शिक्षण मंत्रालय
एम सी मेरी कॉम,अवनी लेखरा आणि सुहास यतिराज परीक्षा पे चर्चा 2025 च्या 7 व्या भागात झाले सहभागी
Posted On:
17 FEB 2025 8:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 17 फेब्रुवारी 2025
परीक्षा पे चर्चा 2025 च्या उद्घाटनपर भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवादात्मक स्वरूपात मांडलेले विचार पुढे नेत या कार्यक्रमाच्या आज प्रसारित झालेल्या सातव्या भागात प्रतिथयश क्रीडापटू एम सी मेरी कॉम, अवनी लेखरा आणि सुहास यतिराज सहभागी झाले. त्यांनी ध्येय निश्चिती, लवचिकता आणि शिस्तीच्या माध्यमातून तणाव व्यवस्थापन, याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याशिवाय त्यांच्या स्वतःच्या जीवनातील वैयक्तिक किस्से आणि ते त्यांच्या आयुष्यात खेळातून काय शिकले याविषयी देखील माहिती दिली.
मुष्टियुद्ध हा खेळ महिलांसाठी नाही या अतिशय पूर्वापार चालत आलेल्या समजुतीला आपण कसा छेद दिला आणि केवळ स्वतःसाठीच नव्हे तर देशभरातील महिलांसाठीच्या सामाजिक धारणांना आव्हान देणारे विचार कसे झुगारून लावले याविषयी मेरी कॉम यांनी सांगितले. आपण स्वतःच आपले शिल्पकार असतो या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सल्ल्याचा दाखला त्यांनी दिला.तसेच एक मुलगी, पत्नी आणि आई म्हणून आपला गेल्या 20 वर्षांच्या प्रवास उलगडून दाखवला.समर्पण आणि चिकाटी हीच यशाची गुरुकिल्ली आहे यावर भर देत त्यांनी कठोर परिश्रमाचे महत्त्वही सांगितले.

यश संपादन करण्यातील प्रमुख अडथळा असलेल्या भीती सारख्या नकारात्मक भावनांवर मात करण्यासाठी आपले मनःसामर्थ्य वाढवण्याचा सल्ला सुहास यतिराज यांनी विद्यार्थ्यांना दिला. भीतीला मागे सारणे हाच नैसर्गिकरीत्या बहारदार कामगिरी करण्याचा आणि त्यात उत्कृष्टता मिळवण्याचा मूलमंत्र आहे, असे त्यांनी सांगितले.सूर्याप्रमाणे तळपण्यासाठी सूर्याप्रमाणे प्रज्ज्वलित व्हावे लागते, असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना चिकाटी आणि जिद्दीने आव्हानांना सामोरे जाण्याचे आवाहन केले. सकारात्मक ऊर्जेसाठी त्यांनी विद्यार्थ्यांना संगीतोपचाराची ओळख करून दिली तसेच विचारांनी नशीब घडते हे लक्षात घेऊन सजग विचारांचे महत्त्व अधोरेखित केले.
अवनी लेखरा यांनी कौशल्य विकासाचे महत्त्व अधोरेखित केले आणि योग्य कौशल्ये आत्मसात केल्याने आत्मविश्वास कसा निर्माण होतो आणि भीती कशी कमी होते हे स्पष्ट केले. खेळाप्रमाणेच अभ्यासात देखील विश्रांती आणि सराव या गोष्टी महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी परीक्षेपूर्वी पुरेशी झोप घेण्याचा सल्लाही अवनी यांनी दिला.आत्मविश्वास वाढवण्याऱ्या एका उपक्रमाच्या माध्यमातून देखील त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या सत्रादरम्यान, पालकांना करिअरच्या निवडीबद्दलचे आपले म्हणणे कसे पटवून द्यावे,आव्हानांना सामोरे जाण्यासाठी धैर्य कसे विकसित करावे आणि लक्ष केंद्रित करणे यासारख्या विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले. या कार्यक्रमात दुबई आणि कतारमधील विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला आणि त्यांच्या शंका पाहुण्यांना विचारल्या.
कठोर परिश्रम ही यशाची गुरुकिल्ली आहे आणि शॉर्टकटने काहीही साध्य होत नाही यावर सर्व पाहुण्यांनी एकमताने भर दिला.
सर्वसमावेशक विकास सुनिश्चित करण्यासाठी, क्रीडा क्षेत्रातील दिग्गज, तांत्रिक तज्ञ, स्पर्धा परीक्षांमध्ये अव्वल क्रमांक पटकावणारे, मनोरंजन उद्योगातील व्यावसायिक आणि आध्यात्मिक गुरु यासह विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे असलेल्या ज्ञानाने समृद्ध करत आहेत.
कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी सत्रातून मिळालेल्या शिकवणीवर चर्चा केली आणि त्यांचे मत सामायिक केले.
परीक्षा पे चर्चा (पीपीसी) 2025च्या आठव्या आवृत्तीला, त्याच्या सुधारित आणि परस्परसंवादी स्वरूपात, देशभरातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांकडून मोठ्या प्रमाणात प्रशंसा मिळत आहे. टाउन हॉल मध्ये घेतल्या जाणाऱ्या पारंपारिक स्वरूपाला फाटा देत, या वर्षीच्या आवृत्तीची सुरुवात 10 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील निसर्गरम्य सुंदर नर्सरी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत एका आकर्षक सत्राने झाली.
उद्घाटनाच्या भागात, पंतप्रधानांनी देशभरातील 36 विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
त्यांच्या मौल्यवान मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक आव्हानांना आत्मविश्वासाने तोंड देण्यासाठी व्यावहारिक धोरणे मिळाली, त्याचबरोबर विकासाची मानसिकता आणि समग्र शिक्षणाला चालना मिळाली.
परीक्षा पे चर्चा 2025 विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. हे व्यासपीठ त्यांना सकारात्मक मानसिकतेने शैक्षणिक आणि जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आत्मविश्वास आणि आनंदाची जोड देते.
S.Kakade/B.Sontakke/H.Kulkarni/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2104215)
Visitor Counter : 28
Read this release in:
Khasi
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam