्ट्या आणि कनवाळू नेत्याला, म्हणजेच ज्यांच्या दूरदृष्टीमुळे या राज्याची निर्मिती झाली त्या आदरणीय  भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी जी यांना अभिवादन करतो, असे पंतप्रधान म्हणाले. ज्यावेळी 2000 साली अटलजींनी छत्तीसगड या राज्याची निर्मिती केली, तेव्हा तो केवळ एक प्रशासकीय निर्णय नव्हता तर छत्तीसगडच्या विकासाची नवी दालने खुली करण्याच्या आणि या राज्याच्या अंतरात्म्याची हाक ऐकण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल होते, याची आठवण त्यांनी करून दिली. विधानसभेच्या इमारतीच्या उद्घाटनासोबतच अटलजींच्या पुतळ्याचे देखील अनावरण करण्यात आले आणि त्यामुळे साहजिकच आपल्या अंतःकरणातून असा आवाज येत आहे की अटलजी पहा, तुमचे स्वप्न साकार होत आहे, ज्याचे स्वप्न तुम्ही पाहिले होते ते छत्तीसगड आता आत्मविश्वासाने भरून गेले आहे आणि विकासाची नवी शिखरे गाठत आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

छत्तीसगड विधानसभेचा इतिहास स्वतःच एक प्रेरणास्रोत असल्याचे सांगत2000 साली या सुंदर राज्याची स्थापना झाली, त्यावेळी रायपूरमधल्या राजकुमार महाविद्यालयातील जशपूर सभागृहात विधानसभेचे पहिले अधिवेशन झाल्याची आठवण मोदी यांनी करुन दिली. तो काळ मर्यादित स्रोतांचा तरीही अमर्यादित स्वप्नांचा होता. आम्ही अत्यंत वेगाने आमचे भविष्य घडवू, अशी एकच भावना त्यावेळी होती, असे मोदी यांनी नमूद केले. नंतर अस्तित्वात आलेली विधानसभेची इमारत मुळात एका दुसऱ्या विभागाची होती असे पंतप्रधान म्हणाले. तिथूनच छत्तीसगडमधला लोकशाहीचा प्रवास नव्या उत्साहाने सुरू झाला. आज 25 वर्षांनंतर तीच लोकशाही आणि तेच लोक एका आधुनिक, डिजिटल आणि स्वयंपूर्ण विधानसभा इमारतीचे उद्घाटन करत आहेत असे त्यांनी अधोरेखित केले

विधानसभा हे लोकशाहीचे तीर्थक्षेत्र आहे असे सांगून विधानसभेतला प्रत्येक स्तंभ पारदर्शकतेचे प्रतीक आहे, प्रत्येक भाग आपल्याला जबाबदारीची जाणीव करुन देतो आणि प्रत्येक कक्ष जनतेच्या आवाजाचे प्रतिबिंब आहे असे पंतप्रधान म्हणाले. इथे घेतले गेलेले निर्णय छत्तीसगडच्या भविष्याला आकार देतील आणि इथे या भिंतींच्या आत बोलला गेलेला प्रत्येक शब्द राज्याच्या भूत, वर्तमान आणि भविष्यकाळाचा अविभाज्य भाग असेल असे ते म्हणाले. ही इमारत पुढील अनेक दशके छत्तीसगडचे धोरण, भविष्य आणि धोरणकर्ते यांचे केंद्र म्हणून काम करेल असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

वारसा आणि विकास यांचा मेळ साधत आज संपूर्ण देश आगेकूच करत आहे असे पंतप्रधान म्हणाले. ही उर्जा सरकारच्या प्रत्येक धोरणातून आणि निर्णयातून दिसून येते असे त्यांनी अधोरेखित केले. पवित्र सेनगोल भारतीय संसदेची प्रेरणा आहे आणि संसदेतील नवीन प्रेक्षक दालने जगाला भारतीय लोकशाहीच्या प्राचीन परंपरेची साक्ष देत आहेत असे ते म्हणाले. संसदेच्या परिसरातील शिल्पकृती जगाला भारतात रुजलेल्या भक्कम लोकशाही परंपरांचे दर्शन घडवतात. हीच मूळ कल्पना आणि भावना छत्तीसगडच्या नवीन विधानसभेत प्रतिबिंबित झाली आहे याविषयी मोदी यांनी समाधान व्यक्त केले. विधानसभेची नवीन इमारत राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतिबिंब आहे असे ते म्हणाले. छत्तीसगडच्या भूमीत जन्मलेल्या महान व्यक्तींची प्रेरणा विधानसभेच्या प्रत्येक घटकात पाहायला मिळते. सबका साथ सबका विकास हे तत्त्व आणि वंचितांना प्राधान्य हे सरकारच्या सुशासनाचे ठळक वैशिष्ट्य असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. भारताच्या राज्यघटनेचा हा आत्मा आहे आणि आपले महान नेते, संत आणि विचारवंत यांनी आपल्यात रुजवलेली ही मूल्ये आहेत.

नवीन विधानसभा इमारतीचे निरीक्षण करत असताना बस्तर कलेचा सुंदर नमुना पाहायला मिळाल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. भारतातली सर्जनशीलता आणि सांस्कृतिक ताकद यांचे हे प्रतीक असल्याचे सांगून, काही महिन्यांपूर्वी अशीच बस्तर कलाकृती आपण थायलंडच्या पंतप्रधानांना भेट दिल्याची आठवण त्यांनी करुन दिली.

मोदी पुढे म्हणाले की या इमारतीच्या भिंती बाबा गुरू घासीदासजी यांचे विचार सांगतात. त्यांनी आपल्याला सर्वांना सामावून घेणे, सर्वांसाठी विकास आणि सर्वांप्रती आदर या मूल्यांची शिकवण दिली. प्रत्येक दरवाजा माता शबरीच्या आपलेपणाचे प्रतीक आहे आणि प्रत्येक अतिथीचे स्वागत प्रेमाने करण्याची आठवण करुन देत आहे. पंतप्रधान म्हणाले की विधानसभेतील प्रत्येक आसन संत कबीरांनी शिकवलेल्या सत्य आणि निर्भयतेच्या मूल्यांचे मूर्त स्वरुप आहे. या इमारतीचा पाया म्हणजे महाप्रभू वल्लभाचार्यजी यांच्या नर सेवा नारायण सेवाया तत्त्वाचा निर्धार आहे असे ते म्हणाले. 

भारत ही लोकशाहीची जननी आहे आणि भारतातील आदिवासी समुदायांनी पिढ्यानपिढ्या लोकशाही परंपरा जपली आहे असे ते म्हणाले. बस्तरमधील मुरिया दरबार हे त्याचे ज्वलंत उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. इथल्या प्राचीन संसदेच्या परंपरेतून तळागाळातील लोकशाही प्रथेची प्रचिती येते असे त्यांनी सांगितले. अनेक वर्षांपासून भारतात समाज आणि प्रशासनाने एकत्रितपणे आव्हानावर मात केली असल्याचे त्यांनी नमूद केले. मुरिया दरबारच्या परंपरेला नवीन विधानसभा इमारतीत स्थान मिळाल्याबद्दलही पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.

या विधानसभेच्या प्रत्येक कोपर्‍यातून आपल्या महान नेत्यांच्या आदर्शाचे दर्शन घडते, तर इथल्या अध्यक्षांच्या खुर्चीलाही डॉ. रमण सिंह यांच्या अनुभवी नेतृत्वाचा स्पर्श लाभला असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. रमण सिंह म्हणजे पक्षाचा कार्यकर्ता, आपल्या कठोर परिश्रम आणि वचनबद्धतेने लोकशाही संस्थांना कसे बळकट करू शकतो, याचे मोठे उदाहरण असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी ​पंतप्रधानांनी राष्ट्रकवी निराला लिखित माता सरस्वतीच्या प्रार्थनेचाही उल्लेख केला. ती केवळ कविता नव्हती, तर स्वतंत्र भारताच्या पुनर्जन्माचा तो एक मंत्र होता असे ते म्हणाले. नव गती, नव लय, नव स्वर, हे निराला यांचे शब्द म्हणजे, परंपरांशी नाळ घट्ट असलेल्या, आणि तरीही आत्मविश्वासाने भविष्याच्या दिशेनेच वाटचाल करणाऱ्या भारताचे प्रतीक आहेत असे त्यांनी सांगितले. हीच भावना या विधानसभेच्या इमारतीलाही लागू असल्याचेही त्यांनी सांगितले. ही इमारत नव स्वर या भावनेचे प्रतीक आहे, इथे भूतकाळातील अनुभवांच्या प्रतिध्वनीचे बंध नवीन स्वप्नांच्या ऊर्जेशी जोडले जातात असे ते म्हणाले. याच ऊर्जेने आपण भारताची जडणघडण केली पाहिजे आणि आपल्या वारशाशी जोडलेले राहून विकासाच्या मार्गावर पुढे जाईल अशा छत्तीसगडचा पाया रचला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

नागरिक देवो भव हा सुशासनाचा मार्गदर्शक मंत्र असल्याचे ते म्हणाले. विधानसभेत घेतलेल्या प्रत्येक निर्णयामध्ये लोकांच्या कल्याणाला प्राधान्य दिले पाहिजे. इथे संमत केलेले कायदे सुधारणांना गती देणारे, नागरिकांचे जगण्यात सुलभता आणणारे आणि अनावश्यक सरकारी हस्तक्षेप कमी करणारे असले पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले. प्रशासनाचे अस्तित्व कायम असले पाहीजे, पण त्याचा अतिरेक नसला पाहीजे, अशा प्रकारचा समतोल हीच जलद प्रगतीची खरी गुरुकिल्ली आहे, असे त्यांनी नमूद केले.

छत्तीसगढ हे प्रभू श्रीरामचंद्रांचे मामाचे घर आहे आणि ते या भूमीचे भाचा आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. विधानसभेच्या या नवीन संकुलात श्रीरामांच्या आदर्शांचे स्मरण करण्यासाठी आजपेक्षा चांगला प्रसंग नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. प्रभू रामचंद्रांनी आखून दिलेल्या मूल्यांमधून सुशासनाची कालातीत शिकवण मिळते ही बाबही त्यांनी अधोरेखित केली.

​अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या वेळी, अवघ्या देशाने भक्तीतून राष्ट्र उभारणीकडे देव ते देश आणि राम ते राष्ट्र या दिशेने जाण्याचा सामूहिक संकल्प केला होता, याचे स्मरणही पंतप्रधानांनी केले. उत्तम प्रशासन आणि लोककल्याणाशी जोडलेल्या शासनाचे प्रतीक बनणे हा दृष्टीकोनच, राम ते राष्ट्र या संकल्पाचा गाभा आहे, यातून सर्वसमावेशक विकासाची सबका साथ, सबका विकास या तत्वाची भावना व्यक्त होते असे ते म्हणाले. गरिबी आणि दुःखापासून मुक्त असलेल्या समाजाची वंचितता दूर करून भारताने प्रगती साध्य करावी, हीच राम ते राष्ट्र या संकल्पामागची संकल्पना आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. आजारपणामुळे कोणाचाही अकाली मृत्यू होणार नाही आणि त्याद्वारे आरोग्यदायी तसेच आनंदी भारताची जडणघडण होईल हाच याचा अर्थ आहे असे ते म्हणाले. राम ते राष्ट्र हा संकल्प, भेदभावापासून मुक्त आणि सर्व समुदायांमध्ये सामाजिक न्याय प्रस्थापित असलेल्या समाजाचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.

​पंतप्रधानांनी पुढे सांगितले की "राम ते राष्ट्र" याचा अर्थ मानवताविरोधी शक्तींचा नायनाट करण्याचा निर्धार आणि दहशतवाद नष्ट करण्याची प्रतिज्ञा देखील होय. त्यांनी नमूद केले की ऑपरेशन सिंदूर मध्ये हा निर्धार स्पष्टपणे दिसून आला असून भारताने दहशतवादाचा कणा मोडला आहे. भारत आता नक्षलवाद आणि दहशतवादाच्या उच्चाटनाकडे वाटचाल करत असून, या अभूतपूर्व विजयांवर अभिमान बाळगतो, असेही त्यांनी सांगितले. हा अभिमान छत्तीसगड विधानसभेच्या नव्या इमारतीत स्पष्ट दिसून येतो.

गेल्या 25 वर्षांत छत्तीसगडने जे परिवर्तन घडवले, ते प्रेरणादायी आहे. पूर्वी नक्षलवादासाठी आणि मागासलेले म्हणून परिचित असलेले हे राज्य आज समृद्धी, सुरक्षा, आणि स्थिरतेचे  प्रतीक बनले आहे. बस्तर ऑलिंपिकची आता देशभर चर्चा होत असून नक्षलग्रस्त प्रदेशांमध्ये विकास आणि शांतता परतली आहे, असे मोदी म्हणाले.  पंतप्रधानांनी या परिवर्तनाचे श्रेय छत्तीसगडच्या लोकांच्या कठोर परिश्रमाला आणि त्यांच्या सरकारांच्या दूरदर्शी नेतृत्वाला दिले.

छत्तीसगडच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या उत्सवातून देशाच्या राष्ट्रीय उद्दिष्टाच्या  वाटचालीचा प्रारंभ होत आहे, असे सांगून पंतप्रधानांनी 2047 सालापर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी छत्तीसगडची भूमिका महत्त्वपूर्ण असेल, असे सांगितले. त्यांनी उपस्थितांना विधानसभेद्वारे प्रेरणादायी उदाहरण घडवण्याचे आवाहन केले, ज्यामुळे इतर राज्ये देखील नवकल्पना राबविण्यास प्रवृत्त होतील. विधानसभेतील चर्चा, प्रश्न आणि कामकाजात उत्कृष्टता हवी, प्रत्येक कृती विकसित छत्तीसगढ आणि विकसित भारतासाठी असावी, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

ते पुढे म्हणाले की छत्तीसगढच्या नव्या विधानसभेची खरी ओळख तिच्या भव्यतेत नाही तर येथील कल्याणकारी निर्णयात आहे. या निर्णयांमुळे शेतकऱ्यांच्या कष्टाचा सन्मान होईल, तरुणांच्या स्वप्नांना दिशा मिळेल, महिलांना नवी आशा मिळेल, आणि अत्यंत मागासलेल्या लोकांसाठी उन्नतीचा मार्ग तयार होईल, असे त्यांनी सांगितले. ही विधानसभा केवळ कायदे बनवण्याचे ठिकाण नाही, तर छत्तीसगढच्या भवितव्याला घडवणारी संस्था आहेअसेही त्यांनी सांगितले. येथून निघणाऱ्या प्रत्येक कल्पनेत जनसेवेचा, विकासाचा आणि भारताला उंचीवर नेण्याचा आत्मविश्वास असावा, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.

या नव्या विधानभवनाच्या उद्घाटनाचे खरे महत्त्व हेच आहे की लोकशाहीत कर्तव्याला सर्वोच्च स्थान देऊन, सार्वजनिक जीवनात निष्ठेने आपली भूमिका पार पाडण्याचा संकल्प करणे, असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की भारतीय प्रजासत्ताकाच्या अमृत वर्षात आपण सर्वांनी येथून बाहेर जाताना जनसेवेसाठी आपले जीवन समर्पित करण्याचा निर्धार करावा.  नवीन लोकशाही मंदिराच्या उद्घाटनानिमित्त पंतप्रधानांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि अभिनंदन केले.

उद्घाटन कार्यक्रमाला छत्तीसगडचे राज्यपाल रामेन डेका, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, विधानसभेचे अध्यक्ष डॉ. रमन सिंह, मुख्यमंत्री  विष्णु देव साहाय, केंद्रीय मंत्री  टोकन साहू आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

पार्श्वभूमी

छत्तीसगड विधानसभेची नवीन इमारत हरीत इमारत संकल्पनेवर बांधण्यात आली असून, पूर्णपणे सौर ऊर्जेवर आधारित अशी तिची निर्मिती आहे, शिवाय त्यात पावसाचे पाणी साठवण्याची प्रणाली तयार करण्यात आली आहे.

***

माधुरी पांगे/शैलेश पाटील/सुरेखा जोशी/तुषार पवार/राज दळेकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2185253) Visitor Counter : 14