शिक्षण मंत्रालय

केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री, डॉ. सुभाष सरकार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आगळावेगळा संवादात्मक कार्यक्रम - "परीक्षा पे चर्चा 2024" याविषयीच्या पत्रकार परिषदेला केले संबोधित


परिक्षा पे चर्चा कार्यक्रमाच्या 7 व्या आवृत्तीसाठी MyGov पोर्टलवर 2.26 कोटी लोकांनी केली नोंदणी – डॉ. सुभाष सरकार

Posted On: 28 JAN 2024 11:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 जानेवारी 2024

 

केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री, डॉ. सुभाष सरकार यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आगळावेगळा संवादात्मक कार्यक्रम - परीक्षा पे चर्चा (पीपीसी) या संदर्भातल्या पत्रकार परिषदेला संबोधित केले. या कार्यक्रमात देशभरातील आणि परदेशातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून परीक्षांमुळे निर्माण होणाऱ्या तणावावर मात करण्यासाठी आणि जीवन एक सण म्हणून साजरे करण्यासाठी संवाद साधतील.

शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागातर्फे गेल्या सहा वर्षांपासून हा उपक्रम यशस्वीपणे राबविला जात असल्याचे यावेळी डॉ. सरकार यांनी यावेळी सांगितले. परीक्षा पे चर्चाच्या पहिल्या तीन आवृत्त्या नवी दिल्ली येथील टाऊन-हॉल येथे संभाषण स्वरूपात आयोजित करण्यात आल्या होत्या. याची चौथी आवृत्ती कोविड-19 महामारीमुळे दूरदर्शन आणि सर्व प्रमुख टीव्ही चॅनेलद्वारे ऑनलाइन आयोजित केली गेली. 

परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाची पाचवी आणि सहावी आवृत्ती

नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम येथे पुन्हा टाऊन-हॉल स्वरूपात आयोजित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मागील वर्षी (2023)  सुमारे 31.24 लाख विद्यार्थी, 5.60 लाख शिक्षक आणि 1.95 लाख पालकांनी परीक्षाविषयक स्पर्धांमध्ये उत्साहाने भाग घेतला होता.

डॉ. सरकार यांनी असेही सांगितले की,”परिक्षा पे चर्चा च्या 7 व्या आवृत्तीसाठी MyGov पोर्टलवर मोठ्या प्रमाणात म्हणजेच तब्बल 2.26 कोटी लोकांनी  नोंदणी केली आहे.” ते  पुढे म्हणाले की, “या प्रतिष्ठित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधण्यासाठी उत्सुक असलेल्या देशभरातील विद्यार्थ्यांमधील व्यापक उत्साह यातून दिसून येतोय.”

डॉ. सरकार म्हणाले की, “यावर्षी परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम टाऊन हॉल स्वरूपात 29 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून भारत मंडपम, आयटीपीओ, प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे आयोजित केला जाईल. या कार्यक्रमात सुमारे 3000 सहभागीं पंतप्रधानांबरोबर संवाद साधतील.

प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील दोन विद्यार्थी आणि एक शिक्षक आणि कला महोत्सवातील विजेत्यांना मुख्य कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूल्स (इएमआरएस) च्या शेकडो विद्यार्थ्यांनी स्थापनेनंतर प्रथमच या कार्यक्रमात भाग घेतील.

त्यांनी माहिती दिली की या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इयत्ता 6 वी ते 12 मधील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी 11 डिसेंबर 2023 ते 12 जानेवारी 2024 या कालावधीत MyGov पोर्टलवर ऑनलाइन बहुपर्यायी प्रश्नमंजुषा स्पर्धा (एमसीक्यू) आयोजित करण्यात आली होती. सहभागींची निवड MyGov पोर्टलवर त्यांच्या प्रश्नांच्या आधारे करण्यात आली. त्यांना एक विशेष परीक्षा पे चर्चा किट देण्यात आली, ज्यामध्ये पंतप्रधानांनी लिहिलेले हिंदी आणि इंग्रजी भाषेतील एक्झाम वॉरियर्स पुस्तक आणि प्रमाणपत्र समाविष्ट आहेत.

ते म्हणाले की, परिक्षा पे चर्चा हा युवकांसाठी तणावमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील 'परीक्षा योद्धा' या मोठ्या चळवळीचा एक भाग आहे.

ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाज यांना एकत्र आणून प्रत्येक मुलाचे अद्वितीय व्यक्तिमत्त्व साजरे केले जावे, त्यांना प्रोत्साहन दिले जावे आणि त्यांचे संगोपन केले जावे, असे वातावरण निर्माण करण्याच्या प्रयत्नातून प्रेरित झालेली ही चळवळ आहे.

ते पुढे म्हणाले की, “हे लक्षात घेऊन 12 जानेवारी 2024 युवा दिनापासून 23 जानेवारी 2024 पर्यंत मुख्य कार्यक्रमाची वातावरण निर्मिती साठी शालेय स्तरावर मॅरेथॉन धावणे, संगीत स्पर्धा, मीम स्पर्धा यांसारख्या आनंददायी शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात विविध स्पर्धा, पथनाट्य, विद्यार्थी-निवेदक-विद्यार्थी-पाहुणे चर्चा आदींचा समावेश होता.”

ते म्हणाले की, “23 जानेवारी 2024 रोजी देशभरातील 774 जिल्ह्यांमधील 657 केंद्रीय विद्यालये आणि 122 नवोदय विद्यालयांमध्ये (एनव्हीएस) देशव्यापी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या मोठ्या कार्यक्रमात 60 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता, ज्याची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या Exam Warriors पुस्तकाच्या परीक्षा मंत्रांवर आधारित होती.या चित्रकला स्पर्धेत विद्यार्थी व शिक्षकांनी मोठ्या उत्साहाने व उत्साहाने सहभाग घेतला.

 

* * *

Jaydevi PS/G.Deoda/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2000834) Visitor Counter : 46