अर्थ मंत्रालय

वित्तीय वर्ष 23-24 मध्ये बहाल करण्यात आलेल्या पेटंट्सची संख्या पोहोचली 1 लाखांच्या पलीकडे


वित्तीय वर्ष 23-24 मध्ये नावारूपाला आलेल्या स्टार्ट अप उद्योगांची संख्या 1.25 लाखांच्या पार

45 टक्के स्टार्ट अप उद्योग उदयाला येत आहेत द्वितीय आणि तृतीय श्रेणी शहरांमध्ये

भारतीय उद्योगक्षेत्रातील शास्त्रीय संशोधनाला मिळणार 'अनुसंधान राष्ट्रीय संशोधन संस्था-ANRF' चे मार्गदर्शन- इति सर्वेक्षण

Posted On: 22 JUL 2024 6:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 जुलै 2024

पेटंट्स (बौद्धिक स्वामित्व हक्क) आणि स्टार्ट अप उद्योगांच्या संख्येत झपाट्याने होणारी वाढ, देशात ज्ञान आणि नवोन्मेषाच्या बळावर होत असलेला आर्थिक विकास सिद्ध करते. केंद्रीय अर्थ तथा कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षण 2023-24 या अहवालावरून, देशात समग्र नवोन्मेषावर आधारित औद्योगिक परिप्रेक्ष्य विकसित होत असल्याचे स्पष्ट होते.

जागतिक नवोन्मेष निर्देशांकात भारताने सातत्याने केलेल्या प्रगतीवरून, गेल्या काही वर्षांपासून भारतात औद्योगिक संशोधन आणि विकास प्रगतीपथावर असल्याचेच सिद्ध होत असल्याची नोंद या सर्वेक्षणात घेतली गेली आहे. या निर्देशांकातील देशान्तर्गत बाजारपेठेचे प्रमाण दाखवणाऱ्या सूचकांकाबाबत भारत जगात सर्वोच्च स्थानावर आहे. 2014-15 मध्ये बहाल करण्यात आलेल्या पेटंट्सची संख्या 5,978 होती, ती आता सतरा पटींनी वाढून 2023-24 मध्ये 1,03,057 इतकी झाली आहे, असे सर्वेक्षणात म्हटले आहे. नोंदणीकृत संरचनांची (डिझाइन्सची) संख्या 2014-15 मध्ये 7,147 होती, ती आता 2023-24 मध्ये 30,672 पर्यंत पोहोचली असल्याचे सर्वेक्षणात अधोरेखित केले आहे. तसेच, 2023-28 या काळासाठी अंदाजे 50,000 कोटी रुपये खर्चून 'अनुसंधान राष्ट्रीय संशोधन संस्था (ANRF)' स्थापन करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचेही सर्वेक्षणात म्हटले आहे. भारतीय उद्योगक्षेत्रातील शास्त्रीय संशोधनाला उच्चस्तरीय धोरणात्मक दिशा देणारी ही शीर्ष संस्था असेल.

देशातील चैतन्यमय असे स्टार्ट-अप उद्योग परिप्रेक्ष्य अधोरेखित करत, सर्वेक्षणात असे म्हटले आहे की- 45 टक्क्याहून स्टार्ट-अप उद्योग द्वितीय आणि तृतीय श्रेणी शहरांमध्ये उदयाला आले आहेत, तर DPIIT मान्यताप्राप्त स्टार्ट-अप उद्योगांची संख्या 2016 मध्ये 300 होती, ती आता मार्च 2024 मध्ये 1.25 लाखांच्या पलीकडे गेली आहे. यांपैकी 13,000 पेक्षा अधिक स्टार्ट-अप उद्योग- कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्स, रोबोटिक्स, आणि नॅनो तंत्रज्ञान अशा- वैविध्यपूर्ण संकल्पनात्मक क्षेत्रांमध्ये काम करत आहेत. भारतीय स्टार्ट-अप उद्योग देशातील अभिनव कल्पनांच्या आणि नवोन्मेषाच्या बाबतीत आघाडीवर असून, 2016 ते मार्च 2024 या काळात बौद्धिक स्वामित्वासाठी (पेटंटसाठी) 12,000 पेक्षा अधिक अर्ज त्यांनी दाखल केले आहेत, असेही आर्थिक सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे. या सर्वेक्षण अहवालानुसार, वित्त वर्ष 24च्या अंतापर्यंत 135 पर्यायी गुंतवणूक निधींनी ₹18,000 कोटींपेक्षा अधिक निधी स्टार्ट-अप उद्योगांमध्ये गुंतवला आहे. तर, स्टार्ट-अप परिप्रेक्ष्यातील विभिन्न भागधारकांना एकत्र आणण्याचे कार्य 'भारत स्टार्ट-अप ज्ञान संपादन नोंदणी (Bharat Startup Knowledge Access Registry)' करत आहे, असेही हा अहवाल सांगतो.

S.Pophale/J.Waishampayan/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 2035252) Visitor Counter : 28