पंतप्रधान कार्यालय
संसदेच्या पावसाळी अधिवेशन 2025 च्या आरंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले निवेदन
पावसाळी अधिवेशन आपल्या राष्ट्रासाठी एक अभिमानाचा क्षण आहे, आपली एकत्रित कामगिरी यथोचित साजरी करण्याचा क्षण आहे
जगाने ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताच्या लष्करी सामर्थ्याचा अनुभव घेतला आहे, भारतीय सैनिकांनी मोहीम 100% यशस्वी करून आपले उद्दिष्ट गाठले, दहशवाद्यांच्या सूत्रधारांना त्यांच्या छुप्या अड्ड्यांमधून शोधून त्यांचा निःपात केला - पंतप्रधान
भारताने अनेक हिंसक आघात झेलले आहेत, मग तो दहशतवाद असो किंवा नक्षलवाद, मात्र आता नक्षलवाद किंवा माओवादाचा प्रभाव झपाट्याने कमी होत आहे, बॉम्ब आणि बंदुकांच्या वर संविधानाची शक्ती आहे. भूतकाळातील लाल कॉरिडॉर आता प्रगती आणि विकासाचे हरित मार्ग म्हणून परिवर्तित होत आहेत
डिजिटल इंडिया जागतिक स्तरावर नावारूपाला येत असून अनेक राष्ट्रांमध्ये युपीआय लोकप्रिय होत आहे, फिनटेक क्षेत्रात त्याने नावलौकिक प्राप्त केला आहे.
पहलगाम येथील निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण जग हादरून गेले आणि दहशतवाद आणि त्याच्या केंद्राकडे जागतिक लक्ष वेधले; पक्षीय रेषांपेक्षा वर जाऊन, भारतातील प्रतिनिधींनी पाकिस्तानची भूमिका उघड करण्यासाठी एकत्र आले: पंतप्रधान
Posted On:
21 JUL 2025 4:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जुलै 2025
संसदेच्या पावसाळी अधिवेशन 2025 च्या आरंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसद भवन परिसरात प्रसारमाध्यमांना संबोधित केले. पावसाळी अधिवेशनात सर्वांचे स्वागत करताना, पंतप्रधान म्हणाले की मान्सून हे नवोन्मेष आणि पुनरुज्जीवनाचे प्रतीक आहे. देशभरातील हवामानाची स्थिती सुधारत असल्याचे अधोरेखित करून त्यांनी सांगितले की त्यामुळे कृषिक्षेत्रासाठी लाभदायक भविष्याचा अंदाज बांधता येऊ शकतो. पाऊस हा केवळ ग्रामीण अर्थव्यवस्था किंवा आणि देशाच्या एकूण आर्थिक रचनेतच महत्त्वाची भूमिका बजावतो असे नाही तर प्रत्येक कुटुंबाच्या उत्तम आर्थिक स्थितीवर देखील त्याचा परिणाम होतो. सध्याच्या माहितीनुसार गेल्या दहा वर्षांशी तुलना करता यंदा जलसाठ्याची पातळी तिप्पट झाली आहे. ही वाढ येत्या काळात भारताच्या अर्थव्यवस्थेला लक्षणीयरीत्या फायदेशीर ठरेल यावर त्यांनी भर दिला.
“सध्याचे पावसाळी अधिवेशन आपल्या राष्ट्रासाठी एक अभिमानाचा क्षण आहे, हे भारताच्या भारताच्या विजयाचा उत्सव दर्शवते” असे सांगून जेव्हा भारताचा तिरंगा ध्वज पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात मानाने फडकला त्या ऐतिहासिक क्षणाचा त्यांनी उल्लेख केला, ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा स्रोत गोष्ट आहे, असे ते म्हणाले. या कामगिरीमुळे देशभरात विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष याबद्दल एक नवीन उत्साह आणि नवीन उमेदीची उधळण झाली, असे त्यांनी सांगितले. संपूर्ण संसद- लोकसभा आणि राज्यसभा ही दोन्ही सभागृहे आणि भारतातील जनता या कामगिरीबद्दलचा अभिमान व्यक्त करण्यासाठी एकजूट असल्याचे ते म्हणाले. हा सामूहिक उत्सव भारताच्या भविष्यातील अंतराळ संशोधन मोहिमांसाठी प्रेरणा आणि प्रोत्साहन म्हणून काम करेल, असे त्यांनी सांगितले.
विद्यमान पावसाळी अधिवेशन म्हणजे भारताच्या विजयाचा महोत्सव असल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले की संपूर्ण जगाने भारताच्या सशस्त्र दलांची ताकद आणि क्षमता पाहिली आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारतीय सैन्याने केवळ 22 मिनिटांत दहशतवाद्यांचे मोक्याचे तळ निष्प्रभ केले. या ऑपरेशनची घोषणा आपण बिहारमधील एका सार्वजनिक कार्यक्रमात केली होती आणि सशस्त्र दलांनी त्यांचे कौशल्य जलद गतीने सिद्ध केले, असे ते म्हणाले. भारताच्या "मेड इन इंडिया" संरक्षण क्षमतांबद्दल जागतिक स्तरावर औत्सुक्य वाढत असून त्यांच्या अलीकडील परदेश दौऱ्यांमध्ये जागतिक नेत्यांनी भारतात विकसित केलेल्या स्वदेशी लष्करी उपकरणांची प्रशंसा केली, असे त्यांनी सांगितले. अधिवेशनादरम्यान, संसद या विजयाचा महोत्सव साजरा करण्यासाठी एकत्र येईल ज्यामुळे भारताच्या लष्करी सामर्थ्याला नवीन ऊर्जा आणि प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सामूहिक भावनेमुळे नागरिकांनाही प्रेरणा मिळते आणि संरक्षण क्षेत्रातील संशोधन, कारखानदारी आणि नवोन्मेषाला नवीन ऊर्जा मिळते तसेच भारतीय युवावर्गाला रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. हे दशक शांतता आणि प्रगतीचे प्रतिबिंब असून ते हातात हात घालून पुढे जात आहे, तसेच प्रत्येक पावलावर विकासाची सतत भावना आहे.
स्वातंत्र्यापासून सुरू असलेल्या दहशतवाद असो किंवा नक्षलवाद असो, देशाला बऱ्याच काळापासून विविध हिंसक घटनांचा सामना करावा लागला आहे, यावर त्यांनी भर दिला. नक्षलवाद आणि माओवादाचा भौगोलिक प्रसार वेगाने ओसरत असून भारताचे सुरक्षा दल, नवीन आत्मविश्वास आणि वेगवान प्रयत्नांसह, नक्षलवाद आणि माओवाद पूर्णपणे नष्ट करण्याच्या ध्येयाकडे स्थिरपणे प्रगती करत आहेत.देशातील शेकडो जिल्हे आता नक्षलवादी हिंसाचारातून मुक्त होऊन मोकळा श्वास घेत आहेत, असे त्यांनी अभिमानाने सांगितले. भारताचे संविधान शस्त्रास्त्रे आणि हिंसेवर विजय मिळवत आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. त्यांनी नमूद केले की, पूर्वीचे 'रेड कॉरिडॉर' असलेले क्षेत्र आता 'ग्रीन ग्रोथ झोन'मध्ये स्पष्टपणे रूपांतरित होत आहेत, जे देशाच्या आशादायक भविष्याचे संकेत देत आहेत.
यापैकी प्रत्येक घटना देशभक्ती आणि राष्ट्राच्या कल्याणासाठी असलेल्या समर्पणाने प्रेरित असलेल्या प्रत्येक सन्माननीय संसद सदस्यासाठी अभिमानाच्या क्षणाचे प्रतिनिधित्व करत आहे, यावर भर देत मोदींनी सांगितले की, संसदेच्या या पावसाळी अधिवेशनादरम्यान, प्रत्येक संसद सदस्य आणि प्रत्येक राजकीय पक्षाच्या आवाजातून राष्ट्रीय अभिमानाचा हा उत्सव संपूर्ण देश ऐकेल.
2014 मध्ये त्यांचे सरकार सत्तेवर आले तेव्हा भारत 'फ्रॅजाइल फाइव्ह' (Fragile Five) अर्थव्यवस्थांचा भाग होता, असे अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले की, त्यावेळी भारत जागतिक आर्थिक क्रमवारीत 10व्या स्थानावर होता, परंतु आज भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याकडे वेगाने वाटचाल करत आहे आणि त्या महत्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे. 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत, हे परिवर्तन जागतिक संस्थांनी मोठ्या प्रमाणावर विचारात घेतले आणि कौतुक केले आहे. मोदींनी नमूद केले की, 2014 पूर्वी भारताला दोन अंकी महागाईचा सामना करावा लागत होता. “आज, महागाई दर 2 टक्क्यांच्या आसपास असल्याने, नागरिकांना दिलासा मिळाला आहे आणि जीवनमान सुधारल्याचा अनुभव येत आहे. कमी महागाई आणि उच्च वाढ हे भक्कम आणि स्थिर विकासाचे प्रतीक आहे,” असे मोदींनी सांगितले.
“डिजिटल इंडिया (Digital India) आणि युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) यांसारखे उपक्रम भारताच्या उदयोन्मुख क्षमता जगासमोर प्रदर्शित करत आहेत आणि भारताच्या डिजिटल इकोसिस्टममध्ये जागतिक स्तरावर ओळख आणि रुची वेगाने वाढत आहे,” असे पंतप्रधान म्हणाले. UPI ने फिनटेक (fintech) क्षेत्रात एक मजबूत स्थान निर्माण केले आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांनी भर दिला की, रिअल-टाइम डिजिटल व्यवहारांमध्ये भारत जगात आघाडीवर आहे, जगात इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त व्यवहार भारतात नोंदवले जात आहेत.
आंतरराष्ट्रीय संस्थांच्या अलीकडील जागतिक शिखर परिषदेतील भारताच्या प्रमुख कामगिरीवर प्रकाश टाकताना, मोदींनी आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) चा उल्लेख केला, ज्यांनी भारतातील 90 कोटींहून अधिक व्यक्ती आता सामाजिक सुरक्षा कवच अंतर्गत समाविष्ट आहेत, जे सामाजिक कल्याणातील एक ऐतिहासिक यश असल्याचे सांगितले आहे. पंतप्रधानांनी जागतिक आरोग्य संघटना (WHO) चाही संदर्भ दिला, ज्याने भारताला ट्रॅकोमामुक्त (trachoma) घोषित केले आहे, हा डोळ्यांचा रोग सामान्यतः पावसाळ्यात दिसून येतो. ही मान्यता भारताच्या सार्वजनिक आरोग्य प्रयत्नांमधील एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड आहे, यावर त्यांनी भर दिला
संपूर्ण जगाला हादरवून टाकणाऱ्या आणि दहशतवाद तसेच त्याच्या प्रायोजकांकडे जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या पहलगाममधील क्रूर हत्याकांडांची आठवण करून देत पंतप्रधान म्हणाले की, याला प्रत्युत्तर म्हणून, बहुतेक राजकीय पक्ष आणि राज्यांचे प्रतिनिधी पक्षीय हितसंबंधांच्या पलीकडे गेले आणि देशाच्या सेवेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर संपर्क प्रस्थापित केला. त्यांनी या एकजुटीने झालेल्या राजनैतिक मोहिमेच्या यशावर प्रकाश टाकला, ज्याने पाकिस्तानला जागतिक स्तरावर दहशतवादाचा प्रायोजक म्हणून उघडे पाडले. मोदी यांनी संसद सदस्यांचे आणि राजकीय पक्षांचे मनापासून कौतुक केले, ज्यांनी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय मोहीम राबवली. त्यांनी सांगितले की, त्यांच्या प्रयत्नांमुळे देशात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आणि आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताच्या दहशतवादावरील भूमिकेबाबत दृष्टीकोन खुला केला. तसेच या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय योगदानाबद्दल सर्वांचे कौतुक करणे हा आपला विशेषाधिकार असल्याचे त्यांनी नमूद केले.
एकतेची शक्ती आणि राष्ट्राला प्रेरणा देणारा आणि ऊर्जा देणारा एकाच आवाजाचा आत्मा यावर भर देत, पंतप्रधान म्हणाले की, सध्याचे पावसाळी अधिवेशन म्हणजे या विजयोत्सवाच्या सोहळ्याचे प्रतिबिंब असेल, जे भारताच्या लष्करी सामर्थ्याचा आणि राष्ट्रीय क्षमतेचा गौरव करत, 140 कोटी नागरिकांसाठी प्रेरणास्रोत म्हणून या भावनेचे प्रतिबिंब असेल. मोदी यांनी असा विश्वास व्यक्त केला की, सामूहिक प्रयत्नांमुळे संरक्षण क्षेत्रात भारताची आत्मनिर्भरतेची उद्दिष्टे अधिक मजबूत होतील. त्यांनी राष्ट्राला सशस्त्र दलांचे सामर्थ्य ओळखण्याचे आणि त्याचे कौतुक करण्याचे आवाहन केले. जनतेला आणि राजकीय पक्षांना संबोधित करताना पंतप्रधानांनी एकतेतून मिळणारी शक्ती आणि एकाच आवाजात बोलण्याचा प्रभाव अधोरेखित केला. त्यांनी सर्व संसद सदस्यांना संसदेत ही भावना पुढे नेण्याचे आवाहन केले. विविध राजकीय पक्ष आणि त्यांच्या संबंधित कार्यसूचींची विविधता लक्षात घेता, मोदी म्हणाले की, पक्षीय हितांबाबत मते भिन्न असली तरी, राष्ट्रीय हिताच्या बाबतीत हेतूंचा सुसंवाद असणे आवश्यक आहे. या अधिवेशनात राष्ट्राच्या विकासाला चालना देणारे, नागरिकांना सक्षम करणारी आणि भारताची प्रगती मजबूत करणारी अनेक प्रस्तावित विधेयके समाविष्ट असतील, असा पुनरुच्चार करत त्यांनी आपले भाषण संपवले. त्यांनी सर्व संसद सदस्यांना फलदायी आणि उच्च-गुणवत्तेच्या चर्चांसाठी शुभेच्छा दिल्या.
जयदेवी पुजारी स्वामी/भक्ती सोनटक्के/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2146372)
Read this release in:
Odia
,
Malayalam
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada