माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत दक्षिण कोरियात बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025 मध्ये आपल्या कलात्मक कौशल्याचे प्रदर्शन करणार; राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्या नेतृत्वाखालील भारताचे पहिलेच मंत्रीस्तरीय शिष्टमंडळ बीआयएफएफमध्ये सहभागी होणार


बीआयएफएफ 2025 मध्ये भारताची आतापर्यंतची सर्वात मोठी कामगिरी, ज्यात 10 चित्रपट प्रदर्शित होणार; 5 भारतीय प्रकल्पांची एसीएफएम, आशियायी आशय आणि फिल्म मार्केटमध्ये सह-निर्मिती मार्केटसाठी निवड

बीआयएफएफ 2025 मध्ये सहभाग, सह-निर्मितीचा विस्तार, एवीजीसी (AVGC) संधींना चालना आणि दक्षिण कोरियासोबत सांस्कृतिक संबंध दृढ करण्याचा भारताचा संकल्प दर्शवतो

भारत पॅव्हेलियनमधील ‘वेव्हज (WAVES) बाजार’ भारतीय निर्मात्यांना जागतिक बाजारपेठांशी जोडणार आणि सह-निर्मिती व एवीजीसीसाठी असलेल्या सवलतींवर प्रकाश टाकणार

'भारत पर्व' आणि भारतीय चित्रपट बुसानमध्ये भारताची संस्कृती आणि सर्जनशीलता साजरी करणार; धोरणात्मक चर्चा आणि सामंजस्य करार भारत-कोरिया एवीजीसी आणि चित्रपट सह-निर्मितीचा पाया अधिक मजबूत करणार

Posted On: 16 SEP 2025 4:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 सप्टेंबर 2025

दक्षिण कोरियामधील बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (बीआयएफएफ) 2025 आणि एशियन कंटेंट्स अँड फिल्म मार्केट (एसीएफएम) येथे माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, यांच्या नेतृत्वाखालील उच्च-स्तरीय शिष्टमंडळासह भारत, आपला महत्त्वाचा ठसा उमटवण्यासाठी सज्ज आहे. हे भारताकडून बीआयएफएफमध्ये जाणारे पहिलेच मंत्रीस्तरीय शिष्टमंडळ असणार आहे. हे शिष्टमंडळ सांस्कृतिक मुत्सद्देगिरी बळकट करणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्जनशील सहकार्याचा विस्तार करणे आणि भारताला सर्जनशील अर्थव्यवस्थेचे जागतिक केंद्र म्हणून स्थापित करण्याची भारताची वचनबद्धता दर्शवते.

या शिष्टमंडळात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, एनएफडीसी, फिक्की, एफटीआयआय, एसआरएफटीआईआय (SRFTII), आणि आयआयएमसी (IIMC) चे प्रतिनिधी तसेच ‘वेव्हज बाजार’ उपक्रमातील निवडक निर्मात्यांचा समावेश असेल.

या भेटीपूर्वी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन म्हणाले,"आशियाई आणि जागतिक सिनेमातील उत्कृष्ट कलाकृती एकत्र आणणाऱ्या बीआयएफएफ 2025 मध्ये सहभागी झाल्याचा भारताला अभिमान आहे. आमची उपस्थिती सह-निर्मितीचा विस्तार करण्याचा, एवीजीसीमध्ये नवीन संधी निर्माण करण्याचा आणि दक्षिण कोरियासोबत सांस्कृतिक संबंध मजबूत करण्याचा भारताचा दृढनिश्चय दर्शवते. 'वेव्हज बाजार'आणि 'भारत पर्व' च्या माध्यमातून, आम्ही केवळ आपली सर्जनशील अर्थव्यवस्थाच नव्हे, तर भारताचा कालातीत वारसा आणि प्रतिभेचेही दर्शन घडवणार आहोत.”

भारताच्या सहभागाची प्रमुख वैशिष्ट्ये

बीआयएफएफ आणि एसीएफएममधील भारत पॅव्हेलियन - ‘वेव्हज बाजार’ उपक्रमाला विशेष महत्त्व

‘इंडिया - क्रिएटिव्ह इकॉनॉमी फॉर द वर्ल्ड’ या संकल्पनेवर आधारित भारत पॅव्हेलियन बीआयएफएफ आणि एसीएफएम दोन्ही ठिकाणी उभारले जाईल. हे पॅव्हेलियन ‘वेव्हज बाजार’’ उपक्रमावर लक्ष केंद्रित करेल, ज्याचा उद्देश भारतीय आशय निर्माते, सृजनशीलकार आणि वितरकांना बीटूबी (B2B) बैठकांद्वारे जागतिक बाजारपेठांशी जोडणे हा आहे. एसीएफएमच्या अधिकृत कार्यक्रमाचा भाग म्हणून, ‘इंडिया-कोरिया सिनर्जीज: न्यू होरायझन्स इन को-प्रॉडक्शन’ या विषयावर दोन्ही देशांतील प्रमुख उद्योग प्रतिनिधी आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या सहभागासह एक पॅनेल चर्चा आयोजित केली जाईल.

बुसानमध्ये भारतीय सिनेमाचे प्रदर्शन

या वर्षी भारताचे प्रदर्शन आतापर्यंतचे सर्वात मोठे आहे, ज्यात भारतीय कथाकथनाची विविधता दर्शवणारे 10 पेक्षा जास्त चित्रपट आहेत:

'स्पायिंग स्टार्स' (पद्मश्री नीला माधव पांडा) - या चित्रपटाची उद्घाटनाच्या स्पर्धेत निवड.

'इफ ऑन अ विंटर नाइट' (संजू सुरेंद्रन); ‘कोक कोक कोकोक’ (महर्षी तुहिन कश्यप); ‘शेप ऑफ मोमो’ (त्रिबेनी राय) - हे 'व्हिजन एशिया' विभागात समाविष्ट आहेत.

इतर प्रकल्पांमध्ये 'बयान' (बिकास रंजन मिश्रा); 'डोन्ट टेल मदर' (अनूप लोकुर); 'फुल प्लेट' (तनिष्ठा चॅटर्जी); 'करिंजी' (शीतल एन.एस.); 'आय, पॉपी' (विवेक चौधरी) यांचा समावेश आहे.

आशियाई प्रकल्प बाजारपेठेत (ACFM) पाच भारतीय प्रकल्पांची सह-उत्पादन बाजारपेठेसाठी निवड करण्यात आली आहे:

• डिफिकल्ट डॉटर्स - सोनी राजदान दिग्दर्शित; आलिया भट्ट, शाहीन भट्ट, अॅलन मॅकअॅलेक्स आणि ग्रिष्मा शाह यांनी निर्मिती केली आहे.

• द लास्ट ऑफ देम प्लेग्स - कुंजिला मॅसिल्लामणी दिग्दर्शित; पायल कपाडिया, जिओ बेबी आणि कानी कुश्रुती यांनी निर्मिती केली आहे.

• लंका (द फायर) – सौरव राय दिग्दर्शित; सुदीप्ता साधुखान, विराज सेलोट आणि अंकिता पुरकायस्थ यांनी निर्मिती केली आहे.

• मून - दिग्दर्शन आणि निर्मिती प्रदीप कुरबा.

• द मॅजिकल मेन - दिग्दर्शक बिप्लब सरकार; भारतीय  आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांनी सह-निर्मिती केली आहे.

भारत पर्व - भारतीय संस्कृतीचा उत्सव

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारतीय कला, संगीत आणि पाककृतींचा समावेश असलेल्या  सांस्कृतिक संध्या अर्थात  "भारत पर्व" चे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम भारत आणि कोरियामधील लोकांमधील सखोल बंध आणि सांस्कृतिक संबंध निर्माण करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करेल, ज्यामध्ये भारतीय आणि कोरियन माध्यमे आणि मनोरंजन उद्योगातील अग्रणी सहभागी होतील.

धोरण संवाद आणि सहयोग

• भारत-कोरिया यांच्यात अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स आणि चित्रपट सह-निर्मिती आराखडा तयार करण्यासह  एक संरचित संवाद सुरू करण्यासाठी कोरिया प्रजासत्ताकच्या संस्कृती, क्रीडा आणि पर्यटन मंत्र्यांसह माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री यांच्या G2G अर्थात सरकार ते सरकार पातळीवरील बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे.

 • प्रशिक्षण, देवाणघेवाण कार्यक्रम आणि भारतीय सामग्री वितरणासाठी राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ, भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था, भारतीय तंत्रज्ञान संस्था(भारत) आणि KAFA, KOFIC, KOCCA यासारख्या कोरियन संस्था तसेच कोरियन OTT प्लॅटफॉर्म यांच्यात आशय पत्रावर  (LoIs)  स्वाक्षरी केली जाणार आहे.

बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि एशियन कंटेंट्स अँड फिल्म मार्केट बद्दल

बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (BIFF) हा आशियातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे, ज्याला आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्माते संघटनांच्या  महासंघाद्वारे भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) आणि कान चित्रपट महोत्सवासोबत मान्यता मिळाली आहे. तर एशियन कंटेंट्स अँड फिल्म मार्केट (एसीएफएम) हे एक प्रमुख सह-निर्मिती आणि वित्तपुरवठा व्यासपीठ म्हणून काम करते, जे चित्रपट निर्मात्यांना जागतिक गुंतवणूकदार आणि भागीदारांशी जोडते.

सुषमा काणे/भक्ती सोनटक्के/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2167186) Visitor Counter : 2