पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युवा दिनानिमित्त, 12 जानेवारी रोजी ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2025’ मध्ये सहभागी होणार


30 लाखांहून अधिक सहभागींमधून गुणवत्तेवर आधारित, बहुस्तरीय निवड प्रक्रियेद्वारे निवड झालेल्या 3000 युवा नेत्यांशी पंतप्रधान संवाद साधणार

भारतापुढील काही महत्त्वाची आव्हाने हाताळण्यासाठीच्या नवोन्मेशी कल्पना आणि उपायांवर युवा नेते पंतप्रधानांसमोर सादरीकरण करणार

अनोख्या उपक्रमाद्वारे,  युवा नेत्यांना त्यांच्या कल्पना, अनुभव आणि आकांक्षा भोजन कार्यक्रमादरम्यान थेट पंतप्रधानांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळणार

Posted On: 10 JAN 2025 9:21PM by PIB Mumbai

 

स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय युवा दिना निमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता भारत मंडपम, नवी दिल्ली येथे ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2025’ मध्ये सहभागी होतील. यावेळी ते देशभरातील 3,000 युवा नेत्यांशी संवाद साधतील आणि उपस्थितांना संबोधित करतील. पारंपरिक पद्धतीने राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित करण्याची 25 वर्षांची परंपरा खंडित करणे, हे विकसित भारत यंग लीडर्स डायलॉगचे उद्दिष्ट आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 1 लाख युवकांना राजकारणात आणून विकसित भारताची त्यांची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या, पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या घोषणेला अनुसरून हा उपक्रम आहे. या अनुषंगाने, यंदाच्या राष्ट्रीय युवा दिनानिमित्त, पंतप्रधान देशाच्या भावी नेत्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देऊन त्यांना सक्षम करण्यासाठी आखलेल्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होतील. यावेळी हे नवोन्मेशी युवा नेते पंतप्रधानांच्या समोर भारताच्या विकासाकरता महत्वाच्या असलेल्या दहा क्षेत्रांवर आधारित पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन करतील. या सादरीकरणांमध्ये युवा नेत्यांनी भारतापुढील काही सर्वात गंभीर आव्हानांची हाताळणी करण्यासाठी सुचवलेल्या नवोन्मेशी कल्पना आणि उपायांचे प्रतिबिंब उमटेल.

या दहा संकल्पनांवर सहभागींनी लिहिलेल्या सर्वोत्कृष्ट निबंधांच्या संकलनाचे पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी प्रकाशन होईल. तंत्रज्ञान, शाश्वतता, महिला सक्षमीकरण, उत्पादन आणि कृषी अशा विविध क्षेत्रांचा या संकल्पनांमध्ये समावेश आहे.

पंतप्रधान युवा नेत्यांबरोबर दुपारच्या भोजनासाठी उपस्थित राहतील. यावेळी युवा नेत्यांना  त्यांचे विचार, अनुभव आणि आकांक्षा थेट पंतप्रधानांसमोर मांडण्याची संधी मिळेल. हा वैयक्तिक संवाद प्रशासन आणि तरुणांच्या आकांक्षा यांच्यातील अंतर भरून काढेल, आणि सहभागींमध्ये आपलेपणा आणि जबाबदारीची भावना खोलवर रुजवेल.

11 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या संवाद सत्रात युवा नेते, स्पर्धा, विविध उपक्रम, सांस्कृतिक आणि संकल्पनांवर आधारित सादरीकरण करतील. याशिवाय डोमेन तज्ञ आणि मार्गदर्शकांच्या नेतृत्वाखालील संकल्पनेवर चर्चासत्र देखील होणार आहेत. यावेळी भारताचा कलात्मक वारसा आणि आधुनिक युगातील प्रगती दर्शवणारा सांस्कृतिक कार्यक्रम आणि ड्रोन शो देखील आयोजित केला जाणार आहे.

विकसित भारत युवा नेतृत्व संवाद कार्यक्रमात भाग घेण्यासाठी 3000  उत्साही आणि प्रेरित तरुणांची निवड करण्यात आली आहे. विकसित भारत स्पर्धेच्या माध्यमातून अत्यंत विचारपूर्वक आखलेल्या आणि गुणवत्तेवर आधारित बहुस्तरीय निवड प्रक्रियेनंतर देशभरातील सर्वाधिक प्रेरित आणि चैतन्यशील युवकांची निवड करण्यात आली आहे. या त्रिस्तरीय प्रक्रियेत 15 - 29 वर्षांच्या सहभागींचा समावेश आहे.  ‘विकसित भारत प्रश्नमंजुषा’ या पहिल्या टप्प्यात सर्व राज्यातील युवकांची 12 भाषांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये सुमारे 30 लाख तरुणांनी भाग घेतला. यात पात्र ठरलेले सहभागी दुसऱ्या फेरीत गेल्यानंतर निबंध स्पर्धा फेरी घेण्यात आली, यामध्ये 'विकसित भारतासाठी तरुणांचे सक्षमीकरण' यासारख्या निश्चित करण्यात आलेल्या सुमारे 10 संकल्पनांवर युवकांनी लिहिलेले सुमारे 2 लाख  निबंध सादर करण्यात आले. तिसऱ्या टप्प्यातप्रति संकल्पना 25 या प्रमाणात सहभागी उमेदवारांनी अत्यंत क्लिष्ट वैयक्तिक स्पर्धांमध्ये भाग घेतला. प्रत्येक राज्याने दिल्लीतील राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपले सर्वोत्तम संघ तयार करून प्रत्येक ट्रॅकमधून आपले अव्वल तीन उमेदवार निवडले.

विकसित भारत चॅलेंज ट्रॅकमध्ये 1,500 युवा सहभागी असून त्यापैकी 500 जण राज्यस्तरीय स्पर्धेतील अव्वल संघांचे प्रतिनिधित्व करतात तर 1,000 सहभागी राज्यस्तरीय युवा महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नावीन्यपूर्ण प्रदर्शन अशा पारंपारिक ट्रॅकमधून निवडण्यात आले आहेत, याशिवाय विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 500 जणांना आमंत्रित केले असून ते संवादात सहभागी होणार आहेत.

***

N.Chitale/R.Agashe/B.Sontakke/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2091987) Visitor Counter : 38