गृह मंत्रालय

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांचा हिंदी दिवस 2024 निमित्त संदेश

Posted On: 14 SEP 2024 9:15AM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज हिंदी दिवसानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. आजचा हा पावन दिवस आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण 14 सप्टेंबर 1949 रोजी भारताच्या संविधान सभेने हिंदी भाषेचा संघाची अधिकृत राजभाषा भाषा म्हणून स्वीकारले होते, असे हिंदी दिवसानिमित्त दिलेल्या आपल्या संदेशात गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. या घटनेला 75 वर्षे पूर्ण होत आहेत आणि आपण या वर्षी राजभाषेचा हीरक महोत्सव साजरा करणार आहोत, असेही अमित शहा म्हणाले. हिंदी, राजभाषा आणि आपल्या सर्व राज्यांतील संबंधित भाषांसाठी 75 वर्षांचा हा प्रवास अत्यंत महत्त्वाचा आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. हिंदी भाषेने अनेक चढउतार पाहिले आहेत, पण आज या टप्प्यावर उभे राहून आपण हे निश्चितपणे म्हणू शकतो की हिंदीची कोणत्याही स्थानिक भाषेशी स्पर्धा नाही, हे त्यांनी स्पष्ट केले.

हिंदी भाषेची सर्व भारतीय भाषांची मैत्री असून त्या दोन्ही भाषा एकमेकांना पूरक आहेत, असे अमित शहा म्हणाले. गुजराती, मराठी, तेलगू, मल्याळम, तामिळ किंवा बांगला असो, प्रत्येक भाषा हिंदी भाषेला मजबूत करते आणि हिंदी भाषा प्रत्येक भाषा मजबूत करते, असे ते म्हणाले. जर आपण हिंदी भाषा चळवळीकडे बारकाईने पाहिले तर एक गोष्ट लक्षात येते की ज्यांनीही चळवळ चालवली मग ते राजगोपालाचारी जी, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, लाला लजपत राय, नेताजी सुभाषचंद्र बोस किंवा आचार्य कृपलानी असोत, हे सर्व नेते बिगरहिंदी भाषिक भागातील होते, असेही केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले. अय्यंगार आणि  के. एम मुन्शी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या समितीने हिंदी भाषेला अधिकृत राजभाषा म्हणून मान्यता देण्यासाठी तसेच हिंदी भाषा आणि इतर सर्व भाषांना बळ देण्यासाठी संविधान सभेला अहवाल सादर केला होता. हे दोन्ही नेते देखील बिगरहिंदी भाषिक भागातील होते, असे शहा म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षांत हिंदी भाषा आणि स्थानिक भाषांना बळकट करण्यासाठी खूप काम केले गेले आहे, असे शहा यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी अभिमानाने अनेक आंतरराष्ट्रीय मंचांना हिंदी भाषेत संबोधित करून हिंदी भाषेचे महत्त्व देशातच नव्हे तर जगभर मांडले आहे, असेही त्यांनी सांगितले. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात आपल्या भाषांबद्दलचा अभिमानही वाढवला आहे. या 10 वर्षांत आम्ही अनेक भारतीय भाषांना बळकट करण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण देण्यास महत्त्वाचे स्थान देऊन आपल्या सर्व भाषांना आणि हिंदी भाषेला नवसंजीवनी दिली आहे, असेही ते म्हणाले.

आम्ही या 10 वर्षांत 'कंठस्थ' हे साधन विकसित केले आहे, असे शहा यांनी सांगितले.  गेल्या 10 वर्षांत आम्ही संसदीय राजभाषा समितीचे चार अहवाल सादर केले आहेत आणि सरकारी कामात हिंदी भाषेला ठळकपणे स्थान देण्याचे काम केले आहे, असेही ते म्हणाले. येत्या काही दिवसांत, राजभाषा विभाग आठव्या अनुसूचीमध्ये सूचीबद्ध केलेल्या सर्व भाषांमध्ये हिंदीतून अनुवाद करण्यासाठी एक पोर्टल देखील आणणार आहे, ज्याद्वारे आपण कोणत्याही लिखित मजकुराचा किंवा भाषणाचा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून अतिशय कमी वेळात सर्व भाषांमध्ये अनुवाद करू शकू, असे ते म्हणाले. यामुळे हिंदी आणि स्थानिक भाषांना मोठ्या प्रमाणात बळ मिळेल, असा विश्वास गृहमंत्र्यांनी व्यक्त केला.

गृहमंत्री म्हणाले की, आज मी पुन्हा सर्वांना सांगू इच्छितो की, आपल्या भाषा जगातील श्रीमंत भाषांपैकी एक आहेत.  हिंदी भाषा आपल्याला आणि आपल्या सर्व भाषांना जोडते, असे ते म्हणाले. देशातील सर्व नागरिकांनी भारतीय भाषेमध्येच एकमेकांशी संवाद साधला पाहिजे, मग ती भाषा हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम किंवा गुजराती अशी कोणतीही भाषा असो, ही संविधान सभेची भावना आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. हिंदी भाषा बळकट केल्याने इतर सर्व भारतीय भाषा देखील लवचिक आणि समृद्ध होतील, आणि  मग एकात्मतेच्या सरावाने सर्व भाषा आपली संस्कृती, इतिहास, साहित्य, व्याकरण आणि मुलांचे संस्कारही पुढे नेतील, असे गृहमंत्री म्हणाले.

गृहमंत्री म्हणाले की, हिंदी दिवसानिमित्त मी सर्व देशवासियांना आवाहन करू इच्छितो की, आपण सर्वजण एक शपथ घेऊया, हिंदी भाषा आणि आपल्या स्थानिक भाषांना बळ देऊ या आणि राजभाषा विभागाच्या या कार्याला पाठिंबा देऊया. पुन्हा एकदा सर्व देशवासियांना हिंदी दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. राजभाषा बळकट करूया. वंदे मातरम.

***

H.Akude/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 2054889) Visitor Counter : 14