युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

खेलो इंडिया बीच गेम्स या स्पर्धांतून खेळांमध्ये असलेल्या परिवर्तनकारी सामर्थ्याचे दर्शन घडते, या स्पर्धांमुळे क्रीडाक्षेत्रामध्ये एक नवा अध्याय जोडला गेला आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी


केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांनी या क्रीडास्पर्धा सुरु झाल्याची केली घोषणा

Posted On: 20 MAY 2025 12:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 मे 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  खेळांमध्ये असलेली ‘परिवर्तनकारी शक्ती’ आणि खेलो इंडिया बीच गेम्सची सुरुवात हा देशाच्या क्रीडाविषयक इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा क्षण असल्याचे अधोरेखित केले. दरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांतील क्रीडास्पर्धा आयोजक तसेच भारतीय क्रीडा प्राधिकरण यांना पाठवलेल्या संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्वांचे अभिनंदन केले आणि हे बीच गेम्स भारताच्या क्रीडाविश्वात महत्वपूर्ण स्थान  निर्माण करतील असे सांगत सर्व संबंधितांना शुभेच्छा दिल्या.

खेलो इंडिया बीच गेम्सच्या आयोजनासाठी दीवची निवड अत्यंत चपखल आहे असे मत पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केले. “सूर्यप्रकाश, वाळू आणि पाणी यांचा संगम शारीरिक क्षमतेत वाढ करतो आणि त्याच वेळी आपल्या सागरी वारशाचा उत्सव साजरा करतो,” असे ते म्हणाले. “आपल्या भारतासारख्या विविधता असलेल्या देशात खेळांमध्ये नेहमीच विविध संस्कृती, प्रदेश आणि भाषा यांना एकत्र आणणारी अनोखी शक्ती दिसून येते. क्रीडाप्रकारांमध्ये असलेली चैतन्यमय उर्जा मनोरंजनाच्या पलीकडे पोहोचून परिवर्तनकारी शक्ती बनली आहे तसेच ती आपल्या युवकांच्या राष्ट्रीय अभिमानाचे आणि आकांक्षांचे प्रतीक बनली आहे. आणि याच संदर्भात खेलो इंडिया बीच गेम्स या क्रीडास्पर्धांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे,” असे पंतप्रधानांनी सांगितले.

खेलो इंडिया उपक्रमाच्या सतत विस्तारत जाणाऱ्या परिघाअंतर्गत प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या किनारी स्पर्धा म्हणजेच बीच गेम्सचे उद्घाटन झाल्याची औपचारिक घोषणा केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांनी केली.  दीव येथील घोघला बीच या कार्यक्रमस्थळी आयोजित विविधरंगी सोहळ्यात या स्पर्धांचे उद्घाटन झाले.

देशभरातील 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 1,350 खेळाडू या खेलो इंडिया बीच गेम्समध्ये भाग घेण्यासाठी एकत्र आले आहेत. या प्रसंगी केंद्रीय मंत्री डॉ.मांडवीय म्हणाले, “आपण आज केवळ या क्रीडास्पर्धांचे उद्घाटन करत नसून, भारताच्या पहिल्यावहिल्या सागरी क्रीडा क्षेत्रातील क्रांतीचा उद्घोष करत आहोत!” ते पुढे म्हणाले, “विकसित भारताच्या उभारणीसाठी, खेलो इंडिया हा उपक्रम म्हणजे युवकांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी गवसलेला खात्रीलायक मार्ग आहे.”

डॉ. मनसुख मांडवीय म्हणाले की खेलो इंडिया बीच गेम्सकडे एक “प्रासंगिक” उपक्रम म्हणून पाहिले जाऊ नये. “बीच व्हॉलीबॉल सारखे क्रीडाप्रकार युवकांना केवळ एक छंद म्हणून नव्हे तर कारकीर्दीचा उत्तम पर्याय म्हणून देखील संधी प्रदान करतात. भारताच्या किनाऱ्यावर प्रथमच स्पर्धात्मक क्रीडास्पर्धांचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर आयोजन होत आहे,” असे ते पुढे म्हणाले.

  

 

* * *

S.Kane/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2129804)