पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील पूर्णिया येथे सुमारे रु.40,000 कोटींच्या विकासकामांचे केले भूमिपूजन आणि उद्घाटन


पूर्णिया आता देशाच्या हवाई वाहतूक नकाशावर: पंतप्रधान

मी बिहारमधील जनतेला मखाना राष्ट्रीय मंडळाची स्थापना करण्याचे आश्वासन दिले होते, कालच केंद्र सरकारने त्याची अधिकृत अधिसूचना जारी केली: पंतप्रधान

भारतात, भारताचा कायदाच लागू होईल, घुसखोरांची मर्जी नाही आणि ही मोदींची गॅरंटी आहे: घुसखोरांवर कारवाई केली जाईल आणि देशाला त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील: पंतप्रधान

Posted On: 15 SEP 2025 10:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 सप्टेंबर 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील पूर्णिया येथे सुमारे रु. 40,000 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सर्वांना आदराने अभिवादन केले. पूर्णिया ही माँ पूर्ण देवी, भक्त प्रल्हाद आणि महर्षी मेही बाबा यांची भूमी असल्याचे त्यांनी सांगितले. या मातीने फणीश्वरनाथ रेणू आणि सतीनाथ भादुरी यांसारख्या साहित्यिक दिग्गजांना जन्म दिला आहे, असे मोदी यांनी अधोरेखित केले. त्यांनी पुढे सांगितले की, ही विनोबा भावे यांच्यासारख्या समर्पित कर्मयोग्यांची कर्मभूमी राहिली आहे आणि त्यांनी पुन्हा एकदा या भूमीबद्दल आपला आदर व्यक्त केला.

बिहारसाठी सुमारे रु. 40,000 कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजनाची घोषणा करताना  मोदी यांनी अधोरेखित केले की, रेल्वे, विमानतळ, वीज आणि पाणी यांसारख्या क्षेत्रातील हे प्रकल्प सीमांचलच्या आकांक्षा पूर्ण करण्याची साधने बनतील. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 40,000 पेक्षा जास्त लाभार्थ्यांना पक्की घरे मिळाली आहेत, असे ते म्हणाले. आज या 40,000 कुटुंबांच्या आयुष्यात एक नवीन सुरुवात झाली आहे. धनत्रयोदशी, दिवाळी आणि छठपूजेपूर्वी पक्क्या घरात प्रवेश करणे हे मोठे भाग्याचे आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांनी या सर्व कुटुंबांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.

आजचा हा कार्यक्रम आपल्या बेघर बंधू--भगिनींनाही एक दिवस पक्के घर मिळेल, याची ग्वाही देत आहे, असे सांगून पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, गेल्या 11 वर्षांत सरकारने गरिबांसाठी 4 कोटींहून अधिक पक्की घरे बांधून दिली आहेत. ते म्हणाले की, सरकार आता 3 कोटी नवीन घरे बांधण्याचे काम करत आहे. जोपर्यंत प्रत्येक गरीब नागरिकाला पक्के घर मिळत नाही, तोपर्यंत मोदी थांबणार नाहीत, असे  त्यांनी  ठामपणे सांगितले. त्यांनी सांगितले की, उपेक्षितांना प्राधान्य देणे आणि गरिबांची सेवा करणे हे त्यांच्या शासनाचे मूळ उद्दिष्ट आहे.

पंतप्रधान म्हणाले की, आज, अभियंता दिनानिमित्त , देश सर एम. विश्वेश्वरैया यांना अभिवादन करत आहे, आणि त्यांनी विकसित भारत आणि विकसित बिहार घडवण्यात अभियंत्यांची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली. त्यांनी देशभरातील सर्व अभियंत्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी सांगितले की, अभियंत्यांचे समर्पण आणि कौशल्य आजच्या कार्यक्रमातही दिसून येत आहे. पूर्णिया विमानतळाची टर्मिनल इमारत पाच महिन्यांपेक्षा कमी विक्रमी वेळेत बांधण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी टर्मिनलचे उद्घाटन आणि पहिल्या व्यावसायिक विमानाला हिरवा झेंडा दाखवला. "नवीन विमानतळाच्या उद्घाटनामुळे पूर्णिया आता देशाच्या हवाई वाहतुकीच्या नकाशावर आले आहे", असे पंतप्रधानांनी सांगितले. ते म्हणाले की, यामुळे पूर्णिया आणि सीमांचलला  देशातील प्रमुख शहरे आणि महत्त्वाच्या व्यावसायिक केंद्रांशी थेट दळणवळण  साधता येईल.

“आमचे सरकार संपूर्ण प्रदेशाला आधुनिक, हाय-टेक रेल्वे सेवांनी जोडत आहे”, असे  मोदी म्हणाले. त्यांनी आज एक वंदे भारत, दोन अमृत भारत आणि एक प्रवासी रेल्वेला  हिरवा झेंडा दाखवला. त्यांनी नवीन अररिया-गलगलिया रेल्वे लाईनचे उद्घाटन जाहीर केले आणि विक्रमशिला-कटारिया रेल्वे लाईनचे भूमिपूजन केले.

भारत सरकारने अलीकडेच बक्सर-भागलपूर हाय-स्पीड कॉरिडॉरच्या मोकामा-मुंगेर विभागाला मंजुरी देऊन आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे, याचा उल्लेख करत पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, यामुळे मुंगेर, जमालपूर आणि भागलपूरसारख्या औद्योगिक केंद्रांना मोठा फायदा होईल. त्यांनी पुढे सांगितले की, सरकारने भागलपूर-दुमका-रामपूरहाट रेल्वे लाईनच्या दुपदरीकरणालाही मंजुरी दिली आहे.

देशाच्या विकासासाठी बिहारचा विकास आवश्यक आहे, असे  मोदी म्हणाले. बिहारच्या प्रगतीसाठी पूर्णिया आणि सीमांचल प्रदेशाचा विकास महत्त्वाचा आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले. पंतप्रधानांनी सांगितले की, मागील सरकारांच्या कुशासनामुळे या प्रदेशाचे मोठे नुकसान झाले. त्यांनी सांगितले की, त्यांचे सरकार आता परिस्थिती बदलत आहे. या प्रदेशाला आता विकासाच्या केंद्रस्थानी ठेवले जात आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला.

बिहारला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगून पंतप्रधानांनी सांगितले की, भागलपूरच्या पीरपैंती येथे 2400 मेगावॉटच्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे. केंद्र आणि राज्य सरकारे शेतकरी आणि पशुपालकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कटिबद्ध आहेत, यावर त्यांनी भर दिला. मोदी यांनी कोसी-मेची आंतर-राज्य नदी जोडणी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या भूमिपूजनाची देखील घोषणा केली. या प्रकल्पामुळे पूर्व कोसी मुख्य कालव्याचा विस्तार होईल. या विस्ताराने लाखो हेक्टर शेतीसाठी सिंचन सुविधा उपलब्ध होईल आणि पुराच्या समस्येवर मात करण्यास मदत होईल. मखाना शेती ही बिहारच्या शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे साधन आहे, परंतु मागील सरकारांनी पीक आणि शेतकरी दोघांकडेही दुर्लक्ष केले, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, सध्याच्या सरकारने मखानाला योग्य ते  प्राधान्य दिले आहे.

"मी बिहारच्या लोकांना राष्ट्रीय मखाणा बोर्ड स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी घोषणा केली की केंद्र सरकारने कालच त्याच्या स्थापनेची अधिसूचना जारी केली आहे", असे पंतप्रधानांनी सांगितले. मखाणा शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा आणि या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढावा यासाठी मंडळ सतत काम करेल यावर त्यांनी भर दिला. मखाणा क्षेत्राच्या विकासासाठी सरकारने सुमारे 475 कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

बिहारच्या विकासाची आणि प्रगतीची सध्याची गती काही जणांसाठी अस्वस्थ करणारी आहे असे नमूद करून मोदी म्हणाले की, ज्यांनी अनेक दशके बिहारचे शोषण केले आणि इथल्या  मातीशी दगा केला ते आता बिहारमध्ये नवीन मापदंड प्रस्थापित होत आहेत, हे स्वीकारण्यास तयार नाहीत. पंतप्रधानांनी अधोरेखित केले की बिहारमधील प्रत्येक क्षेत्रात हजारो कोटी रुपयांचे विकास प्रकल्प सुरू झाले आहेत. 

राजगीरमध्ये हॉकी आशिया कपचे आयोजन, औंटा-सिमारिया पुलाचे ऐतिहासिक बांधकाम आणि मेड-इन-बिहार रेल्वे इंजिनांची आफ्रिकेत निर्यात यासारख्या प्रमुख कामगिरींचा त्यांनी उल्लेख केला. विरोधी नेत्यांना ही  कामगिरी पचवणे कठीण झाले आहे, असे ते म्हणाले. बिहार जेव्हा जेव्हा प्रगती करतो तेव्हा विरोधी पक्ष राज्याचा अपमान करतात याकडे त्यांनी लक्ष वेधले. अलिकडेच एका विरोधी पक्षाने सोशल मीडियावर बिहारची तुलना बिडीशी केली होती, जी खोलवर रुजलेली अवहेलना दर्शवते, असा संदर्भ त्यांनी दिला. घोटाळे आणि भ्रष्टाचार करून बिहारची प्रतिष्ठा खराब करण्याचा आरोप त्यांनी या पक्षांवर केला. आता राज्य प्रगती करत असताना पुन्हा बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. अशा मानसिकतेचे लोक बिहारच्या कल्याणासाठी कधीही काम करू शकत नाहीत यावर त्यांनी भर दिला. ज्यांना फक्त स्वतःची तिजोरी भरण्याची चिंता आहे, ते गरिबांच्या घरांची काळजी करू शकत नाहीत, असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी आठवण करून दिली की एका माजी पंतप्रधानांनी कबूल केले होते की सरकारने पाठवलेल्या प्रत्येक ₹1 पैकी 85  पैसे भ्रष्टाचारामुळे  जात असत.विरोधी पक्षाच्या राजवटीत कधी गरीबांपर्यंत पैसे थेट पोहोचले का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कोविड-19 महामारीपासून प्रत्येक गरीब नागरिकाला मोफत रेशन मिळत आहे यावर मोदींनी भर दिला. विरोधी पक्षाच्या सरकारांनी असे फायदे कधी दिले होते का ?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आता आयुष्मान भारत योजनेअंतर्गत प्रत्येक गरीब व्यक्तीला 5 लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार मिळू शकतात असे पंतप्रधानांनी पुढे नमूद केले. रुग्णालये बांधण्यात अपयशी ठरलेल्यांनी कधी असे आरोग्यसेवा लाभ उपलब्ध केले होते का ? असा प्रश्न त्यांनी विचारला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, विरोधी पक्ष केवळ बिहारच्या प्रतिष्ठेलाच नव्हे तर त्याच्या अस्मितेलाही धोका निर्माण करत असतात. सीमांचल आणि पूर्व भारतात बेकायदेशीर घुसखोरांमुळे निर्माण होणाऱ्या गंभीर लोकसंख्याशास्त्रीय संकटावर त्यांनी प्रकाश टाकला. बिहार, बंगाल आणि आसाममधील लोक त्यांच्या बहिणी आणि मुलींच्या सुरक्षिततेबद्दल अधिकाधिक चिंतेत आहेत याबद्दल मोदी यांनी काळजी व्यक्त केली. 

या समस्येवर उपाय म्हणून लाल किल्ल्यावरून डेमोग्राफी मिशनची घोषणा केल्याची आठवण त्यांनी करून दिली. घुसखोरांना संरक्षण देण्याचा आणि मतपेढीच्या राजकारणासाठी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पंतप्रधानांनी विरोधी आघाडी आणि त्यांच्या परिसंस्थेवर टीका केली. मोदी यांनी ठामपणे सांगितले की हे गट बिहारची आणि देशाची संसाधने तसेच सुरक्षा, दोन्ही धोक्यात आणण्यास तयार आहेत. पूर्णियाच्या मातीतून बोलताना त्यांनी जाहीर केले की प्रत्येक घुसखोराला बाहेर काढले पाहिजे. घुसखोरी रोखणे ही त्यांच्या सरकारची एक ठाम जबाबदारी आहे असे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधानांनी थेट आव्हान देत, घुसखोरांचे रक्षण करणाऱ्या नेत्यांना पुढे येण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की घुसखोरांना संरक्षण देण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्यांना हटवण्यासाठी सरकार दृढनिश्चयाने काम करत राहील. घुसखोरांसाठी ढाल म्हणून काम करणाऱ्यांना त्यांनी इशारा दिला की बेकायदेशीर घुसखोरांची मर्जी नव्हे तर केवळ भारतीय कायदाच लागू राहील. त्यांनी देशाला आश्वासन दिले की ही त्यांची हमी आहे: घुसखोरांवर कारवाई केली जाईल आणि देश त्याच्या निकालांचा साक्षीदार होईल. घुसखोरीचे समर्थन करणाऱ्या कथनांना प्रोत्साहन दिल्याबद्दल मोदी यांनी विरोधी आघाडीवर टीका केली आणि घोषित केले की बिहार आणि भारतातील नागरिक त्यांना जोरदार आणि निर्णायक प्रत्युत्तर देण्याची तयारी करत आहेत.

पंतप्रधानांनी सांगितले की, बिहारमध्ये गेल्या दोन दशकांपासून विरोधी पक्ष सत्तेबाहेर आहे आणि या बदलामागील प्रेरक शक्ती म्हणून त्यांनी बिहारमधील महिलांना - त्यांच्या माता आणि बहिणींना - याचे श्रेय दिले. विरोधी पक्षाच्या राजवटीत हत्या, बलात्कार आणि खंडणी यासारख्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गुन्ह्यांना महिला बळी पडल्या होत्या, असे त्यांनी नमूद केले. केंद्र आणि राज्यातील आपल्या सरकारच्या काळात याच महिला आता "लखपती दीदी" आणि "ड्रोन दीदी" म्हणून उदयास येत आहेत आणि बचत गटांद्वारे परिवर्तनात्मक क्रांती घडवत आहेत, यावर त्यांनी भर दिला. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जीविका दीदी मोहिमेच्या अभूतपूर्व यशाचे त्यांनी कौतुक केले. 

महिलांसाठी अंदाजे ₹500 कोटींचा सामुदायिक गुंतवणूक निधी जारी करण्यात आल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. ही रक्कम समूह-स्तरीय महासंघांपर्यंत पोहोचून गावोगावच्या बचत गटांना सक्षम बनवेल, असे त्यांनी स्पष्ट केले. या उपक्रमामुळे महिलांना स्वतःच्या क्षमता आणि आर्थिक सुदृढता वाढवण्यासाठी नवीन संधी उपलब्ध होतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. 

पंतप्रधान मोदी म्हणाले की, विरोधकांसाठी नेहमीच त्यांच्या स्वतःच्या कुटुंबांचे कल्याण हे सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे आणि त्यांनी कधीही नागरिकांच्या कुटुंबांची काळजी घेतली नाही. त्यांनी यावर भर दिला की आपल्यासाठी प्रत्येक नागरिक हा कुटुंबाचा भाग आहे. ते म्हणाले की, म्हणूनच आपल्याला  लोकांच्या खर्चाची आणि त्यांच्या बचतीची काळजी आहे. दिवाळी आणि छठसारखे अनेक सण जवळ येत असताना गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी सरकारने मोठी भेट आणल्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले.त्यांनी नमूद केले की आज 15 सप्टेंबर आहे आणि बरोबर एक आठवड्यानंतर नवरात्र सुरू होईल. त्या दिवशी म्हणजेच 22 सप्टेंबर रोजी देशभरात जीएसटी कमी केला जाईल. दैनंदिन वापराच्या बहुतेक वस्तूंवरील जीएसटीमध्ये लक्षणीय कपात करण्यात आली आहे, असे मोदी यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाला उपस्थित महिलांना संबोधित करताना ते म्हणाले की जीएसटी दरातील कपातीमुळे स्वयंपाकघरातील सामानाला येणारा खर्च लक्षणीयरित्या कमी झाला आहे. टूथपेस्ट, साबण, शाम्पू, तूप आणि इतर विविध खाद्य उत्पादने अधिक किफायतशीर झाली आहेत. ते पुढे म्हणाले की मुलांच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या वस्तूंचा खर्च देखील कमी होणार आहे. या सणासुदीला नवे कपडे आणि मुलांसाठी नवी पादत्राणे खरेदी करणे सोपे होणार आहे कारण या गोष्टी देखील स्वस्त होणार आहेत. जेव्हा कोणतेही सरकार गरिबांची खऱ्या अर्थाने काळजी करते तेव्हाच अश्या प्रभावी उपाययोजना केल्या जातात अशी खात्री पंतप्रधानांनी दिली.  

पूर्णियाच्या सुपुत्रांनी स्वातंत्र्यसंग्रामात ब्रिटिशांना भारताच्या सामर्थ्याचे दर्शन घडवले याचे स्मरण करत पंतप्रधान मोदी म्हणाले की ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपल्या देशाने पुन्हा एकदा शत्रूला त्याच सामर्थ्याची चुणूक दाखवली आहे. या ऑपरेशनच्या धोरणात्मक कार्यवाहीमध्ये पूर्णियाच्या धाडसी सुपुत्राने निभावलेली महत्त्वाची भूमिका मोदी यांनी अधोरेखित केली. राष्ट्रीय सुरक्षा असो अथवा राष्ट्रीय विकास, बिहार राज्याने प्रत्येक वेळी देशाच्या प्रगतीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली हे सांगण्यावर त्यांनी अधिक भर दिला.बिहारच्या विकास अभियानाची गती अशीच संपूर्ण शक्तीनिशी सुरु राहिली पाहिजे असे सांगत पंतप्रधानांनी भाषण संपवले.

बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, केंद्रीय मंत्री राममोहन नायडू, राजीव रंजन सिंह, जितन राम मांझी, गिरीराज सिंह, चिराग पासवान, नित्यानंद राय, रामनाथ ठाकूर, डॉ.राज भूषण चौधरी, सतीशचंद्र दुबे यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

पार्श्वभूमी

पंतप्रधानांनी बिहारमध्ये राष्ट्रीय मखाणा मंडळाची सुरुवात केली. हे मंडळ मखाणाचे उत्पादन आणि त्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकासाला प्रोत्साहन देईल, सुगी-पश्चात व्यवस्थापन मजबूत करेल, मूल्यवर्धनाला चालना देईल आणि मखाणाचे विपणन, निर्यात तसेच ब्रँड विकासाची सुविधा उपलब्ध करून देऊन बिहार तसेच देशातील मखाणा उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा करून देईल.

देशातील एकूण मखाणा उत्पादनापैकी 90% मखाणा बिहार राज्यात पिकतो. मधुबनी, दरभंगा, सीतामढी,सहरसा, कटीहार, पूर्णिया,सुपौल, किशनगंज आणि अरारिया यांसारखे महत्त्वाचे जिल्हे मखाणा उत्पादनाची प्रमुख केंद्रे ठरतात कारण या जिल्ह्यांमध्ये सर्वोत्कृष्ट दर्जाच्या मखाणा उत्पादनासाठी अनुकूल हवामान आणि सुपीक जमीन आहे. बिहारमध्ये मखाणा मंडळाच्या स्थापनेमुळे राज्यातील तसेच देशातील मखाणा उत्पादनाला मोठी चालना मिळेल आणि या क्षेत्रात जागतिक नकाशावर बिहारची उपस्थिती बळकट होईल.  

पंतप्रधानांनी आजच्या कार्यक्रमात पूर्णिया विमानतळ परिसरात नूतन सिव्हील एन्क्लेव्ह येथील अंतरिम टर्मिनल इमारतीचे उद्घाटन केले. या इमारतीमुळे या प्रदेशातील प्रवासी हाताळणी क्षमतेत सुधारणा होईल.

पंतप्रधानांनी पूर्णिया येथे 40,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची कोनशीला रचली तसेच त्यांचे उद्घाटन केले.

पंतप्रधानांच्या हस्ते भागलपूर येथील पीरपैंती येथे 3x800 मेगावॉट क्षमतेच्या औष्णिक उर्जा प्रकल्पाची कोनशीला रचली. या प्रकल्पात खासगी क्षेत्राची बिहारमधील सर्वात मोठी म्हणजे 25,000 कोटी रुपयांची गुंतवणूक असेल. सदर प्रकल्पाची रचना अल्ट्रा-सुपर, महत्त्वपूर्ण, कमी उत्सर्जन तंत्रज्ञानाच्या वापरावर आधारित आहे. या प्रकल्पातून समर्पित उर्जा निर्मिती होईल आणि हा प्रकल्प बिहारच्या उर्जा सुरक्षेला बळकट करेल.

पंतप्रधानांनी कोसी-मेची आंतरराज्य नदी जोड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची कोनशीला रचली. सुमारे 2680 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या या प्रकल्पात डीसिल्टींगसह कालव्याचे अद्ययावतीकरण, क्षतिग्रस्त संरचनांची पुनर्बांधणी तसेच सेटलींग बेसिनच्या नूतनीकरणासह या कालव्याची डिस्चार्ज क्षमता देखील 15,000 क्युसेक्स वरुन 20,000 क्युसेक्स पर्यंत वाढवण्याचा समावेश आहे. या प्रकल्पाचा लाभ बिहारमधील विविध जिल्ह्यांना सिंचन सुविधा विस्तार, पूर नियंत्रण तसेच कृषीविषयक लवचिकतेसाठी होणार आहे.

रेल्वेद्वारे संपर्क सुविधा सुधारण्याबाबतच्या कटिबद्धतेला अनुसरून पंतप्रधान मोदी यांनी बिहारमधील विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन करून कोनशीला रचली तसेच अनेक नव्या रेल्वे गाड्यांना झेंडा दाखवून त्यांच्या सेवेची सुरुवात करून दिली.

पंतप्रधानांनी यावेळी गंगा नदीवरील थेट रेल्वे जोडणी सुविधा पुरवणाऱ्या बिक्रमशिला-कटारेह दरम्यानच्या रेल्वे मार्ग उभारणी प्रकल्पाची कोनशीला रचली. सुमारे 2,170 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या या प्रकल्पामुळे गंगा नदीवर थेट रेल्वे मार्ग उपलब्ध होऊन या भागातील लोकांची मोठी सोय होईल.

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 4,410 कोटी रुपये खर्चाच्या अरारिया-गलगलिया (ठाकूरगंज) दरम्यान नव्या रेल्वे मार्गाचे उद्घाटन झाले.

पंतप्रधानांनी अरारिया-गलगलिया (ठाकूरगंज) टप्प्यासाठी नव्या रेल्वे गाडीला झेंडा दाखवून रवाना केले. ही गाडी अरारिया आणि किशनगंज या जिल्ह्यांच्या दरम्यान थेट रेल्वे जोडणी सुविधा स्थापन करुन ईशान्य बिहार मध्ये जाण्यासाठीची सोय लक्षणीयरित्या सुधारेल. पंतप्रधान मोदी यांनी जोगबनी आणि दानापूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस गाडीची देखील सुरुवात केली. अरारिया, पूर्णिया, माधेपुरा, सहरसा, खगरिया, बेगुसराय, समस्तीपुर, मुझफ्फरपुर, वैशाली आणि पटणा या जिल्ह्यांतील जनतेची या गाडीमुळे मोठी सोय होईल. त्यांनी सहरसा आणि छेहरता(अमृतसर) तसेच जोगबनी आणि इरोड या दरम्यान धावणाऱ्या अमृत भारत एक्स्प्रेस गाड्यांची देखील सुरुवात केली. प्रवाशांना आधुनिक सोयीसुविधा आणि वेगवान प्रवासाची क्षमता उपलब्ध करून देण्यासोबतच या गाड्या त्या प्रदेशांतील आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक एकात्मतेला चालना देतील.

पंतप्रधान मोदी यांनी पूर्णिया येथे लिंग वर्गीकृत वीर्य सुविधेचे देखील उद्घाटन केले. ही राष्ट्रीय गोकुल अभियानाच्या अंतर्गत अत्याधुनिक वीर्य संकलन केंद्र सुविधा असून त्यात दर वर्षी 5 लाख लिंग वर्गीकृत वीर्य मात्रा उत्पादनाची क्षमता आहे. पूर्व आणि ईशान्य भारतातील ही अशा प्रकारची पहिलीच सुविधा असून त्यामध्ये मेक इन इंडिया तसेच आत्मनिर्भर भारत या संकल्पनांनुसार ऑक्टोबर 2024 मध्ये स्वदेशी पद्धतीने विकसित तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. स्त्री जातीच्या वासरांच्या जन्माची शक्यता वाढवत हे तंत्रज्ञान छोट्या, दुर्लक्षित शेतकऱ्यांना तसेच भूमिहीन मजुरांना गायींच्या अदलाबदलीची अधिक सुरक्षित सोय देऊ करून आर्थिक ताण कमी करेल आणि सुधारित दुग्धोत्पादनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात देखील वाढ करेल.

पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत 35,000 ग्रामीण लाभार्थी तसेच पंतप्रधान आवास योजना (शहरी) अंतर्गत 5,920 शहरी लाभार्थी यांच्यासाठी आयोजित गृहप्रवेश कार्यक्रमात देखील पंतप्रधानांनी भाग घेतला आणि काही लाभार्थ्यांना त्यांच्या घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या.

पंतप्रधानांनी यावेळी दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत बिहारमधील समूह स्तरावरील महासंघांना (सीएलएफ) सुमारे 500 कोटी रुपयांचा समुदाय गुंतवणूक निधी वितरीत केला आणि काही सीएलएफ अध्यक्षांना धनादेशांचे वाटप केले.

 

निलीमा चितळे/शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2167005) Visitor Counter : 2