पंतप्रधान कार्यालय
'ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो' स्वीकार केल्यानंतर पंतप्रधानांचे भाषण
Posted On:
04 JUL 2025 10:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जुलै 2025
नमस्कार,
सर्वांना शुभ सकाळ,
अध्यक्ष क्रिस्टीन कंगालू जी,
पंतप्रधान कमला पर्साद-बिसेसर जी
मान्यवर पाहुणे,
'ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो' हा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान मला बहाल केल्याबद्दल मी तुमचे, तुमच्या सरकारचे आणि तुमच्या लोकांचे मनापासून आभार व्यक्त करतो.
हा सन्मान आपल्या दोन्ही राष्ट्रांमधील शाश्वत आणि सखोल मैत्रीचे प्रतीक आहे. 140 कोटी भारतीयांच्या वतीने मी हा सन्मान एक अभिमान म्हणून स्वीकारतो.
मित्रांनो,
हा सन्मान प्रथमच एखाद्या परदेशी नेत्याला दिला जात आहे, हे आमच्या विशेष नातेसंबंधाची खोली दर्शवते. हा बंध आपल्या सामायिक इतिहास आणि सांस्कृतिक वारशात रुजलेला आहे.
180 वर्षांपूर्वी भारतातून इथे आलेल्यांनी आपल्या मैत्रीचा पाया रचला. ते रिकाम्या हाताने आले असले तरी त्यांचे मन भारतीय सभ्यता, संस्कृती आणि विविधतेने समृद्ध होते. त्यांनी पेरलेली सुसंवाद आणि सद्भावनेची बीजे आता त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या प्रगती आणि समृद्धीच्या रूपात फुलत आहेत.
भारतीय समुदायाने आजपर्यंत आपल्या सामायिक परंपरा, संस्कृती आणि चालीरीती जपल्या आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे. राष्ट्रपती कंगालू जी आणि पंतप्रधान कमला जी हे या समुदायाचे सर्वात मोठे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत. दोन्ही देशांमधील सांस्कृतिक देवाणघेवाण प्रत्येक टप्प्यावर दिसून येते.
मित्रांनो,
राष्ट्रपती कांगालू यांचे पूर्वज हे संत तिरुवल्लुवर यांची भूमी असलेल्या तामिळनाडूचे रहिवासी होते. हजारो वर्षांपूर्वी संत तिरुवल्लुवर म्हणाले होते:
पडई कुडी कूळ् अमईच्चु नट्परन् आरुम्
उडैयान् अरसरुळ् एरु
म्हणजेच, मजबूत राष्ट्राकडे सहा गोष्टी असायला पाहिजेत : एक पराक्रमी सेना, देशभक्त नागरिक, संसाधने, चांगले लोकप्रतिनिधी, एक मजबूत संरक्षण प्रणाली... आणि सदैव पाठीशी उभे राहणारी मैत्रीपूर्ण देश. त्रिनिदाद आणि टोबॅगो हे भारतासाठी एक मैत्रीपूर्ण देश आहे.
आपल्या नात्यात क्रिकेटचा थरार आणि त्रिनिदादच्या मिरचीचा स्वाद आहे. जेव्हा ‘कॅलिप्सो’ चे सूर तबल्याच्या तालासोबत मिळतात, तेव्हा आपले नाते आणखी मधुर होते. आपल्या दोन्ही संस्कृतींमधील सखोल सामंजस्य हे आपल्या नात्याचे मोठे सामर्थ्य आहे.
मित्रांनो,
या सन्मानाला मी आपल्या नातेसंबंधासाठी एक जबाबदारी म्हणून पाहतो. एक जवळचा आणि विश्वासू भागीदार म्हणून आम्ही नेहमीच त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या लोकांसाठी कौशल्य विकास आणि क्षमता बांधणी करण्यावर भर दिला आहे. भारतासाठी, त्रिनिदाद आणि टोबॅगो हा केवळ कॅरिकोम मधील नाही तर जागतिक स्तरावर देखील एक महत्त्वाचा भागीदार आहे.
संपूर्ण ग्लोबल साउथसाठी आमचे सहकार्य महत्त्वाचे आहे. दोन सशक्त लोकशाही म्हणून आम्ही दोन्ही देशांच्या लोकांच्या आणि संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी एकत्र काम करत राहू.
महामहिम,
पुन्हा एकदा, 140 कोटी भारतीयांच्या वतीने मी या सन्मानाबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. हा सन्मान आम्हाला प्रत्येक क्षेत्रात नवीन उंची गाठण्यासाठी प्रेरणा देत राहील.
खूप खूप धन्यवाद.
* * *
सुवर्णा बेडेकर/नेहा कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2170099)
Visitor Counter : 10
Read this release in:
Punjabi
,
Urdu
,
Bengali
,
Assamese
,
Telugu
,
Malayalam
,
English
,
हिन्दी
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada