पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे सुमारे 2,200 कोटी रुपयांच्या विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन
पंतप्रधानांनी पीएम-किसानचा 20वा हप्ता जारी केला, ज्यामध्ये देशभरातील 9.7 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 20,500 कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित करण्यात आली.
शेतकऱ्यांचे जीवन बदलण्यासाठी, त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी, शेतीचा खर्च कमी करण्यासाठी सरकार पूर्ण ताकदीने काम करत आहे. बियाण्यांपासून ते बाजारापर्यंत आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत: पंतप्रधान
भारतावर जो हल्ला करेल तो नरकात देखील सुरक्षित नसेलः पंतप्रधान
ऑपरेशन सिंदूर दरम्यान, भारताच्या देशी बनावटीच्या शस्त्रांचे सामर्थ्य संपूर्ण जगाने अनुभवलेः पंतप्रधान
आपल्या शेतकरी बांधवांचे, आपल्या छोट्या उद्योगांचे हित आमच्यासाठी सर्वोपरी आहे, आणि सरकार या दिशेने सर्वतोपरी प्रयत्न करत आहे: पंतप्रधान
भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे आणि यासाठी त्याला आपल्या आर्थिक हितांबद्दल जागरूक राहावे लागेल: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
02 AUG 2025 1:58PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे सुमारे 2,200 कोटी रुपयांच्या विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रावण महिन्याच्या शुभ मुहूर्तावर वाराणसीतील कुटुंबांना भेटल्याबद्दल मनस्वी भावना व्यक्त केल्या. वाराणसीतील लोकांशी असलेल्या त्यांच्या घट्ट भावनिक संबंधावर भर देत, मोदींनी शहरातील आपल्या प्रत्येक कौटुंबिक सदस्याविषयी आदरपूर्वक सद्भावना व्यक्त केली. मोदींनी श्रावण महिन्याच्या शुभ मुहूर्तावर देशभरातील शेतकऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधल्याबद्दल समाधानही व्यक्त केले.
ऑपरेशन सिंदूरनंतर वाराणसीला आपली ही पहिलीच भेट आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. त्यांनी 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची आठवण करून दिली, ज्यात 26 निष्पाप लोकांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. मोदींनी पीडितांच्या कुटुंबीयांना झालेल्या असह्य वेदना, विशेषतः या दुर्दैवी घटनेमुळे प्रभावित झालेल्या मुलांचे आणि मुलींचे दुःख अधोरेखित केले. आपले अंतःकरण अतिशय दुःखाने भरलेले होते असे सांगत त्यांनी त्यावेळी बाबा विश्वनाथांना प्रार्थना केली होती की, या शोकाकुल कुटुंबांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो. पंतप्रधानांनी आपण 'लेकींच्या सिंदूरचा बदला घेण्याचे' जे वचन दिले होते, ते पूर्ण झाल्याचे सांगितले. त्यांनी या यशाचे श्रेय भगवान महादेवांच्या आशीर्वादाला दिले आणि 'ऑपरेशन सिंदूर'चे यश भगवान महादेवांच्या चरणी समर्पित केले.
अलीकडच्या काही दिवसांत, विशेषतः श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी, वाराणसीमध्ये बाबा विश्वनाथांचा पवित्र जलाभिषेक करण्यासाठी गंगाजल घेऊन जाणाऱ्या भाविकांमध्ये शिवभक्तांच्या दैवी प्रतिमा पाहात होतो, असे त्यांनी सांगितले. यादव बंधूंनी आपल्या खांद्यावर गौरी केदारनाथहून गंगाजल घेऊन जाण्याचे दृश्य खूपच मनमोहक होते, असे ते म्हणाले. डमरूचा आवाज आणि गल्लीबोळातील चैतन्य पाहून वातावरण विलक्षण झाल्याचे त्यांनी सांगितले. श्रावण महिन्यामध्ये बाबा विश्वनाथ आणि मार्कंडेय महादेवाच्या दर्शनाला जाण्याची त्यांची वैयक्तिक इच्छा होती, असे मोदी म्हणाले. मात्र, आपल्या उपस्थितीमुळे महादेवाच्या भक्तांना गैरसोय होऊ शकते किंवा त्यांच्या दर्शनात व्यत्यय येऊ शकतो, म्हणून त्यांनी येथूनच भगवान भोलेनाथ आणि माता गंगा यांना वंदन करत असल्याचे सांगितले.
काही दिवसांपूर्वी तामिळनाडूमधील ऐतिहासिक गंगाईकोंडा चोलापुरम मंदिराला भेट दिल्याची आठवण करून देत, मोदी म्हणाले की, हजारो वर्षे जुने हे स्मारक भारतातील शैव परंपरेचे एक प्राचीन केंद्र आहे. हे मंदिर प्रसिद्ध राजा राजेंद्र चोल यांनी बांधले होते, ज्यांनी उत्तर आणि दक्षिण भारताला एकत्र आणण्यासाठी प्रतिकात्मक रूपाने उत्तर भारतातून गंगाजल आणले होते. हजारो वर्षांपूर्वी भगवान शिवाची भक्ती आणि शैव परंपरेप्रति असलेल्या त्यांच्या वचनबद्धतेतून राजेंद्र चोल यांनी ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’चा दृष्टीकोन जाहीर केला होता, यावर त्यांनी भर दिला. पंतप्रधान म्हणाले की, आज काशी-तमिळ संगममसारख्या उपक्रमांद्वारे हा वारसा पुढे नेला जात आहे. गंगाईकोंडा चोलापुरमला नुकत्याच दिलेल्या भेटीदरम्यान त्यांनी गंगाजल सोबत नेले होते आणि माँ गंगेच्या आशीर्वादाने पूजा अत्यंत पवित्र वातावरणात पार पडली, असे त्यांनी सांगितले. अशा घटना देशात एकतेची भावना जागृत करतात, ज्यामुळे 'ऑपरेशन सिंदूर' सारख्या मोहिमा यशस्वी होतात. 140 कोटी भारतीयांची एकजुटता हीच 'ऑपरेशन सिंदूर'ची ताकद बनली, असेही त्यांनी सांगितले.
वाराणसीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी महोत्सवाच्या भव्य सोहळ्यावर भर देत, पंतप्रधानांनी जाहीर केले की, पीएम-किसान सन्मान निधी योजनेंतर्गत देशभरातील 10 कोटी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यांमध्ये 21,000 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. त्यांनी सांगितले की, या कार्यक्रमादरम्यान 2,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली आहे. मोदी म्हणाले की, बाबांच्या आशीर्वादाने वाराणसीमध्ये विकासाची अखंड गंगा वाहत आहे. त्यांनी उपस्थित सर्वांचे आणि देशातील शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. पंतप्रधानांनी पुढे सांगितले की, काही दिवसांपूर्वी वाराणसीमध्ये खासदार पर्यटक मार्गदर्शक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. येत्या काही दिवसांत काशी खासदार छायाचित्र स्पर्धा आणि खासदार रोजगार मेळा असे कार्यक्रमही होणार आहेत, आणि या उपक्रमांच्या यशासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. अशा उपक्रमांसाठी त्यांनी प्रशासनाचे कौतुकही केले.
शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी सरकार सातत्याने काम करत आहे, अशी ग्वाही देत मोदींनी याच्या विपरित असलेल्या पूर्वीच्या सरकारांच्या कार्यपद्धतीसोबत त्याची तुलना केली. ते म्हणाले की, आधीच्या काळात शेतकऱ्यांच्या नावावर एखादी घोषणा केली जायची, पण ती कधीच पूर्ण व्हायची नाही. याउलट, त्यांच्या सरकारने दिलेली वचने पाळली आहेत आणि पीएम-किसान सन्मान निधी हा सरकारच्या वचनबद्धतेचा दाखला आहे, असे त्यांनी सांगितले.
2019 मध्ये पीएम-किसान सन्मान निधी सुरू झाली, तेव्हा काही प्रमुख विरोधी पक्ष अनेक अफवा पसरवत होते, असे त्यांनी सांगितले. काही लोक दावा करत होते की, निवडणुकांनंतर ही मदत थांबेल, तर काही जण हस्तांतरित केलेले पैसे परत घेतले जातील, असे सुचवत होते. यामुळे विरोधकांचा खरा चेहरा समोर येतो, जे फक्त शेतकरी आणि जनतेची दिशाभूल करतात, असे त्यांनी म्हटले. एकही हप्ता कधीही थांबवला गेला आहे का, असा सवाल विचारत पंतप्रधानांनी सांगितले की, पीएम-किसान सन्मान निधी अखंडपणे सुरू आहे. आजपर्यंत, 3.75 लाख कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. एकट्या उत्तर प्रदेशमध्ये, सुमारे 2.5 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला असून, त्यांना 90,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळाली आहे. वाराणसीमधील शेतकऱ्यांना सुमारे 900 कोटी रुपये मिळाले आहेत, असे मोदींनी सांगितले. या योजनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, निधी कोणत्याही कपातीशिवाय किंवा कमिशनशिवाय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला आहे, यावर त्यांनी भर दिला. त्यांनी सांगितले की, त्यांच्या सरकारने ही एक कायमस्वरूपी व्यवस्था केली आहे - कोणताही भ्रष्टाचार होणार नाही आणि गरिबांचे हक्क हिरावून घेतले जाणार नाहीत.
आपण आधीपासूनच 'जो प्रदेश जितका मागासलेला, त्याला तितके जास्त प्राधान्य' या विकासमंत्राचा पुनरुच्चार करत आहोत, असे सांगून, मोदींनी घोषणा केली की या महिन्याच्या सुरुवातीला केंद्र सरकारने एक मोठी नवीन योजना, ‘पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना’, मंजूर केली आहे. या योजनेसाठी 24,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. या योजनेचा मुख्य भर अशा जिल्ह्यांवर असेल जे पूर्वीच्या सरकारांच्या चुकीच्या धोरणांमुळे मागे राहिले होते—ज्या ठिकाणी कृषी उत्पादन कमी आहे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न मर्यादित आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेचा थेट फायदा उत्तर प्रदेशातील लाखो शेतकऱ्यांनाही होईल, असे त्यांनी सांगितले.
" आमचे सरकार शेतकऱ्यांचे जीवनमान बदलण्यासाठी, त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी तसेच लागवडीचा खर्च कमी करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करत आहे, आम्ही बियाण्यांपासून बाजारपेठेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत", असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले आणि शेताशेतात पाणी पोहोचावे, यासाठी देशभरात लाखो कोटी रुपयांच्या सिंचन योजना राबवल्या जात आहेत यावर त्यांनी भर दिला.
मोदी म्हणाले की हवामान हे नेहमीच शेतकऱ्यांसाठी एक मोठे आव्हान बनून राहिले आहे - मग अतिवृष्टी असो, गारपीट असो किंवा गोठलेले दव असो. अशा अनिश्चिततेपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने सरकारने पंतप्रधान पीक विमा योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत केलेल्या दाव्यांपोटी शेतकऱ्यांना आतापर्यंत ₹1.75 लाख कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळाली आहे अशी माहिती त्यांनी दिली .
शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना योग्य भाव मिळावा, यासाठी सरकार वचनबद्ध आहे हे स्पष्ट करून पंतप्रधानांनी सांगितले की, तांदूळ आणि गहू यासारख्या प्रमुख पिकांसह पिकांच्या किमान आधारभूत किमतीत विक्रमी वाढ करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे रक्षण करण्याच्या दृष्टीने सरकार देशभरात हजारो नवीन गोदामे बांधत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
कृषी अर्थव्यवस्थेत महिलांचा सहभाग वाढवण्यावर सरकारचा भर असल्याचे सांगत मोदी यांनी "लखपती दीदी" मोहिमेचा उल्लेख केला. संपूर्ण भारतात तीन कोटी लखपती दीदी निर्माण करण्याचे याचे लक्ष्य आहे. दीड कोटींहून अधिक महिलांनी हा टप्पा आधीच गाठला असून सरकारच्या "ड्रोन दीदी" उपक्रमामुळे लाखो महिलांचे उत्पन्न लक्षणीयरीत्या वाढले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी सांगितले की, आधुनिक कृषी संशोधन थेट शेतात आणण्यासाठी सरकार सक्रियपणे काम करत आहे. त्यांनी नमूद केले की "लॅब टू लँड" अर्थात, प्रयोगशाळा ते शेत या मार्गदर्शक तत्त्वाखाली प्रामुख्याने आखलेले विकसित कृषी संकल्प अभियान मे आणि जून 2025 मध्ये राबविण्यात आले होते, ज्याद्वारे 1.25 कोटींहून अधिक शेतकऱ्यांशी थेट संबंध प्रस्थापित करण्यात आले. केंद्र सरकारच्या योजनांचे फायदे सर्व नागरिकांपर्यंत अखंडपणे पोहोचत राहिले पाहिजेत यावर त्यांनी भर दिला.
जनतेसोबत एक महत्त्वाची माहिती सामायिक करताना मोदी म्हणाले, “जन धन योजनेअंतर्गत देशभरातील गरिबांसाठी 55 कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत”. त्यांनी माहिती दिली की या योजनेला नुकतीच दहा वर्षे पूर्ण झाली आहेत आणि नियमांनुसार, बँक खात्यांना दहा वर्षांनी नवीन केवायसी पडताळणी आवश्यक असते. ही आवश्यकता पूर्ण करण्यासाठी 1 जुलै 2025 पासून देशव्यापी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
पंतप्रधान म्हणाले की, बँका प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचत आहेत. जवळजवळ एक लाख ग्रामपंचायतींमध्ये याआधीच शिबिरे सुरू करण्यात आली असून लाखो लोकांनी त्यांचे केवायसी नूतनीकरण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. जनधन खाते असलेल्या प्रत्येक व्यक्तीने त्यांची केवायसी प्रक्रिया विलंब न करता पूर्ण करावी असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
ग्रामपंचायतींमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या विशेष बँक शिबिरांचा एक अतिरिक्त फायदा अधोरेखित करताना मोदी म्हणाले की या शिबिरांमुळे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि अटल पेन्शन योजना यासारख्या अनेक महत्त्वाच्या योजनांसाठी नोंदणी सुलभ होत आहे. या योजना नागरिकांना महत्त्वपूर्ण आधार देतात यावर त्यांनी भर दिला आणि सर्वांना या शिबिरांना भेट देण्याचे आवाहन केले. ज्यांनी अद्याप या योजनांमध्ये नावनोंदणी केलेली नाही त्यांना नोंदणी करण्यास आणि त्यांच्या जनधन खात्यांसाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास त्यांनी प्रोत्साहित केले. पंतप्रधानांनी त्यांच्या पक्षाच्या सर्व लोकप्रतिनिधींना या मोहिमेबद्दल सक्रियपणे जागरूकता निर्माण करण्याचे, बँकांना त्यांच्या संपर्क प्रयत्नांमध्ये मदत करण्याचे तसेच जनतेचा जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करण्याचे आवाहन केले.
पंतप्रधानांनी सांगितले की, आज महादेव नगरीत विकास आणि जनतेच्या कल्याणासाठी अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. शिव म्हणजे काय, यावर त्यांनी चिंतन केले आणि सांगितले की शिव म्हणजे "कल्याण" , परंतु दहशत आणि अन्यायाचा सामना करताना तो रुद्र रूप धारण करतो. भारतावर हल्ला करणाऱ्या कोणाचीही, अगदी पाताळातही गय केली जाणार नाही, हे घोषित करणारे भारताचे रुद्र रूप ऑपरेशन सिंदूरदरम्यान जगाने पाहिले " असे ते म्हणाले.
ऑपरेशन सिंदूर यशस्वी ठरल्यानंतरही देशातील काही व्यक्तींना याचा त्रास होत आहे याबद्दल पंतप्रधानांनी खेद व्यक्त केला. त्यांनी विशेषतः विरोधी पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांकडे लक्ष वेधले आणि म्हणाले की भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले हे सत्य ते पचवू शकत नाहीत. भारतीय ड्रोनने दहशतवादी मुख्यालयांना अचूकपणे कसे लक्ष्य केले आणि उद्ध्वस्त केले हे दाखवणाऱ्या दृश्यांचा उल्लेख मोदी यांनी केला आणि असेही म्हटले की अनेक पाकिस्तानी हवाई तळ अजूनही गंभीर स्थितीत आहेत.
पंतप्रधानांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांवर टीका करताना म्हटले की, एका बाजूला दहशतवादाचे सूत्रधार शोक करत असताना, दुसरीकडे हे पक्ष दहशतवाद्यांच्या स्थितीबद्दल शोक व्यक्त करत आहेत.
भारताच्या सशस्त्र दलांच्या शौर्याचा वारंवार अपमान केल्याबद्दल विरोधकांवर जोरदार टीका करताना मोदी म्हणाले की, विरोधकांनी ऑपरेशन सिंदूरला "तमाशा" म्हटले आहे. प्रतिष्ठेचे आणि बलिदानाचे प्रतीक असलेल्या सिंदूरला कधी तमाशा मानले जाऊ शकते का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सशस्त्र दलांचे शौर्य आणि बहिणींच्या सिंदूरचा बदला घेण्याच्या प्रतिज्ञेच्या पूर्ततेला अशा प्रकारे तुच्छ लेखता येऊ शकते का?
मतपेढी आणि तुष्टीकरणाचे राजकारण केल्याबद्दल पंतप्रधानांनी विरोधकांवर टीका केली. संसदेत विरोधी नेत्यांनी केलेल्या विधानांचा त्यांनी उल्लेख केला, ज्यात पहलगाममधील दहशतवाद्यांचा तातडीने खात्मा का करण्यात आला असा प्रश्न उपस्थित केला होता. मोदींनी विचारणा केली की भारताने दहशतवाद्यांवर कारवाई करण्यापूर्वी प्रतीक्षा करायला हवी होती का ? त्यांनी जनतेला आठवण करून दिली की हे तेच लोक आहेत ज्यांनी उत्तर प्रदेशातील त्यांच्या कार्यकाळात दहशतवाद्यांना क्लीन चिट दिली आणि बॉम्बस्फोटात सहभागी असलेल्यांवरील खटले मागे घेतले.
आता हे पक्ष दहशतवाद्यांच्या निर्मूलनामुळे आणि ऑपरेशन सिंदूरच्या नावामुळे त्रस्त आहेत असे ते म्हणाले. वाराणसीच्या पवित्र मातीतून पंतप्रधानांनी घोषित केले की हा एक नवीन भारत आहे - जो भगवान भोलेनाथांची पूजा करतो आणि देशाच्या शत्रूंसमोर काळभैरव कसे बनायचे, हे देखील जाणतो.
"ऑपरेशन सिंदूर दरम्यान जगाने भारताच्या स्वदेशी शस्त्रास्त्रांची शक्ती आणि भारताच्या हवाई संरक्षण प्रणाली, स्वदेशी क्षेपणास्त्रे आणि ड्रोनची परिणामकारकता पाहिली, पर्यायाने आत्मनिर्भर भारताचे सामर्थ्य दिसून आले", असे पंतप्रधान म्हणाले. विशेषतः भारताच्या ब्राह्मोस क्षेपणास्त्रांच्या प्रभावावर त्यांनी भर दिला, त्यांच्या समावेशाने देशाच्या प्रत्येक शत्रूमध्ये भीती निर्माण केली आहे असे त्यांनी नमूद केले.
लवकरच उत्तर प्रदेशात ब्राह्मोस क्षेपणास्त्रे तयार केली जातील, ही बाब उत्तर प्रदेशचे खासदार म्हणून आपल्यासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी घोषणा केली की लखनौमध्ये ब्राह्मोस क्षेपणास्त्रांचे उत्पादन सुरू होत आहे आणि अनेक प्रमुख संरक्षण कंपन्या उत्तर प्रदेश संरक्षण कॉरिडॉरमध्ये कारखाने उभारत आहेत. आगामी काळात उत्तर प्रदेशात उत्पादित होणारी शस्त्रे भारताच्या लष्करी ताकदीचा एक महत्त्वाचा भाग बनतील.
पंतप्रधानांनी जनतेला विचारले की त्यांना या कामगिरीचा अभिमान वाटतो का ? त्यांनी जाहीर केले की जर पाकिस्तानने आणखी एखादे दुष्कृत्य केले तर उत्तर प्रदेशात बनवलेली क्षेपणास्त्रे दहशतवाद्यांचा नायनाट करतील.
उत्तर प्रदेश वेगाने औद्योगिक विकास करत आहे, मोठ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांना राज्यात गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित करत आहे हे अधोरेखित करून, मोदी यांनी या परिवर्तनाचे श्रेय त्यांच्या सरकारच्या विकासाभिमुख धोरणांना दिले. त्यांनी सध्याच्या परिस्थितीची तुलना मागील राजवटीशी केली, जिथे गुन्हेगार निर्भयपणे कार्यरत होते आणि गुंतवणूकदार राज्यात प्रवेश करण्यास कचरत होते.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाने गुन्हेगार भयभीत झाले आहेत आणि गुंतवणूकदार उत्तर प्रदेशच्या भविष्यावर विश्वास व्यक्त करत आहेत यावर त्यांनी भर दिला. पंतप्रधानांनी विकासाच्या या गतीबद्दल उत्तर प्रदेश सरकारचे अभिनंदन केले आणि वाराणसीमध्ये विकासाची भव्य मोहीम अखंडपणे सुरू असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
नवीन रेल्वे उड्डाणपूल, जल जीवन मिशन अंतर्गत विविध उपक्रम, वाराणसीतील शाळांची पुनर्बांधणी, होमिओपॅथिक महाविद्यालयाचे बांधकाम आणि मुंशी प्रेमचंद यांचा वारसा जपण्यासाठीच्या प्रयत्नांसह आज सुरू करण्यात आलेल्या अनेक प्रकल्पांची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली. हे सर्व प्रकल्प भव्य, दिव्य आणि समृद्ध वाराणसीच्या निर्मितीला गती देतील, असे त्यांनी नमूद केले. सेवापुरीला भेट देणे हे भाग्याचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. हे ठिकाण म्हणजे माता कालका देवीचा उंबरठा असल्याचे ते म्हणाले. माता कालका देवीच्या चरणी त्यांनी वंदन केले. सरकारने माता कालका धामचे सुशोभीकरण करून ते अधिक भव्य बनवल्याबद्दल आणि मंदिरापर्यंत पोहोचणे सुलभ केल्याबद्दल त्यांनी आनंदही व्यक्त केला. सेवापुरीच्या क्रांतीकारक इतिहासाचे स्मरणही त्यांनी आपल्या संबोधनातून करून दिले. जिथे महात्मा गांधींच्या विचारांना मूर्त रूप मिळाले आणि प्रत्येक घरात पुरुष आणि महिलांच्या हातात चरखा होता ही तीच सेवापुरी आहे असे ते म्हणाले. चंदपूर-भदोही मार्गासारख्या प्रकल्पांमुळे, वाराणसीचे विणकर आता भदोहीच्या विणकरांशी जोडले जात असल्याचा योगायोगही त्यांनी अधोरेखित केला. याचा बनारसी रेशीम कारागिरांसह भदोहीच्या कारागिरांनाही फायदा होईल, असे त्यांनी सांगितले.
आपल्या संबोधनातून त्यांनी आर्थिक प्रगतीविषयी देखील सांगितले, सध्याची जागतिक परिस्थिती त्यांनी मांडली. वाराणसी हे विचारवंतांचे शहर आहे असे ते म्हणाले. जागतिक अर्थव्यवस्था सध्या अनेक अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या वातावरणाचा सामना करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. अशा परिस्थितीत, जगभरातील देश आपल्या हितावर लक्ष केंद्रित करत आहेत, ही बाब त्यांनी अधोरेखित केली. आता भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, अशावेळी भारताने आपल्या आर्थिक हिताबाबत सतर्क राहिले पाहिजे, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांचे आणि लघु उद्योगांचे कल्याण आपल्या सर्वोच्च प्राधान्यक्रमावर आहे आणि सरकारही या दिशेने सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, ही बाब त्यांनी अधोरेखित केली.
आपल्या संबोधनातून पंतप्रधानांनी नागरिकांना त्यांच्या जबाबदाऱ्यांचेही स्मरण करून दिले. सर्वांनी स्वदेशीची शपथ घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. कोणत्याही भारतीयाच्या घामातून आणि प्रयत्नांतून तयार झालेली कोणतीही वस्तू म्हणजे स्वदेशी आहे अशी स्वदेशीची व्याख्या त्यांनी केली. नागरिकांनी व्होकल फॉर लोकल हा मंत्र आचरणात आणावा असे आवाहन त्यांनी देशाला केले. नागरिकांनी मेक इन इंडिया उत्पादनांना प्रोत्साहन देण्याची शपथ घ्यावी, असे आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केले. आपल्या घरात येणारी प्रत्येक नवीन वस्तू स्वदेशी असली पाहिजे आणि प्रत्येक भारतीयाने ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे ते म्हणाले. प्रत्येक व्यापारी आणि दुकानदाराने केवळ स्वदेशी वस्तू विकण्याची शपथ घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. ही कृतीच देशाची खरी सेवा असेल, असे ते म्हणाले. आगामी सणासुदीच्या काळात लोकांनी स्वदेशी उत्पादनांचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले, ही महात्मा गांधी यांना खरी श्रद्धांजली असेल, असे ते म्हणाले.
विकसित भारताचे स्वप्न केवळ सामूहिक प्रयत्नातूनच साकार होईल ही बाब त्यांनी अधोरेखित केली. आपल्या भाषणाच्या समारोपात त्यांनी आज उद्घाटन झालेल्या विकास कामांबद्दल पुन्हा एकदा जनतेचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह राज्यपाल, मुख्यमंत्री, केंद्रीय आणि राज्य मंत्री तसेच इतर मान्यवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले.
पार्श्वभूमी
वाराणसीमध्ये सर्वांगीण शहरी परिवर्तन, सांस्कृतिक पुनरुज्जीवन, सुधारित कनेक्टिव्हिटी आणि जीवनमानाची गुणवत्ता वाढवणे हा या पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्यसेवा, पर्यटन, शहरी विकास आणि सांस्कृतिक वारसा यासह अनेक क्षेत्रांमधील प्रकल्पांचा उद्देश आहे.
वाराणसीतील रस्ते जोडणीत सुधारणा घडवून आणण्याच्या आपल्या वचनबद्धतेच्या अनुषंगाने पंतप्रधानांनी अनेक प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. त्यांनी वाराणसी - भदोही मार्ग आणि चितौनी-शूल टंकेश्वर मार्गाचे रुंदीकरण आणि मजबुतीकरणाच्या कामाचे उद्घाटन केले. यासोबतच मोहन सराय - अडलपुरा मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हरदत्तपूर इथल्या रेल्वे उड्डाणपुलाचे उद्घाटनही त्यांनी केले. दलमंडी, लहेरतारा-कोटवा, गंगापूर, बाबतपूर यासह अनेक ग्रामीण आणि शहरी मार्गांवर रस्त्यांचे सर्वसमावेशक रुंदीकरण आणि मजबुतीकरण करण्यासाठी तसेच लेव्हल क्रॉसिंग 22C आणि खलिसपूर यार्ड इथल्या रेल्वे उड्डाणपुलांची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते झाली.
या भागातील ऊर्जा पायाभूत सुविधांना बळकटी देण्याच्या उद्देशाने पंतप्रधानांनी स्मार्ट डिस्ट्रिब्युशन प्रोजेक्ट अंतर्गत विविध कामांची आणि 880 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विद्युत पायाभूत सुविधांच्या भूमिगत कामांचीही पायाभरणी केली.
पर्यटनाला मोठी चालना देण्याच्या उद्देशाने नदीकाठच्या 8 कच्च्या घाटांच्या पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत कालिका धाम इथली विकासकामे, शिवपूर मधील रंगीलदास कुटिया इथल्या तलाव आणि घाटाच्या सुशोभिकरणाचे काम, तसेच दुर्गाकुंडचा जीर्णोद्धार आणि जलशुद्धीकरण कामांचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. त्यांनी करदमेश्वर महादेव मंदिराच्या जीर्णोद्धार, अनेक स्वातंत्र्यसैनिकांचे जन्मस्थान असलेल्या करखियाओचा विकास, सारनाथ, ऋषी मांडवी आणि रामनगर क्षेत्रातील शहर सुविधा केंद्र, लमही इथल्या मुंशी प्रेमचंद यांच्या वडिलोपार्जित घराचा पुनर्विकास तसेच संग्रहालयाचे अद्ययावतीकरण अशा अनेक कामांची पायाभरणीही केली. यासोबतच कांचनपूर इथे शहरी मियावाकी वन विकसित करण्यासाठी आणि शहीद उद्यान तसेच इतर 21 उद्यानांच्या पुनर्विकास आणि सुशोभीकरणाच्या कामांची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते झाली.
याव्यतिरिक्त, सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या जलस्रोतांचे जतन करण्यासाठी, रामकुंड, मंदाकिनी, शंकुलधारा आणि इतर विविध कुंडांच्या जलशुद्धीकरण आणि देखभाल कामांचे तसेच चार तरंगते पूजा मंच स्थापित करण्याच्या कामांची पायाभरणी पंतप्रधानांनी केली. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी, पंतप्रधानांनी जल जीवन मिशन अंतर्गत 47 ग्रामीण पेयजल योजनांचेही उद्घाटन केले.
यावेळी पंतप्रधानांनी नगरपालिकेच्या हद्दीतील 53 शाळा इमारतींच्या अद्ययावतीकरणाच्या कामांचे उद्घाटन केले आणि सर्वांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्याच्या आपल्या स्वप्नाला पुढची दिशा दिला. यावेळी पंतप्रधानांनी नवीन जिल्हा ग्रंथालयाचे बांधकाम तसेच जाखिनी, लालपूर इथल्या सरकारी उच्च माध्यमिक शाळांचे नूतनीकरण अशा अनेक शैक्षणिक प्रकल्पांचीही पायाभरणी केली.
आरोग्य विषयक पायाभूत सुविधांना मोठी चालना देण्याच्या उद्देशाने, पंतप्रधानांनी महामना पंडित मदन मोहन मालवीय कर्करोग केंद्र आणि होमी भाभा कर्करोग रुग्णालयात रोबोटिक सर्जरी आणि सीटी स्कॅन सुविधांसह प्रगत वैद्यकीय उपकरणे स्थापित करण्याचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी एक होमिओपॅथिक महाविद्यालय आणि रुग्णालयाचीही पायाभरणी केली. याशिवाय एक पशु जन्म नियंत्रण केंद्र आणि संबंधित श्वान निगा केंद्राचे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते झाले.
वाराणसीमध्ये जागतिक दर्जाच्या क्रीडा पायाभूत सुविधा उभारण्याचा आपला संकल्प साकार करण्याच्या प्रयत्नांतर्गत पंतप्रधानांनी डॉ. भीमराव आंबेडकर स्टेडियममध्ये सिंथेटिक हॉकी टर्फचे उद्घाटन केले. कायदे अंमलबजावणी क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांना अतिरिक्त आणि विस्तारीत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पंतप्रधानांनी रामनगर इथल्या प्रादेशिक सशस्त्र पोलीस दलाच्या ठिकाणी 300 क्षमतेच्या बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटन केले, तसेच शीघ्र प्रतिसाद दलाच्या बराकींसाठी पायाभरणीही केली.
आजच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी प्रधानमंत्री-किसानचा 20 वा हप्ता वितरीत केला आणि शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या उपक्रमांअतर्गतही एक महत्त्वाचे पाऊल टाकले. याअंतर्गत 9.7 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 20,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम थेट जमा केली जाणार आहे. या हफ्त्यानंतर ही योजना सुरु झाल्यापासून आत्तापर्यंत वितरीत केलेली रक्कम 3.90 लाख कोटी रुपयांचा टप्पा पार करणार आहे.
यावेळी पंतप्रधानांनी काशी संसद प्रतियोगिता या स्पर्धेअंतर्गतचे विविध कार्यक्रम आणि स्पर्धांसाठीच्या नोंदणी पोर्टलचाही प्रारंभ केला. या स्पर्धेअंतर्गत स्केचिंग स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, छायाचित्रण स्पर्धा, क्रिडा स्पर्धा, ज्ञान प्रतियोगिता आणि रोजगार मेळा आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी अनेक दिव्यांग आणि वृद्ध लाभार्थ्यांना 7,400 हून अधिक सहायक उपकरणांचेही वितरण केले.
***
सुषमा काणे/शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/तुषार पवार/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2151744)
आगंतुक पटल : 17
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Nepali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam