राष्ट्रपती कार्यालय

माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेला केले संबोधित

Posted On: 31 JAN 2024 3:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 31 जानेवारी 2024

माननीय सदस्य,

1. संसदेच्या या नवीन इमारतीतील हे माझे पहिलेच संबोधन आहे. ही भव्य इमारत स्वातंत्र्याच्या अमृत काळाच्या प्रारंभी बांधण्यात आली आहे.

ही इमारत ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ च्या सुगंधाने ओतप्रोत आहे आणि भारताच्या सभ्यता आणि संस्कृतीची चेतना आहे.

आपली लोकशाही आणि संसदीय परंपरेचा आदर करण्याचा संकल्प यात प्रतिध्वनीत होत आहे.

शिवाय, 21 व्या शतकातील नव्या भारतासाठी नवीन परंपरा निर्माण करण्याच्या वचनबद्धतेला मूर्त रूप दिले आहे.

मला पूर्ण विश्वास आहे की या नवीन इमारतीत धोरणांवर अर्थपूर्ण संवाद होईल.

अशी धोरणे जी स्वातंत्र्याच्या सुवर्णकाळात विकसित भारत निर्माण करतील.

मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते.

माननीय सदस्य,

2. आपले संविधान लागू झाल्याचे हे 75 वे वर्ष आहे.

याच काळात स्वातंत्र्याच्या 75 वर्षांचा उत्सव अमृत महोत्सवही पार पडला.

या काळात देशभरात अनेक कार्यक्रम झाले.

देशाला आपल्या अनाम स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण केले

75 वर्षांनंतर तरुण पिढीने पुन्हा स्वातंत्र्यलढ्याचा तो काळ जगला.

3. या महोत्सवा दरम्यान:

माझी माती, माझा देश मोहिमेअंतर्गत देशभरातील प्रत्येक गावातून मातीसह अमृत कलश दिल्लीत आणण्यात आले.

2 लाखांहून अधिक शिलाफलक लावण्यात आले.

3 कोटींहून अधिक लोकांनी पंचप्रणची शपथ घेतली.

70 हजारांहून अधिक अमृत सरोवर निर्माण करण्यात आले .

2 लाखांहून अधिक अमृत वाटिका बांधण्यात आल्या.

2 कोटींहून अधिक झाडे -रोपे लावण्यात आली.

16 कोटींहून अधिक लोकांनी तिरंग्यासोबत सेल्फी अपलोड केले आहेत.

4. अमृत महोत्सवादरम्यानच :

कर्तव्यपथावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा स्थापित करण्यात आला.

देशाच्या आतापर्यंतच्या सर्व पंतप्रधानांना समर्पित असलेले एक संग्रहालय राजधानी दिल्लीत सुरू करण्यात आले.

शांतीनिकेतन आणि होयसाळ मंदिराचा जागतिक वारसा यादीत समावेश झाला.

साहिबजादांच्या स्मरणार्थ वीर बालदिन घोषित करण्यात आला.

भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आदिवासी गौरव दिन म्हणून घोषित करण्यात आली.


फाळणीची वेदना लक्षात घेऊन 14 ऑगस्ट हा दिवस फाळणी वेदना स्मृती दिन म्हणून घोषित करण्यात आला.

माननीय सदस्य

5.गेले वर्ष भारतासाठी ऐतिहासिक कामगिरीने परिपूर्ण आहे.

या काळात देशवासीयांचा अभिमान वाढवणारे अनेक क्षण आले.

गंभीर संकटांमध्ये भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था बनली आहे. सलग दोन तिमाहीत भारताचा विकास दर 7.5 टक्क्यांच्या वर आहे.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ध्वज फडकवणारा भारत हा पहिला देश ठरला.

भारताने आदित्य अभियानाचा यशस्वीरित्या प्रारंभ केला , पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर दूर आपला उपग्रह पाठवला.

ऐतिहासिक जी-20 शिखर परिषदेच्या यशाने जगभरात भारताची भूमिका बळकट झाली.

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने प्रथमच 100 हून अधिक पदके जिंकली.

 

तसेच पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत 100 हून अधिक पदके जिंकली.

भारताला सर्वात मोठा सागरी सेतू अटल सेतू मिळाला.

भारताला पहिली नमो भारत रेल्वेगाडी आणि पहिली अमृत भारत रेल्वेगाडी मिळाली.

भारत हा जगातील सर्वात वेगवान 5जी अंमलबजावणी करणारा देश बनला आहे.

इंडियन एअरलाइन्स कंपनीने जगातील सर्वात मोठा विमानाचा करार केला.

गेल्या वर्षीही माझ्या सरकारने मिशन मोडमध्ये लाखो तरुणांना सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत.

माननीय सदस्य,

6. गेल्या 12 महिन्यांत माझ्या सरकारने अनेक महत्त्वाची विधेयकेही आणली.

तुम्हा सर्व संसद सदस्यांच्या सहकार्याने ही विधेयके आज कायदे बनली आहेत.

हे असे कायदे आहेत जे विकसित भारताचा संकल्प साध्य करण्यासाठीचा मजबूत पाया आहेत.

3 दशकांनंतर, नारी शक्ती वंदन कायदा मंजूर केल्याबद्दल मी तुमची प्रशंसा करते.

यामुळे लोकसभा आणि विधानसभेत महिलांचा अधिकाधिक सहभाग सुनिश्चित झाला आहे.

हे महिलांच्या नेतृत्वाखालील विकासासाठी माझ्या सरकारचा संकल्प अधिक दृढ करते

माझ्या सरकारने सुधारणा( रिफॉर्म) , कामगिरी (परफॉर्म) आणि परिवर्तनाची (ट्रान्सफॉर्म) आपली वचनबद्धता कायम ठेवली आहे.

गुलामगिरीच्या युगाने प्रेरित गुन्हेगारी न्याय व्यवस्था आता इतिहास जमा झाली आहे. आता शिक्षेला नाही तर न्यायाला प्राधान्य आहे. 'न्याय सर्वोपरी' या तत्त्वावर देशाला नवीन न्याय संहिता प्राप्त झाली आहे.

डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण कायद्यामुळे डिजिटल अवकाश अधिक सुरक्षित होणार आहे.

अनुसंधान राष्ट्रीय संशोधन फाउंडेशन कायदा देशातील संशोधन आणि नवोन्मेषाला बळ देईल.

जम्मू-काश्मीर आरक्षण कायद्यामुळे आदिवासी समुदायांनाही तेथे प्रतिनिधित्वाचा अधिकार मिळणार आहे.

या काळात केंद्रीय विद्यापीठ कायद्यातही सुधारणा करण्यात आली.

यामुळे तेलंगणात समक्का सारक्का केंद्रीय आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला.

गेल्या वर्षी इतर 76 जुने कायदेही रद्द करण्यात आले.

परीक्षेतील अनियमिततेबाबत तरुणांना भेडसावणाऱ्या चिंतेची माझ्या सरकारला जाणीव आहे.

त्यामुळे अशा चुकीच्या पद्धतींना आळा घालण्यासाठी नवा कायदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

माननीय सदस्य,

7. जुन्या आव्हानांवर मात करून भविष्य घडवण्यासाठी
आपली जास्तीत जास्त ऊर्जा खर्च केली तरच कोणतेही राष्ट्र जलद गतीने प्रगती करू शकते.

गेल्या 10 वर्षात भारताने राष्ट्रहिताची अशी अनेक कामे पूर्ण करताना पाहिली आहेत ज्यांची देशातील जनता अनेक दशकांपासून वाट पाहत होती.

राम मंदिर बांधण्याची आकांक्षा शतकानुशतके होती. आज हे सत्यात उतरले आहे.

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याबाबत शंका होत्या. आज त्या इतिहासात जमा झाल्या आहेत.

याच संसदेने त्रिवार तलाकविरोधात कडक कायदा केला.

याच संसदेने शेजारील देशांतून येणाऱ्या पिडीत अल्पसंख्याकांना नागरिकत्व देणारा कायदा केला.

माझ्या सरकारने वन रँक वन पेन्शन लागू केली, ज्याची चार दशकांपासून प्रतीक्षा होती. ओआरओपी लागू झाल्यानंतर आतापर्यंत माजी सैनिकांना अंदाजे 1 लाख कोटी रुपये मिळाले आहेत.

पहिल्यांदाच भारतीय लष्करात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची नियुक्ती करण्यात आली आहे.

माननीय सदस्य,

8. उत्कलमणी पंडित गोपबंधु दास यांच्या अमर ओळी नेहमीच अपार देशभक्तीची भावना व्यक्त करतात. ते म्हणतात :

मिशु मोर देह ए देश माटिरे,

देशबासी चालि जाआन्तु पिठिरे।

देशर स्वराज्य-पथे जेते गाड़,

पूरु तहिं पड़ि मोर मांस हाड़।

अर्थात्

माझे शरीर या देशाच्या मातीत विलीन होवो.

देशवासीयांनी माझ्या पाठीवरून चालावे.

देशाच्या स्वातंत्र्याच्या मार्गात ज्या काही दऱ्या आहेत,

त्या माझ्या मांस आणि हाडांनी भरल्या जाव्यात.

या ओळींमध्ये आपल्याला कर्तव्याची पराकाष्ठा दिसून येते , 'राष्ट्र सर्वोपरी' हा आदर्श दिसतो.

9. आज जे यश दिसून येत आहे ते गेल्या 10 वर्षांच्या प्रयत्नांचे फलित आहे.

‘गरीबी हटाओ’चा नारा आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. आता, आपल्या आयुष्यात प्रथमच, आपण मोठ्या प्रमाणावर गरिबीचे निर्मूलन होत असल्याचे पाहत आहोत.

नीति आयोगाच्या आकडेवारीनुसार, माझ्या सरकारच्या कार्यकाळात गेल्या एका दशकात सुमारे 25 कोटी देशवासीयांना गरिबीतून बाहेर काढण्यात आले आहे.

ही बाब गरिबांमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण करणारी आहे.

25 कोटी लोकांची गरिबी दूर करता आली तर आपली गरिबीही दूर होऊ शकते.

10. आज आपण अर्थव्यवस्थेच्या विविध आयामांकडे पाहिले, तर भारत योग्य दिशेने, योग्य निर्णय घेऊन पुढे जात असल्याचे लक्षात येते आणि आपला आत्मविश्वास वाढतो.

गेल्या 10 वर्षांत:

आपण भारताला "नाजूक पाच" वरून सर्वोच्च पाच" अर्थव्यवस्थेत बदललेले पाहिले आहे.

भारताची निर्यात सुमारे $450 बिलियन वरून $775 बिलियन डॉलर्स हून अधिक झाली आहे.

थेट परदेशी गुंतवणूकीचा प्रवाह दुप्पट झाला आहे.

खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांच्या विक्रीत 4 पटीने वाढ झाली आहे.

प्राप्ती कर परतावा भरणाऱ्या लोकांची संख्या सुमारे 3.25 कोटींवरून 8.25 कोटी म्हणजेच दुप्पट झाली आहे.

एक दशकापूर्वी:

देशात फक्त काही शेकड्यात स्टार्ट-अप होते जे आज एक लाखापेक्षा जास्त झाले आहेत.

एका वर्षात 94 हजार कंपन्यांची नोंदणी होत होती. आता ही संख्या 1 लाख 60 हजार झाली आहे.

डिसेंबर 2017 मध्ये 98 लाख लोक वस्तू आणि सेवा कर भरत होते, आज त्यांची संख्या 1 कोटी 40 लाख झाली आहे.

•2014 पूर्वीच्या 10 वर्षांत सुमारे 13 कोटी वाहनांची विक्री झाली होती. गेल्या 10 वर्षांत देशवासीयांनी 21 कोटींहून अधिक वाहनांची खरेदी केली आहे.

• 2014-15 या कालावधीत सुमारे 2 हजार इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली. तर 2023-24 च्या डिसेंबर महिन्यापर्यंत सुमारे 12 लाख इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली आहे.

माननीय सदस्य गण,

11. गेल्या दशकात माझ्या सरकारने सुशासन आणि पारदर्शकता याला प्रत्येक संस्थेचा मुख्य पाया बनवले आहे.

याचाच परिणाम म्हणून आपण मोठ्या आर्थिक सुधारणा पाहत आहोत.

या कालावधीत, देशात नादारी आणि दिवाळखोरी संहिता लागू करण्यात आली.

देशात आता वस्तू आणि सेवा कराच्या स्वरूपात एक देश एक कर कायदा पद्धती आहे.

माझ्या सरकारने स्थूल-आर्थिक स्थिरता देखील सुनिश्चित केली आहे.

• 10 वर्षांत, भांडवली खर्च (Capex) 5 पटीने वाढून 10 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. वित्तीय तूटही नियंत्रणात आहे.

आज आपल्याकडे 600 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त परकीय चलन साठा आहे.

आपली बँकिंग प्रणाली, जी पूर्वी खूप वाईट अवस्थेत होती, ती आज जगातील सर्वात मजबूत बँकिंग प्रणालींपैकी एक बनली आहे.

पूर्वी दुहेरी अंकात असणारी बँकांची अनुत्पादक मालमत्ता (NPA) आज केवळ 4 टक्के आहेत.

• ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या मोहिमा आपली ताकद बनल्या आहेत.

आज, भारत हा मोबाईल फोनचा जगातील दुसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे.

गेल्या दशकात, मोबाईल फोन निर्मितीमध्ये पाच पटीने वाढ झाली आहे.

काही वर्षांपूर्वी भारत खेळणी आयात करत असे, मात्र आज भारत ‘मेड इन इंडिया’ खेळणी निर्यात करत आहे.

भारताचे संरक्षण उत्पादन एक लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.

आज, प्रत्येक भारतीयाला देशाची स्वदेशी विमानवाहू नौका आयएनएस विक्रांत पाहून अभिमान वाटतो.

तेजस हे लढाऊ विमान आपल्या हवाई दलाची ताकद बनत आहे.

• C-295 माल वाहतूक विमानाचे उत्पादन भारतात होणार आहे.

आधुनिक विमानाची इंजिनेही भारतात बनवली जातील.

उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये संरक्षण कॉरिडॉर विकसित केले जात आहेत.

माझ्या सरकारने संरक्षण क्षेत्रात खाजगी क्षेत्राचा सहभाग सुनिश्चित केला आहे.

आमच्या सरकारने अंतराळ क्षेत्र तरुण स्टार्ट-अपसाठी खुले केले आहे.

माननीय सदस्य गण,

12. माझे सरकार संपत्ती निर्मात्यांच्या योगदानाची नोंद घेते आणि भारताच्या खाजगी क्षेत्राच्या क्षमतांवरही विश्वास ठेवते.

भारतात व्यवसाय करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि सरकार या उद्दिष्टासाठी सातत्याने काम करत आहे.

व्यवसाय सुलभतेमध्ये सातत्याने सुधारणा होत आहे.

गेल्या काही वर्षांत 40,000 हून अधिक नियम रद्द करण्यात आले आहेत किंवा सोपे केले गेले आहेत.

कंपनी कायदा आणि मर्यादित दायित्व भागीदारी कायद्यातील 63 तरतुदी फौजदारी गुन्ह्यांच्या यादीतून काढून टाकण्यात आल्या आहेत.

जनविश्वास कायद्याने विविध कायद्यांतर्गत 183 तरतुदींना फौजदारी गुन्ह्यांच्या यादीतून काढून टाकण्यात आले आहे.

न्यायालयाबाहेरील विवादांचे सौहार्दपूर्ण निराकरण करण्यासाठी मध्यस्थी कायदा लागू करण्यात आला आहे.

वन आणि पर्यावरण विभागाच्या मंजुरीसाठी आता 75 दिवसांपेक्षा कमी वेळ लागतो, पूर्वी यासाठी 600 दिवस लागायचे.

चेहराविहित मूल्यांकन योजनेमुळे कर प्रशासनात अधिक पारदर्शकता आली आहे.

माननीय सदस्य गण,

13. आपल्या सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला देखील सुधारणांमुळे अनेक फायदे मिळत आहेत.

आज अनेक कोटी भारतीय नागरिक सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात काम करत आहेत, हे तुम्हाला माहीतच आहे.

सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र आणि लघु नवउद्योजकांना सक्षम करण्यासाठी आमचे सरकार पूर्ण वचनबद्धतेने काम करत आहे.

•सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची व्याख्या विस्तारित करण्यात आली आहे.

नवीन व्याख्येमध्ये गुंतवणूक आणि उलाढाल जोडण्यात आली आहे.

सध्या, Udy and Udyam असिस्ट पोर्टलवर सुमारे 3.5 कोटी सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग नोंदणीकृत आहेत.

सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी पत हमी योजनेअंतर्गत, गेल्या काही वर्षांत सुमारे 5 लाख कोटी रुपयांच्या हमी मंजूर करण्यात आल्या आहेत.

हे 2014 पूर्वीच्या दशकात प्रदान केलेल्या रकमेपेक्षा हे प्रमाण सहा पट अधिक आहे.

माननीय सदस्य गण,

14. माझी सरकारची आणखी एक महत्त्वाची सूधारणा म्हणजे डिजिटल इंडियाची निर्मिती. डिजिटल इंडिया मूळे भारतातील जीवन आणि व्यवसाय खूपच सुलभ झाले आहेत.

आज, संपूर्ण जग भारताच्या या यशास्वी उपलब्धीची नोंद घेत आहे. जगातील विकसित देश देखील भारतासारखी डिजिटल प्रणाली विकसित करू शकलेले नाहीत.

खेड्यापाड्यातही नियमित खरेदी-विक्री डिजिटल माध्यमातून होत आहे, हे काही लोकांच्या कल्पनेपलीकडचे आहे.

आज, जगातील एकूण रिअल-टाइम डिजिटल व्यवहारांपैकी 46 टक्के व्यवहार भारतात होतात.

गेल्या महिन्यात UPI द्वारे विक्रम 1200 कोटी व्यवहार करण्यात आले.

ही व्यवहाराच्या आकडेवारीतून सुमारे 18 लाख कोटी रुपयांचा विक्रमी व्यवहार झाला.

जगातील इतर देश देखील आता UPI द्वारे व्यवहाराची सुविधा प्रदान करत आहेत.

डिजिटल इंडियामुळे बँकिंग आणि कर्ज वितरण अधिक सोईस्कर झाले आहे.

जन धन आधार मोबाईल (JAM) च्या त्रिसुत्रीने भ्रष्टाचाराला आळा घालण्यास मदत केली आहे.

माझ्या सरकारने आजवर 34 लाख कोटी रुपये थेट बँक खात्यात जमा करण्याच्या प्रणाली द्वारे हस्तांतरित केले आहेत.

सुमारे 10 कोटी बनावट लाभार्थी प्रणालीतून बाहेर काढून टाकल्याबद्दल जन धन आधार मोबाईल (JAM) याबद्दल धन्यवाद.

यामुळे सुमारे 2.75 लाख कोटी रुपये चूकीच्या हाती जाण्यापासून वाचवण्यात मदत मिळाली.

• DigiLocker सुविधा देखील जीवन सुकर बनवत आहे. त्याच्या वापरकर्त्यांनी 6 अब्जाहून अधिक दस्तऐवज डिजीलॉकरमध्ये सुरक्षितरित्या संग्रहित केले आहेत.

आयुष्मान भारत आरोग्य खात्याच्या अंतर्गत सुमारे 53 कोटी लोकांचे डिजिटल आरोग्य ओळखपत्रे तयार करण्यात आली आहेत.

माननीय सदस्य,

15. डिजिटल सोबतच, प्रत्यक्ष पायाभूत सुविधांसाठी देखील विक्रमी गुंतवणूक झाली आहे. आज भारतात अशा पायाभूत सुविधा उभ्या राहत आहेत, ज्यांची स्वप्नं प्रत्येक भारतीय बघत होते.
गेल्या 10 वर्षांत:

खेड्यांत पावणे 4 लाख किलोमीटर नवे रस्ते बनले आहेत.

राष्ट्रीय महामार्गांची लांबी, 90 हजार किलोमीटर वरुन वाढून 1 लाख 46 हजार किलोमीटर इतकी झाली आहे.

चौपदरी राष्ट्रीय महामार्गांची लांबी अडीच पट वाढली आहे.

गती मार्गिकांची लंबी 500 किलोमीटर होती, जी आज 4 हजार किलोमीटर आहे.
विमानतळांची संख्या 74 पासून दुप्पट होऊन 149 झाली आहे .
देशातल्या मोठ्या बंदरांत माल हातळण्याची क्षमता दुप्पट झाली आहे.
ब्रॉडबँड वापरकर्त्यांची संख्या 14 पट वाढली आहे.

देशातील जवळ जवळ 2 लाख खेड्यातील ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरनी जोडल्या गेल्या आहेत.
4 लाखांहून अधिक सामायिक सेवा केंद्र देखील उघडण्यात आले आहेत, जे रोजगाराचे एक मोठे माध्यम बनले आहे.

देशात 10 हजार किलोमीटर गॅस पाईपलाईन टाकण्यात आली आहे.

एक देश, एक पॉवर ग्रिडच्या मध्यमातून वीज वितरणात सुधारणा झाली आहे.

एक देश, एक गॅस ग्रिडच्या माध्यमातून गॅस आधारित अर्थव्यवस्थेला बळ मिळत आहे.

केवळ 5 शहरांपुरती असलेली मेट्रो सुविधा आज 20 शहरांत आहे.

25 हजार किलोमीटर पेक्षा जास्त रेल्वे रूळ टाकण्यात आले आहेत. हे अनेक विकसित देशांच्या एकूण रेल्वे रुळांच्या लंबी पेक्षाही जास्त आहे.

भारत, रेल्वेचे शंभर टक्के विद्युतीकरण करण्याच्या खूप जवळ आला आहे.

याच काळात भारतात पहिल्यांदा निम उच्च गती ट्रेन सुरू झाली आहे.

आज 39 पेक्षा जास्त मार्गांवर वंदे भारत गाड्या चालविल्या जात आहेत.
अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत 1300 पेक्षा जास्त रेल्वे स्थानाकांचा कायापालट होत आहे
 

माननीय सदस्य,

16.माझ्या सरकारचे मत आहे की विकसित भारताची भव्य इमारत 4 मजबूत खांबांवर उभी असेल.

हे खांब आहेत – युवाशक्ती, स्त्रीशक्ती, शेतकरी आणि गरीब.

देशाच्या प्रत्येक भागात, प्रत्येक समाजात या सर्वांची स्थिती आणि स्वप्नं एक सारखीच आहेत.

म्हणूनच या 4 खांबांचे सक्षमीकरण करण्यासाठी माझे सरकार अविरत काम करत आहे.

माझ्या सरकारने कराचा एक खूप मोठा भाग या खांबांना मजबूत करण्यासाठी खर्च केला आहे.

• 4 कोटी 10 लाख गरीब कुटुंबांना आपले पक्के घर मिळाले.

यावर जवळपास 6 लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले.

जवळ जवळ 11 कोटी ग्रामीण कुटुंबांपर्यंत पहिल्यांदा पाईपने पाणी पोहचले आहे.

यावर 4 लाख कोटी रुपये खर्च केले जात आहेत.

आज या लाभार्थी भगिनींना अतिशय स्वस्त दरात गॅस देखील दिला जात आहे.

यावर देखील सरकारने अडीच लाख कोटी रुपये खर्च केले आहेत.

कोरोना काळापासूनच 80 कोटी देशवासियांना मोफत धन्य दिले जात आहे.

आणि ही योजना येणाऱ्या 5 वर्षांसाठी वाढविण्यात आली आहे.

आता यावर 11 लाख कोटी रुपये अधिकचे खर्च होण्याचा अंदाज आहे.

माझ्या सरकारचा प्रयत्न असतो, की प्रत्येक योजना वेगाने शंभर टक्के लाभार्थ्यांपर्यंत पोचावी. कुणीही लाभार्थी वंचित राहू नये.

यासाठी 15 नोव्हेंबर पासून विकसित भारत संकल्प यात्रा सुरू आहे. आतापर्यंत जवळ जवळ 19 कोटी देशबांधव  या यात्रेशी जोडले गेले आहेत.

माननीय सदस्य,

17. गेल्या वर्षांत जगाने दोन मोठी युद्धे बघितली आणि कोरोना सारख्या जागतिक महामारीचा सामना केला. अशी जागतिक संकटे आली तरी, माझ्या सरकारने देशात महागाई नियंत्रणात ठेवली, सर्वसामान्य भारतीयांवर बोजा पडू दिला नाही.

2014 पूर्वीच्या 10 वर्षांत सरासरी महागाई दर 8 टक्क्यांपेक्षा अधिक होता. गेल्या दशकात सरासरी महागाई दर 5 टक्के राहिला आहे.

माझ्या सरकारचा असा प्रयत्न राहिला आहे, की सर्वसामान्य देशबांधवांच्या खिशाची अधिकाधिक बचत कशी जाईल.

आधी भारतात 2 लाख रुपयांच्या उत्पन्नावर कर लावला जात असे.

आज भारतात 7 लाख रुपये उत्पन्नावर देखील कर लागत नाही.

करात सूट आणि सुधारणांमुळे भारताच्या करदात्यांची 10 वर्षात जवळ जवळ अडीच लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे.

आयुष्मान योजनेव्यतिरिक्त देखील, केंद्र सरकार, विविध रुग्णालयांत मोफत उपचारांच्या सुविधा देत आहे. यामुळे देशाच्या नागरिकांची साडे तीन लाख कोटी रुपये बचत झाली आहे.

जन – औषधी केंद्रांमुळे रुग्णांची जवळ जवळ 28 हजार कोटी रुपये बचत झाली आहे.

कोरोनरी स्टेंट, गुडघ्याचे इंप्लांट आणि कर्करोगाच्या औषधांची किंमत देखील कमी करण्यात आली आहे. यात रुग्णांची दर वर्षी जवळ जवळ 27 हजार कोटी रुपयांची बचत होत आहे.

माझे सरकार, किडनीच्या रुग्णांसाठी मोफत डायलिसिसची मोहीम देखील चालवत आहे.  याचा लाभ दरवर्षी 21 लाखांपेक्षा जास्त रुग्ण घेत आहेत. त्यांचा वर्षाला एक लाख रुपये खर्च वाचला आहे.

गरिबांना स्वस्त धन्य मिळत राहावे, यासाठी माझ्या सरकारने गेल्या दशकात जवळ जवळ 20 लाख कोटी रुपये खर्च केले आहेत.

भारतीय रेल्वेमध्ये, प्रवासासाठी, प्रत्येक तिकिटावर, जवळ जवळ 50 टक्के सूट देत आहे. यामुळे गरीब आणि माध्यम वर्गाच्या प्रवाशांची दर वर्षी 60 हजार कोटी रुपयांची बचत होत आहे.

गरीब आणि मध्यमवर्गाला कमी किमतीत विमानाचे तिकीट मिळत आहे. उडान योजनेअंतर्गत गरीब आणि माध्यम वर्गाची विमान तिकीटांवर 3 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त बचत झाली आहे.

• LED बल्ब योजनेमुळे, वीज बिलात 20 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्तची बचत झाली आहे.

जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत, गरिबांना 16 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे दावे निकाली काढण्यात आले आहेत.

माननीय सदस्य,

18. स्त्रीशक्तिचे सामर्थ्य वाढविण्यासाठी माझे सरकार प्रत्येक स्तरावर काम करत आहे.

या वर्षीचे गणतंत्र पथसंचलन देखील स्त्रीशक्तीला समर्पित होते.

या पथसंचलनात जगाने आपल्या मुलींच्या सामर्थ्याची झलक बघितली.

माझ्या सरकारने जल, जमीन, आकाश आणि अंतराळ, प्रत्येक क्षेत्रात मुलींच्या भूमिका विस्तारत आहेत.

आपल्या सगळ्यांना माहीत आहे, की महिलांसाठी आर्थिक स्वातंत्र्याचा अर्थ काय आहे.

माझ्या सरकारने महिलांचा आर्थिक सहभाग वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

आज जवळ जवळ 10 कोटी महिला बचत गटांशी जोडल्या गेल्या आहेत.

या गटांना 8 लाख कोटी रुपये बँक कर्ज आणि 40 हजार कोटी रुपये आर्थिक सहाय्य दिले गेले आहे.

माझे सरकार 2 कोटी महिलांना लखपती दीदी बनविण्याची मोहीम चालवत आहे.

 सन्माननीय सदस्य,

19. शेती अधिक फायदेशीर करण्यावर माझे सरकार भर देत आहे. नफा वाढवताना शेतीचा खर्च कमी करणे हा आमचा उद्देश आहे.

माझ्या सरकारने प्रथमच देशातील कृषी धोरण आणि योजनांमध्ये 10 कोटींहून अधिक छोट्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले आहे.

• पीएम-किसान सन्मान निधी योजनेंतर्गत, शेतकऱ्यांना आत्तापर्यंत 2 लाख 80 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम प्राप्त झाली आहे.

• गेल्या 10 वर्षांत, बँकांकडून शेतकऱ्यांसाठी सुलभ कर्जामध्ये तिपटीने वाढ झाली आहे.

• प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांनी 30 हजार कोटी रुपयांचा प्रीमियम भरला. त्या बदल्यात त्यांना 1.5 लाख कोटी रुपयांचा दावा मिळाला आहे.

• गेल्या 10 वर्षांत, शेतकऱ्यांना धान आणि गहू पिकांसाठी एमएसपी (किमान आधारभूत किंमत) म्हणून जवळपास 18 लाख कोटी रुपये मिळाले आहेत.

• हे 2014 पूर्वीच्या 10 वर्षांच्या तुलनेत 2.5 पट जास्त आहे.

• पूर्वी, तेलबिया आणि कडधान्य पिकांची सरकारी खरेदी नगण्य होती.

• गेल्या दशकात, तेलबिया आणि कडधान्ये उत्पादक शेतकऱ्यांना एमएसपी म्हणून 1.25 लाख कोटी रुपये मिळाले आहेत.

• आपल्या सरकारने देशात प्रथमच कृषी निर्यात धोरण तयार केले आहे.

• यामुळे कृषी निर्यात 4 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

• 10 वर्षांत, शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत खते देण्यासाठी 11 लाख कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला आहे.

• माझ्या सरकारने 1.75 लाखांहून अधिक प्रधान मंत्री किसान समृद्धी केंद्रे सुरू केली आहेत.

• आत्तापर्यंत, सुमारे 8,000 शेतकरी उत्पादक संघटना (एफपीओ) स्थापन करण्यात आल्या आहेत.

• माझे सरकार कृषी क्षेत्रात सहकारी संस्थांना प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे देशात प्रथमच सहकार मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे.

• जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना सहकारी क्षेत्रात सुरू करण्यात आली आहे.

• ज्या गावांमध्ये सहकारी संस्था नाहीत, तेथे 2 लाख संस्थांची निर्मिती होत आहे.

• मत्स्यव्यवसाय क्षेत्रात 38 हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या योजना राबविण्यात येत आहेत, ज्यामुळे मत्स्य उत्पादन 95 लाख मेट्रिक टनांवरून 175 लाख मेट्रिक टनांपर्यंत वाढले आहे, म्हणजे गेल्या दहा वर्षांत जवळजवळ दुप्पट झाले आहे.

• देशांतर्गत मत्स्यपालन उत्पादन 61 लाख मेट्रिक टनांवरून वाढून 131 लाख मेट्रिक टन झाले आहे.

• मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील निर्यात दुपटीने वाढली आहे, म्हणजेच 30 हजार कोटी रुपयांवरून 64 हजार कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे.

• देशात प्रथमच पशुपालक शेतकरी आणि मच्छीमारांना किसान क्रेडिट कार्डचा लाभ देण्यात आला आहे.

• गेल्या दशकात, दरडोई दुधाची उपलब्धता 40 टक्क्यांनी वाढली आहे.

• जनावरांचे लाळ्या खुरकुत रोगापासून संरक्षण करण्यासाठी पहिली मोफत लसीकरण मोहीम सुरू आहे.

• आत्तापर्यंत चार टप्प्यांत जनावरांना 50 कोटींहून अधिक लस मात्रा देण्यात आल्या आहेत.

सन्माननीय सदस्य,

20. या सर्व लोककल्याणकारी योजना केवळ सेवा नाहीत. देशातील नागरिकांच्या जीवन चक्रावर याचा सकारात्मक परिणाम होत आहे.

माझ्या सरकारच्या योजनांचे परिणाम विविध सरकारी आणि बिगर -सरकारी संस्थांच्या अभ्यासाचा विषय आहेत.

या योजनांची फलनिष्पत्ती परिणामकारक आहे आणि दारिद्र्यनिर्मूलनासाठी संघर्ष करणाऱ्या प्रत्येक देशासाठी ती प्रेरणादायी उदाहरण ठरेल.

अलिकडच्या वर्षांत विविध संस्थांनी केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की:

• 11 कोटी शौचालयांची निर्मिती आणि हगणदारीमुक्त परिसरामुळे अनेक आजारांना आळा बसला आहे.

• परिणामी, शहरी भागातील प्रत्येक गरीब कुटुंबाची वैद्यकीय खर्चावर वर्षाला 60 हजार रुपयांपर्यंतची बचत होत आहे.

• नळाद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा दरवर्षी लाखो मुलांचे जीवन वाचवत आहे.

• पीएम आवास योजनेंतर्गत पक्की घरे बांधल्याने लाभार्थी कुटुंबांचा सामाजिक दर्जा आणि सन्मान वाढला आहे.

• ‘पक्की’ घरे असलेल्या कुटुंबांतील मुलांच्या शिक्षणात सुधारणा झाली आहे आणि त्यामुळे शाळा गळतीचे प्रमाण घटले आहे.

• प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत आज देशात 100 टक्के संस्थात्मक प्रसूती होत आहेत. यामुळे माता मृत्यू दरात मोठी घट झाली आहे.

• दुसऱ्या अभ्यासानुसार, उज्ज्वला लाभार्थी कुटुंबांमध्ये गंभीर आजारांचे प्रमाण कमी झाले आहे.

सन्माननीय सदस्य,

21. माझे सरकार मानवकेंद्रित विकासावर लक्ष केंद्रित करते. प्रत्येक नागरिकाचा सन्मान आपल्यासाठी सर्वात महत्वाचा आहे. ही आमची सामाजिक न्यायाची संकल्पना आहे. भारतीय राज्यघटनेच्या प्रत्येक कलमातही हीच भावना आहे.

बराच काळ फक्त अधिकारांवर चर्चा होत होती. सरकारच्या कर्तव्यावरही आम्ही भर दिला. यामुळे नागरिकांमध्येही कर्तव्याची भावना जागृत झाली आहे. एखाद्याने कर्तव्याचे पालन केल्याने एखाद्याला हक्कांची हमी मिळते ही भावना आज जागृत झाली आहे.

आत्तापर्यंत विकासाच्या प्रवाहापासून दूर राहिलेल्यांचीही माझ्या सरकारने काळजी घेतली आहे. गेल्या 10 वर्षात हजारो आदिवासी गावांना प्रथमच वीज आणि रस्ते जोडणी देण्यात आली आहे. लाखो आदिवासी कुटुंबांना आता नळाद्वारे पाणीपुरवठा होऊ लागला आहे. एका विशेष मोहिमेअंतर्गत माझे सरकार आदिवासींची वस्ती असलेल्या हजारो खेड्यांमध्ये 4G इंटरनेट कनेक्टिव्हिटी देखील पुरवत आहे. वन धन केंद्रे आणि 90 हून अधिक वन उत्पादनांवर एमएसपी लावल्याने आदिवासींना मोठा फायदा झाला आहे.

माझ्या सरकारने पहिल्यांदाच विशेषत: वंचित आदिवासी समूहांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. या समूहांसाठी सुमारे 24 हजार कोटी रुपयांच्या खर्चासह पीएम जनमन योजना सुरू करण्यात आली आहे. आदिवासी कुटुंबातील पिढ्या सिकलसेल, पंडुरोगाने त्रस्त आहेत. यावर उपाय म्हणून प्रथमच राष्ट्रीय अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत आजमितीस सुमारे एक कोटी चाळीस लाख लोकांची तपासणी करण्यात आली आहे.

माझ्या सरकारने दिव्यांगजनांसाठी ‘सुगम्य भारत अभियान’ देखील सुरू केले आहे. भारतीय सांकेतिक भाषेतील पाठ्यपुस्तकेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

ट्रान्सजेंडर व्यक्तींना समाजात सन्माननीय स्थान देण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी कायदाही बनवण्यात आला आहे.

सन्माननीय सदस्य,

22. विश्वकर्मा कुटुंबांशिवाय दैनंदिन जीवनाची कल्पना करणे कठीण आहे. ही कुटुंबे त्यांचे कौशल्य पिढ्यानपिढ्या जोपासतात. मात्र, सरकारी पाठबळाअभावी आमचे विश्वकर्मा सोबती कठीण प्रसंगाला तोंड देत होते. माझ्या सरकारने अशा विश्वकर्मा कुटुंबांची देखील काळजी घेतली आहे. आत्तापर्यंत 84 लाखांहून अधिक लोक पीएम विश्वकर्मा योजनेशी जोडले गेले आहेत.

अनेक दशके फेरीवाल्यांनाही त्यांच्या नशिबावर सोडून देण्यात आले होते. माझ्या सरकारने त्यांना पीएम स्वनिधी योजनेद्वारे बँकिंग प्रणालीमध्ये प्रवेश दिला आहे. आत्तापर्यंत 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम कर्ज म्हणून देण्यात आली आहे. त्यांच्यावर विश्वास दाखवून सरकारने तारणमुक्त कर्ज दिले. हा विश्वास दृढ करून, बहुतेक लोकांनी कर्जाची परतफेड करून पुढील हप्त्याचा लाभही घेतला. बहुसंख्य लाभार्थी दलित, मागासवर्गीय, आदिवासी आणि महिला आहेत.

माननीय सदस्यहो,

23.'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास' या मंत्राने चालत असलेले माझे सरकार समाजातील प्रत्येक घटकाला न्याय्य संधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे.

 •पहिल्यांदाच, सर्वसाधारण वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींना आरक्षणाचा लाभ देण्यात आला आहे.

 •ओबीसींसाठी केंद्रीय कोट्याअंतर्गत पदवी आणि पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये 27 टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे.

 •राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आला आहे.

 •डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी निगडीत 5 ठिकाणे पंचतीर्थ म्हणून विकसित करण्यात आली आहेत.

 •देशभरात आदिवासी समाजातील स्वातंत्र्यसैनिकांना वाहिलेली 10 संग्रहालये बांधली जात आहेत.

माननीय सदस्यहो,

24. माझ्या सरकारने प्रथमच, अनेक दशकांपासून दुर्लक्षित राहिलेल्या भागात विकास घडवून आणला आहे. देशाच्या सीमावर्ती  गावांकडे देशातील शेवटची गावे म्हणून पाहिले जायचे. आम्ही त्यांना देशातील पहिली गावे म्हणून ओळख मिळवून दिली.  या गावांचा विकास करण्यासाठी व्हायब्रंट व्हिलेज  कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.

आपली अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीपसारखी दुर्गम आणि दूरवरील भागातली बेटेही विकासापासून वंचित होती.  माझ्या सरकारने या बेटांवरही आधुनिक सुविधा विकसित केल्या आहेत.  तिथे रस्ते, हवाई वाहतूक आणि जलदगती इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.  काही आठवड्यांपूर्वी लक्षद्वीप देखील, पाण्याखालील ऑप्टिकल फायबरने जोडण्यात आले होते.  याचा फायदा स्थानिक लोकांसह पर्यटकांना होणार आहे.

आकांक्षी जिल्हा कार्यक्रमाअंतर्गत, आमच्या सरकारने देशातील शंभरहून अधिक जिल्ह्यांच्या विकासावर भर दिला आहे. या कार्यक्रमाला लाभलेल्या यशाने प्रेरीत होऊन, सरकारने आंकाक्षीत गट (ब्लॉक्स) कार्यक्रम देखील सुरू केला आहे.  विकासाबाबत मागे पडलेल्या देशातील या ब्लॉक्सच्या विकासावर आता विशेष लक्ष केंद्रीत केले जात आहे.

माननीय सदस्यहो,

25. आज माझे सरकार संपूर्ण देशाच्या सर्व सीमांवर आधुनिक पायाभूत सुविधा उभारत आहे.  हे काम प्राधान्याने फार पूर्वीच व्हायला हवे होते.  दहशतवाद असो वा विस्तारवाद, आज आपले सैन्य चोख प्रत्युत्तर देत आहे.

देशांतर्गत सुरक्षा बळकट करण्यासाठी माझे सरकार करत असलेल्या प्रयत्नांचे ठोस परिणाम आपल्याला दिसत आहेत.

 •आज जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षिततेची भावना आहे.

 •बंदमुळे पूर्वी ओस पडत असलेल्या बाजारपेठा आता गर्दीने  गजबजलेल्या दिसत असतात.

 •ईशान्य भारतातील  फुटीरतावादाच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे.

 •अनेक संघटनांनी (विध्वंसक) कायमस्वरूपी शांततेच्या दिशेने पावले उचलली आहेत.

 •नक्षलग्रस्त भागातील नक्षलवाद्यांचा प्रभाव आता ओसरत असून नक्षल हिंसाचारात मोठी घट झाली आहे.

माननीय सदस्यहो,

 26. भारतासाठी येणाऱ्या शतकांचे भविष्य लिहिण्याची हीच योग्य वेळ आहे.  आपल्या पूर्वजांनी आपल्याला हजारो वर्षांचा वारसा दिला आहे.  आजही आपण आपल्या पूर्वजांच्या अजोड कामगिरीचे स्मरण अभिमानाने करतो.  आजच्या पिढीनेही शतकानुशतके स्मरणात राहील असा चिरस्थायी वारसा उभा केला पाहिजे.

 त्यामुळे माझे सरकार आता एका भव्य संकल्पावर काम करत आहे.

 या संकल्पाचा पुढील 5 वर्षांचा कार्यक्रमही तयार आहे.  त्यात पुढील 25 वर्षांचा कृती आराखडा (रोडमॅप) ही आहे.  आमच्यासाठी विकसित भारताचा दृष्टीकोन केवळ आर्थिक समृद्धीपुरता मर्यादीत नाही.  आम्ही सामाजिक, सांस्कृतिक आणि सामरिक शक्तींना समान महत्त्व देत आहोत.  त्यांच्याशिवाय विकास आणि आर्थिक सुबत्ता कायमस्वरूपी राहणार नाहीत.  गेल्या दशकभरातील निर्णयही हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून घेतले गेले आहेत.  हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आणखी अनेक पावले उचलली जात आहेत.

माननीय सदस्यहो,

27. आज जगातील प्रत्येक संस्थेला भारताच्या वेगवान विकासाची खात्री आहे.  राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे मूल्यांकन भारताच्या धोरणांवर आधारीत आहे.  पायाभूत सुविधांमधील विक्रमी गुंतवणूक आणि धोरणात्मक सुधारणांमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास आणखी वाढतो आहे.  पूर्ण बहुमतासह स्थिर आणि सशक्त सरकारला भारतीयांची पसंती असल्यामुळे जगाचा आत्मविश्वासही वाढला आहे.

आज जगाला असा विश्वास वाटतो की केवळ भारतच जागतिक पुरवठा साखळी मजबूत करू शकतो.  त्यामुळेच भारतही आज या दिशेने मोठी पावले उचलत आहे.  देशात सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगांचे (एमएसएमईचे) मजबूत जाळे विकसित केले जात आहे.

माझ्या सरकारने 14 क्षेत्रांसाठी उत्पादन आधारीत प्रोत्साहन (पीएलआय) योजना सुरू केल्या आहेत.  या योजनांअंतर्गत आतापर्यंत सुमारे 9 लाख कोटी रुपयांचे उत्पादन झाले आहे.  यामुळे देशात रोजगाराच्या लाखो नवीन संधी, तसेच स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.

इलेक्ट्रॉनिक, औषध निर्माण, अन्न प्रक्रीया आणि वैद्यकीय उपकरणे क्षेत्रांनाही पीएलआयचा फायदा होत आहे.  वैद्यकीय उपकरणांशी संबंधित डझनभर प्रकल्पांमध्ये उत्पादन सुरू झाले आहे.  माझ्या सरकारने देशात 3 औषध घटकनिर्मिती केंद्रेही (बल्क ड्रग पार्कही) विकसित केली आहेत.

माननीय सदस्यहो,

28. आज मेड इन इंडिया ही भारताची स्वतंत्र जागतिक ओळख  (ब्रँड) बनली आहे.  आता, आमच्या स्वदेश निर्मितीच्या (मेक इन इंडिया) धोरणाबद्दल जग खूप उत्सुक आहे. स्वावलंबी भारताच्या आत्मनिर्भर भारत)  उद्दिष्टाचे आणि निश्चयाचे जग कौतुक करत आहे.  आज जगभरातील कंपन्या भारतात निर्माण होऊ घातलेल्या नव्या क्षेत्रांबद्दल उत्सुक आहेत.  भारतात अर्धवाहक (सेमीकंडक्टर) क्षेत्रातील गुंतवणुकीवरून हे स्पष्ट होते.  सेमीकंडक्टर क्षेत्राचा फायदा इलेक्ट्रॉनिक्स आणि वाहन उद्योग क्षेत्रांनाही होतो.

माझे सरकार ग्रीन मोबिलिटीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत आहे.  देशात गेल्या काही वर्षांत लाखो इलेक्ट्रिक वाहने तयार झाली आहेत.  आम्ही आता भारतात मोठ्या विमानांच्या निर्मितीसाठीही पावले उचलली आहेत.  उत्पादन क्षेत्रात आगामी काळात, कोट्यवधी नवीन नोकऱ्या निर्माण होतील.

माननीय सदस्यहो,

29. आज जगभरात पर्यावरणपूरक उत्पादनांना विशेष मागणी आहे.  त्यामुळे माझे सरकार, पर्यावरणावर विपरीत परिणाम होणार नाही अशा रितीने कुठलेही दोष राहू न देता उत्पादन घेण्यावर  (झिरो इफेक्ट झिरो डिफेक्टवर) भर देत आहे.  आम्ही आता हरीत ऊर्जेवर खूप लक्ष देत आहोत.

•दहा वर्षांच्या कालावधीत देशाची बिगर-जीवाश्म इंधनावर आधारित उर्जा क्षमता 81 गिगावॅट वरुन 188 गिगावॅटपर्यंत वाढली आहे.

•या कालावधीत आपली सौर उर्जा क्षमता 26 पटींनी वाढली आहे.

•त्याच प्रकारे, पवन उर्जा क्षमता दुप्पट झाली आहे.

•नवीकरणीय उर्जाविषयक स्थापित क्षमतेच्या बाबतीत आपण जगात चौथ्या स्थानावर आहोत.

•पवन उर्जा क्षमता क्षमतेच्या बाबतीत आपण चौथ्या स्थानावर आहोत.

•सौर उर्जा क्षमतेच्या बाबतीत आपण पाचव्या स्थानावर आहोत.

•भारताने वर्ष 2030 पर्यंत देशातील एकूण विद्युत उर्जा विषयक स्थापित क्षमतेच्या निम्मी क्षमता बिगर-जीवाश्म इंधनांद्वारे मिळवण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.

•गेल्या 10 वर्षांत, 11 नवे सौर उर्जा पार्क उभारण्यात आले आहेत. आणखी 9 सौर उर्जा पार्क उभारण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे.

•नुकतीच काही दिवसांपूर्वी घरांच्या छतांवर सौर उर्जा संयंत्रे बसवण्यासाठीची नवी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत, 1 कोटी कुटुंबांना मदत पुरवण्यात येणार आहे. या योजनेमुळे लोकांचे विजेचे बिलदेखील कमी होईल आणि शिल्लक राहिलेल्या विजेची उर्जा बाजारपेठेद्वारे खरेदी करण्यात येईल.

•अणुउर्जेच्या क्षेत्रात देखील वेगवान पद्धतीने काम सुरु आहे. माझ्या सरकारने 10 नव्या अणु उर्जा संयंत्रांच्या उभारणीला परवानगी दिली आहे.

•हायड्रोजन उर्जेच्या क्षेत्रात देखील भारत वेगाने वाटचाल करत आहे. आतापर्यंत आपण लडाख आणि दमण-दीव येथे दोन प्रकल्प सुरु केले आहेत.

•माझ्या सरकारने इथेनॉलच्या क्षेत्रात देखील अभूतपूर्व कामगिरी करून दाखवली आहे.पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य देखील लवकरच साध्य होईल. या उपक्रमामुळे आपल्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. सरकारी कंपन्यांनी आतापर्यंत, एक लाख कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या इथेनॉलचे उत्पादन केले आहे. या सर्व प्रयत्नांमुळे, आपल्या उर्जा विषयक गरजा पूर्ण करण्यासाठी परदेशांवर असलेले आपले अवलंबित्व कमी होईल. काही दिवसांपूर्वीच, बंगालच्या आखातातील नव्या ब्लॉकमध्ये तेल उत्पादन सुरु झाले आहे. ही देशासाठी फार मोठी कामगिरी आहे.

माननीय सदस्यहो,

30.महत्त्वाच्या खनिजांचे भूगर्भातील प्रमाण मर्यादित आहे. म्हणूनच माझे सरकार चक्राकार अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देत आहे.  भारताचे पहिले ‘वाहन भंगारात निकाली काढण्याचे धोरण’ देखील याच उद्दिष्टावर आधारित आहे.

खोल समुद्रातील उत्खननाच्या माध्यमातून खनिजे मिळण्याच्या शक्यतेची चाचपणी करणे देखील महत्त्वाचे आहे. हेच उद्दिष्ट मनात ठेवून, गहन सागरी अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानामुळे, सागरी जीवनाविषयीची आपली समज अधिक चांगली होईल. यासंदर्भातील संशोधनासाठी भारताचे ‘समुद्रयान’ काम करत आहे.

माझे सरकार भारताला जगातील अंतराळ क्षेत्रातील प्रमुख शक्ती बनवण्याच्या कार्यात गुंतले आहे. मानवी जीवन सुधारण्याचा हा एक मार्ग आहे. त्याशिवाय, या प्रयत्नांमुळे अंतराळविषयक अर्थव्यवस्थेत भारताचा वाटा वाढण्यास मदत होईल. भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचा विस्तार करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यातून अंतराळ क्षेत्रातील अनेक नव्या स्टार्ट अप उद्योगांची सुरुवात झाली आहे. भारताचे ‘गगनयान’ अवकाशात पोहोचेल तो दिवस आता फार दूर नाही.

माननीय सदस्यहो,

31.माझ्या सरकारने भारताला जागतिक पातळीवर आघाडीच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचे रूप दिले आहे. यातून कोट्यावधी युवकांना रोजगार मिळाला आहे.

चौथ्या औद्योगिक क्रांतीदरम्यान, भारत जागतिक स्तरावर आघाडीवर राहील असा आमचा प्रयत्न आहे.

माझे सरकार कृत्रिम बुद्धिमत्ता अभियानासंदर्भात काम करत आहे. यातून नव्या स्टार्ट-अप उद्योगांसाठी वाट मोकळी होईल. हे प्रयत्न, कृषी, आरोग्य तसेच शिक्षण या क्षेत्रांमध्ये क्रांतिकारक बदल घडवून आणतील.

माझ्या सरकारने राष्ट्रीय क्वांटम अभियानाला देखील परवानगी दिली आहे. क्वांटम गणनेमुळे नव्या युगातील डिजिटल पायाभूत सुविधा विकसित होतील. या क्षेत्रात देखील भारत आघाडीवर राहावा याची सुनिश्चिती करण्याच्या दृष्टीने आता काम प्रगतीपथावर आहे.

माननीय सदस्यगणहो,

32.भारतातील युवकांचे शिक्षण तसेच कौशल्य विकासासाठी माझे सरकार सतत नवनवे उपक्रम हाती घेत आहे. यासाठी, नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण आखण्यात आले आणि आता त्याची वेगवान अंमलबजावणी सुरु आहे.

या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये, मातृभाषा आणि भारतीय भाषांमधून शिक्षण घेण्यावर अधिक भर देण्यात आला आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय तसेच विधी यांसारखे विषय आता भारतीय भाषांमधून शिकवण्यास सुरुवात झाली आहे.

शालेय विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या उद्देशाने माझे सरकार देशात 14,000 ‘पीएम श्री विद्यालये’ उभारण्यासाठी कार्यरत आहे. यापैकी 6,000 हून अधिक विद्यालयांचे कामकाज सुरु झाले आहे.

माझ्या सरकारच्या प्रयत्नांमुळे देशातील शाळांतून विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी झाले आहे. उच्च शिक्षण क्षेत्रात मुलींच्या नोंदणीचे प्रमाण वाढले आहे. शिक्षणासाठी अनुसूचित जातींमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीच्या नोंदणीत सुमारे 44% वाढ झाली असून अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांच्या प्रमाणात 65% हून अधिक तर इतर मागासवर्गीय श्रेणीतील विद्यार्थ्यांच्या प्रमाणात 44% हून अधिक वाढ झाली आहे.

नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी, अटल नवोन्मेष अभियानाअंतर्गत, देशात 10,000 अटल टिंकरिंग प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत. या उपक्रमात 1 कोटीहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

वर्ष 2014 पर्यंत देशात 7 एम्स आणि 390 पेक्षा कमी वैद्यकीय महाविद्यालये कार्यरत होती तर गेल्या दशकभरात नव्याने 16 एम्स आणि 315 वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात आली आहेत.

नर्सिंग महाविद्यालये देखील स्थापन करण्यात येत आहेत.

गेल्या दहा वर्षांत, एमबीबीएस अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी उपलब्ध जागांच्या संख्येत देखील दुपटीहून अधिक वाढ करण्यात आली आहे.

माननीय सदस्यहो,

33.पर्यटन हे युवकांना रोजगार पुरवणारे मोठे क्षेत्र आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये, माझ्या सरकारने पर्यटनाच्या क्षेत्रात अभूतपूर्व कार्य केले आहे. देशांतर्गत पर्यटकांच्या संख्येसोबतच, भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे.

भारताची सातत्याने उंचावत असलेली पातळी पर्यटन क्षेत्राच्या वाढीला कारणीभूत ठरत आहे. आज संपूर्ण जगातील लोकांना भारतात येऊन नव्या गोष्टी बघायच्या आहेत आणि भारताला समजून घ्यायचे आहे. याखेरीज, उत्कृष्ट संपर्क सुविधेमुळे देखील पर्यटन क्षेत्राची व्याप्ती वाढली आहे.

देशातील विविध ठिकाणी झालेली विमानतळांची उभारणी देखील यासाठी उपयुक्त ठरली आहे. आता, ईशान्य प्रदेशाला विक्रमी संख्येने पर्यटक भेट देत आहेत. त्यानंतर, आता, अंदमान-निकोबार तसेच लक्षद्वीप या बेटांच्या संदर्भात पर्यटकांची उत्सुकता वाढलेली दिसत आहे.

माझ्या सरकारने देशभरातील तीर्थक्षेत्रे आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासावर भर दिला आहे. त्यामुळे आता भारतातील तीर्थयात्रा सुलभ झाली आहे. त्याच वेळी, भारतातील वारसा स्थळांच्या  पर्यटनाबाबत जगाची उत्सुकता वाढत आहे. गेल्या वर्षभरात 8.5 कोटी लोकांनी काशीला भेट दिली. 5 कोटींहून अधिक लोकांनी महाकालाचे दर्शन घेतले. 19 लाखांहून अधिक लोकांनी केदार धामला भेट दिली. ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्यानंतर गेल्या पाच दिवसांमध्ये 13 लाख भाविकांनी अयोध्या धाम येथे भेट दिली. भारताच्या पूर्व-पश्चिम-उत्तर-दक्षिण सर्व भागांतील तीर्थ स्थळी, सुविधांचा अभूतपूर्व विस्तार होत आहे.

भारताला बैठकी आणि विविध क्षेत्रांच्या प्रदर्शनांचे एक प्रमुख केंद्र बनवणे, हे माझ्या सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी भारत मंडपम, यशोभूमी यासारख्या सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. आगामी काळात पर्यटन हे रोजगाराचे प्रमुख साधन बनणार आहे.

माननीय सदस्यांनो,

34.देशातील तरुणांना कौशल्य आणि रोजगाराशी जोडण्यासाठी आम्ही क्रीडा अर्थव्यवस्था मजबूत करत आहोत. माझ्या सरकारने खेळ आणि खेळाडूंना अभूतपूर्व पाठबळ दिले आहे. आज भारत क्रीडा क्षेत्रातील एक मोठी शक्ती बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

खेळाडूंबरोबरच आज आम्ही खेळाशी संबंधित इतर क्षेत्रांवरही भर देत आहोत. आज राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची स्थापना झाली आहे. आम्ही देशात अनेक उत्कृष्टता केंद्रे विकसित केली आहेत. त्यामुळे तरुणांना खेळ हा व्यवसाय म्हणून निवडण्याची संधी मिळेल. क्रीडा साहित्य उद्योगालाही सर्व प्रकारची मदत पुरवली जात आहे. गेल्या 10 वर्षांत भारताने अनेक खेळांशी संबंधित आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे यशस्वीपणे आयोजन केले आहे.

देशातील तरुणांना ‘विकसित भारताच्या’ उभारणीमध्ये योगदान देण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये कर्तव्याची आणि सेवेची भावना निर्माण करण्यासाठी ‘मेरा युवा भारत’ संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. आतापर्यंत जवळजवळ एक कोटी युवक या उपक्रमात सहभागी झाले आहेत.

माननीय सदस्यांनो,

35.अस्थिरतेच्या काळात मजबूत सरकार असण्याचा फायदा आपण पाहिला आहे. गेल्या 3 वर्षात जगात अशांतता दिसून येत आहे. जगाच्या विविध भागांमध्ये अनेक संघर्ष सुरू आहेत. संघर्षाच्या या काळात माझ्या सरकारने भारताला विश्व-मित्र म्हणून प्रस्थापित केले आहे. भारताच्या विश्व-मित्र या भूमिकेमुळेच आज आपण ग्लोबल साउथचा आवाज बनलो आहोत.

गेल्या 10 वर्षांत, आणखी एक पारंपरिक विचारसरणी बदलली आहे. यापूर्वी मुत्सद्देगिरीशी संबंधित घडामोडी दिल्लीच्या बंदिस्त प्रदेशापर्यंत मर्यादित होत्या. माझ्या सरकारने यामध्ये जनतेचा थेट सहभागही सुनिश्चित केला आहे. याचे उत्तम उदाहरण भारताच्या G-20 अध्यक्षपदाच्या काळात आपण पाहिले. भारताने G-20 ला ज्या प्रकारे जनतेशी जोडले, ते अभूतपूर्व होते. देशभरात आयोजित कार्यक्रमांच्या माध्यमातून जगाला भारताच्या खऱ्या क्षमतेची ओळख करून देण्यात आली. जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतात प्रथमच इतक्या मोठ्या स्तरावरील आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भारतात झालेल्या ऐतिहासिक G-20 शिखर परिषदेची संपूर्ण जगाने प्रशंसा केली. विसंवादाच्या वातावरणातही दिल्ली घोषणापत्राला एकमताने स्वीकृती मिळाली, ही गोष्ट ऐतिहासिक आहे. ‘महिलांच्या नेतृत्वाखालील विकास’ ते पर्यावरणीय समस्यांबाबतचा भारताचा दृष्टीकोन हा या घोषणापत्राचा पाया आहे.

G-20 मध्ये आफ्रिकन युनियनला कायमचे सदस्यत्व मिळवून देण्याच्या आमच्या प्रयत्नांची देखील प्रशंसा झाली. या परिषदेदरम्यान भारत - मध्य पूर्व - युरोप कॉरिडॉर विकसित करण्याची घोषणा झाली. या कॉरिडॉरमुळे भारताची सागरी क्षमता आणखी मजबूत होईल. जागतिक जैव-इंधन गटाचा शुभारंभ हा देखील एक मोठा कार्यक्रम आहे. ही पावले जागतिक समस्या सोडवण्यामध्ये भारताची भूमिका मजबूत करत आहेत.

माननीय सदस्यांनो,

36.जागतिक विवाद आणि संघर्षाच्या या काळातही माझ्या सरकारने भारताच्या हिताचे मुद्दे जगापुढे ठामपणे मांडले आहेत. भारताच्या परराष्ट्र धोरणाची आजची व्याप्ती भूतकाळातील मर्यादांच्या पलीकडे गेली आहे. आज भारत अनेक जागतिक संस्थांचा सन्माननीय सदस्य आहे. आज भारत दहशतवादाविरोधात आवाज उठवण्यामध्ये जगात आघाडीवर आहे.

भारत आज मानवतेपुढील संकटाचा प्रबळपणे सामना करतो, आणि त्यासाठी पुढाकार घेतो. आज जगात कुठेही संकट आले तरी भारत तत्परतेने प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करतो. माझ्या सरकारने जगभरात काम करणाऱ्या भारतीयांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण केला आहे.

ज्या ज्या ठिकाणी संकट आले, तिथे आम्ही ऑपरेशन गंगा, ऑपरेशन कावेरी, वंदे भारत यांसारख्या मोहिमा राबवून प्रत्येक भारतीयाला सुरक्षितपणे बाहेर काढले आहे.

योग, प्राणायाम आणि आयुर्वेद या भारतीय परंपरांचा संपूर्ण जगात प्रचार करण्यासाठी माझ्या सरकारने सातत्याने प्रयत्न केले आहेत. गेल्या वर्षी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात 135 देशांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन योगासने केली होती. हा एक विक्रमच आहे. माझ्या सरकारने आयुष उपचार पद्धतींच्या विकासासाठी नवीन मंत्रालय स्थापन केले. जागतिक आरोग्य संघटनेचे पहिले जागतिक पारंपरिक औषध केंद्र भारतात स्थापन होत आहे.

माननीय सदस्यांनो,

37. मानवी संस्कृतीच्या इतिहासात असे काही प्रसंग येतात, जे येणाऱ्या शतकांचे भविष्य घडवतात. भारताच्या इतिहासातही असे अनेक निर्णायक क्षण आले आहेत. यावर्षी 22 जानेवारीला देशाने असाच एक युग प्रवर्तनाचा क्षण पाहिला. अनेक शतकांच्या प्रतीक्षे नंतर आता रामलल्ला अयोध्येतील त्यांच्या भव्य मंदिरात विराजमान झाले आहेत. या मागे आपल्या कोट्यवधी देशवासीयांच्या आकांक्षा आणि विश्वास होता, आणि त्यांचा हा संकल्प सलोख्याने पार पडला.

माननीय सदस्यांनो,

38. आपण सर्वजण कोट्यवधी भारतीयांच्या आकांक्षांचे प्रतिनिधित्व करता. आज शाळा-महाविद्यालयांतील तरुणांची स्वप्ने पूर्णपणे वेगळी आहेत. अमृत पिढीची स्वप्ने पूर्ण करण्यामध्ये कोणतीही कसर राहू नये, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. विकसित भारत आपल्या अमृत पिढीची स्वप्ने पूर्ण करेल. यासाठी, आपण सर्वांनी एकत्र येऊन या प्रयत्नांमध्ये यश मिळवायला हवे.

माननीय सदस्यांनो,

39. आदरणीय अटलजी म्हणाले होते-

अपनी ध्येय-यात्रा में,

हम कभी रुके नहीं हैं।

किसी चुनौती के सम्मुख

कभी झुके नहीं हैं।

माझे सरकार 140 कोटी देशवासीयांची स्वप्ने पूर्ण करण्याची हमी देऊन पुढे जात आहे. मला पूर्ण विश्वास आहे की हे नवीन संसद भवन भारताच्या महत्त्वाकांक्षी प्रवासाला बळ देत राहील आणि नवीन आणि निरोगी परंपरा निर्माण करेल.

2047 या वर्षाचे साक्षीदार होण्यासाठी बरेच मित्र या सभागृहात नसतील. पण आपला वारसा असा असायला हवा, की भावी पिढ्या आपली आठवण काढतील.

आपल्या सर्वांना शुभेच्छा!

धन्यवाद!

जय हिंद!

जय भारत!          

JPS/ST/HA/NM/SonalC/Shraddha/Radhika/Vasanti/Ashutosh/Sanjana/Rajashree/PM

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 2000837) Visitor Counter : 160