राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्‍ये पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन कार्यक्रम साजरा

Posted On: 23 AUG 2024 5:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 ऑगस्ट 2024
 

राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्‍ये आज (23 ऑगस्ट, 2024) नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्यात आला. 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर भारताने पाठवलेले ‘विक्रम’ लँडर यशस्वी उतरले होते. अंतराळ क्षेत्रामध्‍ये भारताने घडवलेली ही  ऐतिहासिक घटना साजरी करण्‍यासाठी देशात आज राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा केला जात आहे. याप्रसंगी राष्ट्रपतींनी ‘रोबोटिक्स चॅलेंज’ आणि ‘भारतीय अंतरीक्ष हॅकेथॉन’ विजेत्यांना पुरस्कार प्रदान केले.

यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, प्रारंभापासून इस्रोचा प्रवास शानदार  राहिला आहे. अंतराळ क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.यासोबतच इस्रोने देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासातही अमूल्य योगदान दिले आहे. संशोधकांनी कमीत कमी संसाधनांचा वापर करून भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला जगातील सर्वोत्तम अंतराळ कार्यक्रमांमध्ये स्थान देणाऱ्या समर्पित शास्त्रज्ञांचे राष्‍ट्रपती मुर्मू यांनी कौतुक केले. आपला देश अंतराळ विज्ञानात सातत्याने प्रगती करेल आणि आपण उत्कृष्टतेचे नवे मापदंड प्रस्थापित करत राहू असा विश्वास त्यांनी  व्यक्त केला.

राष्ट्रपती म्हणाल्या की, भारताच्या अंतराळ क्षेत्रातील प्रगती विलक्षण आहे.मर्यादित संसाधनांसह यशस्वीरीत्या पूर्ण झालेली मंगळ मोहीम असो किंवा एकाच वेळी शंभरहून अधिक उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण असो, आम्ही अनेक प्रभावी, उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की,अंतराळ संशोधनामुळे मानवाच्या क्षमतांमध्ये वाढ झाली आहे आणि आपल्या कल्पनेचे वास्तवात रूपांतर झाले आहे. पण अंतराळ संशोधन हे आव्हानात्मक काम आहे. अंतराळ संशोधनादरम्यान येणाऱ्या  समस्या सोडवण्यासाठी केलेल्या संशोधनामुळे विज्ञानाच्या विकासाला गती मिळते आणि मानवी जीवनात सुधारणा होते.आरोग्य आणि औषध, वाहतूक, सुरक्षा, ऊर्जा, पर्यावरण आणि माहिती तंत्रज्ञान यासह अंतराळ  क्षेत्रातील घडामोडींचा अनेक क्षेत्रांना फायदा झाला आहे.

राष्ट्रपतींनी निदर्शनास आणून दिले की, अंतराळ क्षेत्र खाजगी क्षेत्रासाठी मुक्त  केल्यामुळे  स्टार्ट-अप्सची संख्या अतिशय वेगाने वाढली आहे. यामुळे केवळ अंतराळ संशोधनातच प्रगती झाली नाही तर आपल्या तरुणांना त्यांच्यामधील कलागुण दाखवून ते आणि वाढवण्याच्या नवीन संधीही मिळाल्या आहेत. काही महिन्यांपूर्वीच एका भारतीय कंपनीने ‘सिंगल-पीस थ्रीडी प्रिंटेड सेमी-क्रायोजेनिक इंजिन’ वर चालणारे रॉकेट यशस्वीपणे प्रक्षेपित  केल्याचे पाहिल्यावर आपल्याला  आनंद झाला, ही अशी पहिलीच कामगिरी आहे.

भविष्यातील आव्हानांसाठी आपल्याला सज्ज राहावे लागेल, असेही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.अवकाशातील कचऱ्यामुळे अंतराळ मोहिमांमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात.अंतराळ संशोधन उपक्रमांची निरंतर प्रगती सुनिश्चित करण्यासाठी कार्यरत असलेल्या ‘सुरक्षित आणि शाश्वत मोहीम  व्यवस्‍थापनासाठी इस्रो कार्यप्रणाली’ सुविधेचे त्यांनी कौतुक केले. 2030 पर्यंत भारत आपल्या सर्व अंतराळ मोहिमा कचरामुक्त करण्यासाठी कार्यरत आहे, हे जाणून आपल्याला आनंद झाल्याचे राष्ट्रपतींनी नमूद केले.  

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

N.Chitale/S.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2048195) Visitor Counter : 76