पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

जपानच्या पंतप्रधानांसमवेत संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांचे माध्यमांना निवेदन

Posted On: 29 AUG 2025 7:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2025

महामहिम पंतप्रधान ईशिबा,

दोन्ही देशांचे प्रतिनिधी ,

माध्यमातील मित्रांनो ,

नमस्कार !

कोनबनवा!

सर्वप्रथम मी पंतप्रधान ईशिबा यांचे आपुलकीचे शब्द आणि अगत्याने केलेल्या स्वागतासाठी हार्दिक आभार  मानतो.

आज आमच्यात फलदायी आणि अर्थपूर्ण चर्चा झाली. जगातील  दोन मोठ्या अर्थव्यवस्था आणि जिवंत लोकशाही म्हणून आमची भागीदारी केवळ दोन्ही देशांसाठी नव्हे तर जागतिक शांतता आणि स्थैर्यासाठी देखील अतिशय महत्वपूर्ण आहे याबाबत आमचे एकमत आह .

चांगल्या जगाला आकार देण्यात मजबूत लोकशाही असलेले हे देश नैसर्गिक भागीदार आहेत.

मित्रांनो,

आज आम्ही आमच्या विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीत एका नवीन आणि सोनेरी अध्यायाचा मजबूत पाया रचला आहे. आम्ही आगामी दशकासाठी एक रूपरेषा आखली आहे. आमच्या दृष्टिकोनाच्या केंद्रस्थानी गुंतवणूक, नवोन्मेष, आर्थिक सुरक्षा, पर्यावरण, तंत्रज्ञान, आरोग्य, गतिशीलता, लोकांमधील आदानप्रदान आणि राज्य-प्रादेशिक भागीदारी या प्रमुख बाबी आहेत. आम्ही आगामी दहा वर्षांमध्ये जपानमधून भारतात 10 ट्रिलियन येन गुंतवणुकीचे लक्ष्य निर्धारित केले आहे. भारत आणि  जपानमधील लघु आणि मध्यम उद्योग आणि स्टार्टअप्स  यांना जोडण्यावर विशेष भर दिला जाईल.

भारत आणि जपान उद्योग मंचाच्या बैठकीतही मी जपानी कंपन्यांना म्हटले ,मेक इन इंडिया , मेक फॉर द वर्ल्ड .

मित्रांनो ,

आमची संयुक्त पत यंत्रणा ऊर्जा क्षेत्रासाठी  एक मोठे यश आहे. आपली हरित भागीदारी आपल्या आर्थिक भागीदारीइतकीच मजबूत आहे हे यातून दिसून येते. याच दिशेने आपण शाश्वत इंधन उपक्रम आणि बॅटरी पुरवठा साखळी भागीदारीदेखील सुरु करत आहोत. 

आम्ही आर्थिक सुरक्षा सहकार्य उपक्रमाची देखील सुरुवात करत आहोत. या अंतर्गत महत्वपूर्ण आणि धोरणात्मक क्षेत्रांमध्ये एका व्यापक दृष्टिकोनासह पुढे पाऊल टाकले जाईल.

उच्च तंत्रज्ञानाच्या या क्षेत्रात  सहकार्य हे आपणा दोघांचे प्राधान्य आहे. या संदर्भात डिजिटल भागीदारी  2.0,आणि एआय  सहकार्य उपक्रम हाती घेतला जात  आहे.  सेमीकंडक्टर्स आणि दुर्मिळ मृदा खनिजांना आमच्या विषयपत्रिकेत उच्च स्थान राहिल.

मित्रांनो,

आम्हाला विश्वास आहे की जपानी तंत्रज्ञान आणि भारतीय प्रतिभा हे एक विजयी संयोजन आहे. आम्ही जलदगती रेल्वेवर काम करत असून नेक्स्ट जनरेशन मोबिलिटी पार्टनरशिप अंतर्गत बंदरे, विमान वाहतूक आणि जहाज बांधणी यासारख्या क्षेत्रातही जलद प्रगती करू.

चांद्रयान-5 मोहिमेतील सहकार्यासाठी इस्रो आणि जॅक्सा यांच्यात झालेल्या कराराचे आम्ही स्वागत करतो. आमची सक्रिय भागीदारी पृथ्वीच्या कक्षेपलीकडे जाऊन अवकाशातही मानवतेच्या प्रगतीचे प्रतीक बनेल!

मित्रांनो,

मनुष्यबळ आदानप्रदान कृती योजनेअंतर्गत, पुढील पाच वर्षांत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये दोन्ही बाजूंनी 5 लाख लोकांच्या आदानप्रदानास प्रोत्साहन दिले जाईल. यामध्ये 50,000 कुशल भारतीय जपानच्या अर्थव्यवस्थेत सक्रिय योगदान देतील.

भारत-जपान भागीदारी आता केवळ दिल्ली आणि टोक्योपुरती मर्यादित राहणार नाही. भारतीय राज्ये आणि जपानी प्रांतांमधील संस्थात्मक सहकार्याद्वारे संबंध अधिक दृढ होतील. यामुळे व्यापार, पर्यटन, शिक्षण आणि सांस्कृतिक आदानप्रदानासाठी  नवीन द्वारे उघडतील.

मित्रांनो,

भारत आणि जपान,  मुक्त, खुल्या, शांत, समृद्ध आणि नियमांवर आधारित हिंद-प्रशांतसाठी पूर्णपणे वचनबद्ध आहेत.

दहशतवाद आणि सायबर सुरक्षेबाबत आमच्या चिंता  समान आहेत. संरक्षण आणि सागरी सुरक्षेशी आमचे समान हितसंबंध निगडित आहेत. आम्ही संरक्षण उद्योग आणि नवोन्मेष क्षेत्रात आमचे सहकार्य अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे.

मित्रांनो,

भारत आणि जपानमधील भागीदारी परस्पर विश्वासावर आधारित असून आपापल्या राष्ट्रीय प्राधान्यांना प्रतिबिंबित करते आणि आपल्या सामायिक मूल्यांनी आणि श्रद्धेने आकार घेते.

एकत्रितपणे, आम्ही आपल्या लोकांसाठी आणि जगासाठी शांती, प्रगती आणि समृद्धीचे एक समान स्वप्न बाळगतो.

महाशय,

आपल्या मैत्रीसाठी मी पुन्हा आभार व्यक्त करतो. आणि पुढील वार्षिक परिषदेसाठी आपल्याला भारतभेटीचे सादर निमंत्रण देतो.

अरिगातो गोजा-इमासु।

धन्यवाद.

सोनाली काकडे/सुषमा काणे/‍नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2162009) Visitor Counter : 17