पंतप्रधान कार्यालय
उत्तर प्रदेशात वाराणसी येथे विकास कामांच्या पायाभरणी आणि उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
Posted On:
02 AUG 2025 3:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 ऑगस्ट 2025
नम: पार्वती पतये, हर हर महादेव, श्रावणाच्या पवित्र महिन्यात आज मला काशीतील माझ्या कुटुंबातील लोकांना भेटण्याची संधी मिळाली आहे. काशीतील माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला माझा नमस्कार.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य जी, ब्रजेश पाठक जी, पटणा येथून आपल्याबरोबर सहभागी झालेले कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान जी, देशातील विविध भागांमधून आपल्याबरोबर सहभागी झालेले सर्व आदरणीय मुख्यमंत्रीगण, राज्यपाल, मंत्रीगण, उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्रिगण, उत्तर प्रदेश भाजपा अध्यक्ष भूपेन्द्र सिंह चौधरी जी, सर्व आमदार आणि लोकप्रतिनिधीगण आणि माझ्या प्रिय शेतकरी बंधू आणि भगिनींनो आणि विशेषतः काशीमधील माझे जनता जनार्दन!
आज आपण काशीमधून देशभरातील लाखो शेतकऱ्यांशी जोडले गेलो आहोत. श्रावण महिना सुरु आहे, काशीसारखे पवित्र स्थान आहे आणि देशातील शेतकऱ्यांशी जोडले जाण्याची संधी आहे, यापेक्षा मोठे भाग्य काय असू शकते? आज मी ऑपरेशन सिंदूर नंतर प्रथमच काशीला आलो आहे. 22 एप्रिल रोजी जेव्हा पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला तेव्हा 26 निष्पाप लोकांना इतक्या क्रूरपणे मारण्यात आले , त्यांच्या कुटुंबांचे दुःख, त्या मुलांचे दुःख, त्या मुलींच्या वेदना पाहून माझे हृदय हेलावून गेले होते. तेव्हा मी बाबा विश्वनाथांना प्रार्थना करत होतो की सर्व पीडित कुटुंबांना हे दुःख सहन करण्याची हिंमत द्या. काशीच्या माझ्या स्वामींनो, माझ्या लेकींच्या कपाळावरचे कुंकू पुसणाऱ्यांचा बदला घेण्याचे जे वचन मी दिले होते ते देखील पूर्ण झाले आहे. हे केवळ महादेवाच्या आशीर्वादामुळेच शक्य झाले आहे. ऑपरेशन सिंदूरचे यश मी त्यांच्या चरणी अर्पण करतो.
मित्रहो,
आजकाल, काशीमध्ये जेव्हा गंगाजल घेऊन जाणाऱ्या शिवभक्तांची दिव्य छायाचित्रे पाहण्याची संधी मिळते, आणि विशेषतः श्रावणाच्या पहिल्या सोमवारी,जेव्हा आपले यादव बंधू बाबांचा जलाभिषेक करण्यासाठी निघायचे, गौरी केदारेश्वर मधून खांद्यावर गंगाजल घेऊन जाणाऱ्या यादव बंधूंचा समूह, किती विहंगम दृश्य असते. डमरूचा आवाज, गल्ल्यांमध्ये कोलाहल, एक अद्भुत भाव विश्व निर्माण होते. माझीही खूप इच्छा होती की श्रावणाच्या पवित्र महिन्यात बाबा विश्वनाथ आणि मार्कण्डेय महादेवाचे दर्शन घ्यावे. मात्र तिथे गेल्यामुळे महादेवाच्या भक्तांची गैरसोय होऊ नये, त्यांच्या दर्शनात अडथळा येऊ नये म्हणून मी आज इथूनच भोलेनाथ आणि गंगामातेला नमस्कार करतो. सेवापुरीच्या या मंचावरून मी बाबा काशी विश्वनाथ यांना प्रणाम करतो. नम: पार्वती पतये, हर हर महादेव!
मित्रहो,
काही दिवसांपूर्वी मी तामिळनाडूमध्ये होतो, मी तिथल्या एक हजार वर्ष जुन्या गंगई-कोंडा चोलापुरम या ऐतिहासिक मंदिरात गेलो होतो , हे मंदिर देशातील शैव परंपरेचे एक प्राचीन केंद्र आहे. हे मंदिर आपल्या देशातील महान आणि प्रसिद्ध राजे राजेन्द्र चोल यांनी बांधले होते. राजेंद्र चोल यांनी उत्तर भारतातून गंगाजल मागवून उत्तरेला दक्षिणेशी जोडले होते. हजार वर्षांपूर्वी आपली शिवभक्ती आणि शैव परंपरेच्या माध्यमातून राजेंद्र चोल यांनी ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ चा उद्घोष केला. आज काशी-तमिळ संगमम् सारख्या प्रयत्नांच्या माध्यमातून आम्ही ते पुढे नेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. आणि मी अलिकडेच जेव्हा गंगई-कोंडा चोलापुरम येथे गेलो होतो, तेव्हा माझ्यासाठी समाधानाची गोष्ट होती ती म्हणजे एक हजार वर्षांनंतर तुमच्या आशिर्वादाने मी देखील गंगाजल घेऊन तिकडे गेलो होतो. गंगामातेच्या आशिर्वादाने अतिशय पवित्र वातावरणात तिथे पूजा पार पडली. गंगाजलाने तिथे जलाभिषेक करण्याचे भाग्य लाभले.
मित्रहो,
आयुष्यात असे प्रसंग मोठी प्रेरणा देतात. देशाची एकताच प्रत्येक बाबतीत एक नवी चेतना जागृत करते आणि म्हणूनच ऑपरेशन सिंदूर यशस्वी होते. 140 कोटी देशवासीयांची एकता ऑपरेशन सिंदूरची ताकद बनते.
मित्रहो,
ऑपरेशन सिंदूर हा जवानांच्या शौर्याचा क्षण आणि आज शेतकऱ्यांना प्रणाम करण्याची संधी . आज येथे एक भव्य शेतकरी महोत्सव आयोजित केला जात आहे.
देशातील 10 कोटी शेतकरी बंधू-भगिनींच्या खात्यांमध्ये 21 हजार कोटी रुपये पीएम किसान सम्मान निधी स्वरूपात हस्तांतरित करण्यात आले आहेत. आणि जेव्हा काशीमधून धन मिळते ना तेव्हा तो एक प्रकारे प्रसाद बनून जातो. 21 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले.
मित्रहो,
आज येथे 2 हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करण्यात आली आहे. बाबांच्या आशीर्वादाने काशीमध्ये विकासाचा अखंड प्रवाह गंगामातेसोबत पुढे जात आहे. मी तुम्हा सर्वांचे, देशातील शेतकऱ्यांचे खूप-खूप अभिनंदन करतो. काही दिवसांपूर्वीच काशीमध्ये खासदार पर्यटक मार्गदर्शक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. म्हणजेच स्पर्धेच्या माध्यमातून कौशल्य विकास, स्वयंप्रयत्नांच्या माध्यमातून कौशल्य विकास, याचे अनेक प्रयोग आज काशीच्या भूमीवर होत आहेत. येत्या काही दिवसांमध्ये काशी खासदार छायाचित्रण स्पर्धा आणि खासदार रोजगार मेळा यांसह अनेक कार्यक्रमही होणार आहेत. मी इथल्या सर्व सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे जाहीरपणे खूप-खूप अभिनंदन करतो, ते लोकसहभागात युवा पिढीला सामील करून असे अद्भुत कार्यक्रम तयार करत आहेत आणि यशस्वीपणे त्याची अंमलबजावणी करत आहेत, या कामात सहभागी सर्व अधिकारी देखील अभिनंदनासाठी पात्र आहेत. जे या स्पर्धेत सहभागी होत आहेत त्यांना देखील माझ्याकडून खूप-खूप शुभेच्छा.
मित्रहो,
आमचे सरकार शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी सातत्याने काम करत आहे. यापूर्वीच्या सरकारांच्या काळात शेतकऱ्यांसाठी केलेली एखादी घोषणा देखील पूर्ण करणे कठीण असायचे. याउलट, भाजपा सरकार जी आश्वासने देते ती पूर्ण करून दाखवते. आज पीएम-किसान सन्मान निधी हा सरकारच्या वचनबद्धतेचे उदाहरण बनला आहे.
बंधू आणि भगिनींनो,
तुम्हाला आठवत असेल, 2019 मध्ये जेव्हा पीएम-किसान सम्मान निधी सुरु झाला होता तेव्हा सपा-काँग्रेस सारखे विकास विरोधी लोक , विकास विरोधी पक्ष किती अफवा पसरवत होते? लोकांची दिशाभूल करत होते. शेतकऱ्यांना गोंधळात टाकत होते , कोणी म्हणायचे, मोदींनी योजना आणली खरी, मात्र 2019 च्या निवडणुका होऊन जातील आणि हे सर्व बंद होईल. एवढेच नाही तर मोदींनी आता जे पैसे जमा केले आहेत, ते देखील परत घेतील.
किती खोटे सांगता आणि हेच देशाचे दुर्भाग्य आहे की निराशेच्या खाईत बुडालेले, विरोधी मानसिकता असणारे हे लोक अशा खोट्या धारणा घेऊन जगत आहेत. हे शेतकऱ्यांशी,देशातल्या लोकांशी खोटे बोलू शकतात.आपण मला सांगा, इतक्या वर्षात कधी एक तरी हप्ता बंद झाला का ? पीएम सन्मान किसान निधी कोणत्याही खंडाविना सुरु आहे.आतापर्यंत पावणेचार लाख कोटी रुपये, ही रक्कम लक्षात ठेवा, पावणेचार लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. जरा माझ्यासमवेत म्हणा,किती रुपये, पावणेचार लाख कोटी रुपये. किती ? किती ? किती ? आणि हे पावणेचार लाख कोटी रुपये, इतके रुपये कोणाच्या खात्यात जमा झाले ? कोणाच्या खात्यात जमा झाले ? माझ्या शेतकरी बंधू-भगिनींच्या खात्यात जमा झाले. इथे उत्तर प्रदेशातही सुमारे अडीच कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे.उत्तर प्रदेशातल्या शेतकऱ्यांना या योजनेचे 90 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे पाठवण्यात आले आहेत. इतकेच नव्हे तर माझ्या काशीमधल्या शेतकऱ्यांनाही सुमारे 900 कोटी रुपये मिळाले आहेत.आपण असा खासदार निवडून दिला की आपल्या खात्यात 900 कोटी रुपये आले आहेत आणि यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे कोणत्याही कमिशन, मध्यस्थ याशिवाय,पैशाची लाटालाटी नाही,हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले आहेत आणि मोदींनी ही कायमस्वरूपी व्यवस्था केली आहे. पैसा मधल्यामध्ये गहाळ होणार नाही, गरीबांचा हक्क हिरावला जाणार नाही.
मित्रहो,
जो जितका मागास,त्याला तितकेच जास्त प्राधान्य !जो जितका मागास त्याला सर्वात जास्त प्राधान्य ! हा मोदींचा विकासाचा मंत्र आहे.या महिन्यात केंद्र सरकारने एका आणखी मोठ्या योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना.या योजनेसाठी,24 हजार कोटी रुपये,शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी,कृषी व्यवस्थेसाठी,कृषी विकासासाठी 24 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येतील.
देशातले असे जिल्हे जे मागच्या सरकारांच्या अयोग्य धोरणांमुळे विकासाच्या मार्गात मागे राहिले होते,मागे पडले होते,जिथे कृषी उत्पादनही कमी होत आहे,जिथे शेतकऱ्यांचे उत्पन्नही कमी आहे, अहो, त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नव्हते, अशा जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेचा भर राहील. उत्तर प्रदेशातल्या लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा होईल.
मित्रहो,
शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी,त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी,शेतीवरचा खर्च कमी करण्यासाठी एनडीए सरकार सर्व सामर्थ्यानिशी काम करत आहे,संपूर्ण ताकदीनिशी काम करत आहे. बियाण्यापासून ते बाजारापर्यंत आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत.शेतांपर्यंत पाणी पोहोचावे यासाठी देशात लाखो कोटी रुपयांच्या सिंचन योजना सुरु आहेत.
मित्रहो,
शेतकऱ्यांच्या समोर एक मोठे आव्हान असते ते म्हणजे हवामान,कधी जास्त पाऊस,कधी गारपीट.यापासून शेतकऱ्यांना संरक्षण मिळावे यासाठी पीएम पिक विमा योजना सुरु करण्यात आली. या योजनेंतर्गत रक्कम लक्षात ठेवा,या विमा योजनेंअंतर्गत आतापर्यंत पावणेदोन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम दाव्यापोटी शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. विम्याच्या माध्यमातून पावणेदोन लाख कोटी रुपये.किती ? सांगा, किती ? पावणेदोन लाख कोटी रुपये.
मित्रहो,
आपल्याला आपल्या शेतमालाचा योग्य भाव मिळावा याची सुनिश्चितीही आमचे सरकार करत आहे.यासाठी पिकांच्या आधारभूत किमतीमध्ये विक्रमी वृद्धी झाली आहे.धान आणि गहू यासारख्या मुख्य पिकांच्या आधारभूत किंमतीतही वाढ करण्यात आली आहे.आपला शेतमाल सुरक्षित राहावा यासाठी सरकारने देशभरात हजारो नवी गोदामेही बांधली आहेत.
बंधू-भगिनीनो,
कृषी अर्थव्यवस्थेमध्ये महिलांची भागीदारी वाढविण्यावरही आमचा भर आहे. आम्ही लखपती दीदी अभियान चालवीत आहोत. देशात तीन कोटी लखपती दीदी घडविण्याचे आमचे लक्ष्य आहे. तीन कोटी लखपती दीदी. हे सपावाले तर आकडा ऐकताच सायकलसह पळून जातील.आतापर्यंत दीड कोटीपेक्षा जास्त लखपती दीदी बनल्या आहेत.तीन कोटी या लक्ष्याच्या निम्मे लक्ष्य आम्ही साध्य केले आहे. गावांमध्ये काम करणाऱ्या गरीब कुटुंबातल्या,शेतकरी कुटुंबातल्या आमच्या भगिनी,दीड कोटी भगिनी लखपती दीदी बनणे हे अतिशय मोठे काम होत आहे. सरकारच्या ड्रोन दीदी अभियानामुळेही लाखो भगिनींच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.
मित्रहो,
आमचे सरकार कृषी क्षेत्राशी संबंधित आधुनिक संशोधन शेतांपर्यंत पोहोचविण्यासाठीही काम करत आहे. यासाठी मे आणि जून महिन्यात विशेष कृषी संकल्प अभियान प्रामुख्याने राबविण्यात आले.प्रयोगशाळेतले संशोधन प्रत्यक्ष शेतापर्यंत पोहोचविण्याच्या मंत्रासह सव्वा कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यात आला आहे. आपल्या देशात अशी व्यवस्थाही आहे की कृषी हा राज्यांच्या अखत्यारीतला विषय आहे मात्र तरीही भारत सरकारला वाटले, एनडीए सरकारला वाटले,मोदी सरकारला वाटले की भलेही हा विषय राज्य सरकारचा असो, राज्य करो न करो अशी अनेक राज्ये आहेत जी करू शकत नाहीत, तर आम्ही ठरवले की आम्हीही काही करू आणि कोट्यवधी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.
मित्रहो,
केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ आपणापर्यंत अखंड पोहोचत राहावा या संदर्भात मला आज आपणाला महत्वाची माहिती द्यायची आहे आणि त्यात मला आपली मदतही हवी आहे. इथे जमलेल्या लोकांची मदत हवी आहे.आपणाला माहिती आहे जनधन योजनेअंतर्गत देशात गरिबांची 55 कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत.जे कधी बँकांच्या दरवाज्यापर्यंतही पोहोचले नव्हते अशा 55 कोटी लोकांची खाती.मोदींना आपण जेव्हापासून आपणासाठी काम करायची संधी दिली आहे ना,मी हेच काम करत होतो,55 कोटी. या योजनेला नुकतीच 10 वर्षे पूर्ण झाली. बँकिंग क्षेत्राचे काही नियम आहेत,नियमानुसार 10 वर्षानंतर बँक खात्याची पुन्हा केवायसी करणे आवश्यक असते.एक प्रक्रिया पूर्ण करायची असते.आता आपण बँकेत जा,पूर्वी सर्व आपल्याला करावे लागत असे. आता आपला भार कमी करायचा मी प्रण केला आहे. तर मी बँकवाल्यांना सांगितले की लोक येतील, केवायसी करतील चांगली गोष्ट आहे.
आपण नागरिकांना नेहमी जागृत ठेवले पाहिजे. पण आपण एखादी मोहीम चालवू शकतो का? मी आज रिझर्व्ह बँक, आपल्या देशातील सर्व बँका, आणि बँकेच्या सर्व कर्त्याधर्त्यांचे मनापासून अभिनंदन करत आहे. आज त्यांनी असे एक काम केले आहे, ज्यामुळे आपल्याला अभिमान वाटत आहे. बँकेचे लोक या 10 कोटी लोकांना आणि 10 वर्षांनंतर या 55 कोटी लोकांना पुन्हा एकदा पुनरावलोकन करण्यास मदत करण्यासाठी, KYC (नो युअर कस्टमर) करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 1 जुलैपासून देशभरात एक मोठे अभियान राबवत आहेत. आपल्या बँका स्वतः प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचत आहेत. तिथे जाऊन शिबिरे आयोजित करत आहेत. आतापर्यंत अशा सुमारे एक लाख ग्रामपंचायतींमध्ये बँकांनी आपली शिबिरे, आपले मेळावे आयोजित केले आहेत. लाखो लोकांनी पुन्हा एकदा आपले KYC देखील करून घेतले आहे आणि ही मोहीम पुढेही चालू राहणार आहे. मी प्रत्येक अशा व्यक्तीला, ज्याचे जनधन खाते आहे, त्याला विनंती करेन की त्यांनी पुन्हा एकदा आपले KYC नक्की करून घ्यावे.
मित्रांनो,
ग्रामपंचायतींमध्ये बँका जी विशेष शिबिरे आयोजित करत आहेत, अजूनही लाखो पंचायतींमध्ये हे काम सुरू आहे. मला वाटते की या शिबिरांचा फायदा घेतला पाहिजे. आणि त्याचे अनेक फायदे आहेत, आणखी एक फायदा देखील आहे, या शिबिरांमध्ये, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना अशा अनेक योजनांची नोंदणी देखील होत आहे. आणि हा विमा तर असा आहे की, एका चहाच्या खर्चापेक्षाही कमी खर्च लागतो. या योजना तुम्हाला खूप मदत करतात. त्यामुळे बँकांनी जे इतके मोठे अभियान चालवले आहे, तुम्ही त्याचा खूप फायदा घ्या, मी संपूर्ण देशातील लोकांना सांगतो, तुम्ही या शिबिरांमध्ये जरूर जा. जर तुम्ही अजूनपर्यंत या योजनांशी जोडले गेला नसाल, तर त्यांच्यासाठी नोंदणी करा आणि आपल्या जनधन खात्याचे KYC देखील करून घ्या. मी भाजपा आणि एनडीएच्या सर्व प्रतिनिधींनाही सांगत आहे, की त्यांनी जास्तीत जास्त लोकांना या अभियानाबद्दल जागरूक करावे, बँकांशी बोलावे, शिबिर कधी आणि कुठे लागणार आहे? आपण काय मदत करू शकतो? आपण स्वतःहून बँकांच्या इतक्या मोठ्या कामात हातभार लावा, त्यांना मदत करा आणि जास्तीत जास्त लोकांना, जिथे कुठे शिबिर आयोजित होणार असेल, त्या भागातील लोकांना या मोहिमेत सहभागी करून घ्या.
मित्रांनो,
आज महादेवाच्या नगरीत विकास आणि जनकल्याणाची इतकी कामे झाली! शिव म्हणजे कल्याण! पण, शिवाचे एक रूप आणखी देखील आहे, शिवाचे एक रूप कल्याण आहे, शिवाचे दुसरे रूप आहे - रुद्र रूप! समोर जेव्हा दहशत आणि अन्याय असतो, तेव्हा आपले महादेव रुद्र रूप धारण करतात. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी जगाने भारताचे हेच रूप पाहिले आहे. भारतावर जो हल्ला करेल, तो पाताळातही वाचणार नाही.
पण बंधू-भगिनींनो,
दुर्दैवाने, ऑपरेशन सिंदूरच्या यशाविषयी आपल्या देशातील काही लोकांना देखील पोटदुखी झाली आहे. हा काँग्रेस पक्ष आणि त्यांचे चेले चपाटे, त्यांचे मित्र, या गोष्टीला पचवू शकत नाहीत, की भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी ठिकाणांना उद्ध्वस्त केले आहे. मी माझ्या काशीच्या मालकांना विचारत आहे. भारताच्या ताकदीचा तुम्हाला अभिमान वाटतो की नाही? ऑपरेशन सिंदूरचा अभिमान वाटतो की नाही? दहशतवाद्यांच्या तळांचा नाश केल्याचा तुम्हाला अभिमान वाटतो की नाही?
मित्रांनो,
तुम्ही ते फोटो पाहिले असतील, कसे आपल्या ड्रोन्सनी, आपल्या क्षेपणास्त्रांनी अचूक हल्ला करून दहशतवाद्यांच्या मुख्यालयांचे भग्नावशेष बनवून टाकले. पाकिस्तानचे अनेक हवाई तळ तर आजही ICU मध्ये आहेत. पाकिस्तान दुःखी आहे, हे तर सगळेच समजू शकतात, पण पाकिस्तानचे हे दुःख काँग्रेस आणि सपाला सहन होत नाहीये, तिकडे दहशतवादाचा म्होरक्या रडतो, इकडे काँग्रेस-सपा वाले दहशतवाद्यांची अवस्था पाहून रडतात.
मित्रांनो,
काँग्रेस, आपल्या सैनिकांच्या पराक्रमाचा सतत अपमान करत आहे. काँग्रेसने ऑपरेशन सिंदूरला 'तमाशा' म्हटले आहे. तुम्ही मला सांगा, सिंदूर कधीही तमाशा असू शकतो का? असू शकतो का? सिंदूरला तमाशा कोणी म्हणू शकतो का? आपल्या सैन्याचा पराक्रम, आणि बहिणींच्या सिंदूरचा बदला तमाशा म्हणण्याचे हे धाडस, हा निलाजरेपणा.
बंधू-भगिनींनो,
मतपेढी आणि तुष्टीकरणाच्या या राजकारणात ही समाजवादी पार्टी देखील मागे नाही. हे सपाचे नेते संसदेत म्हणत होते, पहलगामच्या दहशतवाद्यांना आताच का मारले? आता सांगा. मी त्यांना फोन करू का? सपावाल्यांना विचारू का, मारू की नको? कोणीतरी मला सांगा, सामान्य बुद्धीने सांगा. दहशतवाद्यांना मारण्यासाठी देखील वाट पाहिली पाहिजे का? त्यांना पळायला संधी द्यायची होती का? हे तेच लोक आहेत, जे यूपीमध्ये जेव्हा सत्तेत होते, तेव्हा दहशतवाद्यांना क्लीन चीट देत होते. बॉम्बस्फोट करणाऱ्या दहशतवाद्यांवरील खटले मागे घेत होते. आता त्यांना दहशतवादी मारले गेल्याने त्रास होत आहे. त्यांना ऑपरेशन सिंदूरच्या नावाने त्रास होत आहे. मी या लोकांना काशीच्या भूमीवरून सांगू इच्छितो. हा नवा भारत आहे. हा नवा भारत भोलेनाथाला देखील पूजतो आणि देशाच्या शत्रूंसमोर काळभैरव बनायचे देखील जाणतो.
मित्रांनो,
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी भारताच्या स्वदेशी शस्त्रास्त्रांची ताकद संपूर्ण जगाने पाहिली आहे. आपली एअर डिफेन्स सिस्टिम, आपली स्वदेशी क्षेपणास्त्रे, स्वदेशी ड्रोन्स, यांनी आत्मनिर्भर भारताची ताकद सिद्ध केली आहे. विशेषतः, आपल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राची दहशत भारताच्या प्रत्येक शत्रूच्या मनात बसली आहे. पाकिस्तानात असाच कुठे तरी ब्राह्मोसचा आवाज आला ना, तर झोप लागत नाही.
माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो,
मी यूपीचा खासदार आहे. यूपीचा खासदार म्हणून मला आनंद आहे की त्या ब्राह्मोस क्षेपणास्त्रे आपल्या यूपीमध्ये देखील बनणार आहेत. लखनौमध्ये ब्राह्मोस क्षेपणास्त्राचे manufacturing सुरू होत आहे. यूपी डिफेन्स कॉरिडोरमध्ये देखील अनेक मोठ्या डिफेन्स कंपन्या आपले कारखाने उभारत आहेत.
आगामी काळात उत्तर प्रदेशात बनलेली शस्त्रे, भारताच्या प्रत्येक भागात बनलेली शस्त्रे, भारतीय सैन्याचे सामर्थ्य बनतील. मित्रांनो, जेव्हा तुम्ही या आत्मनिर्भर लष्करी शक्तीबद्दल ऐकता तेव्हा तुम्हाला अभिमान वाटतो की नाही? पूर्ण ताकदीने हात वर करा आणि मला सांगा, तुम्हाला अभिमान वाटतो की नाही? तुम्हाला अभिमान आहे की नाही, बोला हर हर महादेव. जर पाकिस्तानने पुन्हा कोणतेही पापकर्म केले तर उत्तर प्रदेशात बनलेली क्षेपणास्त्रे दहशतवाद्यांचा नायनाट करतील.
मित्रांनो,
आज उत्तर प्रदेश औद्योगिकदृष्ट्या इतक्या वेगाने विकसित होत आहे, देश आणि जगातील मोठ्या कंपन्या येथे गुंतवणूक करत आहेत, यामागे भाजप सरकारच्या विकास धोरणांचा मोठा वाटा आहे. सपा सरकारच्या काळात उत्तर प्रदेशात गुन्हेगार निर्भय होते आणि गुंतवणूकदार येथे येण्यास घाबरत होते. परंतु भाजप सरकार असताना गुन्हेगार घाबरतात आणि गुंतवणूकदारांना उत्तर प्रदेशच्या भविष्यात खात्री दिसते. विकासाच्या या गतीबद्दल मी उत्तर प्रदेश सरकारचे अभिनंदन करतो.
मित्रांनो,
काशीमध्ये विकासाचा महायज्ञ सुरू आहे याबद्दल मला आनंद वाटतो. आजपासून सुरू झालेले रेल्वे ओव्हर ब्रिज, जलजीवन मिशनशी संबंधित प्रकल्प, काशीतील शाळांची पुनर्बांधणी, होमिओपॅथिक कॉलेजचे बांधकाम, मुन्शी प्रेमचंद यांचा वारसा जतन करणे, ही सर्व कामे भव्य काशी, दिव्य काशी, समृद्ध काशी आणि माझी काशी यांच्या उभारणीला गती देतील. येथे सेवापुरीला येणे ही देखील भाग्याची गोष्ट आहे. हे माँ कालका देवीचे प्रवेशद्वार आहे. येथून मी माँ कालकाच्या चरणी नतमस्तक होतो.
आमच्या सरकारने माँ कालका धामचे सौंदर्यीकरण केले आहे आणि ते अधिक भव्य केले आहे याचा मला आनंद आहे. मंदिरातील येणे-जाणे देखील यामुळे सोपे झाले आहे. सेवापुरीचा इतिहास क्रांतीचा इतिहास आहे. येथील अनेक लोकांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. ही तीच सेवापुरी आहे जिथे महात्मा गांधींचे स्वप्न साकार झाले. येथे प्रत्येक घरातील महिला आणि पुरुषांच्या हातात चरखा असे आणि योगायोग पहा, आता चांदपूर ते भदोही रोड सारख्या प्रकल्पांमुळे भदोहीचे विणकर देखील काशीच्या विणकरांमध्ये सामील होत आहेत. याचा लाभ बनारसी रेशीम विणकरांनाही होईल आणि भदोहीच्या कारागिरांनाही होईल.
मित्रांनो,
काशी हे बुद्धिजीवींचे शहर आहे. आज जेव्हा आपण आर्थिक प्रगतीबद्दल बोलत आहोत, तेव्हा मी तुमचे लक्ष जागतिक परिस्थितीकडेही वेधू इच्छितो. आज जागतिक अर्थव्यवस्था अनेक चिंतांमधून जात आहे, अस्थिरतेचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत जगातील देश आपापल्या हितांवर लक्ष केंद्रित करत आहेत. ते आपल्या स्वतःच्या देशाच्या हितांवर लक्ष केंद्रित करत आहेत. भारत देखील जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. म्हणूनच भारताला देखील आपल्या आर्थिक हितांबद्दल सजग राहावे लागेल. आपले शेतकरी, आपले लघु उद्योग, आपल्या तरुणांचा रोजगार, त्यांचे कल्याण हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. सरकार या दिशेने सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पण देशाचे नागरिक म्हणून आपल्याही काही जबाबदाऱ्या आहेत. आणि हे फक्त मोदींनीच नव्हे तर भारतातील प्रत्येक व्यक्तीने हे प्रत्येक क्षणी आपल्या मनात म्हणत राहिले पाहिजे, इतरांना सांगत राहिले पाहिजे, ज्यांना देशाचे कल्याण हवे आहे, ज्यांना देशाला तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवायची आहे, असा कोणताही राजकीय पक्ष असो, कोणताही राजकारणी असो, त्यांना स्वतःचा संकोच बाजूला ठेवून देशाच्या हितासाठी प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी देशवासीयांमध्ये एक भावना जागृत करावी लागेल आणि ती म्हणजे - आपण स्वदेशीचा संकल्प करावा! आता आपण कोणत्या गोष्टी खरेदी करणार आहोत, कोणत्या तराजूने तोलणार आहोत.
माझ्या बंधूभगिनींनो, माझ्या देशबांधवांनो,
आता आपण जे काही खरेदी करू ते फक्त एकाच तराजूने तोलले पाहिजे, आपण अशा वस्तू खरेदी केल्या पाहिजेत ज्या बनविण्यासाठी कोणा भारतीयाचा घाम वाहिला आहे. आणि जी वस्तू भारतीयांनी बनवली आहे, भारतीयांच्या कौशल्याने बनली आहे, भारतीयांच्या घामाने बनली आहे. आपल्यासाठी ती स्वदेशी आहे. आपल्याला व्होकल फॉर लोकल, व्होकल फॉर लोकल हा मंत्र स्वीकारावा लागेल. चला आपण शपथ घेऊया की आपण फक्त मेक इन इंडिया उत्पादनांना प्रोत्साहन देऊ.
आपल्या घरी जे काही नवीन सामान येईल, मी नवीन वस्तूंबद्दल बोलत आहे. आपल्या घरी जे काही नवीन सामान येईल, ते फक्त स्वदेशी असेल, देशातील प्रत्येक नागरिकाला ही जबाबदारी घ्यावी लागेल. आणि आज मी माझ्या व्यापारी जगतातील बंधू आणि भगिनींना एक विशेष विनंती करू इच्छितो, मी माझ्या दुकानदार बंधू आणि भगिनींना विनंती करू इच्छितो की, जेव्हा जग अशा अस्थिरतेच्या वातावरणातून जात आहे, तेव्हा आपणही, मग तो व्यवसाय असो, छोटे दुकान असो किंवा कामकाज असो. आता आपण आपल्या ठिकाणाहून फक्त आणि फक्त स्वदेशी वस्तू विकू.
मित्रांनो,
स्वदेशी उत्पादने विकण्याचा हा संकल्प देशाची खरी सेवा असेल. येणारे महिने सणांचे महिने आहेत. दिवाळी येईल, नंतर लग्नाचा काळ येईल. आता आपण प्रत्येक क्षणी स्वदेशीच खरेदी करूया. जेव्हा मी देशवासियांना सांगितले होते की, भारतात लग्न करा. आता परदेशात जाऊन लग्न करून देशाची संपत्ती वाया घालवू नका. आणि मला आनंद आहे की अनेक तरुणांनी मला पत्र लिहिले होते की आमच्या कुटुंबाने परदेशात लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण तुमचे ऐकल्यानंतर, आम्ही आता तेथील सर्व काही रद्द केले आहे, काही खर्चही झाला आहे. पण आता आम्ही भारतातच लग्न करणार आहोत. आमच्याकडेही खूप चांगली ठिकाणे आहेत, जिथे लग्ने होऊ शकतात. प्रत्येक गोष्टीतील स्वदेशीची भावना आगामी काळातील आपले भविष्य निश्चित करणार आहे. मित्रांनो, आणि ही महात्मा गांधींना एक उत्तम श्रद्धांजली देखील असेल.
मित्रांनो,
सर्वांच्या प्रयत्नांनीच विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होईल. आजच्या विकासकामांबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन करतो आणि भविष्यात जर आपण व्होकल फॉर लोकल खरेदी केले तर आपण स्वदेशी खरेदी करू, जर आपण आपली घरे सजवली तर आपण त्यांना स्वदेशीने सजवू, जर आपण आपले जीवन सुधारले तर आपण त्यांना स्वदेशीने सुधारू. चला या मंत्राने पुढे जाऊया. खूप खूप धन्यवाद. माझ्यासोबत बोला हर हर महादेव.
* * *
जयदेवी पुजारी स्वामी/सुषमा काणे/निलिमा चितळे/शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
(Release ID: 2168519)
Visitor Counter : 11
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam